आयकर कायद्यासंबंधी सल्ला [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 1, 2023
- 5 min read

स्थावर मालमत्ता २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर विकल्यास दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल
प्रश्न : मी एक घर एप्रिल २०२० मध्ये रु. ५० लाखांना खरेदी केले होते. ते घर मी जून २०२२ मध्ये रु.७० लाखांना विकले आहे. माझ्या भांडवली नफ्याची गणना कशी होईल ?
उत्तर : वित्त अधिनियम, २०१७ अनुसार आयकर कलम २(४२ऄ) मध्ये दिनांक १.४.२०१८ म्हणजेच आकारणी वर्ष २०१८-१९ पासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार स्थावर/अचल मालमत्ता म्हणजेच जमीन किंवा इमारत किंवा दोन्ही हस्तांतर (ट्रान्स्फर) करण्यापूर्वी २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ताब्यात नसल्यास ती अल्प मुदतीची भांडवली मालमत्ता धरली जाईल. कलमात बदल होण्यापूर्वी हा कालावधी ३६ महिने एवढा होता. आयकर कलम २(२९ऄ) प्रमाणे “दीर्घ मुदतीची भांडवली मालमत्ता’’ म्हणजे अशी भांडवली मालमत्ता जी अल्प मुदतीची भांडवली मालमत्ता नाही. आपण एप्रिल २०२० मध्ये खरेदी केलेले घर २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर जून २०२२ मध्ये विकले आहे. आपल्याला आकारणी वर्ष २०२३-२४ साठी दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल.
ट्रान्स्पोर्टरला रक्कम अदा करताना मुळातून करकपात करु नये यासाठीचे घोषणापत्र प्रत्येक मागील वर्षासाठी स्वतंत्रपणे घ्यावे लागेल
प्रश्न : आमचा बेसनचा घाऊक व्यवसाय आहे. आमच्या ट्रान्स्पोर्टरने त्याच्या मालकीच्या दहा पेक्षा कमी गाड्या आहेत असे घोषणापत्र आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दिले होते. ऑडिटरनुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्वतंत्र घोषणापत्र आवश्यक आहे का ?
उत्तर : आयकर कलम १९४सी अनुसार कॉन्ट्रॅक्टरला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम अदा करताना मुळातून करकपात (टी.डी.ऄस.) करणे आवश्यक आहे. ही तरतूद ट्रान्स्पोर्टरलाही लागू होते. परंतु कलम १९४सी(६) अनुसार ट्रान्स्पोर्टरला सूट मिळू शकते. त्यानुसार मालवाहतूक गाडी भाड्याने किंवा लीजवर देणारा ट्रान्सपोर्टर मागील वर्षात (आकारणी पूर्व वर्षात) १० किंवा कमी मालवाहतूक गाड्यांचा मालक असेल आणि यासंबंधीचे घोषणापत्र त्याने दिले व सोबत पॅन दिला तर त्याला रक्कम अदा करताना मुळातून करकपात करावी लागणार नाही. हे घोषणापत्र प्रत्येक मागील वर्षासाठी वेगळे द्यावे लागेल. आपल्या केसमध्ये आपण मागील वर्ष २०२२-२३ चे घोषणापत्र स्वतंत्रपणे घेतले पाहिजे. तसेच आता वर्ष २०२३-२४ साठीचे घोषणापत्रही नव्याने घेतले पाहिजे.
गोडाऊन/दुकाने भाड्याने दिल्यास त्यावर घसारा वजा मिळत नाही
प्रश्न : मी एकूण ३ दुकाने खरेदी केली होती. त्यापैकी २ दुकानात माझा व्यवसायातील काही माल साठवून ठेवला आहे म्हणजे गोडाऊनसारखा त्याचा उपयोग करीत आहे. मात्र एक दुकान मी भाड्याने दिले आहे. तर मला भाड्याने दिलेल्या दुकानावर घसारा वजा मागता येईल का?
उत्तर : आपण एकूण ३ दुकाने खरेदी केली होती. त्यापैकी २ दुकाने आपण स्वत:साठी वापरत आहात. एक दुकान मात्र भाड्याने दिले आहे.
अशा परिस्थितीत आपण स्वत:साठी २ दुकाने वापरता त्यावर आपणास घसारा वजा मागता येईल. मात्र एक दुकान जे भाड्याने दिले आहे त्यावर घसारा वजा मागता येणार नाही. या दुकानापासून मिळणारे भाडे ‘घरापासूनचे उत्पन्न’ या सदराखाली धरले जाईल त्यातून स्टॅंडर्ड डिडक्शन भाड्याच्या ३०% वजा मिळेल व बाकी रकमेवर कायद्याप्रमाणे विहित योग्य तो आयकर भरावा लागेल.
रु. २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोखीने स्वीकारल्यास रोख घेतलेल्या रकमेएवढा दंड
प्रश्न : मी एका व्यापार्याला रु. ५ लाखाचा माल उधारीवर विकला आहे. त्याने १५ मे २०२२ रोजी रु. १ लाख, ३० जून २०२२ रोजी रु. १,५०,००० रक्कम रोख अदा केली. राहिलेल्या रु. २,५०,००० चा अकौंट पेयी चेक दिला आहे. रोख स्वीकारलेल्या रकमेवर मला दंड भरावा लागेल का?
उत्तर : आयकर कायद्यामध्ये दिनांक १.४.२०१७ पासून कलम २६९एसटीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीने रु. २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम अकौंट पेयी चेक किंवा अकौंट पेयी बँक ड्राफ्ट किंवा बँक खात्यातील इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमचा वापर वगळता अन्य पद्धतीने स्वीकार करू नये. म्हणजे रोखीने स्वीकार करू नये. यामध्ये खालील परिस्थितींचा समावेश होईल.
(अ) एका दिवसात एका व्यक्तीकडून एकूण रक्कम किंवा
(ब) एकाच व्यवहाराच्या संदर्भात (सिंगल ट्रॅन्झॅक्शन)
(क) व्यक्तीबरोबर एक घटना किंवा प्रसंगाबद्दल झालेल्या व्यवहारासंदर्भात.
माल विक्री करणारा, सेवा देणारा, भांडवली मालमत्ता हस्तांतर करणारा अशा सर्व व्यक्तींना रक्कम घेताना हे कलम लागू होईल. या कलमातील तरतुदींचा भंग केल्यास कलम २७१डीए अनुसार रोख स्वीकारलेल्या रकमेएवढा दंड लागेल. तथापि, संबंधित व्यक्तीने अशी रक्कम रोखीने घेण्यामागची सबळ कारणे सादर केल्यास असा दंड लागणार नाही. असा दंड जॉईंट कमिशनर लावू शकतात.
आपण रु. ५ लाखाच्या विक्री व्यवहारापोटी रु. २,५०,०००(१,००,००० + १,५०,०००) एवढ्या रोख रकमेचा स्वीकार केला आहे. आपल्याला कलम २७१डीए खाली रु. २,५०,००० एवढा दंड लागू शकतो. आपल्याला कलम ४४एबी प्रमाणे टॅक्स ऑडिट लागू असल्यास कलम २८५बीए च्या तरतुदींनुसार फॉर्म नं. ६१ए मध्ये वरील व्यवहार नमूद करावा लागेल.
एका घराचे वार्षिक मूल्य शून्य ही कलम २३(२) ची सवलत हिंदू अविभक्त कुटुंबालाही मिळेल
प्रश्न : मी ज्या घरात राहतो ते घर माझ्या हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालकीचे आहे. घरात मी स्वत:, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे चार जण राहतो. आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचे दुसरे कोणतेही घर नाही. घर स्वत: राहण्यासाठी वापरत असल्यास त्याचे उत्पन्न शून्य धरले जाईल. ही सवलत हिंदू अविभक्त कुटुंबालाही मिळू शकेल का?
उत्तर : आयकर कलम २३(२) च्या तरतुदींनुसार घर किंवा घराचा भाग हा घरमालक स्वत:च्या निवासासाठी वापरत असेल तर अशा घराचे वार्षिक मूल्य शून्य धरले जाईल. सी.आय.टी. वि. हरिप्रसाद भोजनागरवाला (२०१२) २५० सी.टी.आर. १०८ या केसमध्ये गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, हिंदू अविभक्त कुटुंब, जो एकमेकांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा समूह (ग्रूप) असतो त्याला कलम २३(२) ची सवलत मिळेल. न्यायालयानुसार हिंदू अविभक्त कुटुंब हा रक्ताच्या नात्याने किंवा इतर पद्धतीने एकत्र आलेला व्यक्तींचा समूह आहे. हिंदू अविभक्त कुटुंब हे नैसर्गिक व्यक्तींचे कुटुंब आहे. हे कुटुंब हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालकीच्या घरात राहू शकते याबद्दल कोणताच वाद नाही. कुटुंबात नैसर्गिक नसलेल्या व्यक्ती असू शकत नाही. त्यामुळे कलम २३(२) ची सवलत हिंदू अविभक्त कुटुंबाला मिळायला हरकत नाही.
करदात्याने घसारा या खर्चाची वजावट घेणे सक्तीचे आहे
प्रश्न : माझ्याकडे मशिनरी, मोटर कार इत्यादी मालमत्ता आहेत, ज्यांचा मी व्यवसायासाठी वापर करतो त्यावर मागील वर्षामध्ये घसारा खर्च वजा घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये माझा नफा खूप कमी झाला आहे. या वर्षामध्ये मी घसार्याची वजावट घेतली नाही तर चालेल का ?
उत्तर : करदाता व्यवसायाकरता ज्या मालमत्ता वापरतो त्यांची झीज होते आणि त्यांच्या मूल्यात र्हास होत असतो. मालमत्तेच्या मूल्यात होणार्या र्हासासाठी घसारा अर्थात डेप्रिसिएशन नफा काढताना वजा करता येतो. आयकर कलम ३२ मध्ये दिनांक १.४.२००२ पासून स्पष्टीकरण ५ समाविष्ट करण्यात आले होते. त्यानुसार घसार्याची वजावट घेण्याचे सक्तीचे करण्यात आले. करदात्याने एकूण उत्पन्नाची गणना करताना घसार्याची वजावट घेतलेली असो किंवा नसो तरीही घसार्याची वजावट दिली जाईल असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच करदात्याला घसारा वजा घेणे किंवा वजा न घेणे असा पर्याय उपलब्ध नाही. करदात्याने कलम ४४एडी किंवा कलम ४४एडीए खाली अंदाजित उत्पन्न घोषित केले तरी त्याला घसार्याची वजावट मिळाली आहे असे गृहीत धरले जाते. त्यामुळे आपला नफा कमी झाला असला तरी आपण घसारा या खर्चाची वजावट घेणे बंधनकारक आहे.
भागीदारीने व्याज देताना मुळातून करकपात (टी.डी.एस.) करणे आवश्यक आहे
प्रश्न : आमची भागीदारी असून वार्षिक उलाढाल/ विक्री साधारणत: रु. १.५० कोटी पर्यंत असते. आम्ही कलम ४४एडी खाली ८% किंवा ६% नफा दाखवून आयकर पत्रक दाखल करत नाही. आम्ही वरील टक्केवारीपेक्षा कमी नफा दाखवून टॅक्स ऑडिट करून घेतो. आम्ही कर्जावर (अनसिक्युअर्ड लोन) व्याज देतो. याबाबतीत व्याजाच्या रकमेतून मुळातून करकपात करावी लागेल का?
उत्तर : आयकर कलम १९४ए अनुसार सिक्युरिटीखेरीज इतर व्याज देताना मुळातून करकपात करणे बंधनकारक आहे. कर्जावरील व्याज रु. ५००० पेक्षा जास्त असल्यास १०% दराने टी.डी.एस. कापावा लागतो. वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब सोडून कोणत्याही व्यक्तीने व्याज देताना ही तरतूद लागू होते. व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला मागील वर्षात कलम ४४एबी खाली टॅक्स ऑडिट लागू असल्यास त्यापुढील वर्षात या कलमाच्या तरतुदी लागू होतात. आपण भागीदारीत व्यवसाय करता. आपण घेतलेल्या कर्जावर व्याज देताना ते रु. ५००० पेक्षा जास्त असल्यास कलम १९४ए खाली १०% दराने टी.डी.एस. कापणे आवश्यक आहे. कर्ज दिलेल्या व्यक्तीने फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५एच दिल्यास मुळातून करकपात करावी लागणार नाही.