आर्थिक घडामोडींचा वेध [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 28, 2023
- 3 min read
आर्थिक घडामोडींचा वेध

सुवर्णसाठा वाढला

भारताचा अधिकृत सुवर्णसाठा मार्च 2022 ते 2023 या काळात 34.22 टनांनी वाढला आहे. याच काळात जगात सर्वाधिक सुवर्णसाठा तुर्कीमध्ये 140.88 टनाने वाढला. त्या खालोखाल चीन 120.06 टन, सिंगापूर, 68.67 टन यांचा क्रमांक लागतो.
निर्लेखित कर्जाची वसुली नगण्यच
स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने थकीत कर्ज खात्यामधून 2017-18 ते 2022-23 या सद्य वर्षात एकूण रुपये 2,29,657 कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) केली आहेत. यापैकी फक्त 21 टक्के कर्जेच (48,104 कोटी रुपये) सहा वर्षात वसूल झाली आहेत. अशी माहिती बँकेने प्रसिद्ध केली आहे. गेल्या दहा वर्षात बँकांनी एकूण रुपये 13,22,309 कोटीची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) केली आहेत. कर्ज निर्लेखित करणे म्हणजे बँकातील महिन्यांहून (90 दिवस) अधिक कर न भरलेली कर्जे अनुत्पादित (एनपीए) म्हणून घोषित करतात. अनेक वर्षे प्रयत्नानंतर ती वसूल झाली नाहीत तर ती कर्जे निर्लेखित केली जातात. यामुळे ती बँकेच्या ताळेबंदाचा भाग रहात नाहीत. पर्यायाने अशा नवीन कर्जासाठी कराव्या लागणार्या आर्थिक तरतुदीपासून बँकांचा बचाव होतो. यावरुन मध्यंतरी संसदेत मोठा गोंधळ झाला होता.
‘पुणे विद्यापीठ’ कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अनुक्रमे डॉ. सुरेश गोसावी, डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. संजय भावे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी या नियुक्त्या केल्या. डॉ. गोसावी हे ‘पुणे विद्यापीठा’च्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
सह्याद्री रुग्णालयाची 750 कोटींची गुंतवणूक योजना
सह्याद्री रुग्णालयाने पुढील तीन ते चार वर्षात पायाभूत सुविधांवर 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. या गुंतवणुकीतून रुग्णांना दुप्पट क्षमतेने वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पुणे, नाशिक पाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, कोल्हाूपर आदी शहरात ‘सह्याद्री’ आपला विस्तार करणार आहे ही माहिती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्रार अली दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉसमॉस बँकेला विक्रमी नफा
‘कॉसमॉस’ या सहकारी बँकेला मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 151 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाला आहे. तर 213 कोटी रुपये करपूर्व नफा झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 30 हजार 700 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला असून त्यामध्ये 17 हजार 600 कोटींच्या ठेवी आणि 13 हजार 10 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.
‘फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स’च्या ‘सीईओ’ पदी श्री. रजनीश दिवाण

इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट क्षेत्रात कार्यरत असणार्या फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) श्री. रजनीश दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाण यांना या क्षेत्रातील 38 वर्षांचा अनुभव असून त्यांनी यापूर्वी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम केले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव वासदेव यांनी दिली आहे.
महिंद्राची ‘सुप्रो सीएनजी ड्युओ’ बाजारात

महिंद्र अॅण्ड महिंद्र या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने ‘सुप्रो सीएनजी ड्युओ’ ही मालवाहतुकी-साठी उपयुक्त गाडी बाजारात आणली आहे. ही गाडी सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालू शकते. याची किंमत रुपये 6 लाख 30 हजार पासून सुरु होते. या गाडीची माल वाहून नेण्याची क्षमता 750 किलो इतकी असून ही गाडी दोन रंगात बाजारात उपलब्ध झाली आहे. ही माहिती श्री. विजय नाक्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डिजिटल पेमेंटमध्ये भारत अव्वलस्थानी
भारताने सन 2022 या वर्षात डिजिटल पेमेंटमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. जागतील एकूण डिजिटल रिअल टाईम पेमेंटपैकी 46 टक्के व्यवहार भारतात झाले आहेत. सन 2022 मध्ये भारतात 89.5 दशलक्ष रिअल टाइम डिजिटल व्यवहार झाले; ते जगात सर्वाधिक आहेत असे रिझर्व्ह बँकेने नमूद केले.
‘प्रिसिजन’ला पुरस्कार
सोलापूर येथील प्रिसिजन कॅमशाफ्टस् लि. या कंपनीला सन 2022 या वर्षी सुट्या भागांच्या सर्वोत्तम पुरवठादार कामगिरीसाठी टोयोटो मोटर्सकउून दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘शून्य दोष पुरवठा’ आणि ‘सर्वोत्तम गुणवत्तेचा पुरवठा’ यासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. कंपनीचे गुणवत्ता विभाग प्रमुख श्री. गणेश चिंताकिंवी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
किरकोळ महागाई दरात घट
भाजीपाला, तृणधान्य आदीच्या किंमती घसरल्याने मे 2023 या महिन्यात किरकोळ महागाई दर 25 महिन्यांच्या निचांकी म्हणजे 4.25 टक्के नोंदवला गेला. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या दृष्टीने ही नक्कीच समाधानकारक बाब आहे. गेले चार महिने सलग महागाई दरात घसरण होत आहे. हा दर मागील वर्षी मे 2022 मध्ये 7.4 टक्के इतका होता.
मुंबई-दिल्ली विमान प्रवास जगात सर्वात महाग
जर तुम्ही 24 तास अगोदर मुंबई-दिल्ली विमान प्रवास करण्यचे ठरविले तर त्यासाठी रुपये 14 हजार मोजावे लागणार आहेत. हा प्रवास नॉनस्टॉप स्वरुपातील असून देशांतर्गत प्रवासासाठी इतकी रक्कम मोजावी लागणे हा जगभरातील विमान प्रवास तिकिटाचा सर्वात महाग पर्याय आहे. नुकतीच ही आकडेवारी विमान कंपन्यांनी प्रसिद्ध केली.