चैतन्याने भारलेल्या शैक्षणिक वर्षाचीसुरूवात जून महिन्यातहोते, मेघातून बरसणार्या सरींचा नादब्रम्ह आवाजही याच महिन्यात आपण अनुभवतो. व्यापार-व्यवसायामध्येही पुढे येणार्या सणासुदींची चाहूल तसेच पावसाच्या आगमनामुळे विविध बाजारपेठांच्या उभारीची सुरूवातही याच महिन्यापासून सुरू होते.
सीए, कर-सल्लागार, कॉस्ट अकौंटंट यांच्या वार्षिक कामाची लगबगही चालू महिन्यापासून सुरू होते. जुलै महिन्यातील व्यक्तिगत रिटर्न भरणे, पुढे ऑडिटची तयारी आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑडिट रिपोर्ट पूर्ण करून दाखल करणे. ऑक्टोबर महिन्यात ऑडिट झालेल्या करदात्यांचे रिटर्न भरणे, डिसेंबर महिन्यात जीएसटीचे वार्षिक पत्रक भरणे असा नित्यवर्षक्रमाचा ओघ सुरू होतो.
व्यापारी, करदाते यांनी आपल्या सीए, कॉस्ट अकौैंटंट, कर-सल्लागारांना आपल्या जमाखर्च माहितीची आदान-प्रदान योग्य रितीने व विहित बाबींची पूर्तता करून आपल्या रिटर्नच्या कामासाठी शेवटच्या घटकेपर्यंत न थांबता विहित वेळेतच पूर्तता केल्यास प्रत्येकासच व्यवसाय आणि काम करणे सुलभ होईल! कर वेळेत भरणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यही आहे.
रु. 2,000 च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार !
काळा पैसा, बेनामी व्यवहार आणि भ्रष्टाचारापासून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त होण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 पासून नोटबंदीची घोषणा केली होती. यावेळी भारत सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्या. अर्थव्यवस्थेमध्ये रुपये रु. 2000 ची नोटचलनात आणली होती.
तथापि संबंधित नोटा वर्ष 2018-19 पासून छापणे आरबीआयने बंद केले आहे.
23 मे 2023 पासून रुपये 2000 च्या नोटा “क्लीन नोट’’ धोरणांतर्गत बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ती 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चालू राहील.
कोणीही कितीही रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करू शकतात. तसेच व्यक्तीला कोणत्याही बँकेतून संबंधित नोटा बदलून मिळू शकतील.
एप्रिल 2023 - जीएसटी संकलन : नवा विक्रम
चालू आर्थिक वर्षातील प्रथम महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये जीएसटी महसुलाने 1 लाख 87 हजार 35 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला आहे. गेल्या 6 वर्षातील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक कर संकलन आहे. अशा प्रकारे प्रथमच जीएसटी कर वसुलीने 1.75 लाख कोटी हा टप्पा पार केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 12 टक्के वृद्धी झाली आहे. महाराष्ट्रातून 33 हजार 196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून इतर राज्यांच्या तुलनेने हे सर्वाधिक जीएसटी कर संकलन आहे.
तात्पुरत्या अॅटेचमेंटमुळे व्यवसायावर परिणाम होऊ नये
कर अधिकार्यांनी कलम 83 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर विवेकपूर्ण पद्धतीने केला पाहिजे. त्यांना या कलमातील तरतुदी अनुसार करदात्याची संपत्ती तात्पुरती अॅटॅच करण्याचा अधिकार असला तरी करदात्यांकडून येणारी प्रलंबित देणी वसूल करताना करदात्याच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. या कलमाद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करदात्याची छळवणूक करण्यासाठी करू नये, तसेच त्याच्या व्यवसायावर घातक परिणाम होणार नाही हे ही पाहिले पाहिजे. तात्पुरत्या अॅटॅचमेंट कारवाईमुळे करदात्याचा दैनंदिन व्यवहार विस्कळीत होऊनये. याचा अर्थ इतकाच की, करदात्याच्या उत्पादनासाठी किंवा तयार मालाच्या निर्मितीसाठी आवश्यक असा कच्चामाल अॅटॅच होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी.
विशेषत: करदात्याचे चालू बँक खाते हा त्याच्या व्यापारी अस्तित्वाचा गाभा समजला जातो. अशावेळी चालू खाते गोठविण्याची कार्यवाही अतिशय दक्षतेने केली पाहिजे. सारांश स्वरूपात असे म्हणता येईल की, तात्पुरत्या अॅटॅचमेंट कार्यवाहीमुळे करदात्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होता कामा नये.
[ .... The power under section 83 should not be used as a tool to harass the assessee nor should it be used in a manner which may have irreversibe detrimental effect on the business of the assessee...]
[ संदर्भ : आर्य मेटाकास्ट प्रा. लि. 110(3) जीएसटीआर पान 377 (गुजरात हायकोर्ट) ]
5 जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ तर 21 जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा होतो. योगाचे महत्त्व भारताने जगाला दाखवून दिले आहे. योगाचे फायदे जगाला समजले आहेत. योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. तर ‘पर्यावरण’ जपणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे.
व्यापारी मित्र मासिकाच्या वतीने सर्व बंधूभगिनींना, वाचक, जाहिरात, पोस्ट खाते व सेवक वर्ग आणि हितचिंतकांस ‘जागतिक पर्यावरण’ आणि ‘जागतिक योग दिनाच्या’ शुभेच्छा!