top of page

भारत फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी – 2025 [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • May 31, 2023
  • 2 min read

ree

सीए. अविनाश घारे,

प्रा. नारायण गुणे,

प्रा. प्रभाकर मानकर,

डॉ. संगीता शिरोडे





भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स व्हावी, हा संकल्प प्रथम पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजीच्या भाषणात केला. या हुंकारामुळे राष्ट्रीय चेतना व राष्ट्रप्रेम जागृत झाले; शिवाय तो संकल्प प्रत्यक्षात उतरावा म्हणून अनेक स्तरांवरुन प्रयत्न सुरु झाले. त्या प्रयत्नांचे एक फलित म्हणजे “भारत फाईव्ह ट्रिलियन - डॉलर्स इकॉनॉमी - 2025” हे पुस्तक. हा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी गाव पातळीपासून ते राष्ट्रपातळीपर्यंत एक देशव्यापी ‘संवाद’ उभा करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

या पुस्तकात एकंदर अठरा प्रकरणे आहेत. पहिल्या काही प्रकरणात देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. तर नंतरच्या काही प्रकरणांद्वारे संकल्पपूर्तीसाठी वाचकांची मानसिक पृष्ठभूमी तयार करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे अपरिहार्य असल्याचा पुनरुच्चार पुस्तकात वेळोवेळी केल्याचे जाणवते.

लेखक - चमू अर्थशास्त्राचे जाणकार असल्याने आर्थिक धोरणांचे सिंहावलोकन करुन भविष्यकालीन आर्थिक धोरण कसे असले पाहिजे व संकल्पपूर्तीसाठी देशाने आर्थिक स्थितीचा कोणता पल्ला गाठावयास हवा, याची रुपरेषा मांडलेली आहे. भारतातील नैसर्गिक साधन संपत्ती, पायाभूत सुविधा, त्यांचे लोकसंस्थेशी असलेले प्रमाण इत्यादी उत्पादनवाढीसाठी कसे अनुकूल व उपयुक्त ठरते हे जगातील जर्मनी, जपान, अमेरिका, कॅलिफोर्निया इत्यादी देशांच्या अर्थव्यवस्थांची उदाहरणे देऊन स्पष्ट केलेले आहे. सकल घरेलू उत्पाद (जी.डी.पी.) कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रे, पर्यटन, आयात-निर्यात या सर्व महत्त्वाच्या घटकांची अर्थव्यवस्थेतील भूमिका तपशीलवार स्पष्ट केलेली आहे. तसेच इतर अनुषंगिक घटकांचे अर्थव्यवस्थेतील योगदान यावरही सविस्तर चर्चा केलेली आहे.

प्रत्येक प्रकरणानंतर त्या विषयाशी संबंधित असा कृती कार्यक्रम लेखकांनी देशवासियांसाठी दिलेला आहे. अठरा प्रकरणातील विषय एकमेकांना पूरक व एकमेकांशी निगडित असून देशाच्या अर्थचक्रास गती देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. देशाची अर्थव्यवस्था म्हणजे केवळ उद्योग, कृषी, बँका, आयात-निर्यात, पर्यटन हेच नसून या सर्व घटकांचे संचालन करणार्‍या मानव संसाधनाचा मोठा वाटा असल्याने देशातील प्रत्येक माणसाला शिक्षण व आरोग्य लाभले, भूक निर्मूलन, दारिद्य्र निर्मूलन झाले तरच शाश्वत विकास साध्य होईल असे प्रतिपादन लेखक करतात.

पुस्तकाची भाषा सोपी, ओघवती असून आवश्यक तिथे सांख्यिकी दिलेली असल्याने पुस्तकातील विवेचन परिणामकारक झाले आहे.


सीए. अविनाश घारे, 92220 23249
प्रा. नारायण गुणे,
प्रा. प्रभाकर मानकर,
डॉ. संगीता शिरोडे
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
2159/2 विजयनगर कॉलनी,
पुणे - 411 030. (99237 37114)
पृष्ठे : 300, मूल्ये : 350

 
 
bottom of page