आयकर रिटर्न फाईल करण्यास सुरूवात - होईल मोठे फायदे-सौ. सुनिता कातकाडे [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 28, 2023
- 4 min read
आयकर रिटर्न फाईल करण्यास सुरूवात - होईल मोठे फायदे

सौ. सुनिता कातकाडे, कर-सल्लागार नाशिक
98818 43617
एकाच ठिकाणी जाणून घ्या सर्व माहिती आणि लवकरात लवकर रिटर्न दाखल करा.
आयकर रिटर्न (आयटीआर) टॅक्स स्लॅब-मध्ये बसत नाही या कारणाने रिटर्न भरण्याची गरज नाही असा चुकीचा समज लोकांमध्ये आहे. खरंतर टॅक्स स्लॅबच्या करपात्र उत्पन्न श्रेणीत तुम्ही आहात किंवा नाही तरी देखील आयकर रिटर्न (आयटीआर) फाईल केले पाहिजे, त्यापासून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
आयकर रिटर्नचे (आयटीआर) फायदे
1. उत्पन्नाचा वैध प्रामाणिक पुरावा
आयकर रिटर्न (आयटीआर) फाईल केल्यामुळे करदात्याला एक कायदेशीर प्रमाणित दस्तऐवज प्राप्त होतो ज्यात तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती असते. तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा प्राप्त होत असल्याने तुम्हाला स्वतःची पत निर्माण करणे, कर्ज प्रकरणे, क्रेडिट कार्ड अशा गोष्टी सहजसाध्य होतात तसेच तुम्हाला स्वतःच्या क्रेडिट स्कोअरच्या माहितीस ही मदत होते.
2. व्यवसायासाठी तसेच कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी आयकर रिटर्न भरणे गरजेचे
जर तुम्ही व्यवसाय करू इच्छित असाल किंवा एखाद्या कार्यालयामार्फत कॉन्ट्रॅक्ट घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला आयकर रिटर्न खूप कामी येणार आहे. सरकारी कार्यालयामार्फत कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी मागील 3 ते 5 वर्षापर्यंतचे आयकर रिटर्नची मागणी गेली जाऊ शकते. त्यावरून तुमचे क्रेडिट, आर्थिक स्थिती तपासली जाते. याकरिता देखील आयकर रिटर्न भरणे फायदेशीर आहे.
3. गृह कर्ज किंवा इतर कोणतेहीकर्ज घेण्यास रिटर्न गरजेचे
तुम्ही कोणत्याही कर्जासाठी अर्ज करत असला तर तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा मागितला जातो. गृहकर्ज प्रकरणात मागील 3 वर्षांपर्यंतच्या रिटर्नची कॉपी मागितली जाते. जर तुम्ही देण्यास सक्षम नसाल तर बँक तुमचे कर्ज प्रकरण नाकारू शकते. याकरिता तुम्ही नियमित रिटर्न भरले पाहिजे. त्याचा तुम्हाला कमी व्याजदरासाठी देखील फायदा होऊ शकतो.
4. टॅक्स रिफंड मिळविण्यासाठी रिटर्न भरले पाहिजे
तुम्ही आयकर स्लॅबमध्ये येत नसाल तरी देखील आर्थिक व्यवहारात काही कारणास्तव तुमचा टीडीएस कापला गेला तर तो तुम्ही रिटर्न दाखल करून परत मिळवू शकता. आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून त्याची तपासणी केली जाते व तुमचा कापलेला टॅक्स जर रिफंड येत असेल तर तो प्रोसेस होऊन तुमच्या बँक खात्यात व्याजासह जमा केला जातो.
5. जास्त रकमेच्या विमा संरक्षणासाठी रिटर्न भरणे फायद्याचे
तुम्ही जर मोठ्या रकमेचा विमा/टर्म पॉलीसी घेऊ इच्छित असाल तर विमा कंपनी तुमच्याकडे आयकर रिटर्नची मागणी करते. त्यानुसार तुमचे उत्पन्न व उत्पन्नाचे स्त्रोत चेक केले जातात. त्यामुळे तुम्हाला मोठ्या रकमेचा विमा/टर्म पॉलीसी घेण्यास मदत होते.
6. व्हिसासाठी आयकर रिटर्न गरजेचे
विदेश भ्रमण करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. तुम्ही जेव्हा व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा संबंधित अधिकारी तुमच्याकडे मागील 3 ते 5 वर्षाच्या कालावधीचे आयकर रिटर्नची मागणी करू शकतात. आयटीआरच्या माध्यमातून तुमची आर्थिक स्थिती बघितली जात असते म्हणून याकरिता देखील आयकर रिटर्न भरणे गरजेचे आहेत.
आयकर रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्ही जर आयकर भरत असाल तर लवकरात लवकर रिटर्न भरून निश्चिंत झाले पाहिजे कारण रिटर्न भरण्याकरिता अनेक वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे/ पुरावे द्यावे लागत असतात आणि याबाबत तुम्हाला माहिती असायला हवी; जेणेकरून नंतर कागदपत्रे जमवा-जमव करण्यास त्रास होणार नाही व रिटर्नही वेळेत दाखल होईल.
1. फॉर्म 16 (Form 16)
आयकर रिटर्न फाईल करताना तुम्ही फॉर्म 16 सादर केला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आहे जे एक प्रकारचे तुमच्या पगाराचे प्रमाणपत्र म्हणून दिले जाते, ज्यात तुमचा पगार, टॅक्स कपात, भविष्य निर्वाह निधी अशी स्वरूपाची माहिती असते. हा फॉर्म तुम्हाला पार्ट ए व बी मध्ये दिला जात असतो.
2. सॅलरी सर्टिफिकेट
जर तुम्ही नोकरदार असाल परंतु फॉर्म 16 मिळत नसेल तर तुम्ही दरमहा मिळणार्या सॅलरीचे सर्टिफिकेट घेऊन ते तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करू शकता.
3. बँक खात्याचा तपशील व स्टेटमेंट
तुमचे विविध बँकेत खाते असेल तर त्या सर्व बँक खात्यांची माहिती व त्याचे स्टेटमेंट इ. माहिती द्यावी लागणार आहे. या सर्व माहितीवरून तुमचे उत्पन्न सत्यापित केले जाते याचबरोबर तुम्ही काही मोठ्या प्रमाणात व्यवहार केले असतील तर त्याची माहिती येथे प्रस्थापित करता येऊ शकते. तुमचा टॅक्स रिफंड असेल तर तो कोणत्या बँकेत प्रोसेस करायचा यासाठी देखील बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो.
4. गुंतवणुकीचा तपशील
कर वाचवण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणुकीवरील करकपातीचा पर्याय उपलब्ध असतो. यासाठी तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे यासंबंधीचा तपशील व कागदपत्रे सादर करावी लागतात जेणेकरून आयकर कायद्यातील कलमात उपलब्ध असलेल्या कर वाजवटीची सवलत तुम्ही घेऊ शकता. गुंतवणुकीवरील करसवलतीसाठी तुमच्याकडे विमा हप्ता, पीपीएफ, एफडी, डोनेशन, मुलांची ट्यूशन फीस, म्युच्युअल फंड, शैक्षणिक कर्ज इ. अशा विविध खर्चांवरील व गुंतवणुकीवर तुम्ही कराची सवलत मिळवू शकतात.
5. इतर अन्य मार्गाने मिळविलेले उत्पन्न
तुम्हाला इतर स्रोताच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होत असेल तर त्यासंबंधीची माहिती देखील द्यावी लागते. यात तुम्हाला मिळालेले बँक इंटरेस्ट, एखादी प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर दिलेली असेल तर त्यापासून मिळणारे उत्पन्न, शेअर बाजार, पोस्ट खात्यातील विविध स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीपासून होणारा फायदा तसेच डिव्हिडंट अशा स्वरूपाच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती सादर करावी लागते.
6. गृहकर्जाचा तपशील
तुम्ही जर गृहकर्ज घेतलेले असेल तर त्यावर भरलेल्या व्याजाची कर सवलत/वजावट तुम्ही क्लेम करू शकता. याकरिता तुम्हाला गृहकर्जाचा तपशील व भरलेल्या व्याजाचा तपशील संबंधित बँक/कंपनी कडून घेऊन सादर करावा लागतो.
7. कॅपिटल गेन
प्रॉपर्टी किंवा शेअर/सिक्युरिटी मधील गुंतवणुकीवर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत असतो यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा दस्तऐवज व शेअर बाजार व्यवहाराची माहिती सादर करावी लागते.
सावधान.... रिटर्न दाखल करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी नाहीतर येऊ शकते आयकर विभागाची नोटीस ! आयकर विभागाची आर्थिक व्यवहारांवर नजर
करदात्यांना त्यांच्या व्यवहारांची ऐच्छिक परिपूर्तता करण्यासाठी व कर चोरीला लगाम लावण्यासाठी आयकर विभाग विविध उपाय योजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाच्या ई-पोर्टलवर AIS/26AS द्वारे तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपलब्ध करून दिली जाते. विविध स्रोतांच्या/डेटाच्या माध्यमातून आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहाराबद्दलची माहिती प्राप्त असते. TDS/TCD आकर्षित करणार्या पावत्या, स्थावर मालमत्ता खरेदी किंवा विक्री, बँक ठेवी, शेअर्स/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, मुदत ठेवी, पोस्ट खात्यातील विविध स्कीममध्ये केलेली गुंतवणूकीपासून होणारा फायदा व इतर अन्य स्रोताच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न, यासोबतच विदेश यात्रा व रक्कम रु. 10 लाख रुपयांवरील वाहन खरेदीची माहिती तुमच्या आयकर खात्याच्या AIS/26AS पोर्टलवर उपलब्ध असते. त्यामुळे रिटर्न दाखल करतेवेळी तुम्ही तुमच्या उत्पन्नाची खात्रीपूर्वक सर्व माहिती देऊन कराचे योग्य पद्धतीने मूल्यमापन केले आहे हे पाहणे गरजेचे आहे.
तुम्ही दाखल केलेल्या रिटर्नची आयकर विभागाकडून तपासणी केली जाते. यात काही तफावत आढळल्यास आयकर विभागामार्फत तुम्हाला नोटीस बजावली जाऊ शकते व तुम्हाला विचारलेली माहिती सादर करावी लागते. यात तुमची चूक आढळल्यास आयकर विभागाकडून कार्यवाही केली जाते व तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंडही भरावा लागू शकतो. याकरिता रिटर्न भरते वेळी कोणतीही माहिती लपवू नका तुमच्या आर्थिक व्यवहाराची पुरेपूर माहिती तुमच्या कर/आर्थिक सल्लागार यांना द्या व भविष्यात आयकर विभागाकडून नोटीस येणार नाही याबाबत निश्चिंत व्हा...!