कायद्याचा सल्ला - आयकर
- Vyapari Mitra Editor

- Mar 15, 2023
- 7 min read

रिफंड रकमेवर आयकर खात्याकडून मिळालेले व्याज करपात्र आहे
Are you looking for business consultancy?
YES
NOT NOW!
प्रश्न 1 : मी आकारणी वर्ष 2021-22 चे आयकर पत्रक दाखल करताना त्यामध्ये रु.15,360 ची रिफंड रक्कम दाखविली होती. मला त्यापेक्षा जास्त रकमेची रिफंड ऑर्डर प्राप्त झाली आहे. जादा मिळालेली रक्कम करपात्र आहे का?उत्तर : आकारणी वर्ष 2021-22 च्या आयकर पत्रकात दाखविलेल्या रिफंड रकमेपेक्षा जादा रकमेची रिफंड ऑर्डर आपणास मिळाली आहे. जादा मिळालेली रक्कम ही आयकर कलम 244ए अनुसार व्याजाची रक्कम आहे. आकारणी वर्षाच्या पहिल्या तारखेपासून ते रिफंड मंजूर झाला त्या तारखेपर्यंत 0.5 टक्के प्रतिमहिना या दराने व्याज प्रत्येक महिना किंवा महिन्याच्या भागासाठी दिले जाते. अशा रिफंडवर मिळालेले व्याज ‘अन्य स्रोतापासूनचे उत्पन्न’ या शीर्षकाखाली दाखवावे, हे व्याज करपात्र आहे.वित्त अधिनियम, 2016 अनुसार कलम 139(1) मध्ये दिलेल्या मुदतीत आयकर पत्रक दाखल केल्यास आकारणी वर्षाच्या 1 एप्रिलपासून रिफंड देण्याच्या तारखेपर्यंत व्याज दिले जाईल. वेळेत पत्रक दाखल न केल्यास आयकर पत्रक दाखल करण्याच्या तारखेपासून रिफंड देण्याच्या तारखेपर्यंत व्याज दिले जाईल.
मुलीला आईकडून भेट म्हणून मिळालेली रक्कम करमाफ
प्रश्न 2 : मी एल.आय.सी. एजंट आहे. माझे वार्षिक कमिशन साधारणत: रु.15 लाखांपर्यंत होते. माझ्याकडे रु.50 लाखाच्या बँक मुदत ठेवी आहेत. माझी विवाहित मुलगी नागपूर येथे राहते. नवीन घर खरेदी करण्यासाठी मी तिला रु.20 लाख भेट देऊ इच्छिते. ही रक्कम तिचे उत्पन्न धरले जाईल का?उत्तर : आयकर कलम 56 अनुसार एखाद्या व्यक्तीला स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे रु.50,000 पेक्षा जास्त रक्कम विना मोबदला मिळाली असल्यास ती पूर्ण रक्कम घेणाऱ्याच्या उत्पन्नात समाविष्ट केली जाते. परंतु अशी रक्कम नातेवाईकांकडून मिळालेली असल्यास ते घेणाऱ्याचे उत्पन्न धरले जात नाही. नातेवाईक मध्ये आईचा समावेश होतो. त्यामुळे आईने मुलीला भेट म्हणून रक्कम दिल्यास अशी रक्कम मुलीचे उत्पन्न धरले जाणार नाही. आपण आपल्या मुलीला घर खरेदी करण्यासाठी रु.20 लाख रक्कम भेट म्हणून दिल्यास ही रक्कम तिचे उत्पन्न धरले जाणार नाही. तिला या रकमेवर आयकर भरावा लागणार नाही.आपण मुलीला रु.20 लाख भेट दिली आहे असे पत्र मुलीला द्यावे अथवा अॅफिडेव्हिट करून द्यावे. आयकर अधिकार्यांनी मागणी केल्यास सदर कागदपत्र पुरावा म्हणून दाखल करता येईल.
मशिनरी खरेदी करण्यासाठी करदात्याने कर्ज घेतले असल्यास मशिनरीचा वापर सुरू करेपर्यंतचे कर्जावरील व्याज भांडवली मालमत्तेच्या किंमतीत मिळविले जाते
प्रश्न 3 : आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आहे. आमच्या व्यवसायासाठी आम्ही मशिनरी खरेदी केलेली आहे. यासाठी आम्ही बँकेकडून कर्ज घेतले आहे. कर्जावरील व्याजाची वजावट कशाप्रकारे मिळेल?उत्तर : उद्योगासाठी यंत्रसामग्री खरेदीसाठी आणि संच मांडणी करण्यासाठी (Installaion) कर्ज घेतलेले असल्यास मशिनरीचा प्रत्यक्ष वापर सुरू होईपर्यंतचे व्याज भांडवली खर्च धरला जाईल. त्यावर घसाऱ्याची वजावट मिळेल.अचल संपत्तीवरील खर्चातील अंतर्भूत घटक (अ) नवीन उद्योग उभारणीसाठी परंतु उत्पादन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इमारत व मशिनरीसाठीच्या कर्जाचे व्याज देय असेल ते भांडवली खर्च म्हणून मशिनरीच्या किंमतीत समाविष्ट केले जाईल. आयकर कलम 36(i)(ii) खाली खर्च म्हणून ते वजावटीस पात्र ठरणार नाही. (ब) उद्योग सुरू झालेला असेल, आणि उद्योग विस्तारासाठी मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेतले असेल, तर मशिनरी खरेदीचा दिवस ते मशिनरी पहिल्यांदा उपयोगात आणली तो दिवस या दरम्यानचे व्याज आयकर वजावटीस कलम 36(i)(iii) नुसार पात्र असणार नाही. पण त्याचे व्याज मशिनरीच्या किंमतीत समाविष्ट होईल, त्यावर आपणास घसारा मिळू शकेल. (क) मशिनरी जेव्हा सर्वप्रथम उत्पादनासाठी वापरली जाईल त्यानंतरच्या कर्जावरील व्याज कलम 36(i)(iii) नुसार खर्च म्हणून वजावटीसाठी पात्र होईल.
ट्रान्सपोर्टरला अदा केलेल्या रकमेतून मुळातून करकपात (टी.डी.एस.)
प्रश्न 4 : आमचा भागीदारीत स्पोर्ट्स गुडसचा व्यवसाय आहे. आम्हाला ट्रान्सपोर्टरला रक्कम द्यावी लागते. याबाबतीत किती रकमेवर टीडीएस कापावा लागेल? यासंबंधीची कायदेशीर तरतूद काय आहे?उत्तर : (1) आयकर कायद्याच्या कलम 194सी अनुसार एका कॉन्ट्रॅक्टरची रक्कम ही रु.30,000 पेक्षा जास्त किंवा आर्थिक वर्षात एका कॉन्ट्रॅक्टरला देण्याची एकूण रक्कम ही रु.1,00,000 पेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापणे आवश्यक असते.(2) एका कॉन्ट्रॅक्टरची ट्रान्सपोर्टरला देण्याची रक्कम रु.30,000 पेक्षा कमी असल्यास किंवा एका वर्षात त्याला देण्याची एकूण रक्कम रु.1,00,000 पेक्षा कमी असल्यास टीडीएस कापण्याची गरज नाही.(3) ट्रान्सपोर्टरची एका कॉन्ट्रॅक्टची रक्कम रु.30,000 पेक्षा जास्त आहे परंतु त्याच्याकडे वर्षभरात केव्हाही 10 पेक्षा जास्त वाहने नाहीत आणि त्याने घोषणापत्र व पॅनकार्डची प्रत दिल्यास टीडीएस कापण्याची गरज नाही.आयकर कायद्याच्या कलम 194सी मधील तरतुदीनुसार ट्रान्सपोर्टर वर्षभरात केव्हाही 10 पेक्षा जास्त गाड्यांचा मालक असल्यास त्याला रक्कम देताना टीडीएस कापला जाईल. ट्रान्सपोर्टर करकपात होऊ नये म्हणून घोषणापत्र देऊ शकत नाही. ट्रान्सपोर्टर व्यक्ति किंवा हिंदू अविभक्त कुटुंब असल्यास व त्याला एका कॉन्ट्रॅक्टपोटी रु.30,000 पेक्षा अधिक रक्कम मिळत असेल किंवा वार्षिक रु.1,00,000 पेक्षा जास्त रक्कम मिळत असल्यास व त्याने पॅनकार्डची प्रत सादर केल्यास अशी रक्कम देताना मुळातून करकपात 1% दराने केली जाईल. पॅनकार्डची प्रत दिली नाही तर टीडीएस 20% दराने कापला जाईल. ट्रान्सपोर्टर व्यक्ति किंवा हिंदू अविभक्त कुटुंब नसेल तर टीडीएस 2% दराने कापला जाईल.
सज्ञान पाल्याला पालकांकडून मिळालेली भेट रक्कम (गिफ्ट) गुंतवल्यास मिळालेले उत्पन्न पाल्याचे धरले जाईल
प्रश्न 5 : मी एक घर 90 लाखाला विकले आहे. घर विक्रीतून आलेल्या रकमेपैकी प्रत्येकी 10 लाख रुपये मी माझ्या मुलाला (वय 21) आणि मुलीला (वय 18) भेट म्हणून देणार आहे. ते त्यांचे उत्पन्न धरले जाईल का? त्यांनी ही रक्कम बँकेत मुदत ठेवीमध्ये गुंतवल्यास मिळणारे व्याज त्यांचे उत्पन्न धरले जाईल की माझे उत्पन्न धरले जाईल?उत्तर : आयकर कलम 56(2)(vii) मधील “नातेवाईक’’ या शब्दाच्या व्याख्येनुसार आई किंवा वडिलांकडून मुलाला किंवा मुलीला मिळालेली भेट करमाफ आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलाला आणि मुलीला 10 लाख प्रत्येकी भेट देणार आहात ते त्यांचे उत्पन्न धरले जाणार नाही. त्यांनी ही रक्कम बँकेत मुदत ठेवीमध्ये गुंतवल्यास त्यावर मिळणारे व्याज हे मुलाचे आणि मुलीचे वैयक्तिक उत्पन्न धरले जाईल. आयकर कलम 64(1ए) अनुसार अज्ञान अपत्याला मिळणारे उत्पन्न त्याचे आई किंवा वडील ज्यांचे उत्पन्न जास्त असेल त्यांच्या उत्पन्नात मिळविले जाते, परंतु आपला मुलगा आणि मुलगी सज्ञान आहेत म्हणून त्यांचे उत्पन्न आपल्या उत्पन्नात मिळविले जाणार नाही.
मागील वर्षात खरेदी केलेली यंत्रसामग्री खरेदी वर्षात 180 दिवसांपेक्षा कमी काळासाठी उत्पादन/उद्योगात वापरली तर त्या यंत्रसामग्रीचा घसारा त्या वर्षासाठी एकूण घसाऱ्याच्या 50% एवढा धरला जाईल
प्रश्न 6 : एका उत्पादकाने दि. 15.12.2022 रोजी खरेदी केलेली यंत्रसामग्री 28.12.2022 रोजी उत्पादनासाठी उपयोगात आणली तर त्या यंत्रसामग्रीचा घसारा कशाप्रकारे गणला जाईल?उत्तर : आयकर कलम 32(1) च्या दुसऱ्या प्रोव्हिजोनुसार करदात्याने मालमत्ता मागील वर्षात घेतलेली असेल आणि त्या मागील वर्षात संबंधित मालमत्तेचा धंदा किंवा व्यवसायासाठीचा वापर 180 दिवसांपेक्षा कमी काळासाठी झालेला असेल तर त्या वर्षात नियमित घसारा दराच्या 50 टक्के दराने घसाऱ्याची वजावट मिळेल.यंत्रसामग्रीच्या श्रेणीत समाविष्ट अशी संपत्ती मागील आर्थिक वर्षात खरेदी केली आणि ती त्या वर्षी 180 दिवसांपेक्षा कमी काळासाठी वापरली तर तिचा त्या वर्षासाठीचा घसारा एकूण घसाऱ्याच्या 50 टक्के असेल, पण त्यासाठी त्या अचल संपत्तीला खालील अटींची पूर्तता करावी लागेल. ए) अचल संपत्ती मागील आर्थिक वर्षात खरेदी केलेली असली पाहिजे. बी) मागील वर्षातच उत्पादन किंवा उद्योगासाठी ती वापरात आली पाहिजे. सी) त्या वर्षात 180 दिवसांपेक्षा कमी काळासाठी ती वापरली असावी.आपण यंत्रसामग्री 15.12.2022 रोजी खरेदी केली. तिचा वापर 28.12.2022 रोजी सुरू झाला, म्हणून आकारणी वर्ष 2023-24 साठी आपल्याला या मशिनरीवर घसारा 7.5 टक्क्याने होईल, जो नियमानुसार असलेल्या घसाऱ्याचा दर 15 टक्क्यांच्या निम्मा म्हणजेच 50 टक्के आहे.एखाद्या करदात्याने 15.4.2022 रोजी खरेदी केलेली यंत्रसामग्री 20.12.2022 रोजी उपयोगात आणली तर घसारा 15 टक्केऐवजी 7.5 टक्केच असेल. कारण त्या यंत्रसामग्रीची खरेदी झाल्यानंतर 180 दिवसांचा काळ झाला असला तरी तिचा वापर मात्र 180 दिवसांपेक्षा कमी वेळा झालेला आहे. पुढील वर्षापासून या मशिनरीवर 15% घसारा मिळेल.
शेतजमीन सरकारने सक्तीने संपादन केल्यास होणारा भांडवली नफा करमुक्तप्रश्न 7 : हिंदू अविभक्त कुटुंबाची शेतजमीन शहरी भागातील आहे. ही जमीन सरकारी विकास प्रकल्पासाठी सक्तीने संपादित केली गेली असून त्यापोटी नुकसान भरपाई मिळाली आहे. हा भांडवली नफा आयकर मुक्त आहे का?उत्तर : एखाद्या व्यक्तीची किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाची कलम 2(14)(iii)(ए) किंवा(बी) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरी भागातील शेतजमीन असल्यास आणि ती सरकारी प्रकल्पासाठी संपादित केली गेली व तिची नुकसान भरपाई 31.3.2004 नंतर मिळाली असल्यास उद्भवणारा भांडवली नफा पूर्णत: करमुक्त असतो. आयकर कलम 10(37) इतकेच नव्हे तर सदर भूसंपादनाबद्दल कोर्टाने वाढीव नुकसान भरपाई दिल्यास तो सुद्धा आयकर मुक्त असतो.
करदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मिळणारी नॅशनल पेन्शन योजनेमधील संपूर्ण रक्कम करमाफ आहेप्रश्न 8 : मी नॅशनल पेन्शन योजनेमध्ये रक्कम गुंतविली आहे. यातील सध्याच्या तरतुदीप्रमाणे एन.पी.एस. बंद झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्याने या स्कीममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास मिळणारी रक्कम करपात्र आहे. यामधील तरतुदीमध्ये काही सुधारणा झाली आहे का?उत्तर : आपण एन.पी.एस. मध्ये रक्कम गुंतविली आहे. 1.4.2017 म्हणजेच आकारणी वर्ष 2017-18 पासून कलम 80सीसीडी (3) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. उपकलम (3) मधील प्रोव्हिजो प्रमाणे करदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना एन.पी.एस. मधून मिळणारी संपूर्ण रक्कम करमाफ आहे.
करदात्याचे आई-वडील त्याच्यावर अवलंबून असोत किंवा नसोत, त्यांचा आरोग्य विमा हप्ता भरल्यास वजावट मिळेलप्रश्न 9 : माझे वय 35 असून मी स्वत:, पत्नी आणि मुलाचा आरोग्य विमा हप्ता रु.20,000 भरला आहे. तसेच माझे वडील (वय 58) आणि आई (वय 56) यांचा आरोग्य विमा हप्ता रु.24,000 भरला आहे. माझ्या वडिलांचा स्वत:चा व्यवसाय आहे. आई नोकरी करते. ते दोघेही माझ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाहीत. मला आरोग्य विमा हप्त्याची वजावट किती मिळेल?उत्तर : आयकर कलम 80डी (2)(ए) अनुसार व्यक्तीने स्वत:साठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा हप्ता भरल्यास त्याला जास्तीत जास्त रु.25,000 एवढी वजावट मिळेल. कलमातील स्पष्टीकरणानुसार “कुटुंब’’ म्हणजे व्यक्तीचे पती/पत्नी आणि त्याच्यावर अवलंबून असलेले अपत्य (मुलगा/ मुलगी), आयकर कलम 80डी(2)(बी) अनुसार करदात्याने त्याच्या आई-वडिलांचा आरोग्य विमा हप्ता भरल्यास त्याला जास्तीत जास्त रु.25,000 एवढी वजावट मिळेल. वरील (ए) आणि (बी) मध्ये ज्याचा मेडिक्लेम घेतला आहे ती व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक असल्यास रु.50,000 अतिरिक्त वजावट मिळेल. आपल्या केसमध्ये आपले आई-वडील आपल्यावर अवलंबून नाहीत. कलम 80डी मध्ये पालक (आई-वडील), करदात्यावर अवलंबून असायला हवेत अशी कोणतीही अट नाही. करदात्याचे आई-वडील त्याच्यावर अवलंबून असोत किंवा नसोत, त्यांचा आरोग्य विमा हप्ता भरल्यास करदात्याला वजावट मिळेल. आपल्याला कुटुंबाचा हप्ता रु.20,000 अधिक पालकांचा हप्ता रु.24,000 अशी एकूण रु.44,000 वजावट मिळेल.
ज्या मालमत्तेवर घसारा घेतला आहे ती मालमत्ता 2 वर्षांपूर्वी खरेदी केलेली असल्यास अशी मालमत्ता विकून होणारा नफा कलम 54ईसी मधील बाँड्समध्ये गुंतवणूक करून भांडवली नफ्यातून सूट मिळेलप्रश्न 10 : मी दहा वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या दुकानाच्या किंमतीतून घसारा घेतलेला आहे. सदर दुकान विकून मला नफा झालेला आहे. संबंधित नफा मी कुठे गुंतवावा म्हणजे आयकरात वजावट मिळेल?उत्तर : आपण 10 वर्षांपूर्वी घेतलेले दुकान विकून आपणास भांडवली नफा झाला आहे. आयकर कलम 50 अनुसार असा नफा हा अल्प मुदतीचा नफा धरला जातो. मात्र आपण आयकर कायद्याच्या कलम 54ईसी मध्ये नमूद केलेल्या योजनेत भांडवली नफ्याची रक्कम गुंतविल्यास करपात्र उत्पन्नात वजावट मिळू शकते. घसारा घेतलेली मालमत्ता 2 वर्षांपेक्षा जास्त काळ करदात्याकडे असल्यास ती दीर्घ मुदतीची मालमत्ता असते त्यामुळे अशी दीर्घ मुदतीची भांडवली मालमत्ता विकून होणारा नफा कलम 54ईसी खालील योजनेत गुंतवून त्याचा लाभ घेता येऊ शकतो. दुकान विकल्यापासून सहा महिन्यांच्या आत गुंतवणूक करावी लागते. ‘रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लि.’ आणि ‘नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ या दोन संस्थांचे बाँड्स खरेदी करता येतील. जास्तीत जास्त रु.50 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. यातील गुंतवणुकीची कालमर्यादा कमीत कमी 5 वर्षे असते. यावर मिळणारे व्याज करपात्र असते.अशा स्वरूपाचे न्यायालयीन निर्णय खालीलप्रमाणे आहेत : (i) वेकफिल्ड प्रॉडक्ट्स कं. (इं) (प्रा.) लि. वि. डी.सी.आय.टी. (2001) 71 टीटीजे 518 (पुणे) (ii) एसीई बिल्डर्स (प्रा.) लि. वि. असि. सी.आय.टी. (2001) 71 टीटीजे 188 (मुंबई) (iii) सी.आय.टी. वि. आसाम पेट्रोलियम इंडस्ट्रिज (प्रा.) लि. (2003) 262 आय.टी.आर. 587. (iv) सी.आय.टी. वि. व्ही.एस. डेस्पो कं. 387 आयटीआर पान क्र. 354 (सु. कोर्ट)