आर्थिक साक्षरता आणि संस्कार सीए. सुरेश मेहता [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 7, 2023
- 4 min read

सीए. प्रा. सुरेश मेहता, पुणे.
98901 78548
skm.fca@gmail.com
विषयाचे नाव वाचून सामान्य माणूस गोंधळात पडू शकतो. आपण आर्थिक दृष्ट्या संपन्न असलो तरी साक्षर असतोच असे नव्हे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार ‘Depositors Education & Awareness Fund - DEAF’ या खात्यात ठेवीदारांनी हक्क न सांगितलेले किंवा गेल्या दहा वर्षात व्यवहार न झालेले 32 हजार कोटी रुपये अक्षरश: पडून आहेत. हे एकच उदाहरण आपल्या आर्थिक निरक्षरतेचे पुरेसे बोलके उदाहरण आहे.
तसे पाहिल्यास हा विषय अतिशय व्यापक आहे. त्यात गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद करता येणे अशक्य आहे. तसेच लक्ष्मीपुत्रांपासून भगवी शिधापत्रिका धारकांच्या जीवनात या विषयास अनन्य साधारण असे महत्त्व आहे.
हा विषय जसा अर्थशास्त्राशी निगडित आहे तसा अनेक कायद्यांशीही निगडित आहे. कारण प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा संबंध कोणत्या ना कोणत्या कायद्याशी आलेला असतो त्यामुळे ‘अर्थ’ आणि ‘कायदा’ यांचा अभ्यास म्हणजे ‘आर्थिक साक्षरता’ या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. इतकी प्रास्ताविक माहिती दिल्यानंतर सुमारे दोन तासाच्या व्याख्यानाचा विषय असणारा हा विषय जागेची मर्यादा असल्यामुळे अतिशय संक्षिप्त स्वरूपात महत्त्वाचे मुद्दे मांडून खाली स्पष्ट केला आहे.
पॅन (PAN)
(अ) याचा उच्चार पॅन नंबर असे करणे अत्यंत चुकीचे आहे. पॅनचे दीर्घरूप ‘पर्मनंट अकौंट नंबर’ असा आहे. त्यामुळे ‘पॅन’ नंतर पुन्हा ‘नंबर’ म्हणणे/ लिहिणे बंद करावे.
(ब) पॅन बरोबर आहे की चूक आहे हे पॅनमधील अक्षर क्रमांक चार आणि पाचवरून कळते. वैयक्तिक करदात्यांबाबत पॅनमधील चौथे अक्षर ‘पी’ हवे असते आणि पाचवे अक्षर आपल्या आडनावाचे इंग्रजी अद्याक्षरच असते. याप्रकारे सर्वांनी आपापला पॅन असा तपासून घ्यावा.
बँकेतील खाते
(अ) आपले बँक खाते शक्यतो संयुक्त (जॉईंट) असावे.
(ब) सही करण्याचा अधिकार मात्र सोयीसाठी एकाकडेच असावा.
(क) डेबिट कार्ड ज्याचे आहे त्यानेच वापरावे; इतरांनी वापरू नये.
(ड) शासनाच्या धोरणानुसार तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी एका बँकेच्या सर्व शाखात मिळून सर्व
प्रकारच्या ठेवींची रक्कम शक्यतो 4.75 लाखापर्यंतच ठेवावी.
(इ) कर्जफेड वेळच्या वेळी करावी.
(फ) ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे त्याच कारणासाठी ते वापरावे.
(ग) गृहकर्जावरील बँकेचा बोजा पूर्ण कर्ज फेडल्यानंतर न विसरता उतरवून घ्यावा.
(ह) कर्ज प्रकरणात रिकाम्या कागदपत्रांवर सह्या करू नयेत.
(ङ) बँकेने आकारलेले व्याज तपासून घ्यावे.
(ञ) बँकेच्या कर्ज मंजुरीच्या पत्राची प्रत आणि सर्व कागदपत्रांची प्रत आपल्या दप्तरी ठेवावी.
विमा
(अ) आपल्या खिशाची परवानगी घेऊनच पुरेशा रकमेचा आयुर्विमा उतरवावा.
(ब) विमा ही ‘गुंतवणूक’ नसून ‘धोक्यापासून संरक्षण’ आहे हे लक्षात ठेवावे.
(क) पंतप्रधानांच्या दोन्ही विमा योजनांमध्ये पैसे गुंतवावेत : (i) 436 मध्ये दोन लाख रुपयांचा आयुर्विमा
आणि (ii) 20 मध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा.
(ड) आयुर्विमा घेताना शक्यतो ‘मनी बॅक पॉलिसी’ प्रकारातील विमा न घेता दीर्घकाळ मुदतीचा फक्त हप्ते
भरावयाचा आयुर्विमा आयुष्याच्या शक्य तेवढ्या सुरूवातीस घ्यावा.
(इ) आयुर्विम्याबरोबर शक्यतो वैद्यकीय विमा (मेडिक्लेम) पण लवकरात लवकर कमी वयातच खिशाची
परिस्थिती पाहून उतरवावा.
डिजीटल लॉकर
(अ) आपल्या सर्वांना कागदपत्रे सांभाळण्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी केंद्र सरकारने ‘डिजी अॅप’ नावाची प्रणाली विकसित केली आहे. ही शासकीय प्रणाली आहे म्हणून अत्यंत सुरक्षित आहे.
(ब) या प्रणालीचा वापर करण्यासाठी ती आपल्या वाहन दूरध्वनी संचात (मोबाईल) अगोदर संचित करावी आणि नंतर सर्व केंद्र सरकारची, राज्य सरकारची अगर स्थानिक स्वराज्य संस्थांची तुमच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे संग्रहीत करावी. उदा. पॅन कार्ड, आधारपत्रिका, वाहन परवाना, पारपत्र, घराची सर्व कागदपत्रे, जातीचा दाखला इ.
(क) डिजीटल लॉकरमध्ये संग्रहित केलेली कागदपत्रे सर्वत्र स्वीकारली जातात. उदा. : बँकेकडे आपण पॅन आणि आधारपत्रिका पाठवू शकतो व त्यातून पोलिसांना वाहन परवाना दाखवू शकतो. हॉटेलमध्ये खोल्या घेताना ही कागदपत्रे आपण दाखवू शकतो.
(ड) कागद विरहित व्यवहार, पारदर्शकता, विश्वासार्हता, पर्यावरणाचे रक्षण ही सर्व या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून आपण या प्रणालीचा कमाल वापर केला पाहिजे.
गुंतवणूक
(अ) कोठेही गुंतवणूक करताना सुरक्षितता, रोखता आणि परतावा (Safety,Liquidity and Return) यांचा
गांभीर्याने विचार करा.
(ब) कोणत्याही जाहिरातीला व्याजाच्या आणि गाजरांच्या आशेने बळी पडू नका.
(क) आपली आर्थिक नुकसान सोसण्याची क्षमता पाहूनच भाग/इतरत्र Short Natural Fund मध्ये
गुंतवणूक करा.
(ड) प्रथम आपले आणि कुटुंबियांचे आर्थिक भवितव्य निश्चित आणि सुरक्षित करा. परतावा कमी मिळाला
तरी चालेल पण आमिषाला बळू पडू नका.
(इ) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसारख्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या.
(फ) शेअर मार्केटमध्ये किती जणांचे भले झाले आणि किती जण कंगाल झाले ही माहिती कोणी सांगत नाही
हे लक्षात घ्या.
(ग) गुंतवणूक करताना एकाच टोपलीत सगळी ठेव ठेवू नका. अनेक प्रकारची विविध क्षेत्रात गुंतवणूक करा
आणि तसे करताना विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणीही करा.
(ह) ‘72’ चा सिद्धांत जरूर वापरा.
(ङ) शेअर भागातील गुंतवणुकीचे साधे तंत्र (पण वरील डी आणि इ ला धरून) = 100 वजा तुमचे वय. शुभेच्छा!
कागदपत्रे (Documents)
जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक टप्प्यांवर अनेक कागदपत्रे आपणाला सांभाळावी लागतात. उदा. जन्मदिनांक दाखला, जातीचा दाखला (मला कधीही लागला नाही, आपणही मागू नये) उत्पन्न दाखला, आयकर कायम खाते क्रमांक, आधार पत्रिका, पारपत्र, मालमत्ता खरेदी खत आणि मालमत्ता पत्रिका, विवाह नोंदणी दाखला इ. ही सर्व मूळ कागदपत्रे, कुटुंबातील सर्वांना विश्वासाने दाखवा. ही सर्व कागदपत्रे एका स्वतंत्र धारिकेत (म्हणजे फाईल) नीट लावून ठेवा. त्याची एक अनुक्रमणिका धारिकेत लावून ठेवा. गरज नसताना ही धारिका सारखी काढू नका. ती नीट सुरक्षित ठिकाणी घरी अगर बँकेत ठेवा. डिजीटल लॉकरचा यासाठी जरूर वापर करा.
देय तारीख नोंदवही
(अ) आपली मुदत ठेव, विमा पत्रे, राष्ट्रीय बचत दाखला वेगवेगळ्या दिनांकांना देय होतात.
(ब) तसेच पारपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, पीयूसी, व्यवसायातील विविध परवाने यांचे नूतनीकरणही करावे
लागते. या सर्व घटना देय तारखेच्या क्रमाने लिहून ठेवून त्यानुसार कार्यवाही करा.
इच्छापत्र
अभद्र विचार करण्याची सवय बाजूला ठेवून इच्छापत्र तयार करून ठेवा. आपल्या कुटुंबियांच्या निधनानंतर त्वरितपणे मतदान पत्रिका आणि बँक खात्याला जोडलेला दूरध्वनी क्रमांक निष्क्रीय करावा.
आपली नैतिक कर्तव्ये
आपला संसार आपल्याला करावयाचा असतो, तसे सरकार कोणत्याही पक्षाचे असो सरकारला देशाचा संसार करावयाचा असतो. त्यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्ज फेडणे, आयकर अगर वस्तू आणि सेवाकर देणे या गोष्टी करा. तुम्हाला चांगल्या शाळा, दवाखाने, रस्ते, वीज इ. गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी सरकारला हातभार लावा. हे केल्यावर तुम्हाला मागण्या मागण्याचा, टीका करण्याचा अगर सल्ला देण्याचा अधिकार असतो हे लक्षात घ्या.
समारोप
मी या विषयावर एकावेळी (न थांबता) किमान दोन तास व्याख्यान देतो. शक्य तेवढे मुद्दे येथे मांडले असले तरी अनेक गोष्टी राहिल्या आहेत. मी प्रामुख्याने वैयक्तिक विषयांवर लिहिले आहे. सार्वजनिक आर्थिक साक्षरता आपण नंतर कधी तरी पाहू. एवढे केले तर तुम्ही आणि तुमच्या बरोबर देशाची आर्थिक घडी बसेल. निर्णय आणि कृती तुमची आहे. तुमच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.