पद्मश्री जयवंतीबेन जमनादास पोपट - अनुराधा चव्हाण पाटील [ ऑगस्ट २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 29, 2023
- 2 min read
Updated: Aug 5, 2023
पद्मश्री जयवंतीबेन जमनादास पोपट

चाय कॉफी के संग खाये
जब भी चाहे शौक से खाये
शेक के खाये, तल के खाये
मजेदार... लज्जतदार... खुर्रर्रम, खुर्रर्रम
लिज्जत पापड... हूँ!! हूँ
केवळ 80 रुपयांच्या उधारी भांडवलावर 1959 साली गिरगावमधील एका गच्चीवर 7 गुजराथी महिलांना सोबत घेऊन श्रीमती जसवंतीबेन जमनालाल पोपट यांनी, पापड लाटण्याचा व्यवसाय सुरु केला. पहिल्या दिवशी नफा फक्त 50 पैसे आज 1600 कोटी रुपये !
जसवंतीबाईंचा एकच कॉमन उद्देश, तो म्हणजे Community Growth, Not Capital Growth ! महिला सशक्तीकरणाचे आदर्श मॉडेल म्हणजे ‘लिज्जत पापड’. ज्या बायकांजवळ शिक्षण नाही, इतर स्किल नाही, अशा बायकांना त्यांच्या कुकिंग स्किलचा वापर करुन, प्रत्येक बाईला मालक बनवले. घरचे काम आवरुन, मुले शाळेत गेल्यावर, घरातच राहून कित्येक बायका पापड लाटण्याचा व्यवसाय करु लागल्या.
लिज्जतने इज्जत दिली
सात बायकांपासून सुरु झालेल्या या रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आजच्या घडीला 45000 बायका लिज्जतसाठी काम करतात. प्रत्येक बाई घरच्या घरी दरमहा 15 ते 20 हजार रुपये कमवू लागली आहे. या बायकांची स्वत:ची घरे झाली. मुले शिकून मोठी झाली. इथे मालक-नोकर असा भेदभाव नाही. सर्वच मालक. महिलांमध्ये ‘माझी कंपनी अन् मी कंपनीची अशी भावना !’
गुणवत्तेची हमी
आज रोज जवळ जवळ पाच कोटी पापड तयार केले जातात. 17 राज्यांमध्ये 82 शाखा आहेत. 25 देशांमध्ये पापड निर्यात केले जातात, परंतु हे सर्व करण्यापूर्वी ‘लिज्जत बहिणींना’ योग्य प्रशिक्षण दिले जाते. पापडाचे आकार, वजन, जाडी, करताना घ्यायची काळजी, घराची स्वच्छता, नखांची-बोटांची स्वच्छता हे सर्व प्रशिक्षण दिले जाते. सर्व नियम समजावून सांगून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते. त्यांना आवश्यक ती सामुग्री - उदा. पोळपाट, लाटणे वगैरे पुरवले जाते. समितीतील बायका अचानक एखाद्या घरी भेट देऊन गुणवत्ता तपासतात.
कार्यपद्धती
आज लिज्जत बहिणींना केंद्रावर घेऊन जाण्यासाठी बस आहे. ती बस त्यांना घेऊन त्या त्या भागातील केंद्रावर येते. केंद्रावर तीन खिडक्या असतात. तयार केलेले पापड तपासून घेऊन, वजन करुन पहिल्या खिडकीत घेतले जातात; वजनाची चिठ्ठी दिली जाते. ती चिठ्ठी दाखवल्यावर दुसर्या खिडकीत रोख पैसे दिले जातात. तिसर्या खिडकीतून दुसर्या दिवसासाठी पीठ दिले जाते. ते पीठ केंद्रावरच स्वच्छतेचे सर्व नियम पाळून मळले जाते. कंपनीचा नियम म्हणजे ‘शंभर टक्के पारदर्शकता व शून्य टक्के वायफळ गप्पा !’ अफवांना वावच नाही. सर्वांचे ‘कॉमन व्हिजन’. त्यामुळे महिला उत्साहाने व जोषाने काम करतात.
पॉलीसी
लिज्जतने महिलांना इज्जत देऊन स्वत:च्या पायावर उभे तर केलेच; पण त्याबरोबरच व्यवसायाचे जबरदस्त मार्केटिंग केले. व्यवसायाभिमुख तयार केला. सगळीकडे पापडाची क्वालिटी व वजन माप एकच असेल यावर भर दिला.
सप्लायरकडून उधार माल घेतला जात नाही व वितरकांना उधारीवर माल दिला जात नाही त्यामुळे कॅश फ्लो म्हणजे खेळते भांडवल कधीही कमी पडले नाही.
अनेक लोकांनी जसवंतीबेन यांना देणग्या देऊ केल्या, पण त्यांनी त्या नाकारल्या. उलट स्वत: अनेक ‘रिलीफ फंड’ उभे केले व गरजूंना मदत केली.
21 सदस्यांची समिती देशभरात पसरलेले हे जाळे पाहते. सामूहिक निर्णय घेतले जातात. ज्या बायका पूर्वी पापड लाटत होत्या; त्यातीलच काही आज पदाधिकारी आहेत. मुंबईतील मुख्यालयात रोजच्या, आठवड्याच्या व मासिक बैठका होतात आणि त्यात आढावा घेतला जातो.
जसवंतीबेननी मनात आणले असते तर, स्वत:साठी लाखो रुपये कमावले असते. पण ‘हजारो स्त्रियांना सक्षम करुन स्वत:च्या पायावर उभे करणे, बायकांना स्वत:चे अस्तित्व देणे, स्वत:ची ओळख देणे’ हीच त्यांची मानसिकता होती.
जसवंती बेन यांनी चालू केलेल्या लिज्जत पापडची कार्यपद्धती, सामाजिक जाणीव, त्यांनी चालू केलेली स्त्री शक्तीच्या सबलीकरणाची चळवळ अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना 2021 साली पद्मश्री पुरस्कार बहाल केला.