top of page

जीएसटी विवरणपत्रकांचे महत्त्व - अ‍ॅड. अमित लुल्ला [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 27, 2023
  • 3 min read

जीएसटी विवरणपत्रकांचे महत्त्व

ree

अ‍ॅड. अमित लुल्ला, सांगली.

94224 07979

amitklulla@gmail.com



जीएसटी कायद्याअंतर्गत अनेक विवरणपत्रके भरावी लागतात. साध्या आणि सोप्या भाषेत विवरणपत्र याचा अर्थ नोंदित व्यापार्‍याकडील असलेली माहिती विहित नमुन्यात ठराविक कालावधीमध्ये सक्षम अधिकार्‍यास कळवणे. विविध कामांसाठी अनेक प्रकारची विवरणपत्रके या कायद्याअंतर्गत बंधनकारक केलेली आहेत. परंतु मुख्यतः जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3बी ही दोन विवणपत्रके सर्वच नोंदित व्यापार्‍यांना भरावी लागतात. म्हणून या दोनच विवरणपत्रकांचे महत्त्व मी येथे नमूद करीत आहे.

वस्तू आणि सेवाकर कायद्याअंतर्गत प्रत्येक नोंदित व्यापार्‍याला विवरणपत्रके भरावी लागतात तसेच करभरणाही करावा लागतो. या विवरणपत्रकां-मध्ये एखाद्या महिन्यात किंवा तिमाहीमध्ये केलेल्या विक्रीचा आणि खरेदीचा संपूर्ण तपशील शासनास कळवावा लागतो. इतकेच नाही तर वसूल केलेल्या करांमधून खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांवरील इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करून करदेयता आपणच ठरवून द्यावी लागते आणि राहिलेला कर भरावा लागतो. विवरणपत्रके भरल्याशिवाय त्याची तपासणी करता येत नाही. संपूर्ण वर्षामध्ये केलेल्या व्यवसायाचे आकडे समजू शकत नाहीत. शासनाला किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांना धंद्याचे ऑडिट करता येत नाही. त्यामुळे विवरणपत्रके हा जीएसटी कायद्याचा गाभा आहे. याची पूर्तता केली नाही तर व्याज, फी आणि दंडाला सामोरे जावे लागते आणि प्रसंगी मिळणार्‍या इनपुट टॅक्स क्रेडिटला किंवा सेटऑफला मुकावे लागते.

  1. जीएसटीआर 1 मध्ये व्यापार्‍याने केलेल्या विक्रीचा किंवा दिलेल्या सेवेचा समावेश असतो. एकूण वार्षिक उलाढालीवर एकमाही किंवा तिमाही विवरणपत्रक भरण्याचे ठरते. जीएसटीआर 3बी हे स्वनिर्धारणा विवरणपत्रक आहे. यामध्ये व्यापार्‍याने केलेली खरेदी, घेतलेल्या सेवा आणि केलेला खर्च यांचा समावेश असतो. वार्षिक उलाढाल किती जरी असली तरी हे विवरणपत्रक एकमाही किंवा तिमाही भरावे लागते.

  2. मागील वर्षाची उलाढाल रुपये पाच कोटीच्या वर असेल तर प्रत्येक महिन्यास जीएसटीआर 1 भरावे लागते. याकरिता पुढील महिन्याचे 11 दिवस ही त्याची मुदत असते. अशी उलाढाल रुपये पाच कोटीच्या आत असेल तर तिमाही जीएसटीआर 1 रिटर्न भरावे लागते आणि यासाठी मुदत पुढील महिन्याची 13 तारीख असते. परंतु एक महिन्यासाठी जे जीएसटीआर 3बी भरावे लागते त्याची मुदत संबंधित महिना संपल्यानंतर 20 दिवस असते. तिमाही करिता ही मुदत तिमाही संपल्यावर 22 दिवस असते.

  3. जीएसटीआर 1 रिटर्न सोबत कोणत्याही प्रकारच्या कराचा भरणा करावयाचा नसतो परंतु कर भरणा केल्याशिवाय जीएसटीआर 3बी भरता येत नाही. विवरणपत्रक भरण्यास उशीर केला तर दंड भरावा लागतो.

  4. जीएसटीआर 1 चे विवरणपत्रक उशिरा भरल्यास 200 रुपये लेट फी ही भरावी लागते. जीएसटीआर 3बी चे विवरणपत्रक उशिरा भरल्यास निल रिटर्नसाठी प्रति दिवस रुपये 20 प्रमाणे किंवा रिटर्नप्रमाणे पैसे भरावे लागत असल्यास प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे लेट फी भरावी लागते.

  5. जीएसटीआर 1 मध्ये व्यापार्‍याने व्यापार्‍यास केलेली आणि व्यापार्‍याने गिर्‍हाईकास केलेली तसेच ज्यावर कर लागत नाही तसेच निर्यात केलेली अशा सर्व वस्तूंच्या विक्री अगर सेवेचा समावेश करावा लागतो. थोडक्यात म्हणजे या विवरणपत्रकातून विक्रीबाबतची किंवा दिलेल्या सेवेबाबतची संपूर्ण माहिती कळविली पाहिजे.

जीएसटीआर 3बी मध्ये व्यापार्‍याने केलेली उलाढाल, केलेली विक्री आणि केलेली निर्यात याचा समावेश असतो त्यामध्ये करपात्र विक्री, सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटीचा समावेश असतो. याव्यतिरिक्त एकूण केलेल्या खरेदीमध्ये मिळणारा इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळणार आहे याची देखील माहिती असते. तसेच ज्या खरेदीवर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमप्रमाणे कर भरावा लागतो त्याची देखील माहिती द्यावी लागते.

वरील दोन्ही विवरण पत्रकांमध्ये व्यवस्थित माहिती दिली नाही, नियमाप्रमाणे कर भरला नाही, मुदतीत विवरणपत्रके दाखल केली नाहीत तर वस्तू आणि सेवाकर खात्याकडून येणार्‍या नोटिसांना तोंड द्यावे लागते आणि म्हणून अचूक आणि परिपूर्ण विवरणपत्रके भरणे हे केव्हाही व्यापार्‍याच्या फायद्याचे ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिवाईज विवरणपत्रक भरण्याची या कायद्यामध्ये तरतूद नाही त्यामुळे एखाद्या विवरणपत्रकामध्ये खरेदी अगर विक्री दाखवायची राहिली असल्यास, चूक झालेली असल्यास किंवा सेटऑफ अगर इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करावयाचा राहिला असल्यास अशी दुरुस्ती पुढील रिटर्नमध्ये करता येते. वर्षभरात अशा राहिलेल्या सर्व चुकांची दुरुस्ती वर्ष संपल्यानंतर साधारणपणे पुढील सहा महिन्यात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

एक मुद्दा मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवला पाहिजे आणि तो म्हणजे वर्ष संपल्यानंतर पुढील सहा महिन्यात आपण एखाद्या खरेदीवर किंवा घेतलेल्या सेवेवरील इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यावयाचा राहिला तर कोणत्याही परिस्थितीत असा इनपुट टॅक्स क्रेडिट परत क्लेम करता येत नाही. अशा परिस्थितीत व्यापार्‍याचे प्रचंड मोठे नुकसान होते. इतकेच नाही तर आपण ज्यांच्याकडून खरेदी करतो किंवा सेवा घेतो त्यांनी विवरणपत्रके विहित मुदतीत भरली नाहीत किंवा उशिरा भरली तर इनपुट टॅक्स क्रेडिटमिळण्यास प्रचंड त्रास होतो किंवा प्रसंगी त्यास मुकावे लागते. त्यामुळे आपल्या-सोबतच आपण ज्यांच्याकडून खरेदी करतो किंवा सेवा घेतो त्यांच्यावरही लक्ष ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. ही बाब अवघड आणि अशक्य असली तरी देखील या तरतुदीमध्ये शासन बदल करण्यास तयार नाही. त्यासाठी व्यापारी संघटनानी आंदोलन छेडणे आवश्यक आहे. कारण आपल्याला पुरवठा करणार्‍याच्या चुकीमुळे आपला इनपुट टॅक्स क्रेडिट अमान्य करणे हे घटनाबाह्य आहे असे माझे मत आहे. जीएसटीआर 3बी मध्ये तितकाच सेटऑफ घेता येतो, जितका त्याला जीएसटीआर 2बी मध्ये दिसतो. त्यापेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येत नाही.

उल्लेखित सर्व बाबींकडे विवरणपत्रके भरताना विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

 
 
bottom of page