top of page

चालू आर्थिक वर्षाची नवीन आयकर विवरणपत्रे अधिसूचित झाली ! सीए. अनिरुद्ध राठी [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 7, 2023
  • 3 min read

ree

सीए. अनिरुद्ध सुरेश राठी, पुणे

९४२३ ५७ ५५ ५६

caasrathi@gmail.com





10 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीडीटीने अधिसूचना क्रमांक 4 /2023 अन्वये आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 म्हणजेच (आकारणी वर्ष 23-24) साठीची आयकर विवरणपत्रे घोषित केली आहेत. यापूर्वी आयकर विभागाकडून त्या-त्या वर्षांसाठीची आयकर विवरणपत्रे मार्च महिन्याच्या शेवटी किंवा अगदी एप्रिल महिन्यामध्ये घोषित होत असत. परंतु यंदा बर्‍याच लवकर आयकर विवरणपत्रे घोषित केल्यामुळे आता भागधारकांना आणि करदात्यांना पुरेसा वेळ मिळेल, आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर लवकरच त्याचे ई-फायलिंग सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत.

नवीन आयकर विवरणपत्रामधील बदल

करदात्यांसाठी हे जाणून घेणे गरजेचे असते की नवीन जाहीर केलेल्या आयकर विवरणपत्रांमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत. नवीन घोषित केलेल्या आयकर विवरणपत्रकामध्ये खूप मोठे असे बदल नसले; तरी करदात्यांनी जाणून घेण्याजोगे महत्त्वाचे काही बदल खाली नमूद केले आहेत :-

  • आयटीआर फॉर्म1(सहज) जो पगारदार व्यक्ती किंवा एक घर मालमत्तेपासून असणारे उत्पन्न किंवा इतर स्त्रोत जसे व्याज इत्यादी यातून पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी लागू होता. या पगारदारांच्या आवडत्या फॉर्ममध्ये कोणतेही बदल नसल्यामुळे करदात्यांना नक्कीच याचा दिलासा मिळेल.

  • नवीन आयकर विवरणपत्रांमध्ये एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल केला गेला आहे तो म्हणजे आभासी (व्हर्च्युअल) डिजिटल मालमत्तेतून (व्हीडीए) जसे क्रिप्टोकरन्सी इत्यादी उत्पन्नाचा अहवाल देण्यासाठी आणि तपशीलवार माहिती देण्यासाठी ‘कॅपिटल गेन’ अर्थात भांडवली नफा या शीर्षकाअंतर्गत एक नवीन स्वतंत्र तक्ता समाविष्ट केला गेला आहे.

  • नवीन तक्त्यामध्ये करदात्यांनी संपादनाची तारीख, हस्तांतरणाची तारीख, तसेच संपादनाची किंमत आणि आभासी डिजिटल मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा तपशील देणे आवश्यक आहे. तसेच काही क्रिप्टोकरन्सी किंवा एखादी आभासी मालमत्ता आपणांस बक्षीस म्हणून भेट मिळाली असल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणा-साठी किती रकमेवर कर भरण्यात आला आहे त्याचा तपशील द्यावा लागेल.

  • आभासी डिजिटल मालमत्ता म्हणजेच क्रिप्टोकरन्सी इत्यादी वरील उत्पन्नावर कर आकारणीसाठीच्या तरतुदी आर्थिक वर्ष 2022-23 पासून सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वर उल्लेखित नवीन तक्त्याचा ‘भांडवली नफा’ या शीर्षकाअंतर्गत होणारा बदल हा अगदी अपेक्षेनुसार होता.

  • वरील मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा बदल आयकर विवरण पत्रकांमध्ये दिसून येतो तो म्हणजे नवीन कर प्रणालीच्या निवड संदर्भात :-

  • आता नवीन कर प्रणालीच्या निवडणुकीसंबंधीत अतिरिक्त प्रश्‍नांचा समावेश नवीन घोषित केलेल्या आयकर विवरणपत्रांमध्ये दिसून येतो.

  • त्यामध्ये करदात्याने मागील आकारणी वर्षात नवीन कर प्रणालीची निवड केली आहे की नाही आणि निवड केली असेल तर नेमके कोणत्या वर्षात केली गेली होती, तसेच मागील कोणत्याही वर्षांमध्ये नवीन कर प्रणालीची निवड रद्द केली गेली आहे का? एवढेच नव्हे तर करदात्यांनी दोन्ही निवडीसाठी फॉर्म 10IE चा तपशील सुद्धा नमूद करणे अपेक्षित आहे.

  • अशाप्रकारे नवीन कर प्रणाली संदर्भातील विविध प्रश्‍नांचा समावेश नवीन आयकर विवरणपत्रकांमध्ये करून त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आयकर कायद्याच्या कलम 115 बीएसी अंतर्गत करदात्याने पूर्वी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे की नाही हे तपासण्यासाठी नवीन प्रश्‍नावली नमूद केली गेली आहे.

  • आणखी एक महत्त्वाचा असा बदल ज्याची सर्वजण खूप वर्षांपासून वाट पाहत होते तो म्हणजे आता आयकर विवरणपत्रामध्ये इंट्राडे ट्रेडिंगचे उत्पन्न आणि उलाढाल नमूद करण्यासाठी वेगळा विशिष्ट पर्याय देण्यात आला आहे. इंट्राडे ट्रेडिंगमधील उलाढाल आणि उत्पन्न स्वतंत्ररीत्या वेगळ्याने ‘ट्रेडिंग अकौंट’ अंतर्गत नमूद करणे आवश्यक आहे.

  • करदात्यांना ते परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर - FII) किंवा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर-FPI) आहेत की नाही हे नमूद करावे लागेल. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा सेबी नोंदणी क्रमांकसुद्धा नमूद करावा लागेल.

  • प्रतिकार कलम2(22) अंतर्गत करपात्र असलेले लाभांश उत्पन्न असल्यास नवीन आयकर विवरण पत्रकामध्ये ते स्वतंत्रपणे नोंदवण्याची गरज लागणार आहे.

  • ‘सेवानिवृत्ती लाभउत्पन्न’ या मथळ्याखाली करदात्याने मागील कोणत्याही वर्षात कलम 89ई अंतर्गत रिबेट घेतला असेल तर त्या त्या वर्षाच्या करपात्र उत्पन्नाबद्दल खुलासा करणे गरजेचे आहे.

  • नवीन आयकर विवरणपत्रकामध्ये ‘बॅलन्सशीट’ (ताळेबंद) रिपोर्ट करताना थोडासा बदल केला गेला आहे तो म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 40ए(2)(बी) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या आगाऊ रकमेचा अहवाल ‘अ‍ॅडव्हान्स’ या शीर्षकाखाली देणे आवश्यक आहे.

  • कलम 80जी अंतर्गत चॅरिटेबल ट्रस्टला देणगी दिली असल्यास देणगी रेफरन्स नंबर (ऊठछ) नमूद करावा लागेल.

समारोप

मागच्या वर्षांचा इतिहास पाहता यावर्षी आयकर विवरणपत्रे एवढ्या लवकर अगोदरच जाहीर करणे हे करदात्यांनी त्यांचे अनुपालन सुलभ करण्याच्या दिशेने अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकले आहे. आयकर कायद्याअंतर्गत ऑडिटची आवश्यकता नसणार्‍या करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 22-23 म्हणजेच आकारणी वर्ष 23-24 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ही मुदत वाढ होईल या आशेवर न बसता मुदतीपूर्वीच आपले आयकर विवरणपत्र दाखल करणे सोयीस्कर आणि हितावह ठरेल असे वाटते.



 
 
bottom of page