पुरवठा घेणाराही अॅडव्हान्स ऑथॉरिटीकडे निर्णयासाठी अर्ज करू शकतो [ ऑगस्ट २०२३ ]
- Vyapari Mitra
- Aug 14, 2023
- 2 min read
पुरवठा घेणाराही अॅडव्हान्स ऑथॉरिटीकडे निर्णयासाठी अर्ज करू शकतो

मुंबई विक्रीकर कायद्यात कलम 52 आणि व्हॅट कायद्यात कलम 56 खाली करदात्याच्या दृष्टीने या कलमातील तरतुदींचा उपयोग करून तो नमूद व्यवहारांच्या बाबतीत कायद्याखालील आपल्या जबाबदारीच्या बाबतीत अधिकृत निर्णय घेऊ शकत होता. त्यामुळे त्या बाबतीत निश्चित अधिकृत निर्णय घेऊन त्याबाबतीत दुमत झाल्यास होणारे नुकसान टाळता येत होते.
उपरोक्त तरतुदीला अनुसरून जीएसटी कायद्यातही अशाच बाबतीत उपयुक्त असे कलम 97 आहे. या कलमानुसार त्यामध्ये नमूद व्यवहारांच्या बाबतीत तो कायद्यातील जबाबदारी अन्वये अधिकृत निर्णय घेऊ शकतो.
अधिकृत निर्णय घेण्यासाठी अर्ज कोण करू शकतो, या बाबतीत करदात्यांचे दोन भाग म्हणजे खरेदी करणारा (Recipient) आणि पुरवठा करणारा (Spplier) असे करून विचार करणे जरूरीचे आहे. यातील कलम 97(1) मध्ये अर्जदार (Applicant) असा उल्लेख आहे. कलम 95(सी) मध्ये अर्जदाराची व्याख्या दिलेली आहे. या व्याख्येप्रमाणे “नोंदित असलेली किंवा नोंदणी करू इच्छिणारी व्यक्ती’’ अशी तरतूद आहे.
सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी गुजरात अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे त्यांच्या कामाच्या बाबतीत जीएसटी भरावा लागेल किंवा नाही असा मुद्दा उपस्थित केला होता. सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे पुरवठा करणारे नसून काम करून घेणारे आहे. या मुद्यावर ऑथॉरिटीने निर्णय दिला की, ‘अर्जदार काम करून घेणारा आहे, पुरवठा करणारा नाही.’ त्यामुळे कलमातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करणारी व्यक्ती अधिकृत निर्णय घेण्यासाठी अर्ज करू शकते. (Applicant is recipient if the services and not supplier of such services accordingly, the application is not liable for admission and therefore rejected...) म्हणून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. (Surat Municipal Corporation - GST AAR Gujrat Order No. GUJ / GAAR / ADM / 2020 / 120 dated 30.12.2020)
गुजरात अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने वरील केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे, त्याप्रमाणेच तामिळनाडू अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय या केसमध्ये निर्णय दिलेला आहे. [ ऑर्डर नं. 04/एएआर/2021 ता. 26.2.2021 ]
वेस्ट बंगाल ऑथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगने 9 फेब्रुवारी 2023 रोजी वरील दोन निर्णयात जो निर्णय दिलेला आहे, त्याचप्रमाणे म्हणजे काम करून घेणारा त्याच्या कामावर कर भरावा लागेल की नाही या बाबतीत अधिकृत निर्णय घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही. कारण तो पुरवठादार नाही. [...We are therefore of the view that in the subject application the applicant cannot seek and advance rulling in relation to the supply where he is a recipient of services ] [ अनमोल इंड. लि. 26 डब्ल्यूबीए-एएआर/ 2022-23 ता. 9.2.2023) ]
सुरत, तामिळनाडू आणि वेस्ट बंगाल अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने वर उल्लेख केल्याप्रमाणे जो निर्णय दिलेला आहे, त्या बाबतीत वेस्ट बंगाल ऑथॉरिटीच्या निर्णयाविरुद्ध करदात्याने हायकोर्टात रिट दाखल केले. करदात्याचे म्हणणे होते की, अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे करदायित्वाच्या बाबतीत कलम 97(2) मध्ये नमूद केलेल्या मुद्यांच्या बाबतीत पुरवठा करणार्या करदात्याबरोबर पुरवठा घेणारा करदाताही अर्ज करू शकतो.
हायकोर्टाने कलम 95(सी), कलम 97(2)(बी) मधील तरतूद पाहता पुरवठा करणार्या करदात्याबरोबर पुरवठा घेणारा करदाताही अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे कलम 97(2) मधील बाबींच्या बाबतीत अधिकृत निर्णय घेण्यासाठी अर्ज करू शकतो, असा निकाल दिला.
कोलकाता हायकोर्टाने अधिकृत निर्णय घेण्यासाठी अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे करावयाच्या मुद्यावर स्पष्ट निर्णय दिलेला आहे की, अधिकृत निर्णयासाठी पुरवठा करणार्याबरोबर पुरवठा घेणार्या व्यक्तीलाही अर्ज करता येतो.
[ संदर्भ : अनमोल इंडस्ट्रिज लि. वेस्ट बंगाल ऑथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (2023) 150 टॅक्समन.कॉम पान 3 (कोलकाता) जीएसटी केसेस व्हॉ. 97(4) पान ए-11 ]