top of page

महाराष्ट्राचा अमृत संकल्प 2035 - 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी [ मे २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 28, 2023
  • 2 min read

ree

सीए. अविनाश घारे


औद्योगिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र शासनाने इ. स. 2025 पर्यंत अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा संकल्प केलेला आहे. आपला अमृत महोत्सव साजरा करताना म्हणजेच इ. स. 2035 पर्यंत आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याची क्षमता महाराष्ट्र राज्यात असल्याचे गृहीतक लेखकांनी मांडलेले आहे. या गृहीतकाच्या आधारे पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट प्राप्त करणे कसे शक्य आहे, याची मांडणी या पुस्तकातून करण्यात आलेली आहे.

या संकल्पपूर्तीसाठीचा आराखडा या पुस्तकातून यथार्थपणे सांखिकीच्या साह्याने मांडलेला आहे. एकंदर तेरा प्रकरणे व परिशिष्टे यांच्या माध्यमातून या रोड मॅपबाबतची चर्चा केलेली आहे. हे करीत असताना महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक, व शैक्षणिक बलस्थाने जशी अधोरेखित केलेली आहेत तशीच महाराष्ट्रासमोरील आव्हाने व समस्या यांचाही ऊहापोह लेखक मंडळींनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीशी असलेले प्रमाण अनुकूल असूनही महाराष्ट्राला आपला जी. डी. पी. त्या प्रमाणात का वाढवता आलेला नाही, याचे विवेचन मुद्देसूदपणे केलेले आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक क्षमता व औद्योगिक विकास हेच निकष अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी उपयुक्त नसतात तर त्यासाठी अंगीकृत केलेली शास्त्रीय ध्येये, जसे की दारिद्रयनिर्मूलन, भूक निर्मूलन, दर्जेदार शिक्षण व आरोग्य व्यवस्था, आर्थिक व सामाजिक समानता, शुद्ध पेयजल, प्रदूषण मुक्त पर्यावरण इत्यादी घटकांचा वाटाही संकल्पित उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाचा असतो असे प्रतिपादन लेखक मंडळींनी केलेले आहे. या ध्येयांची पूर्ती गावपातळी पासून राष्ट्रपातळीपर्यंत करणे आवश्यक असून त्यात प्रत्येक घटकाचा सहभाग असला पाहिजे असे लेखकांना वाटते.

पुस्तकात अत्यंत मौलिक विचार मांडलेले आहेत. अन्य देशातील नागरिकांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर नेऊन देशाला कसे समृद्ध केले, ही काही निरीक्षणे या पुस्तकात नोंदवलेली आहेत. कॅलिफोर्निया व जपान यांची बरोबरी करणारी नैसर्गिक संपत्ती महाराष्ट्राकडे असूनही महाराष्ट्राला त्यांच्याएवढा आर्थिक विकास का करता आलेला नाही, याचे विवेचन पटण्यासारखे आहे. राष्ट्रीय भावनेला साद घालणारे हे पुस्तक नक्कीच असल्याने प्रत्येक राष्ट्रप्रेमीने ते वाचले पाहिजे.


सीए. अविनाश घारे (92220 23249)
प्रा. नारायण गुणे,
प्रा. प्रभाकर मानकर,
डॉ. संगीता शिरोडे
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
2159/2 विजयनगर कॉलनी,
पुणे 411 030. (99237 37114)
पृष्ठे : 222, मूल्ये : 250

 
 
bottom of page