जीएसटी : अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचे निर्णय [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 6, 2023
- 2 min read

19) सोलर पॉवर पॅनेल बसवण्यासाठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटी कराबाबतचे आयटीसी घेता येत नाही
केसची हकीकत : अर्जदार भागीदारी संस्था असून स्थावर मिळकतीच्या देखभालीचा व्यवसाय करतात. वीज मंडळाकडून वीज खरेदी करून त्याचा वापर ते आपल्या व्यवसायासाठी करतात. अशी वीज अर्जदारांनी उभ्या केलेल्या सौरऊर्जा पॅनेलद्वारा पुरविण्यात येते. अर्जदाराने सौरऊर्जा पॅनेलद्वारे निर्मित विजेचे युनिट वजा करून नेट युनिटवरील खर्च भरलेला असतो. त्याच्या भरपाईपोटी ते त्यांच्या टेनन्टकडून ग्रॉस युनिट वसूल करतात. त्यासाठी स्वतंत्र इनव्हॉईस देतात. अशा विजेचा समावेश एचएसएन 2706 मध्ये होर्तोें व तो करमुक्त आहे. जीएसटी कायदा कलम 17 अन्वये अशा विजेचा आऊटवर्ड पुरवठा करमुक्त असतो. त्यामुळे अशा सोलर पॉवर पॅनेलवर भरलेल्या कराबाबत कोणतेही आयटीसी घेता येत नाही, असा निर्णय एएआर यांनी दिला.
[ व्हीबीसी असोसिएट्स एएआर, तामिळनाडू (2023) जीएसटी केसेस व्हॉ. 95/5, पान 519 ]
20) तयार खाद्यपदार्थ व पेये यांची काऊंटरवरून विक्री केली तर ती रेस्टॉरंट सेवा समजली जात नाही
केसची हकीकत : रेस्टॉरंट चालवणार्या अर्जदाराने खुल्या बाजारातून खरेदी करून आणलेले तयार खाद्यपदार्थ व पेये स्वत:च्या काऊंटरवरून विकले. ग्राहकांनी असे खाद्यपदार्थ अर्जदाराच्या रेस्टॉरंटमध्ये बसून खाल्ले किंवा पार्सल स्वरूपात घरी नेले तर त्याचे निर्धारण कसे केले जाते, याबाबतची विचारणा एएआरकडे केली. एएआरच्या मतानुसार खाद्यपदार्थ रेस्टॉरंटमध्ये तयार केले व त्याच प्रांगणात बसून ग्राहकांनी खाल्ले किंवा पार्सल म्हणून घरी नेले तरच ती रेस्टॉरंट सेवा होते. मात्र बाजारातून आणलेले तयार खाद्यपदार्थ व पेये फक्त विकले तर त्यांचे वर्गीकरण एसएसी 996331 मध्ये होते व नोटिफिकेशन 19/2017 प्रमाणे त्यावर 5% दराने कर आकारणी होते व त्यावर आयटीसी घेता येत नाही, असा निर्णय एएआर यांनी दिला.
[ रिद्धी एंटरप्रायजेस (2023) एएआर, गुजरात जीएसटी केसेस व्हॉ. 95/4, पान ए-11 ]
21) प्रतिपूर्ती रकमेवर कोणताही कर लागू होत नाही
केसची हकीकत : करदात्याने आपल्या कर्मचार्यांना दिलेल्या प्रतिपूर्ती रकमेचा समावेश सीजीएसटी कायद्यामधील शेड्यूल-3 च्या क्लॉज (1) मध्ये होतो, त्यावर कोणताही कर लागू होत नाही.
[ यादवी सायंटिफिक सोल्युशन्स (प्रा.) लि. जीएसटी केसेस व्हॉ. 95/4, पान ए-10 ]
22) अनेक प्रकारचा स्टेशनरी माल एकाच बॉक्समध्ये घालून ग्राहकांना पुरवला तर तो मिक्स्ड सप्लाय ठरतो
केसची हकीकत : अर्जदार पेन्सिल, टोकयंत्र, रबर, भूमितीसाठी आवश्यक अशी संयंत्रे एका बॉक्समध्ये घालून एका विशिष्ट किंमतीला विकण्याचा व्यवसाय करतात. अशा पुरवठ्याचे निर्धारण कंपोझिट सप्लाय म्हणून होते की मिक्स्ड सप्लाय म्हणून होते, याबाबतची विचारणा एएआरकडे केली.
एएआरच्या मताप्रमाणे अर्जदार दोन किंवा अधिक वस्तू एका पॅकमध्ये विकत आहे, एका विशिष्ट किंमतीत अशा एकमेकांना पूरक वस्तू विकल्या जातात. त्यामुळे अशा पुरवठ्याला कंपोझिट पुरवठा न म्हणता मिक्स्ड पुरवठा म्हटले जाते, असा निर्णय एएआर यांनी दिला.