आयकर:कायदयाचा सल्ला [ जाने २०२३ ]
- Vyapari Mitra
- Mar 21, 2023
- 7 min read
Updated: Mar 31, 2023

रिफंड रकमेवर आयकर खात्याकडून मिळालेले व्याज करपात्र आहे
प्रश्न 1 : मी आकारणी वर्ष 2021-22 चे आयकर पत्रक दाखल करताना त्यामध्ये रु.15,360 ची रिफंड रक्कम दाखविली होती. मला त्यापेक्षा जास्त रकमेची रिफंड ऑर्डर प्राप्त झाली आहे. जादा मिळालेली रक्कम करपात्र आहे का?
उत्तर : आकारणी वर्ष 2021-22 च्या आयकर पत्रकात दाखविलेल्या रिफंड रकमेपेक्षा जादा रकमेची रिफंड ऑर्डर आपणास मिळाली आहे. जादा मिळालेली रक्कम ही आयकर कलम 244ए अनुसार व्याजाची रक्कम आहे. आकारणी वर्षाच्या पहिल्या तारखेपासून ते रिफंड मंजूर झाला त्या तारखेपर्यंत 0.5 टक्के प्रतिमहिना या दराने व्याज प्रत्येक महिना किंवा महिन्याच्या भागासाठी दिले जाते. अशा रिफंडवर मिळालेले व्याज ‘अन्य स्रोतापासूनचे उत्पन्न’ या शीर्षकाखाली दाखवावे, हे व्याज करपात्र आहे.
वित्त अधिनियम, 2016 अनुसार कलम 139(1) मध्ये दिलेल्या मुदतीत आयकर पत्रक दाखल केल्यास आकारणी वर्षाच्या 1 एप्रिलपासून रिफंड देण्याच्या तारखेपर्यंत व्याज दिले जाईल. वेळेत पत्रक दाखल न केल्यास आयकर पत्रक दाखल करण्याच्या तारखेपासून रिफंड देण्याच्या तारखेपर्यंत व्याज दिले जाईल.