top of page

“अखेरचा हा तुला दंडवत... सोडून जाते गाव’’ श्री. प्रसाद घारे [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 8, 2023
  • 4 min read

ree

श्री. प्रसाद घारे, पुणे 93730 05448 prasad.ghare@gmail.com (मुक्त पत्रकार)



परदेशाचे आकर्षण भारतीयांना नवे नाही. आपण परदेशी वस्तूच फक्त वापरतो असे स्वाभिमानाने सांगणारे भारतीय आजूबाजूला आपल्याला दिसतील. शिक्षणासाठी तरुणाईची पावले परदेशी विद्यापीठांच्या दिशेने पडताना दिसतात, हे आता नित्याचेच झाले आहे. वर्षभरापूर्वी रशिया-युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा आपल्याला कळले की वैद्यकीय शिक्षणासाठी कित्येक भारतीय मुले/मुली युक्रेनला गेली होती. त्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकारला एक खास मोहीम आखावी लागली होती हे आपल्याला नक्कीच आठवत असेल. आज या घडीला जगभरातील विविध देशांमधे शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यवसाय या निमित्ताने तीन कोटीपेक्षा जास्त भारतीय लोक स्थलांतरित झाले आहेत. शिक्षण, उद्योग, व्यवसायासाठी काही वर्षे परदेशात जायचे. काही वर्षांनी अनुभवाची शिदोरी कमरेला बांधून परत मायदेशी परतायचे आणि आपल्या परदेशी ज्ञानाच्या भांडवलावर येथे एखादा उद्योग, व्यवसाय सुरू करायचा असा एक प्रघात पडलेला होता. अजूनही काही प्रमाणात तो आहे. आता बक्कळ पैसे मोजून विविध देशांचे नागरिकत्व घ्यायचे असा एक नवा ट्रेंड भारतातील ‘हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल’(एचएनआय) म्हणजे कोट्याधीशांमध्ये आला आहे. यासंबंधी ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रामध्ये (Indians go west, take up residence by investment 20th February 2023) सरकारी आकडेवारीचा दाखला देऊन एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे. ही बातमी नुसती धक्कादायक नाही तर खाडकन डोळे उघडायला लावणारी आहे. याला धोक्याची घंटा वाजू लागली आहे असेही म्हणायला हरकत नाही. अमेरिका, कॅनडा, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, माल्टा आणि पोर्तुगाल या देशांनी मध्यंतरी नागरिकत्व मिळविण्यासाठी खर्पींशीीांशपीं झीेसीरााश ची घोषणा केली होती. या गुंतवणूक योजनेनुसार जी भारतीय व्यक्ती 8 ते 10 कोटी रुपये आगामी 4-5 वर्षात या देशांमध्ये गुंतवणूक करेल आणि या देशातील किमान दहा स्थानिकांना (मूळ निवासी) रोजगार उपलब्ध करून देईल अशा व्यक्तीला या देशाचे नागरिकत्व बहाल केले जाईल. या बरोबर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला देखील येथे राहता येईल, शिक्षण घेता येईल अशी ही योजना आहे. 2022 या एका वर्षात भारतातील 2 लाख 25 हजार नागरिकांनी या योजनेअंतर्गत वर उल्लेख केलेल्या देशांमध्ये स्थलांतर केले आहे आणि त्यांचे नागरिकत्व घेतले आहे. विशेष म्हणजे या सगळ्या व्यक्ती कोट्याधीश या गटात मोडणार्‍या आहेत. या कोट्याधीशांमध्ये आयटी प्रोफेशनल, इंजिनिअर, डॉक्टर अशांची संख्या जास्त आहे.

ही बातमी वाचली आणि मला जगजितसिंग यांची गझल आठवली
“चिठ्ठी ना कोई संदेस, जाने वो कौनसा देस
जहाँ तुम चले गये ! इस दिल से लगाकर ठेच!
जाने वो कौनसा देस ! जहाँ तुम चले गए’’

असे घडण्यामागची नेमकी कारणे काय याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, परदेशातील शिक्षण व्यवस्था, जीवनशैली, सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि प्रदूषण विरहित मोकळी हवा यासाठी या मंडळींनी आपल्या देशाकडे पाठ फिरवून परदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ईबी5 व्हिसानुसार पोर्तुगालच्या ग्लोडन व्हिसानुसार, ऑस्ट्रेलियाच्या ग्लोबल टॅलेंट इंडिपेंडंट व्हिसाद्वारे, माल्टाच्या परमनंट रेसिडेन्सी प्रोग्रॅमनुसार आणि ग्रीसच्या इन्व्हस्टमेंट प्रोग्रॅमद्वारे ही सर्व मंडळी ठराविक पैसे मोजून या देशात स्थायिक होण्यासाठी गेली आहेत. या देशांमध्ये पोर्तुगालमध्ये स्थलांतरित होणार्‍या भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. ज्या पोर्तुगीजांनी गोव्यावर शेकडो वर्षे राज्य केले, तेथील जनतेला छळले, त्यांना गोव्यातूृन हाकलून लावण्यासाठी गोवा मुक्ती संग्राम करावा लागला त्यात अनेकांना आपले प्राण पणाला लावावे लागले त्या देशात भारतीय लोक स्थायिक होण्यासाठी जात आहेत याला काय म्हणायचे? पोर्तुगालमध्ये स्थायिक झाल्यावर त्यांचा व्हिसा नागरिकांना दिला जातो. या व्हिसाद्वारे जगातील 150 देशात प्रवास करणे सहज शक्य होते. या ‘गाजरा’ला तर आपले भारतीय भुलले नाहीत ना हे बघायला हवे. पूर्वी चीन आणि मेक्सिको या देशातील नागरिक जगभरात स्थलांतरित होत होते. अन्य देशांच्या तुलनेत या दोन देशांचे नागरिक आपल्या मातृभूमीला कायमचा रामराम करून अन्य देशात स्थायिक व्हायचे आता यामध्ये भारतीयांचा समावेश व्हायला लागला आहे. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणचे (खाउजा) वारे आपल्या देशात 1990-91 पासून वहायला सुरूवात झाली. या घटनेला आता 32 वर्षे झाली. या ‘खाउजा’चा सर्वाधिक फायदा श्रीमंत वर्गाला झाला. त्यामुळे हे श्रीमंतांचे गर्भश्रीमंत म्हणजे ‘एचएनआय’ झाले. सन 2021 मध्ये भारतात अशा गर्भश्रीमंतांची संख्या ही 3 लाख 47 हजार इतकी होती. यापैकी सर्वाधिक गर्भश्रीमंतांची संख्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, हैद्राबाद, पुणे, सुरत, अहमदाबाद, चेन्नई आणि गुडगाव या 10 शहरात आहे. यामधील बहुतांशी भारतीय जनता “पैसे मोजा, नागरिकत्व घ्या’’ या योजनेद्वारे वर उल्लेख केलेल्या देशात कायमचे स्थलांतरित होण्यासाठी गेली आहेत. विशेष म्हणजे भारतात अशा ‘एचएनआय’ ची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसर्‍या बाजूला गरीब आणखी गरीब होत आहेत.

हे काय गूढ आहे हे कळायला मार्ग नाही. आपल्या देशाला रामराम करून परदेशात स्थायिक होणार्‍या नागरिकांची काही आकडेवारी पुढे दिलेली आहे. ही आकडेवारी सरकारनेच प्रसिद्ध केलेली आहे ती अशी :

साल स्थलांतरीत भारतीयांची संख्या

2011 1,20,000

2012 1,20,000

2013 1,25,000

2014 1,25,000

2015 1,25,000

2016 1,40,000

2017 1,20,000

2018 1,20,000

2019 1,40,000

2020 80,000

2021 1,60,000

2022 2,25,000

ही आकडेवारी चिंताजनकच आहे. जी मंडळी देशासाठी ‘Creation of Wealth’ संपत्तीची निर्मिती करतात अशा व्यक्ती देश सोडून जात आहेत. सरकारला अजून जाग आली आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. देश सोडणार्‍या या व्यक्तींशी किमान संवाद साधून ते हा निर्णय का घेत आहेत हे जाणून घ्यायला हवे. म्हणजे आपल्याला आवश्यक त्या सुधारणा त्वरित करता येतील. नुसती सरकारच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही. अशी बोटे मोडणे प्रत्येक भारतीयाला सहज शक्य आहे. परदेशात शिकून भारतात परत येऊन आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या समाजाला, देशाला व्हावा असा विचार करणार्‍या अनेक मान्यवर व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर या देशात आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि या हुशार व्यक्तींनीच भारताला आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी हातभार लावला आहे. आगामी काळात भारताला ‘आत्मनिर्भर’ आणि जगाचे नेतृत्व करायचे असेल तर ‘पैसे मोजून स्थलांतरित’ होणार्‍यांना थांबवायला हवे. आपला देश शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण सुरक्षितता या बाबतीत अव्वल कसा होईल याचा ध्यास प्रत्येक भारतीयाने घेतला पाहिजे. हा देश ‘सुजलाम् सुफलाम’ करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची आहे हे आपण विसरलो आहोत हेच खरे आहे. केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही. हे सरकार आपणच निर्माण करतो/निवडून देतो हे लक्षात ठेवावे. या स्थलांतरितांची ही बातमी वाचून मला लता मंगेशकर यांच्या आवाजातील एक गाणे आठवले,

“अखेरचा हा तुला दंडवत सोडुन जाते गाव
तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले
आता हे परी सारे सरले, उरलं मागं नाव
सोडून जाते गाव, अखेरचा हा तुला दंडवत’’
 
 
bottom of page