जीएसटी : अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचे निर्णय [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 31, 2023
- 2 min read

26) बीज ड्रेसिंग, कोटिंग व ड्रमिंगवर जीएसटीचा दर 12 टक्के आहे
केसची हकीकत : यंत्राऐवजी हाताने कृषि उपक्रमासाठी बीज ड्रेसिंग, कोटिंग व ड्रमिंग करावयाच्या कारवाईचा समावेश हेडिंग 8436 मध्ये होतो. या प्रक्रियेमध्ये यंत्राऐवजी हातानी बीजांवर ड्रेसिंग, कोटिंग करण्यात येते. अशा प्रक्रियेत पेरणीपूर्वी दाण्यांवर रासायनिक कोटिंग करण्यात येते ज्यामुळे दाण्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली जाते व बीज उत्तमप्रकारे उगवते. ही प्रक्रिया कृषी संबंधित/शेतीसाठी पूरक यंत्रणा सिद्ध होत असल्याने त्याचे वर्गीकरण हेडिंग 8437 मध्ये होत नाही. तसेच चॅप्टर 82 च्या नोट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याचा अंतर्भाव हाताने चालवल्या जाणार्या दातेरी फावडे, काटा, छाटणी इत्यादी अवजारांमध्ये म्हणजेच ज्याला धारदार पाते असते अशा सामग्रीमध्ये होते. अशा अवजारांचे वर्गीकरण हेडिंग 8201 मध्येही होत नाही. मात्र एचएसएन च्या खुलाशामधील टिपणीप्रमाणे हेडिंग 8436 (टेरिफ आयटम 8436, 8090) मध्ये “कृषीसाठी लागणारी अन्य यंत्रणा’’चाही समावेश होतो ज्यामध्ये रिव्हॉल्व्हींग ड्रमचाही अंतर्भाव असतो. अशा रिव्हॉल्व्हींग ड्रममध्ये दाण्यांवर कीटकनाशक थर देण्यात येतो, तसेच बुरशी प्रतिबंधक थर देता येतो.
नोट : परिशिष्ट II मधील नोंदक्रमांक 199 (एचएसएन 8436) प्रमाणे जीएसटी दर 12 टक्के आहे. (6 टक्के सीजीएसटी + 6 टक्के एसजीएसटी)
[ आदर्श प्लँट प्रोटेक्ट लि. अपिलीय एएआर, गुजरात (2023) 96 (2) जीएसटी केसेस पान नं. 208 ]
27) टेस्टबेंच इक्विपमेंटवर सवलतीचा दर लागू नाही
केसची हकीकत : विमानाच्या अवकाशातील उद्धरण क्षमतेची चाचणी घेण्यासाठी टेस्ट बेंच इक्वीपमेंट (मेरमॉझ सिस्टम) यांचा उपयोग करण्यात येतो. अशी साधने ना धड विमानाचा भाग असतात, ना विमानाचा सुटा भाग समजली जातात. अशा टेस्ट बेंच इक्वीपमेंट (मेरमॉझ सिस्टम) ची देखभाल व दुरुस्ती यांचा समावेश हेडिंग नं. 998719 मध्ये होतो. त्यावर सवलतीचा जीएसटी करदर 5% लागू होत नाही.
[ टेस्टमेजर्स स्फीरिया सोल्युशन्स (प्रा.) लि. एएआर कर्नाटक (2023) जीएसटी केसेस 96/2 पान 191 ]
28) पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण उपक्रम करमुक्त
केसची हकीकत : 1) सेवाभावी संस्था असलेली अर्जदार संस्था पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेते तेव्हा अशा उपक्रमाचा समावेश नोटिफिकेशन नं.12/2017 मधील क्लॉज 2(आर) च्या मुद्दा क्र. (आयव्ही) मध्ये होतो व तो करमुक्त असतो.
2) सेवाभावी संस्थेद्वारा हाती घेतलेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाचा सामाजिक व आर्थिक लाभ वंचित घटकांना होत असल्याने व त्याचा फायदा पर्यावरणासाठी होत असल्याने व त्यातून कोणताही आर्थिक लाभ होत नसल्याने अशा उपक्रमाचा अंतर्भाव “पुरवठा’’ या व्याख्येत होत नाही (जीएसटी कायदा 2017) त्यामुळे अर्जदार संस्थेस जीएसटी अंतर्गत नोंदणी घेण्याची आवश्यकता नाही.