इंडियन बँकिंग इन रिट्रॉस्पेक्ट [ मे २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 2, 2023
- 2 min read

डॉ. आशुतोष रारावीकर
भारतीय बँकिंग क्षेत्राचा आजवरचा रंजक प्रवासाचा सुरस आढावा म्हणजे डॉ. आशुतोष रारावीकर यांचे “इंडियन बँकिंग इन रिट्रॉस्पेक्ट” हे बहुचर्चित पुस्तक. या पुस्तकाद्वारे लेखकांनी प्राचीन बँकिंग ते कोविड महामारीचा काळ व त्यानंतरची भारतीय बँकिंगची वाटचाल उलगडून दाखवलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ (1947 ते 1967) आर्थिक सुधारणांचा काळ (1967 ते 1991) व त्यानंतरचा काळ अशा चार महत्त्वपूर्ण टप्प्यांतील बँकिंगचा लेखा जोखा प्रस्तुत पुस्तकातून मांडलेला आहे. लेखकांच्या मतानुसार बँकिंग या संकल्पनेची उत्पत्ती वेदकाळातील असून हुंडी व तत्सम तारणविरहीत व्यवहार त्या काळात होत असल्याचे दाखले त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत.
आधुनिक भारतीय बँकिंगची सुरुवात 18 व्या शतकात झाली व त्यानंतरच्या स्वदेशी चळवळींमुळे भारतीय मालकीच्या बँकांनी आपली पाळेमुळे खोलवर रुजवली. 1947 ते 1967 या दोन दशकांत भारतीय बँकिंग क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. वित्तीय सुदृढता प्राप्त करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला विविध उपाययोजनांचा अवलंब करावा लागला. आर्थिक व सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट समोर ठेऊन बँकांनी वंचित घटकांना वित्तपोषण केले ते याच काळात. समाजाभिमुख भूमिकेमुळे बँकिंग क्षेत्रावर आलेला ताण व त्यानंतर राष्ट्रीयकरणामुळे या क्षेत्राने लोकांचा विश्वास कसा जिंकला याचे विवेचन लेखकांनी साक्षेपीवृत्तीने केलेले आहे.
1990 च्या काळातील बँकिंगची वाटचाल लेखक दोन टप्प्यात अधोरेखित करतात. पहिला टप्पा 1991 ते 98 व दुसरा टप्पा 1998 व नंतर. प्रथम टप्प्यात या क्षेत्राने स्वतःला मजबूत व लवचिक बनवले तर दुसर्या टप्प्यात उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक मानदंड व सुधारणांचा अवलंब केला; ज्यामुळे जोखीम व्यवस्थापन करणे सुलभ झाले. एम. नरसिंहम समितीच्या शिफारशी लागू करणे, नाबार्डची स्थापना, सहकारी व ग्रामीण बँकांचे सक्षमीकरण याच काळात झाल्याने कृषीक्षेत्राला वित्तपोषण देणे शक्य झाले. बँकिंग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष, खासगी व परदेशी थेट गुंतवणूक याबाबतचे धोरण रिझर्व बँकेने याच काळात आखले व लागूही केले. रिझर्व बँकेचे, मध्यवर्ती बँक म्हणून असेलले महत्त्व लेखकांनी प्रत्येक टप्प्याच्या विवेचनातून अधोरेखित केलेले आहे.
हे पुस्तक म्हणजे बँकिंग क्षेत्राचा साद्यंत इतिहास असून समकालीन अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण दस्तावेजही आहे. लेखक अर्थतज्ज्ञ, संशोधक व धोरणकर्ते असल्याने पुस्तकाचा विषय क्लिष्ट असूनही भाषा अत्यंत सोपी व ओघवती असल्याने पुस्तक वाचनीय झालेले आहे. पुस्तकाचे उद्दिष्ट अर्थप्रबोधन असल्याने अत्यंत सोपी इंग्रजी शब्दयोजना लेखकांनी अवलंबिली आहे. प्रत्येक सुविद्य नागरिकाने वाचावे, असे हे पुस्तक नक्कीच आहे.