top of page

आयकर कायद्यासंबंधी सल्ला [ मे २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • May 2, 2023
  • 4 min read

ree








कॉन्ट्रॅक्ट वेळेत पूर्ण न झाल्याने द्यावालागणार दंड वजा मिळतो

प्रश्‍न 32 : आमची कंपनी आहे. आम्ही मशिनरी उत्पादन करतो. आमची एका कंपनीशी काही मशिनरी तयार करून देण्याचा करार झाला होता. सदर करारानुसार मशिनरी दिवाळी 2022 पूर्वी द्यावयाची होती ती डिसेंबर 22 आणि जानेवारी 2023 मध्ये कंपनीला दिली गेली. कराराप्रमाणे उशिरा मशिनरी दिल्याबद्दल सदर कंपनीला आम्हाला दंड द्यावा लागला सदर दंडाची रक्कम आम्हाला आमच्या उत्पन्नातून वजावट मिळेल का ?


उत्तर : आपण केलेल्या कराराप्रमाणे मुदतीत मशिनरी देऊ शकला नाही. त्यामुळे आपल्याला सदर कंपनीला आपल्यात झालेल्या कराराप्रमाणे दंड द्यावा लागला. सदर खर्च हा व्यवसायासाठी झालेला खर्च आहे. त्यामुळे सदर खर्च आपल्याला आपल्या उत्पन्नातून वजा मिळू शकेल.


पहा - सीआयटी वि. रिलायबल वॉटर सप्लाय 124 आयटीआर 199 (अलाहाबाद), सीआयटी वि. प्रफुल्लकुमार मलिक 73 आयटीआर 119 (ओरिसा)


लिज भाड्यातून भरलेला म्युनिसिपल कर वजावट मिळेल

प्रश्‍न 33 : मी माझी इमारत, फर्निचर, मशिनरी वगैरे एक रकमी लिजवर दिलेली आहे. भाडे प्रत्येक मालमत्तेवर वेगळे दाखविलेले नाही. या इमारतीवर भरलेली म्युन्सिपाल्टी कराची मला वजावट मिळेल का?


उत्तर : आपण आपली इमारत त्यातील फर्निचर आणि मशिनरी सर्व मालमत्ता एकत्रित लिजवर भाड्याने दिलेली आहे. आपल्याला मिळणारे लिज आपले करपात्र उत्पन्न आहे. आपल्याला मिळणारे लिज भाडे प्रत्येक मालमत्तेवर वेगवेगळे करता येत नसल्याने ते अन्य मार्गातून मिळणारे उत्पन्न (Income From Other Sources) म्हणून करपात्र होत असणार. आपण इमारतीवर म्युनिसिपल कर भरत असल्यास आपणास आपल्या एकूण लिज भाड्यातून म्युनिसिपल कराची रक्कम वजावट मिळेल.


पहा. सीआयटी वि. जगन्नाथ गोविंददास 45 आयटीआर 61 (मद्रास)


व्यावसायिक मालमत्ता रहाण्याची मालमत्ता नाही

प्रश्‍न 34 : माझ्याकडे एक रहाण्याचे घर आहे आणि एक दुकान आहे जे मी भाड्याने दिलेले आहे. माझ्याकडील एक जमीन विकून मी रहाण्यासाठी घर खरेदी करणार आहे. मला आयकर कलम 54 एफ ची वजावट मिळेल का ?


उत्तर : आयकर कलम 54 एफ प्रमाणे व्यक्तीने रहाण्याचे घर सोडून अन्य कोणतीही मालमत्ता विकून रक्कम रहाण्याच्या घरात गुंतविल्यास आपल्याला आयकर कलम 54 एफ प्रमाणे भांडवली नफ्यातून वजावट मिळते. यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  1. जी मालमत्ता विकली आहे ती ज्या तारखेला विकली त्यापासून नवीन रहाण्याचे घर एक वर्ष आधी किंवा 2 वर्षात खरेदी करायला हवे. अथवा 3 वर्षात नवीन घर बांधायला हवे.

  2. नवीन घर खरेदी करताना करदात्याच्या नावाने 1 पेक्षा जास्त रहाण्याचे घर असता कामा नये.

  3. नवीन घर खरेदी केल्यापासून आणि नवीन घर बांधल्यापासून 3 वर्षात विकता कामा नये.

सदर कलमांमध्ये रहाण्याचे घर अशी शब्दरचना आहे त्यामुळे आपण नवीन घर खरेदी करताना एकच रहाण्याचे घर आहे दुसरी मालमत्ता व्यावसायिक (Commercial Property) आहे त्यामुळे आपण जमीन विकून नवीन घर खरेदी करणार असल्याने आणि नवीन घर खरेदी करताना आपल्या नावाने आपल्याकडे एकच रहाण्याचे घर असल्याने आपणास आयकर कलम 54 एफची वजावट मिळेल. यासाठी आपण खालील निर्णय पहावा.


सीआयटी वि. आय आफतीकर आशिफ 68 टॅक्समन.कॉम 25/239 टॅक्समन 443 (मद्रास हायकोर्ट)


मुलाच्या लग्नात मुलाच्या वडिलांना मिळालेली गिफ्ट करमाफ नाही

प्रश्‍न 35 : माझ्या मुलाचे लग्न मागील महिन्यात झालेले आहे. या लग्नात त्याला गिफ्ट मिळाली आहे तसेच मलापण गिफ्ट मिळालेली आहे. मला मिळालेले गिफ्ट करमाफ आहे का ?


उत्तर : आपल्या मुलाच्या लग्नात त्याला आणि आपल्याला गिफ्ट मिळालेली आहे. आयकर कलम 56(2)(x) प्रमाणे कोणत्याही करदात्याला एका आर्थिक वर्षात रु. 50,000 पेक्षा जास्त गिफ्ट मिळाल्यास सदर एकूण गिफ्ट करदात्याच्या करमाफ उत्पनात मिळवून करदात्याला आयकर भरावा लागतो.

सदर कलमात काही अपवाद आहे. आयकर कलम 56(2)(x)(b)(c)(ii) प्रमाणे व्यक्तीला त्याच्या लग्नाच्या वेळेस मिळालेली रक्कम पूर्णतः करमाफ आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळेस आपल्या मुलाला मिळालेली गिफ्ट सदर कलमाच्या तरतुदी अनुसार करमाफ आहे. आपल्याला मिळालेल्या गिफ्ट रु. 50,000 पेक्षा जास्त असल्यास आणि सदर गिफ्ट ती पूर्ण रक्कम आपल्या करपात्र उत्पन्नात मिळवून आपल्याला त्यावर आयकर भरावा लागेल कारण आपल्याला आपल्या मुलाच्या लग्नात गिफ्ट मिळाली आहे. यासाठी आपण खालील निर्णय पाहावा.


राजिंदर मोहनलाल वि. डेप्यु.सीआयटी 36 टॅक्समनन.कॉम 250


व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने 50,000 दरमहा पेक्षा जास्त भाडे देताना मुळातून करकपात करावी लागेल

प्रश्‍न 36 : मी मुंबईत एका कंपनीत कामाला आहे. मी भाड्याच्या घरात रहात असून दरमहा भाडे रु. 1 लाख एवढे आहे. मला भाड्याच्या रकमेतून मुळातून करकपात (टीडीएस) करावी लागेल का?


उत्तर : कलम 194आयबी चा दिनांक 1.6.2017 पासून समावेश करण्यात आला आहे. या कलमानुसार व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने निवासी व्यक्तीला भाडे म्हणून प्रतिमहिना किंवा महिन्याच्या भागासाठी रु. 50,000 पेक्षा जास्त रक्कम दिल्यास 5% दराने टी.डी.एस. कापावा लागेल. मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यासाठी किंवा वर्षात मध्येच जागा सोडल्यास भाडे कराराच्या शेवटच्या महिन्यासाठी भाडे देताना (रोख किंवा चेकने, ड्राफ्टने किंवा अन्य पद्धतीने) किंवा भाडे जागा मालकाच्या खात्याला जमा करताना यापैकी जे आधी असेल त्या महिन्यात करकपात करावी लागेल. म्हणजेच दरमहा करकपात न करता वर्षामध्ये एकदाच करकपात करावी लागेल. अशा करदात्यांना कलम 203ए प्रमाणे टॅन घेण्याची गरज राहणार नाही. जागा मालकाकडे पॅन नसेल तर 20% दराने करकपात करावी लागेल. करकपातीची रक्कम वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा किंवा भाडे कराराच्या शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद आहे.


आर्थिक वर्षात विक्री 1 कोटी पेक्षा कमी असल्यास ऑडिट करून घ्यावे लागणार नाही

प्रश्‍न 37 : माझा व्यवसाय आहे. मागील वर्षापर्यंत माझ्या व्यवसायाची एकूण विक्री 2 कोटीपेक्षा जास्त असल्याने मी ऑडिट करून घेत होतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये माझी 1 कोटीपेक्षा कमी झाली आहे. मला आर्थिक वर्ष 2022-23 चे ऑडिट करून घ्यावे लाभेल का ?


उत्तर : आयकर कलम 44 एबी प्रमाणे ज्या करदात्याची एकूण विक्री, वार्षिक उलाढाल रु. 1 कोटीपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना त्याचे जमाखर्च ऑडिट करून घ्यावे लागते.

आपली विक्री, एकूण उलाढाल 1 कोटीपेक्षा कमी असल्यास आणि आपण आयकर कलम 44एडी प्रमाणे आपला नफा रोख विक्रीच्या 8% अथवा बँकेच्या मार्फत झालेल्या विक्रीवर 6% नफा दाखविला असल्यास ऑडिट करून घ्यावे लागणार नाही.


प्रायव्हेट ट्रस्टने आपले आयकर पत्रक आयटीआर नं. 5 मध्ये भरावा

प्रश्‍न 38 : माझ्या वडिलांनी त्यांच्या विलप्रमाणे एक प्रायव्हेट ट्रस्ट केलेला आहे. सध्या प्रायव्हेट ट्रस्टला कोणत्या आयटीआर मध्ये आयकर पत्रक भरावे लागेल ?


उत्तर : आयकर कायद्यामध्ये वेगवेगळ्या करदात्यांना आपले आयकर पत्रक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दाखल करावे लागतात. मध्ये फॉर्म नं. 1 ते 7 फॉर्म आहेत.

प्रायव्हेट ट्रस्टना आपले आयकर पत्रक आयटीआर नं. 5 मध्ये दाखल करायला लागेल.

 
 
bottom of page