top of page

आयकर ‘फेसलेस अ‍ॅसेसमेंट’ प्रणाली अ‍ॅड. सुकृत देव [ जाने २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Mar 24, 2023
  • 3 min read

Updated: Mar 28, 2023


ree
फेसलेस अ‍ॅसेसमेंट आयकर विभागाकडून राबविण्यात येत असलेली “फेसलेस असेसमेंट’’ ही प्रणाली खूप उपयुक्त आहे, सध्याच्या काळात व्यवहार, विवरणपत्र, कर भरणा इत्यादी सर्वच गोष्टी ऑनलाइन पद्धतीने झाल्याने, हे ‘ई’ चे जग झाले आहे. त्यामध्ये ई-पेमेंट, ई-फायलिंग, ई-अपील, ई-कॉमर्स, ई-बँकिंग इत्यादी सामावलेले आहे. आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट या योजने अंतर्गत ‘ई-असेसमेंट’ - एक उपयुक्त प्रणाली आयकर विभागाने आणली आणि ती यशस्वीरित्या ते राबवत आहेत. या ‘ई-असेसमेंट’ प्रणालीनुसार आयकरदात्यांनी दाखल केलेले आयकर विवरणपत्र किंवा इतर सर्व आयकर संबंधित माहितीची पडताळणी आज ऑनलाइन पद्धतीने होतं आहे. “फेसलेस असेसमेंट’’ अंतर्गत आयकरदाता किंवा करसल्लागार नोटीस, असेसमेंट, अपील इत्यादी सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकतात, आयकरदात्यांना आयकर विभागात जायची किंवा तिथे हिशोबाची पुस्तके, इन्व्हॉईस (बिल बुक) इत्यादी गोष्टी प्रत्यक्षात घेऊन जायची गरज नाही. ‘फेसलेस असेसमेंट’ मध्ये कुठलाच मनुष्य संपर्क नाही, आयकर अधिकारी आणि आयकरदाता/करसल्लागार प्रत्यक्षात भेटण्याची गरज नाही. ही ‘फेसलेस असेसमेंट’ एक केंद्रीकृत (Centralised) प्रक्रिया आहे, जी आयकर विभागाने विकसित केली आहे, जी विकसित करण्यासाठी आयकर कायदा कलम 144(बी) समाविष्ट करण्यात आला आहे. या ‘फेसलेस असेसमेंट’मुळे आता सर्व आयकरातील छाननी, कर निर्धारणा ही ऑनलाईन व फेसलेस होणार आहे. ‘फेसलेस असेसमेंट’ कार्यान्वित करण्यासाठी ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र प्रस्थावित केले आहे, त्यामध्ये : 1) राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र ‘फेसलेस असेसमेंट’ ही केंद्रीकृत (Centralised) प्रक्रिया असल्याने, राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्राची प्रमुख भूमिका असणार आहे. 2 ) प्रादेशिक ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र प्रादेशिक ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र हे ‘ई-असेसमेंट’ सुरळीत व नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, ज्यामध्ये संयुक्त कमिशनर, अतिरिक्त कमिशनर व इतर अधिकार्‍यांचा समावेश असेल. 3) अ‍ॅसेसमेंट युनिट अ‍ॅसेसमेंट युनिट हे प्रत्यक्षात ई-अ‍ॅसेसमेंट करेल ज्यामध्ये आयकरदात्याचा कुठलाही व्यवहार, माहिती किंवा करपात्र उत्त्पन्न आयकरातून सुटत तर नाही ना? किंवा आयकर रिफंड (परतावा) कमी केव्हा जास्त तर होत नाहीये ना? याची शहानिशा करण्यास मदत होईल. 4) तपासणी युनिट हे युनिट आयकर संबंधीत चौकशी, उलट तपासणी, हिशोबाच्या पुस्तकांची तपासणी, साक्षीदाराचा जबाब नोंदविणे, विधान (स्टेटमेंट) रेकॉर्ड करणे इत्यादी अशा अनेक गोष्टींची तपासणी करण्यास मदत होणार आहे. 5) तांत्रिक युनिट तांत्रिक गोष्टींची तपासणी हा विभाग/युनिट करेल. 6) पुनर्विचार युनिट (Review) या युनिट अंतर्गत सादर केलेले पुरावे, माहिती, इत्यादी याची परत तपासणी केली जाईल. या सर्व युनिट्स मधील समन्वय, संवाद हे राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र करणार आहे, त्याचबरोबर या युनिट्सला माहिती पुरविणे, कागदपत्र पाठविणे, पुरावे सादर करणे, केस-टू-केस वाटप, इत्यादी गोष्टी देखील राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र करणार आहे, हे लक्षात असणे आवश्यक आहे. या ई-अ‍ॅसेसमेंटसाठी जी कार्यपद्धती नमूद केली आहे ती खालीलप्रमाणे 1) राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र आयकरदात्यांना ऑनलाईन नोटीस पाठवेल, ही नोटीस आयकरदात्याने अधिकृत नोंदवलेल्या ई-मेल वर पाठवण्यात येईल. 2) आयकरदात्याने या नोटीसला 15 दिवसांच्या आत उत्तर देणे अपेक्षित आहे, हे उत्तर ऑनलाईनच आयकराची वेबसाईट www.incometax.gov.in/iec/foportal, वर लॉगिन करून पाठवायचे आहे. 3) आयकरदात्याने आयकर कायदा 1961 कलम 139, 148 (1), 142 (1), 143 (1), खाली आयकर विवरणपत्र दाखल केले आहे किंवा दाखल केलेच नाही, आणि करपात्र उत्पनामध्ये तफावत दिसून आली आहे, अशा वेळेस राष्ट्रीय ई-अ‍ॅसेसमेंट केंद्र हे ‘फेसलेस अ‍ॅसेसमेंट ’ प्रणालीप्रमाणे अ‍ॅसेसमेंट पूर्ण करण्यास इंटिमेट करते. ‘फेसलेस अ‍ॅसेसमेंट’ बद्दल जाणून घेऊ काही प्रमुख मुद्दे, खालील प्रमाणे 1) ‘फेसलेस असेसमेंट’ मुळे भ्रष्टाचारास आळा बसण्यास मदत होईल. 2) आयकर विभागात जाऊन कुठल्याही अधिकार्‍यास भेटण्याची गरज आयकरदात्यास/ कर सल्लागारास पडणार नाही. 3) अधिकारी कोण, केस कोणाकडे जाईल, हे काहीच सांगू शकत नाही आणि मुख्य म्हणजे एकाच अधिकार्‍याकडे अनेक वर्ष तुमची केस असणार नाही, अधिकारी बदलत राहतील, त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल. 4) ‘फेसलेस असेसमेंट’मुळे पारदर्शकता नक्कीच वाढणार आहे. 5) ‘फेसलेस असेसमेंट’ ला किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. ऑनलाईन प्रणाली, ई-मेल द्वारे अचूक उत्तरे पाठवणे आज सगळ्यांना जमेलच असं नाही. ई- मेल द्वारे पाठवलेले सूचनापत्र (इन्टिमेशन) आणि त्याला दिलेले उत्तर नीट दिले नाही तर आज आयकर, त्यावरचा दंड, व्याज हे देखील भरावयास येऊ शकते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, म्हणूनच आयकरदात्याने अचूक उत्तर देणे आवश्यक आहे. 6) ‘फेसलेस असेसमेंट’साठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड/माहिती ठेवणे आवश्यक आहे, त्याचबरोबर ई-मेल, मोबाईल नंबर, डिजिटल स्वाक्षरी, इत्यादी गोष्टी अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. ही संगणकीय व इलेक्ट्रॉनिक पद्धत कशी वापरायची, हे आयकर-दात्याला माहित असणे गरजेचे आहे. 7) ‘फेसलेस असेसमेंट’ हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाते, यासाठी आयकरदात्याकडे अद्ययावत सामग्री असणे देखील गरजेचे आहे. या अ‍ॅसेसमेंटबद्दलची सर्व माहिती, पुरावे, वेळ, तारीख, वाद विवादाचे मुद्दे, आयकराची रक्कम इत्यादी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आयकरदाता किंवा कर सल्लागारांना पाहिजे. ‘फेसलेस अ‍ॅसेसमेंट’ प्रणाली ही एक उत्तम सुविधा आयकर विभागाने कार्यान्वित केली आहे, ज्यामुळे भ्रष्टाचारास नक्की आळा बसेल. आयकर विभागाकडून राबविण्यात येत असलेली “फेसलेस अ‍ॅसेसमेंट’’ ही प्रणाली खूप उपयुक्त आहे आणि तिची व्याप्ती ही येणार्‍या काळात वाढणार आहे.
अ‍ॅड. सुकृत देव 98605 74036 sukrut_deo29@yahoo.co.in
 
 
bottom of page