जॉबवर्क आणि सेटऑफ - अॅड. किशोर लुल्ला [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 31, 2023
- 4 min read

अॅड. किशोर लुल्ला, सांगली.
94224 07979
lullakishor@gmail.com
सीजीएसटी कायद्याच्या कलम 19 मध्ये माल अगर भांडवली वस्तू जॉबवर्कसाठी पाठविल्या तर त्यावरील जो इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो त्याचा उल्लेख केलेला आहे. तसेच कलम 143 मध्ये जॉबवर्क करण्याकरता कराची आकारणी न करता माल पाठवण्याच्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. याशिवाय नियम 45 मध्ये खरेदी केलेला माल आणि भांडवली वस्तू ज्या जॉबवर्कसाठी पाठविल्या जातात त्याबाबतीतील अटी, शर्ती आणि बंधनांचा उल्लेख केलेला आहे.
जॉबवर्क याचा अर्थ असा आहे की एखाद्या जॉबवर्करने दुसर्या नोंदित व्यापार्याने पाठविलेल्या मालावर ट्रीटमेंट अगर प्रक्रिया करणे. याचा अर्थ जॉबवर्कही संज्ञा त्याच वेळी वापरली जाते, ज्यावेळी दुसर्या नोंदित व्यापार्याकडून जॉबवर्कसाठी माल पाठवला जातो. अशा व्यक्तीला प्रिन्सिपॉल असे म्हणतात. तो नोंदित व्यापारी असला पाहिजे.
प्रिन्सिपॉल म्हणजे जो नोंदित व्यापारी खरेदी केलेला माल आणि भांडवली वस्तू कराचा भरणा न करता एखाद्या जॉबवर्करला जॉबवर्कसाठी पाठवितो आणि काही वेळा त्यानंतर दुसर्या जॉबवर्करकडे पाठवितो.
जॉबवर्कर ही प्रक्रिया करणारी व्यक्ती असते. त्यामुळे त्याने नोंदणी दाखला घेतलाच पाहिजे असे बंधनकारक नाही. जर त्याची वार्षिक उलाढाल वीस लाखाच्या आत असेल तर त्याने नोंदणी दाखला घेण्याची जरुरी नाही. हा जॉबवर्कर राज्यांतर्गत किंवा राज्याबाहेर माल पाठवू शकतो. प्रिन्सिपॉलने जॉबवर्करला जॉबवर्कसाठी पाठवलेल्या मालाच्या किमतीची गणना जॉबवर्करच्या उलाढालीमध्ये करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच त्याच्या उलाढाली-मध्ये फक्त जॉबवर्क चार्जेस आणि त्याने त्यासाठी वापरलेला स्वतःचा माल याचा समावेश होतो.
जॉबवर्कवर जीएसटीचा दर किती लागतो याचा उल्लेख अध्यादेश क्रमांक 11 / 2017 मध्ये केलेला आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जॉबवर्कवर कराचे दर हे 5% पासून 18% पर्यंत आहेत.
जॉबवर्कच्या व्याख्येमध्ये जॉबवर्क केल्यानंतर त्यातून उत्पादन होऊ नये असे कोठेही म्हटलेले नाही.
खरेदी केलेला माल किंवा भांडवली वस्तू या जॉबवर्क करण्याकरता जॉबवर्करकडे प्रिन्सिपॉलच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून पाठविल्या जातात. यामध्ये प्रिन्सिपॉलने आधीच काही ट्रीटमेंट अगर प्रक्रिया मालावर केलेली असेल तर तसा माल देखील जॉबवर्कसाठी पाठवता येतो. तसेच जॉबवर्क करण्याकरता प्रिन्सिपॉलच्या पुरवठादाराकडून थेट जॉबवर्करकडे देखील जॉबवर्क करण्यासाठी माल पाठवता येतो. यामध्ये आधी प्रिन्सिपॉलकडे माल आलाच पाहिजे असे बंधन नाही. अशावेळी प्रिन्सिपॉलच्या पुरवठादाराने विक्री बिलावर प्रिन्सिपॉलचे नाव लिहायचे असते आणि कन्सायनी म्हणून म्हणजे जेथे माल जाणार आहे त्या जॉबवर्करच्या नावाचा पत्ता लिहिला पाहिजे. अशावेळी प्रिन्सिपॉलने कलम 45 अंतर्गत डिलिव्हरी चलन काढून ते जॉबवर्करकडे पाठवावे. कस्टम स्टेशनवरून देखील आयात केलेला माल थेट जॉबवर्करकडे पाठविता येतो. येथे देखील प्रिन्सिपॉलने डिलिव्हरी चलन काढून जॉबवर्करकडे पाठविले पाहिजे. एखाद्या जॉबवर्करकडून दुसर्या जॉबवर्करकडे देखील माल पाठविता येतो. अशावेळी प्रिन्सिपॉलने किंवा पहिल्या जॉबवर्करने डिलिव्हरी चलन काढणे आवश्यक आहे. जॉबवर्क पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला माल हा जॉबवर्करने थेट प्रिन्सिपॉलने सांगितलेल्या ठिकाणी पाठवला तरी चालतो. तो परत प्रिन्सिपॉलकडे पाठविला पाहिजे असे बंधन नाही. अशी रवानगी देशांतर्गत असेल तर त्यावर जीएसटी भरावा लागतो. अशा प्रकारचा माल निर्यातीच्या नियमास अधीन राहून निर्यात केला तरी चालतो. या प्रकारचा माल जॉबवर्करने प्रिन्सिपॉलकडे परत न पाठवता परस्पर प्रिन्सिपॉलने सांगितलेल्या दुसर्या ठिकाणी पाठवला तर अशावेळी सदरचा जॉबवर्कर नोंदित नसेल तर प्रिन्सिपॉलच्या नोंदणी दाखल्यामध्ये अतिरिक्त धंद्याची जागा म्हणून नोंद केलेली असली पाहिजे. जॉबवर्कर कलम 25 खाली नोंदित व्यापारी असेल तर अशी नोंद करण्याची जरूरी नाही. अशा प्रकारे जो पुरवठा केलेला असतो तो प्रिन्सिपॉलने केलेला पुरवठा समजला जातो, किंबहुना जॉबवर्करने नव्हे. त्यामुळे इनव्हॉईस आणि ई-वे बिल जॉबवर्करने न काढता प्रिन्सिपॉलने काढले पाहिजे. जॉबवर्क करताना जे काही वेस्ट अगर स्क्रॅप निघते त्याची विल्हेवाट अगर विक्री जॉबवर्कर नोंदित व्यापारी असेल तर त्याने लावावी आणि कर भरावा. जॉबवर्कर असे करून देत नसेल तर मात्र प्रिन्सिपॉलने कर भरला पाहिजे. प्रिन्सिपॉल अ राज्यात असेल आणि जॉबवर्कर ब राज्यामध्ये असेल आणि ज्याला स्क्रॅप विकला जातो तो ब राज्यात असेल तर प्रिन्सिपॉलने विक्री बिलामध्ये आय जीएसटीची आकारणी केली पाहिजे. ज्याला स्क्रॅप विकतो तो अ राज्यात असेल तर प्रिन्सिपॉलने एसजीएसटी आणि सीजीएसटीची आकारणी केली पाहिजे. थोडक्यात म्हणजे संपूर्ण मालाची जबाबदारी तसेच कर भरण्याची जबाबदारी ही प्रिन्सिपॉलवरच असते.
प्रिन्सिपॉलने जॉबवर्कसाठी माल पाठवला तरी काही अटी आणि शर्तीस अधीन राहून त्याला खरेदीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते. असा माल प्रिन्सिपॉलने थेट पुरवठादाराकडून स्वत:कडे न आणता जॉबवर्करकडे पाठविला तरी देखील इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते. डिलिव्हरी चलन मात्र प्रिन्सिपॉलनेच काढले पाहिजे. जॉबवर्क पूर्ण केल्यानंतर जर जॉबवर्करने दुसर्या जॉबवर्करकडे माल पाठविला किंवा प्रिन्सिपॉलकडे माल परत पाठविला तर अशावेळी जॉबवर्कर स्वतःचे वेगळे चलन काढणेऐवजी प्रिन्सिपॉलकडून आलेल्या चलनावरच एंडोर्समेंट करू शकतो. यामध्ये मालाचे वर्णन आणि नगांची संख्या नमूद केली पाहिजे. अशाप्रकारे पुढच्या जॉबवर्करने देखील त्यापुढे माल पाठवायचा असेल तर त्याच चलनावर एंडोर्समेंट करता येते. डिलिव्हरी चलन हे सीरियल नंबरने असले पाहिजे. त्यावर डिलिव्हरी चलनाचा नंबर, तारीख, माल पाठवणार त्याचे नाव व पत्ता, जीएसटी नोंदणी क्रमांक, ज्याच्याकडे माल पाठवतो त्याचे नाव, पत्ता, जीएसटी नोंदणी क्रमांक, वस्तूचे वर्णन, एचएसएन कोड, नगांची संख्या, करपात्र रक्कम, कराची रक्कम, जिथे माल जाणार आहे तेथील पत्ता याचा उल्लेख असला पाहिजे आणि सही असली पाहिजे. डिलिव्हरी चलन तीन प्रतींमध्ये काढले पाहिजे. पहिली प्रत कन्सायनीकरिता, दुसरी प्रत वाहतूकदाराकरिता आणि तिसरी प्रत स्वतः कन्साईनोरकरिता. वरीलपैकी आवश्यक तो तपशील अचूकपणे ई-वे बिलामध्ये देखील नमूद केला पाहिजे. राज्याबाहेर जॉबवर्कसाठी माल पाठविला तर वस्तूची किंमत रुपये पन्नास हजारचे आत असली तरी देखील ई-वे बिल काढणे बंधनकारक आहे. प्रिन्सिपॉल किंवा जॉबवर्कर यापैकी कोणीही ई-वे बिल काढले तरी चालते. जॉबवर्क पूर्ण केल्यानंतर तयार झालेली वस्तू पुढे कोणाकडे तरी पाठवली किंवा प्रिन्सिपॉलकडे परत पाठवली तर ई-वे बिलामध्ये त्या वस्तूच्या किमतीचा अंतर्भाव केला पाहिजे. प्रिन्सिपॉलने जीएसटी आयटीसी-04 या क्रमांकाचे सहामाही पत्रक पुढील महिन्याच्या 25 तारखेपर्यंत भरले पाहिजे. यामध्ये प्रत्येक जॉबवर्कर आणि जॉबवर्करला पाठवलेल्या प्रत्येक मालाची माहिती दिली पाहिजे असे नाही.
जॉबवर्करकडून काम पूर्ण झाल्यानंतर प्रिन्सिपॉलकडे एक वर्षाच्या आत माल परत आला नाही किंवा प्रिन्सिपॉलने सांगितलेल्या ठिकाणी माल पाठवला नाही तर अशावेळी ज्यावेळी प्रिन्सिपॉलने जॉबवर्करला माल पाठवला होता त्यावेळी त्याने जॉबवर्करला विक्री केलेली आहे असे समजले जाईल आणि त्यावर कर आणि व्याज भरावा लागेल. हाच कालावधी भांडवली स्वरूपाच्या वस्तूंसाठी तीन वर्ष आहे. जर योग्य आणि सयुक्तिक कारण दिल्यास एक वर्षाचा कालावधी दोन किंवा तीन वर्षापर्यंत आयुक्तांकडून वाढवून मिळू शकतो. सदरची एक वर्ष किंवा तीन वर्षाची तरतूद मोल्ड्स आणि डाईज् जीगस् आणि पॅटर्न आणि टूल्स यासाठी लागू नाही. या वस्तू जॉबवर्कर स्वतःकडे ठेवू शकतो. त्यांनी त्या वस्तू प्रिन्सिपॉलकडे परत पाठवल्याच पाहिजेत असे बंधन नाही. या वस्तू विक्री अगर स्क्रॅप म्हणून विकून त्यावरील जीएसटी जॉबवर्कर भरू शकतो. जॉबवर्कर अनोंदित असेल तर हा टॅक्स भरायची जबाबदारी प्रिन्सिपॉलवर येते. शेवटी एवढेच म्हणता येईल की जी व्यक्ती जॉब वर्कसाठी माल दुसर्याकडे पाठवते, त्या व्यक्तीने बर्याच पूर्तता करण्याकरीता सतर्क असले पाहिजे.