जीएसटी नोंदणीधारकांनो सावधान....सीए. गणेश पांचाळ [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 4 min read
जीएसटी नोंदणीधारकांनो सावधान....

सीए. गणेश पांचाळ, पुणे.
98818 93360
caganesh@gbpanchal.com
बनावट जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांचा शोध घेण्याची जीएसटी विभागाची अखिल भारतीय मोहीम
जीएसटी विभागाने नुकतीच अखिल भारतीय स्तरावर बनावट जीएसटी नोंदणी धारक व्यापार्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बनावट जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांचा शोध घेणे, त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे हा यामागचा उद्देश आहे. या मोहिमांमध्ये जीएसटी अधिकारी प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणाला भेट देऊन त्याची खातरजमा करणार आहेत. या मोहिमे अन्वये प्रामाणिक व्यापार्यांनी काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्रास होऊ शकतो. या मोहिमेबद्दल सोशल मीडियावर विविध गैरसमज पसरवले जात आहेत. गैरसमज दूर करून व्यापार्यांना या मोहिमेची योग्य ती माहिती पोहोचविणे आणि व्यापारी बंधूंनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबतीत या लेखामध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे.
बनावट जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांचा शोध घेण्याची जीएसटी विभागाची अखिल भारतीय मोहीम
करचुकवेगगिरी रोखणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणार्या आर्थिक व्यवहाराला आळा घालणे हे नेहमीच सरकारला आव्हान देणारे काम ठरले आहे. गुजरात राज्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये हे निदर्शनास आले आहे की, काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जीएसटीची नोंदणी घेऊन हजारो कोटींचेइनपुट टॅक्स क्रेडिट, कोणत्याही वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा न करता समोरच्या व्यक्तीला ट्रान्सफर केले आणि शासनाची हजारो कोटींची करचुकवेगिरी केली आहे. अशा बनावट जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांना शोधून त्यांना आळा घालण्यासाठी शासनाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (CBIC) च्या माध्यमातून अखिल भारतीय विशेष बनावट जीएसटी नोंदणी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.
काय आहे ही मोहीम ?
अखिल भारतीय विशेष बनावट जीएसटी नोंदणी शोधण्याच्या मोहिमेंतर्गत जीएसटी विभागातील नियुक्त अधिकारी, जीएसटी नोंदणीच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी व्यापार्याच्या/व्यवसायाच्या (Place of Business) ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन त्याची तपासणी करतील. तसेच हे अधिकारी जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रातील नमूद केलेल्या इतर बाबींच्या सत्यतेचीही पडताळणी करतील. जसे की, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रात ज्या व्यक्तीचा उल्लेख जीएसटी स्वाक्षरीकर्ता (Authorised Signatory) म्हणून केलेला आहे त्याच व्यक्तीने सेल्स इन्व्हॉईसवर सही केली आहे ना?
मोहिमेचा कालावधी
या मोहीमेची सुरूवात 16 मे 2023 पासून होईल व 15 जुलै 2023 पर्यंत संपूर्ण भारत देशात चालू राहील.
जीएसटी नोंदणीकृत व्यापारी आणि व्यावसायिक बंधूंनी घ्यावयाची दक्षता
या मोहिमेचा उद्देश हा बनावट जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांचा शोध घेणे हा असला तरी एखादा जीएसटी नोंदणीधारक व्यापारी हा जीएसटी कायद्याचे आणि नियमांचे पालन करत नसेल तर त्याला काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हा त्रास टाळण्यासाठी प्रत्येक जीएसटी नोंदणीधारक व्यापार्याने खालील गोष्टींची आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
व्यवसायाचा नामफलक (Name Board of Business) : प्रत्येक व्यापार्याने आपल्या व्यवसायाचा नामफलक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे आणि त्या नामफलकावर खालील माहिती नमूद केलेली असावी. अ)व्यवसायाचे नाव, ब) GSTN, क) व्यवसायाचा पत्ता, ड) जीएसटीचा नोंदीचा प्रकार हा काँपोझिशन डीलर असेल तर GSTN समोर काँपोझिशन डीलर असा उल्लेख करणे आवश्यक आहे.एखादी भागीदारी कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असेल, जसे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा कलम 8 अन्वये कंपनी. अशा कंपनीने कंपनीच्या नावाबरोबरच CIN नंबरचा उल्लेख करणे हे कंपनी कायदा 2013 नुसार बंधनकारक आहे.
जीएसटीचे नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायाच्या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसेल अशा रितीने प्रदर्शित करणे किंवा लावणे आवश्यक आहे.
खालील कागदपत्रे तपासणीसाठी तयार ठेवणे
अ) मालकाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड
ब) फर्म/कंपनी/LLP/OPC/सार्वजनिक संस्था असल्यास त्या कायद्यांतर्गत दिले गेलेले नोंदणी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड.
क) व्यवसायाच्या जागेचा/पत्त्याचा पुरावा; व्यवसायाची जागा भाडेतत्त्वावर असेल - भाडेकराराची प्रत; भाडेकराराचा कालावधी संपलेला असेल तर त्याचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे; व्यवसायाची जागा स्वतःच्या मालकीची किंवा कंपनीच्या मालकीची असेल तर - खपवशु 2/खरेदीचा करारनामा/जागा मालकीची कागदपत्रे.
ड) इतर कागदपत्रे : POB चे इलेक्ट्रिसिटीचे बिल, बँकेतील करंट अकौंटचा Cancelled Chque , खरेदी बिले इत्यादी.
व्यवसायाचे ठिकाण
जीएसटी कायद्यामध्ये व्यवसायाच्या ठिकाणाला [ Place of Business - POB] असे संबोधले जाते. जीएसटी कायद्यानुसार जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रा-मध्ये जे व्यवसायाचे ठिकाण नमूद केलेले आहे त्याच ठिकाणावरून व्यवसाय करणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाची इतरत्र शाखा असेल किंवा इतर ठिकाणावरूनही व्यवसाय केला जात असेल तर अशा सर्व ठिकाणांचीही नोंदणी जीएसटी पोर्टलवर Additional Place of Businessम्हणून करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीकृत व्यापार्याने आपल्या व्यवसायाचे ठिकाण बदलेले असेल तर व्यवसायाच्या नवीन ठिकाणाचा पत्ता जीएसटी पोर्टलवर 15 दिवसाच्या आत अपडेट करणे आवश्यक आहे.
Additional Place of Business किंवा बदललेला व्यवसायाचा पत्ता जीएसटी पोर्टलवर अपडेट न केल्यामुळे जीएसटी ऑफिसर रुपये 10 ते 50 हजारापर्यंत विविध कलमांतर्गत दंड लावू शकेल. जीएसटीची नोंदणी करताना जी माहिती जीएसटी विभागाला दिली होती त्यात काही बदल झाले असल्यास, जसे की Authorised Signatory, व्यवसायाचे स्वरूप, Contact details,फर्म/ कंपनीतील भागीदार/संचालक मंडळातील बदल, अशा बदलांची नोंद 15 दिवसांच्या आत जीएसटी पोर्टलवर करणे आवश्यक आहे,तसे न केल्यास जीएसटी कायद्यांतर्गत दंड लागू शकतो.
बोगस/बनावट नोंदणी धारक व्यापारी सापडल्यास
अशा व्यापाराची आणि व्यवसायाची संपूर्ण माहिती विहित नमुन्यात जीएसटी अधिकारी CBIC ला सादर करतील ज्याच्या आधारे जीएसटी विभाग त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून जीएसटी अधिकारी बोगस किंवा बनावट व्यापार्याने बोगस जीएसटीची नोंदणी घेण्यासाठी आणि करचुकवेगिरी करण्यासाठी ज्या कार्यपद्धतीचा वापर केला आहे त्याचे संकलन करून उइखउ ला सादर करतील. जेणेकरून अशा गोष्टी भविष्यामध्ये टाळण्यासाठी नियोजित उपाययोजना करण्यासाठी माहितीचा उपयोग होईल.
प्रामाणिक करदात्याने/नोंदणीधारक व्यापार्याने याबाबतीत घाबरण्याचे काहीही कारण नाही. वर नमूद केलेल्या गोष्टींचे आणि नियमांचे पालन केल्यास कोणत्याही जीएसटी नोंदणीधारक व्यापार्याने घाबरण्याचे कोणतेहीकारण नाही. एखाद्या गोष्टीची पूर्तता झाली नसेल तरी जीएसटी अधिकारी त्वरित कारवाई करू शकत नाहीत. जीएसटी अधिकार्याला नियमानुसार संबंधित व्यापार्यास नोटीस देणे बंधनकारक आहे. अशा नोटीसला उत्तर देण्याचा अधिकार नोंदणीधारक व्यापार्याला तसेच जीएसटी अधिकार्यांनी एखादी ऑर्डर चुकीची जरी काढली तरी अशा ऑर्डरच्या विरोधात अपील करण्याचा अधिकारही संबंधित व्यापार्याला आहे.
सारांश
उल्लेखित अखिल भारतीय मोहिमेचा उद्देश हा बोगस जीएसटी नोंदणीधारक व्यापार्यांचा शोध आणि त्यांनी वापरलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे हा असला तरी जीएसटी कायद्यातील छोट्या-छोट्या गोष्टींची पूर्तता केलेली नसेल तर त्याचा व्यापार्यांना त्रास होऊ शकतो.
दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललेला जीएसटी कायदा आणि व्यवसायास लागू असणारे इतर कायदे आणि त्यांच्या सखोल अंमलबजावणीमुळे व्यवसायात दीर्घकालीन यश मिळवायचे असेल तर जीएसटी आणि इतर संबंधित कायद्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
या लेखाचा उद्देश व्यापार्यांना जीएसटी मोहिमेबद्दल विनाकारण भीती दाखवणे हा नसून या मोहिमेबद्दल योग्य ती माहिती पोहोचवणे हा आहे. या लेखात केलेले विश्लेषण हे लेखकाचे वैयक्तिक विश्लेषण असून जीएसटीच्या सखोल माहितीसाठी आपल्या सीए किंवा टॅक्स कन्सल्टंट यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.