top of page

अस्तित्वाकरता व्यायाम श्री.श्रीरंग हिर्लेकर [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 4, 2023
  • 4 min read

Updated: Apr 5, 2023


ree

श्री. श्रीरंग हिर्लेकर, अमरावती

९४२२१ ११८९३




चराति चरतो भग:

प्रास्ताविक : वरील वचनाचा सरळ अर्थ असा की चालणार्‍याचे भाग्य चालते. मला मात्र आज त्याचा लाक्षणिक अर्थ म्हणजे हालचाल आणि त्यातून प्रगतीच नव्हे तर अस्तित्व असे अभिप्रेत आहे. हे अस्तित्व कसे तर अस्ति म्हणजे केवळ आहे असे नाही तर जे आपल्या वैशिष्टयांमुळे, सुदृढतेने सर्वांत उठून दिसते-निराळे दिसते आणि उज्ज्वल किंवा ओजस्वी असून प्रभावी दिसते ते.

थांबला तो संपला हे अक्षरश: खरे आहे. असे होते हे व्यवहारात तर सर्व बघतातच पण अगदी डार्विनपासून सर्वांनी हेच निरनिराळ्या पद्धतीने सांगितले आहे. म्हणून जिवंत असेपर्यंत ही हालचाल सुरू ठेवली तर आयुष्यही लांबते आणि ते सुखावहही होते. स्वत:लाही होते आणि समाजालाही होते.

ही शारीरिक हालचाल अगदी लहान बाळापासून सुरू होते ती आयुष्याच्या संध्याकाळी आद्यशंकराचार्य त्यांच्या चर्पटपंजरीत म्हणतात तसे अंगं गलितं... अशी सर्व गात्रे शिथिल होऊन दिवसातला अधिकातील अधिक वेळ अंथरुणावर पडून राहण्याची वेळ येते तोपर्यंत आणि तेथेही सुरू ठेवावी लागते. लहान बाळही स्वत: काही करू शकत नाही आणि अंथरुणावरचे वृद्ध शरीरही काही हालचाल करू शकत नाही. अशावेळेस त्यांच्याकडून ठराविक पद्धतीने शरीराची हालचाल योग्य रितीने करवून घेतली तर ते त्यांना आणि घरातील सर्वांना फायद्याचे ठरते.

मात्र जे स्वत:च्या बळावर काही करू शकतात तेही अनेकदा व्यायामाची टाळाटाळ करतात. कोणी ‘आम्हाला तसेही भरपूर मेहनतीचे काम असल्याने आमचा व्यायाम आपोआप होतो-निराळा करण्याची आवश्यकता नाही’, असे म्हणतात, तर कोणी करतात पण स्वत:च्याच मर्जीप्रमाणे आणि अर्धवट ज्ञानानुसार. त्यांना फायदा होणे तर दूरच पण चांगल्या शरीराचे नुकसानच होण्याचा संभव असतो.


1) व्याख्या आणि प्रयोजन :

आपण आधी व्यायाम या शब्दाची व्युत्पत्ती किंवा व्याख्या आणि त्यातून ध्वनित झालेले प्रयोजन बघू. शरीर घटक आणि अवयव यांना दीर्घता येणे, त्यांचा विस्तार आणि त्यातून विकास होणे हे ज्या शिस्तबद्ध क्रिया आणि हालचाली यातून होते त्या क्रिया म्हणजे व्यायाम. व्यायामो दैर्घ्यम् किंवा वि +आयाम म्हणजे व्यायाम (आयाम म्हणजेच दीर्घता हे लक्षात घ्यावे.) चरकाचार्य तर त्यांच्या ग्रंथात (सूत्रस्थान 7-31) व्यायामाची महती सांगताना लिहितात-

शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी ।
देह व्यायामसंख्याता मात्रेयां तां समाचरेत् ॥

म्हणजे शरीराला लाभदायक, दृढता देणारी आणि बळ देणारी अशी क्रिया म्हणजेच व्यायाम.


2) व्यायामापासून लाभ :

अर्थात हे लाभ, ही दृढता आणि हे बळ योग्य, प्रमाणात आणि चिरस्थायी असणे आवश्यकच आहे. निरोगी शरीराची लक्षणे-किंबहुना व्याख्याच सांगतांना वाग्भट लिहितात -

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तो ऽ ग्निर्मेदस: क्षय:।
विभक्त्तघन गात्रत्वं व्यायामादुपजायते॥ सू. अ. 2

शरीराला चपळता येणे, कोणत्याही क्रियेला समर्थ असणे, पचनशक्त्ती प्रमाणात असणे, शरीरावर अनावश्यक चरबी-मेद स्थूलता नसणे आणि अवयवांची रेखीवता असणे हा अर्थ यांतून सूचित होतो. मला येथे सुंदरकांड या स्तोत्रातील हनुमानाचे स्मरण होते. योग्य व्यायामाने त्याने इतके सौष्ठव पूर्ण आणि पिळदार शरीर कमावले की त्याचे नावच सुंदर असे रूढ झाले. अशी ही सुंदरता केवळ वैयक्तिक किंवा शारीरिक इतकीच सीमित राहत नाही तर सामाजिक स्तरावरही वर्तणुकीचे सौंदर्य निर्माण होते. या लेखात मात्र आपण वैयक्तिक स्तरावरच विचार करणार आहोत.

3) दैनंदिन व्यवहारातून व्यायामाला सुट्टी :

आधुनिक काळात आपल्या दैनंदिन कामांच्या पद्धती बदलाव्या लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे. सर्वच जुने चांगले आणि नवीन ते वाईट असेही मला म्हणावयाचे नाही पण अनेकदा या नवीन सवयी आपल्याला घातक ठरत आहेत. आपण चालणे विसरलो, सायकलवर बसणे कमीपणाचे वाटू लागले आणि 5 मिनिटांच्या अंतरावरही मोटरसायकल शिवाय जात नाही. साधी सायकल दुरावली आणि हेल्थ क्लबमधील महागडी सायकल आपण हौसेने जवळ करतो. शुद्ध आणि मोकळी हवा देणार्‍या खिडक्या प्रायव्हसी हवी म्हणून बंद करतो आणि एअर कंडिशनरच्या अंती त्रासदायक अशा वातावरणात राहतो. ऑफिसमधील टेबलखुर्ची डायनिंग हॉलमध्ये आली. मांडी घालून खाली बसणे हे कमीपणाचे वाटू लागले. यात पचनावर तर परिणाम झालाच पण साठीच्या वयातच हातपाय कडक झाले, लाखो रूपये खर्च करून नैसर्गिक गुडघे बदलणे ही प्रतिष्ठा झाली. वेळ आणि कष्ट कमी व्हावेत म्हणून अनेक आधुनिक उपकरणे आपल्या घरात आली. लिफ्ट शब्दाचा अर्थच मुळी वर उचलणे आहे. आपण मात्र ती वरच्या मजल्यावरून खाली यायचे असेल तरी वापरतो. जो परोक्ष व्यायाम आपल्याला कामांमधून होत होता तो आपणच बंद केला व सांधेदुखी ओढवून घेतली. सौख्य आणि लाड यांच्यातील सीमारेषाच संपली. यामुळे कष्टांची आणि त्यातून आपोआप होणार्‍या व्यायामाची सवयच काय पण जाणीवही नवीन पिढीला न राहिल्याने तरुणांचे शारीरिकच काय पण मानसिक आरोग्यही ढासळले. फळ पूर्ण पिकले की ते स्वाभाविकपणे वृक्षापासून स्वतंत्र होते. याच पद्धतीने नैसर्गिक डिलिव्हरी होते. पण हा प्रकार आता जवळजवळ संपल्यातच जमा आहे. घरकामांचा अतिरेक नको पण योग्य आहार-विहार आणि प्रमाणात घरकामे करण्याची सवय असेल तर बाळंतपणाच्या वेदना (शारीरिक आणि मानसिक)सहन करण्याची नैसर्गिक शक्ती (Potential) आपोआप प्रकट होते आणि सिझरिनची वेळ येत नाही. बेड-रेस्ट तर हार्ट-पेशंटलासुद्धा चुकीची आहे. त्यालाही चालण्याचा व्यायाम उपयुक्त्त आहे.

4) शरीर प्रकृती आणि प्रवृत्ती :

आयुर्वेदाने वात, पित्त, आणि कफ असे प्रकृतीचे 3 प्रकार व त्यानुसार 3 पद्धतीच्या शरीर धारणा, त्यांचे शरीर गुणधर्म आणि सात्विक, इतकेच नव्हे तर राजस अथवा तामस अशा 3 मनोवृत्तीही विशद केल्या आहेत. त्यामुळे या विविध पद्धतीच्या व्यायामातून आपापल्या प्रकृती आणि प्रवृतीनुसार योजना करणे चांगले. शरीर स्वास्थ्य हाच प्रत्येकाचा उद्देश असला तरी कोणी कोणता व्यायाम करावा व कोणता करू नये हे सांगितले आहे. प्रकृती आणि प्रवृत्ती व्यतिरिक्त व्यायामाला व्यक्तिचे वय, लिंग,आरोग्य हे सापेक्षतेने बघणे आवश्यक आहे. हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रवृत्ती ही प्रकृतीतूनच उद्भवते.


5) व्यायामाचे प्रयोजन :

म्हणजे स्थिर, चल, लवचिकता देणारे आणि कठिण परिश्रमांकरता शरीराला मदत देणारे असे म्हणता येतील. स्थिर आणि तरिही व्यायाम हा कोणाला शब्दभ्रम वाटेल. प्रत्येक प्रकाराच्या व्यायामाचे प्रयोजन आणि परिणाम निरनिराळे आहेत. शारीरिक दोष दूर करणे हे तर महत्वाचे व्यायामाचे प्रयोजन आहेच. दोषांची विषमता हे तर सर्व आजारांचे मूळ आहे. स्वस्थ शरीराची व्याख्या करतांना समदोष: समाग्निश्‍च समधातुमलक्रिय: प्रसन्नात्मेन्द्रियमना: स्वस्थ इत्यभिधीयते ॥ हे विधान सुश्रुताचार्यांनी ठामपणे सांगितले आहे.

(व्यायामाचे प्रयोजन पुढील अंकात वाचू या.)
(क्रमश:)
 
 
bottom of page