जीएसटीमधील काही फॉर्म्स (भाग 2) - अॅड. चारुचंद्र भिडे [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 2 min read
Updated: Jul 28, 2023
जीएसटीमधील काही फॉर्म्स (भाग 2)

अॅड. चारुचंद्र भिडे, पुणे.
98903 10904
charu@bhideconsultants.com
व्यापारी मित्र मे २०२२ पान ४३ ते ४५ या पानावर आपण जीएसटी मधील जीएसटी आरईजी १ ते ३१ पर्यंतची माहिती घेतली होती आता या लेखात आपण पुढील काही अर्ज आणि मसुद्यांची माहिती घेणार आहोत.
काँपोझिशन संदर्भातील फॉर्म्स
या अर्जांची माहिती घेण्याआधी काँपोझिशन योजनेबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे. छोटे व्यापारी, लघु उद्योजक किंवा लघु व्यावसायिक यांच्यासाठी जीएसटीमध्ये असणारी सवलत योजना म्हणजे काँपोझिशन योजना होय. व्यावसायिकाचा वस्तू विक्रीचा व्यवसाय गतवर्षी दीड कोटीच्या आत आणि सेवांसाठी पन्नास लाखच्या आत असल्यास वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत आणि सेवांचा व्यवहार असल्यास वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत असल्यास ही सवलत मिळते. उलाढाल त्यापुढे गेली तर नेहमीच्या दराने कर वसूल करून भरावा मात्र योजनेत असताना हा कर (जीएसटी) ग्राहकाकडून न वसूल करता स्वत: होऊन (खिशातून) सरकारजमा करायचा असतो आणि कोणत्याही प्रकारचा कर परतावा (आयटीसी) मिळत नाही. हे सर्व व्यवहार कलम 10 नुसार चालतात म्हणून थोडक्यात त्याची माहिती घेऊ. या कलमात व्यावसायिकाला कमी दराने कर भरण्याची सुविधा असून त्यात काही अटी आहेत. बहुतेक व्यवहारात 1%, उत्पादकांना 2% आणि रेस्टॉरंट सेवेस 5% अशा सवलतीच्या दराने कर भरता येतो. सदर व्यावसायिकाने राज्याबाहेर व्यवसाय करता कामा नये. करमुक्त वस्तू सेवा यांचा व्यापार करता कामा नये, त्याची नोंदणी कॅज्युअल व्यापारी म्हणून नसावी, किंवा तो अनिवासी नसावा.
अशा व्यावसायिकांसाठी असणारे अर्ज पुढील प्रमाणे
जीएसटी सीएमपी 01
(ज्यांनी आधी सेवाकर अथवा उत्पादनशुल्क यामध्ये नोंदणी घेतलेली होती अशा व्यावसायिकांसाठी हा अर्ज आहे)
ज्या व्यावसायिकांना या योजनेखाली जायचे आहे आणि कमी दराने कर भरायचा आहे त्यांनी आपण आता या योजनेखाली काम करू इच्छितो अशा कारणासाठी या अर्जाद्वारे माहिती द्यावयाची होती. मात्र आजच्या तारखेला हा अर्ज निरुपयोगी आहे.
जीएसटी सीएमपी 02
जीएसटी अंमलात आल्यानंतर नव्याने नोंदणी घेणारे अथवा घेतलेल्या व्यावसायिकांसाठी हा जीएसटी सीएमपी 02 अर्ज आहे. यात आणि जीएसटी सीएमपी 01 मध्ये एकच माहिती विचारलेली आहे.
जीएसटी सीएमपी 03
हा अर्ज ही जुन्या कायद्याखाली नोंदणी झालेले व आता जीएसटी मध्ये आलेले व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी असून यामध्ये मागील करपद्धतीतून नवीन पद्धतीत (जीएसटीमधे) आल्याच्या दिवशीचा शिल्लक माल, त्याची किंमत, त्यावर भरलेला कर, उत्पादन शुल्क आणि विक्रीकर इतकेच नाही तर तो माल कोणाकडून घेतला अशी सर्व माहिती घ्यावी लागते. आजच्या तारखेला हा अर्ज निरुपयोगी आहे.
जीएसटी सीएमपी 04
या सवलत योजनेतून बाहेर पडण्यासाठी करायचा हा अर्ज असून त्यात करदात्याची पूर्ण माहिती, पत्ता, व्यवहाराचे स्वरूप, कोणत्या तारखेला आणि कोणत्या कारणासाठी या सवलत योजनेतून बाहेर पडणार वगैरे माहिती द्यावयाची आहे. कोणत्या कारणासाठी हे विचारले आहे; कारण काही वेळा कोणास राज्याबाहेर माल विकायचा असेल तर तो मर्यादेच्या आत असून ही योजना सोडू शकतो.
जीएसटी सीएमपी 05
संबंधित अधिकारी ही सवलत योजना नाकारू शकतो व त्यासाठी संबंधित अधिकारी व्यक्तीने वरील नमुन्यात अर्जदारास नोटीस पाठवायची आहे व कोणत्या कारणासाठी सवलत नाकारली हे त्यात कळवावे लागते.
जीएसटी सीएमपी 06
अशी नोटीस आल्यावर करदाता किंवा अर्जदार यालाही आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून तो या नमुन्यात आपले उत्तर पाठवू शकतो. हे सर्व संगणकीय मार्गाने करायचे असल्याने आपले उत्तर 500 अक्षरांच्या (कॅरेक्टर्स) पर्यंतच मर्यादित असावे.
जीएसटी सीएमपी 07
अर्जदाराने उत्तर दिल्यावर, प्रत्यक्ष मुलाखतीनंतर संबंधित अधिकारी आपला निर्णय या नमुन्यात कळवितो व अर्ज निकालात काढतो.
जीएसटी सीएमपी 08
हे विवरणपत्र असून ते तिमाही तत्त्वावर भरतात व त्यात एकूण विक्री, आरसीएम खालील खरेदी, कर त्यात आंतरराज्यीय, केंद्रीय व राज्य जीएसटी किती याचा तपशील द्यायचा असतो. उशीर झाल्यास व्याज किती आणि अखेरीस किती कर भरला आणि किती व्याज भरले ही माहिती देखील भरावी लागते.