top of page

आयकर कलम 115बीबीसी अन्वये निनावी देणगी आणि सामाजिक संस्था-सीए. सुरेश मेहता [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 28, 2023
  • 3 min read

आयकर कलम 115बीबीसी अन्वये निनावी देणगी आणि सामाजिक संस्था

ree

सीए. प्रा. सुरेश मेहता, पुणे.

98901 78548




(1) निनावी देणगी म्हणजे नक्की काय ?

आयकर कायदा, 1961, च्या कलम

115 बीबीसी(3) नुसार ‘निनावी देणगी’

1) कलम 2(24)(2ए) नुसार मिळालेली


2) ऐच्छिक स्वरूपातील रक्कम होय.

असे असले तरी ज्या संस्थेला सदरची रक्कम मिळालेली असते अशा संस्थेकडे अशी रक्कम जमा करणार्‍या व्यक्तींची नावे, पत्ते आणि इतर विहित माहिती ठेवलेली अगर उपलब्ध नसते.

याचा असा अर्थ काढला जाऊ नये की, या रकमा देणार्‍या व्यक्तीच मुळात अस्तित्वात नाहीत. एखाद्या वेळी विशेषकरून मंदिरासारख्या ठिकाणी - काही लोक आपल्या श्रद्धेपोटी मंदिरात ठेवलेल्या पेटीत पैसे, दागिने, इत्यादी अनेक स्वरूपातील भेटी टाकत असतात. त्या धार्मिक संस्थेच्या हिशोब पुस्तकात या रकमा आणि दागिने नोंदविले गेले तरी अशा देणगीदारांची विहित माहिती (नाव, पत्ता, आयकर कायम खाते क्रमांक, आधार पत्रिका क्रमांक, संपर्क क्रमांक, संगणकीय पत्ता इत्यादी) या संस्थेकडे उपलब्ध असेलच याची खात्री नसते. अशा प्रकारे देणगीदारांच्या संपूर्ण माहितीशिवाय जी रक्कम या संस्थेकडे जमा होते, अशा रकमांना ‘निनावी देणगी’ म्हटले जाते.

पंढरपूरचे विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, नांदेड येथील गुरुद्वारा, कर्नाटकातील श्रवणबेळगोळ अशी अनेक उदाहरणे यासाठी आपणास देता येतील.

या व्याख्येचे वैशिष्ट्य असे आहे की ‘निनावी देणगी’ या संज्ञेच्या व्याख्येसाठी वापरलेली ’Means’ ही शब्दरचना स्वयं-स्पष्ट अशी आहे, काही व्याख्येत वापरतात तशी ‘Includes’ अशी मोघम आणि वाद निर्माण करणारी शब्द रचना येथे केलेली नाही.

या तरतुदीनुसार देणगीदारांची विविध प्रकारची माहिती (नाव, पत्ता, आयकर कायम खाते क्रमांक, आधार पत्रिका आणि तत्सम विहित माहिती ) ठेवण्यासाठी संबंधित संस्थांना जबाबदार धरण्यात आले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे सामान्यतः देणगीदारांची अशी माहिती फक्त संकलित करण्याची गरज असते, ही माहिती अगर देणगीदारच उपलब्ध नसतात असे नाही.


तरतुदींची व्याप्ती

कलम 115 बीबीसीमधील तरतुदी फक्त आयकर कायम, 1961, च्या कलम 10(23सी) मध्ये उल्लेख केलेल्या पंधरा संस्थांपैकी सहा संस्था आणि कलम 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या संस्था यांनाच लागू आहेत. (आयकर कायद्यानुसार इतर कोणत्याही करदात्याला निनावी व्यवहार करता येत नाहीत.)

कलम 10(23सी) नुसार (अ) मान्यता असलेल्या धार्मिक अगर सामाजिक संस्था,(बी) मान्यता (Approval) असलेल्या शैक्षणिक अगर वैद्यकीय संस्था आणि (क) रुपये पाच कोटींपर्यंत जमा उत्पन्न असलेल्या (Receipt) शैक्षणिक अगर वैद्यकीय संस्था या सहा संस्थानाच या तरतुदी लागू आहेत.

कलम 10(23सी) मधील शासन-नियंत्रित सात संस्था आणि ज्या शैक्षणिक अगर वैद्यकीय संस्थांना शासनातर्फे वित्त पुरवठा केला जातो अशा संस्थांना या तरतुदी लागू नाहीत.

तसेच कलम अकरामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या संस्थानांही या तरतुदी लागू आहेत.


(3) कलम 115बीबीसी नुसार पूर्णपणे करमुक्त निनावी देणगी

(शैक्षणिक अगर वैद्यकीय संस्था सोडून) इतर सर्व प्रकारच्या (1) नुसत्या धार्मिक अगर (2) धार्मिक आणि सामाजिक अशा दोन्ही कारणांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना मिळालेली निनावी देणगी पूर्णपणे करमुक्त असते. म्हणूनच देवळातील पेटीमध्ये जमा झालेल्या निनावी देणगीच्या रकमा पूर्णपणे करमुक्त असतात.

मात्र ही करमुक्ततेची सवलत (1) कोणत्याही शाळेत अगर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या निनावी देणगीस अगर (2) कोणत्याही वैद्यकीय अगर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या निनावी देणगीस अगर अशा समकक्ष देणगीला मिळत नाही. मिळालेल्या अशा रकमांवर अशा संस्थांना आयकर भरावा लागतो.


(4) कलम 115बीबीसीनुसार करपात्र निनावी देणगी

या तरतुदीनुसार (अ) इतर संस्थेच्या एकूण देणगीच्या (उत्पन्नाच्या नव्हे) पाच टक्के अगर

(बी) रुपये एक लाख यापैकी जी रक्कम ‘जास्त’ (नेहमीप्रमाणे कमी नव्हे) असेल ती निनावी देणगी रक्कम करमुक्त असते. उदा : (अ) एका संस्थेला ‘एकूण’ 25 लाख रुपये देणगी मिळाली आहे.

(बी) या देणगी रकमेपैकी रुपये पाच लाख ही निनावी देणगी आहे.

अशा परिस्थितीत (अ) एकूण देणगीच्या 5 टक्के म्हणजे रुपये 1.25 लाख रुपये आणि (बी) विहीत रक्कम रुपये 1 लाख यापैकी जी रक्कम ‘जास्त’ आहे ती म्हणजे या प्रकरणी रुपये 1.25 लाख ही निनावी देणगी करमुक्त असेल. (याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खर्चाची वजावट संस्थांना मिळत नाही.)

म्हणजेच या संस्थेच्या 5 लाख रुपये निनावी देणगीपैकी करमुक्त रक्कम रुपये 1.25 लाख रुपये वजा करून उर्वरित 3,75,000, रुपयांवर सध्याच्या कलम 115बीबीसी मधील तरतुदीनुसार 30 टक्के दराने आयकर भरावा लागेल.

म्हणजेच या संस्थेची एकूण देणगी रुपये 25 लाखपैकी (या संस्थेला इतर उत्पन्न नाही असे गृहीत धरले तर) करपात्र निनावी देणगी रुपये 3,75,000 वजा जाता राहिलेल्या रक्कम रुपये 21,25,000 पैकी 85 टक्के रक्कम आपल्या हेतूंच्या पूर्ततेसाठी वापरावी (Application) लागेल.

गेल्या काही वर्षांत आपल्या शासनाचा सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडे पहाण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे, तो अतिशय जाचकही आहे.

दर 5 वर्षांनी नोंदणी आणि मान्यतेचे नूतनीकरण, असे न केल्यास अगर वेळच्यावेळी आयकर विवरणपत्र सादर केले नसल्यास निर्माण होणार्‍या जटिल समस्या, देणगी पत्रक दाखल करणे, दुसर्‍या सामाजिकसंस्थांना भांडवल निधीस (Corpus) देणगी देण्यावर बंदी, अशा संस्थांना इतर कामासाठी देणगी दिली तर त्यापैकी फक्त 85 टक्के रक्कमच वजावटीस पात्र, भांडवल निधी आणि कर्ज घेऊन केलेल्या हेतूंवरील खर्च वजावटीवरील बंधने, कलम 115 टीडीची टांगती तलवार यामुळे अशा संस्थांना आगामी काळात खूप काटेरी वाटचाल करावी लागणार आहे. पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत रहाणे आणि आपल्याला अशा परिस्थितीत काम करणे शक्य आहे का ? याचाही विचार करून निर्णय घेणेच फक्त संस्था चालकांच्या हातात आहे.

 
 
bottom of page