top of page

गॅरंटर / जामीनदार...‘धर्मसंकट!’ श्री. मनोज भिडे [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 28, 2023
  • 2 min read

Updated: Aug 5, 2024

गॅरंटर / जामीनदार...‘धर्मसंकट!’

ree

श्री. मनोज भिडे, दापोली

भिडे आणि कंपनी

लीगल टॅक्स प्रॅक्टिशनर

98225 45217


आपल्याला अनेकदा व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणासाठी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते. आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो. बँक आपली मागील वर्षांची इन्कम टॅक्स रिटर्न तपासून आपण किती कर्ज घ्यायला पात्र (फेडायला लायक) आहोत हे तपासते.

मागील वर्षात आपण काही कर्ज घेतली आहेत का ? त्याची परतफेड वेळेवर केली का ? किती हप्ते थकवले ? वगैरे वगैरे... हे सर्व तपासणी करते.

CIBIL नावाचा मास्तर आपल्याला त्यावरून आपले मार्क देतो आणि आपला स्कोअर चांगला असेल तर बँक आपल्याला कर्ज घेण्यास पात्र समजते.


कर्ज तारण कसरत


आता ज्या कारणासाठी लोन घेतो, त्या बद्दल बँक तारण (सिक्युरिटी) मागते आणि त्याचे मॉर्टगेज डीड देखील करून घेते. म्हणजे गृह कर्जासाठी घर तारण असते, व्हेईकल लोनसाठी आपली गाडी तारण असते, आपण गोल्ड लोन साठी सोने तारण ठेवतो; आपल्या नावावर असलेले जे काही घर, दुकान, गाडी, जमीन असेल, ती कर्ज फेडेपर्यंत बँकेकडे गहाण असते. एवढा आपला अभ्यास करून, पूर्व इतिहास तपासून, वस्तू गहाण ठेवून देखील बँकेला लोन देण्यासाठी अजून सिक्युरिटी हवी असते. ती म्हणजे गँरेटर /जामीनदार आणि इथे सुरु होते... आपली परीक्षा...


जामीनदार म्हणजे धर्मसंकट


आपण आपले कुटुंब, आपले नातलग, आपले मित्र यांना जामीनदार राहण्यासाठी विचारतो...

आपल्यासाठी काही लगेच तयार देखील होतात. पण कधी कधी आपल्याला नकार देखील मिळतो. आता लोन बाजूला पडतं आणि सुरु होते मानसिक लढाई धर्मसंकटाची !!!

आपल्याच कुटुंबात, नात्यात आणि मित्रांमध्ये आणि नकाराची ठिणगी पडली तर ती थेट जाते विश्वासाच्या मानसिक लढाईकडे... !! कालपर्यंत गोड वाटणारी माणसे आज विश्वासघातकी वाटू लागतात. आपण त्याला जामीन राहिलो, पण आज आपल्याला गरज असताना मात्र आपल्यावर विश्वास नाही. त्याने नाही फेडले तर बँक आपल्या मागे लागेल. असे अनेक प्रश्न डोक्यात घोळू लागतात आणि काल पर्यंत असलेली मैत्री, आपुलकी, एका क्षणात संपते, पण यात कधी जामीनदारांचा देखील विचार व्हायला हवा.

कधी कधी जामीन न राहण्यामागे तुमच्यावर विश्वास नाही असा अर्थ नसतो. त्या त्या वेळच्या परिस्थितीवर हा निर्णय घ्यावा लागतो. काही त्याची वैयक्तिक अपरिहार्यता पण असू शकते.तो स्वतः आधीच कुणाला तरी जामीन असू शकतो. आणि इच्छा असूनही जामीन राहता येत नाही अशा वेळी. मान्य आहे कधी कधी कर्जदारावर आर्थिक संकट येऊ शकते आणि अशी परिस्थिती येते कि तो काही काळ कर्ज फेडू शकत नाही, तसेच काही मुद्दाम कर्ज बुडवे देखील असतातच, पण त्यांनी कर्ज थकवले याची शिक्षा गॅरेंटर / जामीनदारांना भोगावी लागते. आणि मग ही नात्यातली कटुता अजून वाढत जाते.

आता मूळ प्रश्न हा आहे की बँकांचा लोन देताना गॅरेंटर पाहिजे असा अट्टाहास का ?


जामिनदार कशासाठी


ज्याला कर्ज हवे आहे, त्याची संपूर्ण छाननी केलीत, त्याची योग्यता तपासून त्याला कर्ज दिलेत एवढेच नाही तर त्याच्याकडून त्याची मालमत्ता देखील गहाण ठेवलीत. एवढे पुरेसे नाही का ? आणि एवढे करूनही आजच्या घडीला थकीत कर्ज किती आहेत ? किती जण लोन थकवून बँकेला, देशाला चुना लावून विदेशात ऐषोआरामात निगरगट्ट पणे राहत आहेत.

मोठे कर्जदार पैसे असूनही सेटलमेंटला बसून लोन चक्क माफ पण करून घेतात. आणि या दुष्टचक्रात अडकतो फक्त साधा सामान्य माणूस. त्याला आणि त्याच्या गॅरेटरला अक्षरशः हॅरेंसमेंट करून पूर्ण व्याजासहित कर्जवसुली केली जाते आणि जामीनदार यात विनाकारण भरडला जातो.

यावर नक्कीच विचार व्हायला हवा आणि या धर्मसंकटातून सामान्य माणसाची मुक्तता व्हायला हवी नाही का ?

 
 
bottom of page