आयकर पत्रक भरायचंय.... काय काय डॉक्युमेंट्स लागतील ? श्री. मनोज भिडे [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Mar 29, 2023
- 2 min read
Updated: Apr 5, 2023

श्री. मनोज भिडे, दापोली
लीगल टॅक्स प्रॅक्टिशनर
९८२२५ ४५२१७
tinfcdapoli@gmail.com
सर्वसामान्यपणे नवीन आयकर पत्रक भरताना माणसाच्या मनात असलेला पहिला प्रश्न ... आता याच उत्तर हे प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाचे स्वरूप काय आहे त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे या प्रश्नाचे ठोस उत्तर देता येऊ शकत नाही. परंतु काही कॉमन डॉक्युमेंट्स असतात जी सर्व प्रकारच्या रिटर्नसाठी लागतातच. खाली अशाच काही कागदपत्रांची यादी दिली आहे. ही बेसिक कागदपत्रे घेऊनच आपण आपले आयकर पत्रक भरायला गेलो तर अजून फार डॉक्युमेंट्स द्यायची शिल्लक राहणार नाहीत. आपल्या उत्पन्नाच्या स्वरूपाप्रमाणे किंवा काही मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर त्यासंबंधीच्या कागदपत्रांची फक्त विचारणा होऊ शकेल.
तत्पूर्वी खालील कागदपत्रे तरी नक्कीच तयार ठेवता येतील -
१) पॅनकार्ड :-
प्रोप्रायटरी असल्यास - स्वतःचे
भागीदारी असल्यास - भागीदारीचे व भागीदारांचे सुद्धा
२) आधारकार्ड :-
प्रोप्रायटरी असल्यास - स्वतःचे
भागीदारी असल्यास - भागीदारांचे
३) आधार-पॅन लिंकिंग :-
हे खूप महत्त्वाचे आहे. आधार - पॅन लिंक नसेल तर रिटर्न दाखल होत नाही. रु. १००० दंड भरून आधार पॅन लिंक करावे लागते.
४) मोबाईल नंबर :-
आधाराला लिंक असलेला मोबाईल देणे. लिंक नसेल तर आधी केंद्रावर जाऊन मोबाईल लिंक करून घेणे. शक्यतो कायमस्वरुपी ठेवणार असलेला मोबाईल नंबर लिंक करावा. आधारला लिंक केलेला मोबाईल नंबर बंद करू नये.
५) ई-मेल आयडी :-
शक्यतो स्वतःचा ई-मेल आयडी द्यावा. दुसरा आपल्या करसल्लागार किंवा सीएचा द्यावा.
६) बँक, पोस्ट ऑफिस, पतसंस्था या सर्वांची बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट :-
(इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा की, ज्या आर्थिक वर्षाचे आयकर पत्रक भरायचे आहे, त्याच आर्थिक वर्षाचे स्टेटमेंट देणे)
उदा. आर्थिक वर्ष २०२२-२०२३ या वर्षाचे रिटर्न भरायचे असेल तर ०१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ चे पासबुक द्यावे.
७) व्यवसायाच्या जागेचा पुरावा :-
स्वतःची जागा असेल तर- जागेचे खरेदीखत किंवा ७/१२.
जागा भाडेतत्वावर असेल तर - भाडे करार.
८) टीडीएस सर्टिफिकेट :-
पगारदार व्यक्ती असेल तर - फॉर्म १६
अन्य उत्पन्नावर टॅक्स कट [करकपात] केला असेल तर - फॉर्म १६A
९) पगारदार व्यक्तींसाठी :-
फॉर्म १६ नसल्यास १२ महिन्याच्या सॅलरी स्लिप किंवा वार्षिक पगारपत्र दाखला
१०) ट्रेडिंग व्यवसाय असल्यास :-
खरेदी विक्रीची बिले, व्यावसायिक खर्चाची बिले, स्टॉक स्टेटमेंट आणि वार्षिक येणे बाकी (उधारी) व व्यापारी देणे बाकी
११) बँकेत FD,RD,पिग्मी असल्यास :-
त्याचे त्या आर्थिक वर्षात मिळालेल्या व्याजाचे स्टेटमेंट
१२) हौसिंग लोन असल्यास :-
त्याचे त्या आर्थिक वर्षात भरलेल्या हप्त्याचे मुद्दल आणि व्याजाचे ब्रेकअप
१३) टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक केली असेल तर :-
उदा. LIC, NSC, PPF, FD, ट्युशन फी इ. तर त्या आर्थिक वर्षात भरणा केलेल्या पावत्या.
१४) शेअर ट्रेडिंग करीत असल्यास :-
डिमॅट अकौंट स्टेटमेंट, फंड होल्डिंग स्टेटमेंट, कॅपिटल गेन / लॉस स्टेटमेंट
१५) रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी :-
निवृत्तीनंतर मिळालेले पीएफ, ग्रॅच्युइटी, लिव्ह एनकॅशमेंट, इ. चे स्टेटमेंट.
वरील १५ पैकी आपल्याला जी लागू आहेत, अशी डॉक्युमेंट्स तर आपण नक्कीच तयार ठेऊ शकतो. या यादीचा उपयोग नवीन रिटर्न भरणारेच नव्हे तर दरवर्षी रिटर्न भरणारे सुद्धा करू शकतात.
दरवर्षी ३१ जुलैपूर्वी आपल्याला रिटर्न भरायचे असते. परंतु दरवर्षी जवळ जवळ ७०% रिटर्न्स ही ड्यूडेटच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतात, हा शेवटच्या क्षणीचा ताण सीए, टॅक्स कन्सल्टंट आणि इन्कमटॅक्स पोर्टल वर देखील पडतो.
वरीलप्रमाणे आपली कागदपत्रे वेळेवर जमवून सादर केली तर हा शेवटच्या क्षणी येणारा ताण आपण नक्कीच कमी करण्यास मदत करू शकू.
आणि हो ... रिटर्न भरण्यास जेवढा विलंब ... तेवढा व्याज आणि लेट फी चा भुर्दंड !!!
तसेच ... टॅक्स रिफंड असेल तर !! जेवढ्या लवकर रिटर्न ... तेवढ्या लवकर रिफंड ... नाही का ?