उद्योगाचं व्यवस्थापन - सीए. अभिजित थोरात [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 3 min read
Updated: Jul 29, 2023
उद्योगाचं व्यवस्थापन

सीए. अभिजित थोरात, पुणे
abthorat.ca@gmail.com
स्वत:चा उद्योग म्हटलं की येतं मल्टीटास्किंग. हे मल्टीटास्किंग तेव्हाच सोपं होतं जेव्हा तुम्ही हातात असलेल्या कामाचं, वेळेचं आणि तुमच्याकडील साधनांचं योग्य व्यवस्थापन करु शकता. कोणत्या गोष्टींचं व्यवस्थापन उद्योगासाठी लाभदायी असतं आणि ते कसं करावं याचा ऊहापोह प्रस्तुत लेखातून.
उद्योगामधून आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात, हाताळाव्या लागतात. त्यांचे व्यवस्थापन आपण नीट केले नाही तर केेलेल्या कामाचा योग्य आणि पुरेसा मोबदला आपल्याला मिळत नाही. ज्याची निष्पत्ती उद्योगाची प्रगती न होण्यात होते.
कोणताही उद्योग व व्यवसाय करत असताना ज्या गोष्टींचं व्यवस्थापन आपण प्राधान्याने केलं पाहिजे त्या गोष्टी पुढीलप्रमाणे :
वेळेचं व्यवस्थापन :
व्यवसाय व उद्योगात कोणतेही काम करत असताना महत्त्वाचं असतं ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. आपल्याकडे असलेलं मनुष्यबळ, आपल्याकडे असलेली यंत्र सामग्री, संसाधनं याचा विचार करुन एखादी ऑर्डर पूर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. आपल्या हाती असलेल्या वेळेचं आपण नीट व्यवस्थापन केलं तरच आपण हा अंदाज बांधू शकतो आणि वेळेत मागणी पूर्ण करु शकतो. आता उद्योजक व व्यावसायिक म्हटलं की त्याने आपल्या दिवसातील, महिन्यातील आणि वर्षातील वेळेचंही व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. तुमच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करणारे जे अनेक विभाग असतात जसे की, एच. आर. अकाऊंट्स, ऑपरेशन्स इत्यादी. उद्योगाचा प्रमुख या नात्याने तुम्ही या सर्व विभागांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यातील एकाही विभागाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या हाती असलेल्या वेळेचं व्यवस्थापन केल्यास सगळ्या जबाबदार्या व्यवस्थित तुम्ही पार पाडू शकता.
आर्थिक व्यवस्थापन :
पैसा हा उद्योगाचा कणा, त्यातील रक्त समजला जातो. उद्योगात पैसा खेळता राहण्यासाठी ग्राहकांकडून नियमित वसुली आणि त्यासाठी आवश्यक असा पाठपुरावा करण्याची गरज असते. याचबरोबर तुम्ही ज्या लोकांचे देणे आहे, त्यांचे पैसे नियमित देता यावेत यासाठीही पैशाचे व्यवस्थापन आणि नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज असते.
मनुष्यबळ व्यवस्थापन :
कोणत्याही उद्योगाचा अथवा व्यवसायाचा डोलारा हा तेथील उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावरच उभा असतो. त्यामुळे कोणत्या विभागासाठी किती मनुष्यबळ आवश्यक आहे, आपल्या हाताखाली किती मनुष्यबळ आहे याचा विचार उद्योजकाने सतत केला पाहिजे. मनुष्यबळ कमी असले तरी आणि जादा असले तरीही व्यवसायावर, नफ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आवश्यक तेव्हा भरती आणि अनिवार्य असेल तिथे कामगार कपात ही उद्योजकाने केली पाहिजे.
सिस्टीम आणि प्रोसेस मॅनेजमेंट :
उद्योग करत असताना उद्योजकाने कामासाठीची एक निश्चित प्रमाणित कार्यप्रणाली ठरवली पाहिजे. आपल्याकडे या प्रकारे माल येईल, त्याचे असे उत्पादन होईल, त्याची या मार्गे आणि या या ठिकाणी विक्री होईल अशा पद्धतीने एक प्रक्रिया, एक कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. नवीन पदावर व्यक्ती नियुक्त करुन घेण्याची प्रक्रिया निश्चित केली पाहिजे. या सार्या पद्धती आणि प्रक्रिया यांचं व्यवस्थापन उद्योगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं.
प्रॉडक्शन मॅनेजमेंट :
आपण ज्या प्रमाणात आपल्या उद्योगातून उत्पादन करणं अपेक्षित आहे ते करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळ, यंत्र सामग्री यांचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. तरच आपण मागणीनुसार उत्पादन वेळेत करुन देऊ शकतो. तर यंत्र सामग्री, कच्चा माल, मनुष्यबळ यासारख्या घटकांचं उत्पादनासाठी नियोजन करणं अतिशय आवश्यक असतं.
सप्लाय चेन :
कोणत्याही उद्योगामध्ये एक पुरवठा साखळी अस्तित्वात असते. उदा. अमूल कंपनीचं एक युनिट जे गुजरातमध्ये आहे, शेतकर्यांकडचं दूध त्यांच्यापर्यंत कसं पोचतं, त्यावर काय प्रक्रिया होतात आणि मग ते देशभर विक्रीसाठी पाठवलं जातं या सार्याची एक पुरवठा साखळी किंवा सप्लाय चेन असते. प्रत्येक उद्योजकाने आपल्याकडील कच्चा माल, अंतिम उत्पादन, विक्री इत्यादीचं व्यवस्थापन करण्यासाठी सप्लाय चेन विकसित करणं आणि त्या चेनचं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं.
संसाधनांचं व्यवस्थापन :
संसाधनांमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी येतात. त्या म्हणजे मटेरीअल अर्थात कच्चा माल, मनी म्हणजेच पैसा आणि मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ. या तीनही गोष्टींचं त्याने व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे.
मार्केटिंग मॅनेजमेंट :
आज आपलं उत्पादन ग्राहक आणि विक्रेत्यापर्यंत पोचवण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध आहेत. समाजमाध्यमं, जाहिराती, टीव्ही, इंटरनेटवरुन तुमच्या उत्पादनाचा प्रसार प्रचार इत्यादी मार्गाने लोकांपर्यंत पोचू शकता. अशावेळी आपण आपलं उत्पादन कोणत्या माध्यमातून आणि कशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवायचं याचं व्यवस्थापन एका उद्योजकाने करणं आवश्यक असतं.
क्वालिटी मॅनेजमेंट :
कोणत्याही वस्तूचा किंवा गोष्टीचा खप हा त्या वस्तूच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपण कोणताही महागातला फोन विकत घेताना त्याची क्वालिटी पाहतो. व्यावसायिक वा उद्योजकाने आपल्या उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या, पद्धती आणि मापदंड विकसित केले पाहिजेत. त्यासाठी यंत्रसामग्री आवश्यक असल्यास ती विकत घेतली पाहिजे. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहील आणि वृद्धिंगत होईल या दृष्टीने व्यवस्थापन केले पाहिजे.
रिपोर्टिंग :
आपल्या व्यवसायाच्या विविध विभागांची आणि त्यातील घडामोडींची माहिती उद्योजकाने सातत्याने घेत राहिले पाहिजे. जसे की, एच. आर., प्रोडक्शन, अकाऊंट्स इत्यादी. यामुळे त्याला उद्योग वा व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्यायला अधिक मदत होते.
डेलिगेशन : हा मॅनेजमेंट क्षेत्रातील महत्त्वाचा नियम मानला जातो. डेलिगेशन या संकल्पनेचा अर्थ असा होतो की, एखादे काम स्वत: करण्यापेक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने जो करु शकतो त्याला देणे. याबद्दल अॅन्थिया टर्नर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, द फर्स्ट रुल ऑफ मॅनेजमेंट इज डेलिगेशन, डोंट ट्राय अँड डू एव्हरीथिंग युअरसेल्फ बिकॉज यू कान्ट.