आयकर कायद्यासंबंधी सल्ला [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jun 1, 2023
- 3 min read

मुळातून करवसुलीची तरतूद प्रत्येक विक्री व्यवहारानुसार लागू होईल आणि आर्थिक वर्षातील एकूण विक्रीनुसार लागू होणार नाही
प्रश्न 39 : आमचा पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय आहे. आमचे ग्राहक आमच्या बँक खात्यात रोख रक्कम भरतात किंवा ऑफिसमध्ये रोख रक्कम आणून देतात. आमचे प्रत्येक बिल 2 लाखापेक्षा कमी रकमेचे असेल परंतु आर्थिक वर्षात एकूण मिळालेली रक्कम रु. 2 लाखापेक्षा जास्त असल्यास आम्हाला मुळातून करवसुली (टी.डी.एस.) करावी लागेल का ?
आर्थिक वर्षात रु. 50,000, रु. 75,000 आणि रु. 1,00,000 अशी एकूण रु. 2,25,000 विक्री केली आहे. ग्राहकाने रु. 50,000, रु. 75,000 आणि रु. 1,00,000 अशी एकूण रु. 2,25,000 रोख रक्कम अदा केली आहे. या परिस्थितीत आम्हाला मुळातून कर वसुली करावी लागेल का ?
उत्तर : आयकर कलम 206सी(1डी) अनुसार 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीची वस्तू रोखीने विकताना (बुलियन आणि दागिने सोडून) विक्रेत्याने खरेदीदाराकडून 1 टक्का दराने मुळातून कर वसुली करणे दिनांक 1.6.2016 पासून जरुरीचे आहे. सी.बी.डी.टी. सर्क्युलर नं. 22/2016 दिनांक 8.6.2016 मधील प्रश्न क्रमांक 4 अनुसार प्रत्येक विक्रीला टी.सी.एस. च्या तरतुदी लागू होतील आणि संपूर्ण आर्थिक वर्षातील एकूण विक्रीनुसार लागू होणार नाहीत. या प्रश्नात मोटर वाहन विक्रीचा संदर्भ आहे परंतु शेवटी अशाच प्रकारे उपकलम (1डी) मधील विक्री करताना कर गोळा करण्याची पद्धत लागू राहील असे स्पष्ट केले आहे. आपले प्रत्येक बिल रु. 2 लाखापेक्षा कमी आहे. वर्षातील सर्व बिलांची एकत्रित रक्कम रु. 2 लाखापेक्षा जास्त असली तरी आपल्याला मुळातून कर वसुलीची तरतूद लागू होणार नाही.
नियमित औषधोपचाराचा खर्च उत्पन्नातून वजा मिळत नाही
प्रश्न 40 : माझे वय 70 आहे. मला बँक मुदत ठेवींपासून रु. 5 लाखापर्यंत व्याजाचे उत्पन्न मिळते. वयोमानानुसार होणार्या रोगांवर माझा व माझ्या पत्नीचा साधारणत: रु. 50,000 वार्षिक खर्च होतो. औषधांची सर्व बिले जपून ठेवली आहेत. माझ्या व्याजाच्या उत्पन्नातून औषधोपचाराचा खर्च वजा मिळेल का?
उत्तर : आपला व आपल्या पत्नीचा नियमित औषधोपचारावर जो खर्च होतो त्याची उत्पन्नातून वजा घेण्याची तरतूद आयकर कायद्यात नाही. त्यामुळे आपल्याला औषधांचा खर्च व्याजाच्या उत्पन्नातून वजा मिळणार नाही. आयकर कायद्याच्या कलम 80डी अनुसार आरोग्य विमा हप्त्याची वजावट मिळते. आयकर कलम 80डीडीबी अनुसार काही विशिष्ट रोगांच्या औषधोपचारावर होणार्या खर्चाची वजावट मिळते. कलम 80डीडीबी खाली कोणत्या रोगांवर होणार्या खर्चाची वजावट मिळेल त्या रोगांची माहिती आयकर नियम 11डी(1) मध्ये दिलेली आहे.
असुरक्षित कर्जावरील व्याज रु. 10,000 पेक्षा जास्त रोखीने अदा केल्यास खर्च नामंजूर होईल
प्रश्न 41 : मी माझ्या मित्राकडून व्यवसायासाठी रु. 5 लाख कर्ज म्हणून घेतले आहेत. त्यावर 12 टक्के दराने रु. 60,000 व्याज होते. मित्राला पैशाची तातडीची गरज असल्यामुळे मी व्याज रोखीने अदा केले आहे. माझ्या ऑडिटरच्या मते हा खर्च नामंजूर होईल. ते बरोबर आहे का ?
उत्तर : आयकर कलम 40ए(3) च्या तरतुदींनुसार एका दिवसात एका व्यक्तीला दिली जाणारी रोख रक्कम रु. 10,000 पेक्षा जास्त असेल तर ती वजावटीस पात्र रहाणार नाही. कलम 40ए(3) च्या तरतुदी कर्ज घेणे किंवा परतफेडीच्या व्यवहारांना लागू होत नाहीत. अशा व्यवहारांसाठी कलम 269 एसएस आणि कलम 269 टी मध्ये तरतुदी आहेत. परंतु व्याज हा उत्पन्नातून वजा होणारा खर्च असल्याने व्याजाच्या व्यवहारांना कलम 40ए(3) च्या तरतुदी लागू होतील. त्यामुळे आपण रु. 60,000 रोखीने व्याज आपल्या मित्राला अदा केल्यास व्याजाचा खर्च कलम 40ए(3)खाली नामंजूर होईल.
कमिशनवर टीडीएस दर 5% आहे
प्रश्न 42 : आमची भागीदारी आहे. आम्ही विक्रीवरती आमच्या एजंटना कमिशन देतो. त्यांना कमिशन देताना काय दराने टीडीएस करायला लागेल?
उत्तर : आयकर कायदा कलम 194 एच प्रमाणे ज्या करदात्यांना टीडीएसच्या तरतुदी लागू आहेत. अशांनी एजंटना कमिशन देताना 5% दराने टीडीएस कापावा लागेल.
ज्याच्या कमिशनमधून टीडीएस कापला जाणार आहे त्या व्यक्तीने पॅन दिला नाहीतर आपल्याला 20% दराने टीडीएस करावा लागेल.
कमिशनची रक्कम आर्थिक वर्षात रु. 15000 च्या आत असल्यास टीडीएस तरतुदी लागू होणार नाहीत.
जुन्या रहाण्याच्या घरांमध्ये केलेल्या दुरुस्तीचा खर्च कलम 54 एफ खाली मिळणार नाही
प्रश्न 43 : मी काही दागिने विकले आहेत आणि झालेला भांडवली नफा माझ्या रहाण्याच्या घरामध्ये दुरुस्ती करण्यासाठी वापरणार आहे. मला आयकर कलम 54एफ खाली वजावट मिळेल का ?
उत्तर : आपण दागिने विकले आहेत. त्यापासून मिळालेली रक्कम आपण आपले जुन्या रहाण्याच्या घरामध्ये दुरुस्ती करण्यासाठी वापरणार आहेत. आयकर कलम 54एफ प्रमाणे घर सोडून अन्य मालमत्ता विकून झालेला नफा हा नवीन रहाण्याचे घर खरेदी करण्यासाठी अथवा नवीन रहाण्याचे घर बांधण्यासाठी वापरल्यास भांडवली नफ्यातून सूट मिळते.
आपण आपले जुन्या रहाण्याच्या घरामध्ये दुरुस्तीचा खर्च करणार आहात. आपण नवीन रहाण्याचे घर खरेदी अथवा नवीन घर बांधण्यासाठी भांडवली नफा वापरणार नसल्याने आपणस कलम 54एफ ची वजावट मिळणार नाही. पुढील निर्णय पहा.
मिसेस मीरा जाकोब वि. आयटीओ 313 आयटीआर 411 (केरळ हायकोर्ट पुष्पा वि. आयटीओ 213 टॅक्सम्मान.कॉम
टीडीएस केला नाही पण डिडक्टीने आयकर भरल्यास परत टॅक्स भरावा लागणार नाही
प्रश्न 44 : आमची भागीदारी आहे. आम्ही एका व्यापार्याला रक्कम देताना टीडीएस कापून घेतला नाही. मात्र सदर व्यापार्याने संपूर्ण रक्कम उत्पन्न दाखवून त्यावर आयकर भरला आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडून कर वसूल केला जाऊ शकतो का ?
उत्तर : आपण व्यापार्याला रक्कम देताना टीडीएस केलेला नाही. मात्र सदर व्यापार्याने सदर रक्कम आपले उत्पन्न दाखवून त्यावर आयकर भरलेला आहे. हे सविस्तर पुरावा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण टीडीएस कापला नाही यासाठी आपल्याकडून टीडीएसची रक्कम वसूल करता येणार नाही.
मात्र आपण ज्या दिवशी टीडीएस करायला हवा होता त्या तारखेपासून व्यापार्याने ज्या दिवशी आयकर भरला त्या तारखेपर्यंत कलम 201(1ए) प्रमाणे होणारे व्याज मात्र आपल्याला भरावे लागेल.