top of page

आयकर कायद्यासंबंधी सल्ला [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 28, 2023
  • 3 min read

आयकर कायद्यासंबंधी सल्ला

ree








सर्चमध्ये उत्पन्न न दाखविलेल्यावर भरावा लागणारा दंड

प्रश्‍न 45 : आमच्याकडे मागील वर्षी सर्च झाली होती. यावर्षी आयकर पत्रक भरताना किती दंड भरावा लागू शकतो ?


उत्तर : आयकर कायद्यानुसार सर्चमध्ये काही उत्पन्न ज्यावर आयकर भरलेला नाही असे सापडल्यास त्यावर आयकर कलम 271 एएबी अनुसार दंड भरावा लागतो. दंड खालीलप्रमाणे भरावा लागतो.

(अ) (1) सर्चच्या वेळेस करदात्याने उत्पन्न कलम 132(4) अनुसार स्टेटमेंटमध्ये जाहीर केले ते कशाप्रकारे मिळाले आहे ते स्पष्ट केले.

(2) आयकर पत्रक दाखल करण्याची जी मुदत आहे.

a) त्यापूर्वी आयकर पत्रक दाखल करावे आणि जाहीर केलेल्या उत्पन्नावर आयकर आणि त्यावर व्याज भरले पाहिजे.

b) आयकर पत्रक मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि त्यामध्ये कलम 131 (4) खाली जाहीर केलेले उत्पन्न दाखविलेले असायला हवे.

c) अशा जाहीर केलेल्या उत्पन्नवार 30% दंड भरावा लागेल.

(ब) सर्च झाल्यानंतर आयकर पत्रक दाखल करताना जाहीर न केलेले उत्पन्न आयकर उत्पन्नात दाखवून त्यावर आयकर आणि व्याज भरलेले असेल तर जाहीर केलेल्या उत्पन्नावर 60% दंड भरावा लागेल.

(क) सर्च झाल्यानंतर वरील अटींची पूर्तता झालेली नसल्यास आयकर अधिकार्‍यांनी वाढ केलेल्या उत्पन्नावर 60% दंड भरावा लागेल.


घर विकताना भांडवली नफा कसा काढला जाईल

प्रश्‍न 46 : माझे जुने खरेदी केलेले घर आहे. बँकेकडून कर्ज घेऊन जुन्या घरात पहिला मजला बांधला आहे. 3 वर्षानंतर मी सदर घर विकणार आहे माझा भांडवली नफा कसा काढला जाईल ?


उत्तर : आपण जुन्या घरावर एक मजला पण बांधला आहे. हे संपूर्ण घर आपण 3 वर्षांनी विकत आहात. आपले घर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याकडे असल्यामुळे आपणास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा धरला जाईल.

आपण पूर्वी खरेदी / बांधलेले घर 1.4.2001 पूर्वी घेतलेले असल्यास आपण 1.4.2001 त्या घराची असलेली बाजार भावाने किंमत इंडेक्स कॉस्ट आणि ज्या वर्षात विकणार त्यावर्षाचा इंडेक्स कॉस्ट विचारात घेऊन घराची आजची किंमत काढावी. नवीन बांधकामाची आजची किंमत इंडेक्स कॉस्ट काढावी. एकूण विक्रीच्या किंमतीतून वरील 2 इंडेक्स कॉस्ट कमी करून येणारा नफा हा आपला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल. त्यावर आपणास 20% आयकर भरावा लागेल.


मित्राकडून रोखीने कर्ज / ठेव घेऊ नये

प्रश्‍न 47 : मी माझ्या मित्राकडून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. व्याजधरून आता बाकी रु. 28,500 आहे. मी त्याच्याकडून अजून रु. 15,000 रोखीने कर्ज घेऊ शकतो का? सदर रक्कम रु. 20,000 पेक्षा कमी असल्याने मला घेता येईल असे माझे मत आहे ते बरोबर आहे का ?


उत्तर : आयकर कायद्यामध्ये कलम 269 एसएस आहे. या कलमाच्या तरतुदी अनुसार कोणतीही व्यक्ती कोणाकडून ही रु. 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेताना सदर रक्कम अकौंटपेयी चेकने अथवा ड्राफ्टने अथवा बँक चॅलनमार्फत घ्यावी. म्हणजेच व्यक्ती रु. 19,999 पर्यंत रोख रक्कम कर्ज / डिपॉझिट म्हणून घेऊ शकतो.

ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या खात्यात रु. 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असेल. अशाकडून परत कर्ज / डिपॉझिट घेताना अकौंटपेयी चेक अथवा ड्राफ्ट अथवा बँक चॅलन मार्फत घ्यायला हवी. मग ती रक्कम रु. 20,000 पेक्षा कमी असली तरी.

आपण रु. 20,000 अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोखीने कर्ज / डिपॉझिट घेतल्यास जेवढी रक्कम रोखीने घेतली आहे. तेवढीच रक्कम दंड म्हणून लावला जाऊ शकतो. उदा. आपण रु. 20,000 पेक्षा जास्त रक्कम जमा असताना रु. 15,000 रोखीने घेतल्यास आपणास रु. 15,000 दंड लावला जाऊ शकतो. पहा कलम 271 डी.


भागीदारीत उत्पन्न नसले तरी आयकर पत्रक दाखल करावे

प्रश्‍न 48 : आमची भागीदारी आहे. यावर्षी आमचा भागीदारीत व्यवसाय झाला नाही त्यामुळे उत्पन्न करपात्र नाही. आम्ही भागीदारीचे आयकर पत्रक दाखल केले नाही तर चालेल का ?


उत्तर : भागीदारीने आपले आयकर पत्रक दरवर्षी दाखल करणे आवश्यक आहे. भागीदारीत व्यवसाय झाला नसेल किंवा नफा नसेल तरी आपण आयकर पत्रक दाखल करणे आवश्यक आहे.

[ कलम 139(1)(a)]


इंडेक्स कॉस्ट

प्रश्‍न 49 : भांडवली नफा काढताना मालमत्तेचा इंडेक्स कॉस्ट सदर वर्षाचा लागतो. 1.4.2001 ते 31.3.2024 चे दरवर्षाचे इंडेक्स कॉस्ट द्यावेत.


उत्तर : भांडवली नफा काढण्यासाठी सरकार दरवर्षासाठीचा इंडेक्स कॉस्ट जाहीर करत आहे. प्रत्येक वर्षाचा इंडेक्स कॉस्ट खालीलप्रमाणे आहे.

ree

आकारणी वर्ष 2023-24 चे आयकर पत्रक दाखल करण्याची मुदत

प्रश्‍न 50 : आकारणी वर्ष 2023-24 आर्थिक वर्ष 1.4.2022 ते 31.3.2023 या मुदतीचे आयकर पत्रक दाखल करण्याची मुदत काय आहे ?


उत्तर : आयकर कलम 139(1) मध्ये आयकर पत्रक दाखल करण्याची मुदत दिली आहे. ती खालीलप्रमाणे आहे :

  1. ज्या करदात्यांना ऑडिट करून घ्यावे लागत नाही अशा करदात्यांना - 31 जुलै 2023

  2. अ. कंपनी ब. ज्याचे ऑडिट आयकर कायद्यानुसार केले जाते अथवा अन्य कोणत्याही कायद्याखाली भागीदारीचे ऑडिट होत असल्यास अशा भागीदारीचे भागीदार - 31 ऑक्टोबर 2023

  3. ट्रान्सफर प्रायसिंगचे करदाते - 30 नोव्हेंबर 2023

  4. मुदतीनंतर दाखल केले जाणारे सर्व करदात्यांचे आयकर पत्रक (Belated Return)- 31 डिसेंबर 2023

  5. सर्व प्रकारच्या करदात्यांनी रिव्हाईज्ड पत्रक दाखल करण्याची मुदत - 31 डिसेंबर 2023


हिंदू अविभक्त कुटुंबाचे पूर्ण विभाजनाच्या वेळी मिळालेल्या भांडवली मालमत्तेवर आयकर नाही

प्रश्‍न 51 : माझ्या वडिलांच्या हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून आकारणी होते. आम्ही आता आमच्या हिंदू अविभक्त कुटुंबाचे पूर्ण विभाजन (Total Partition) कारणात आहोत. त्यावेळी आम्हाला मिळणार्‍या भांडवली मालमत्तेवर आम्हाला आयकर भरावा लागेल का ?


उत्तर : आपल्या कुटुंबाची हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून आतापर्यंत आकारणी होत आली आहे. आपण आपल्या हिंदू अविभक्त कुटुंबाचे पूर्ण विभाजन करणार आहात. त्यामुळे हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्यांना भांडवली मालमत्ता विभाजनात मिळणार आहे. ही हिंदू अविभक्त कुटुंबाकडून आपल्या सदस्यांना मालमत्ता हस्तांतरण होणार आहे.

आयकर कायदा कलम 47 मध्ये काही हस्तांतरण हे हस्तांतर धरले जाणार नाही याची यादी दिलेली आहे. या कलमाच्या 47(i) अनुसार हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेचे पूर्ण अथवा अपुरे विभाजना अनुसार मिळालेली मालमत्ता हस्तांतर धरली जाणार नाही म्हणजेच असे हस्तांतरणावर आयकर भरावा लागणार नाही.

 
 
bottom of page