top of page

माझ्या कुटुंबियांना काय काय कळायला हवे ! श्री. अशोक कुरापाटी [ ऑगस्ट २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 29, 2023
  • 4 min read

Updated: Aug 5, 2024

माझ्या कुटुंबियांना काय काय कळायला हवे !

ree

श्री. अशोक कुरापाटी, अहमदनगर

98906 97593




पूर्वीच्या काळी पैशांबाबतचे निर्णय घरातील कर्ते पुरुषच घेत असत, पण आज परिस्थिती बदलली आहे. आर्थिक गुंतवणुकीबाबत निर्णयात घरातील “गृहलक्ष्मी”चा सहभाग अपरिहार्य झाला आहे. परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने आर्थिक घडामोडीचे ज्ञान घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात. भविष्यात कोणतीही आर्थिक चणचण भासू नये यासाठी पैशांची गुंतवणूक केली जाते. आयुष्यात अनेक टप्पे येतात की, ज्यावेळी आपल्या महत्त्वाच्या निर्णयाचा कस लागतो. त्यात आपले करिअर व जीवनातील आपली दिशा हे महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वतःची बलस्थाने व मर्यादा आयुष्यातील जडणघडणीत प्रभावी दिशा देतात. पण या सर्व गुंतवणूक परिस्थितीची माहिती आपण आपल्या कुटुंबियांना, वारसांना देतो का ? दिली का ? माझ्या गुंतवणुकीच्या दिशादर्शकतेची माझ्या कुटुंबियांना पूर्ण कल्पना आहे काय ? याबाबत बर्‍याचशा कुटुंबात चिंताजनक स्थिती आहे. त्यात कौटुंबिक कलह, आर्थिक साक्षरतेचा अभाव, कागदपत्रांचे व्यवस्थित जतन नसणे, पूर्तता करण्याचा कमालीचा आळस इ. कारणांचा अंतर्भाव होऊ शकेल.

अहमदाबाद, गांधीनगर येथील बँक ऑफ बरोडा शिखर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री.आर.के.चोप्रा यांनी कौटुंबिक गुंतवणूक विषयक बाबींविषयी संशोधन करून कुटुंब प्रमुखांनी गुंतवणुकीविषयी, वैयक्तिक आरोग्याविषयी, जतन करावयाच्या अभिलेखाविषयी एका रजिस्टर डायरीत नमूद करावयासाठी चिंतनपूर्वक विविध नमुने तयार केले आहेत. त्याचा संक्षिप्त गोषवारा येणेप्रमाणे :-


1) वैयक्तिक माहिती :-

फॅमिली डॉक्टर, विशेषतज्ज्ञ डॉक्टर, करसल्लागार, इन्शुरन्स एजंट, पासपोर्ट, वाहन परवाना, क्रेडिट / डेबिट कार्ड, आधार/ पॅनकार्ड, स्वतःची इच्छा, स्थावर मालमत्ता मिळकत, विवाह नोंदणी, कोणाशी केलेले करारनामा इ. तपशील.


2) इन्शुरन्स, एलआयसी पॉलिसी, मेडिकल क्लेम इ :-

इन्शुरन्स कंपनीचे नाव, पॉलिसी क्रमांक, रक्कम, वारस नियुक्ती, इन्शुरन्स प्रमाणपत्राची मुदत संपते ती तारीख, शेवटचा हप्ता, प्रीमियमची रक्कम इ. तपशील.


3) मोटार वाहन इन्शुरन्स :-

घरातील चारचाकी, दुचाकी वाहने, नोंदणी क्रमांक, मॉडेल / इंजिन / चॅसीस नंबर, उत्पादन वर्ष, इन्शुरन्स रक्कम, मॅच्युरिटी डेट, प्रीमियम इ.


4) स्थावर मिळकत आग / नुकसानीचा इन्शुरन्स :-

स्थावर मिळकत वारस नोंद, इन्शुरन्सचा तपशील, रिस्क कव्हर रक्कम, प्रीमियम रक्कम, स्थावर मिळकत खरेदीखत, मंजूर लेआऊट बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, 7/12 उत्तरे, 6 ड, प्रॉपर्टीकार्ड, म्युनिसिपल टॅक्स, शेतसारा, स्थावर मिळकत, कर्जासाठी बँकेकडे तारण आहे काय इ. तपशील.


5) बँक अकौंट / मुदत ठेव गुंतवणूक :-

बँकेचे नाव, शाखा, गुंतवणूक तपशील, वारस नोंद, बँक खाते, व्यवहाराचे अधिकार, कर्जाचा तपशील, कर्जदार, जामीनदार तपशील, कर्जासाठी दिलेले गहाण, बोजा इ.


6) शेअर्स / डिबेंचर्स / बॉण्ड्स इ. :-

वैयक्तिक किंवा संयुक्त नावाचा तपशील, कंपनी शेअर्स संख्या, डिमॅट अकौंट नंबर, बँकेचा तपशील, डिमॅट स्टेटमेंट इ. तपशील.


7) लॉकर्स :-

बँकेचे नाव, शाखा, लॉकर नंबर, वैयक्तिक / संयुक्त नावाचा व अन्य व्यक्तीस लॉकर उघडण्याचे दिलेले अधिकार तपशील, लॉकर भाडे, भाडे मुदत संपण्याची तारीख व इतर तपशील, लॉकरची चावी कुठे आहे संक्षिप्त खूण.


8) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) :-

बँक खाते, बँकेचे नाव, शाखा, पीपीफ A/C.No.पीपीफ ऑर्डरची कागदपत्रे, नॉमिनीचा तपशील.


9) निवृत्ती वेतन :-

बँक खाते, बँकेचे नाव, शाखा पेन्शन, अकौंट नंबर, पेन्शन ऑर्डरची कागदपत्रे, वारस नियुक्ती, हयातीचे प्रमाणपत्र तपशील, निवृत्ती वेतनावरील नमुना सही इ. तपशील.


10) एटीएम / डेबिट / क्रेडिट कार्ड :-

बँक खाते, बँकेचे नाव, शाखा, सेव्हिंग्ज बँक नंबर, एटीएम / डेबिट / क्रेडिट कार्ड नंबर कार्ड दिल्याची तारीख व मुदतीचा तपशील सीव्हीव्ही नंबर, टी पिन नं. इ. तपशील.


11) पॅनकार्ड / आधार कार्ड तपशील :-

पॅनकार्ड / आधार कार्ड / मूळ प्रत, झेरॉक्स प्रती, पासपोर्ट नंबर, पासपोर्ट मिळाल्याची तारीख व मुदत संपती तारीख, प्राधिकरण तपशील, मूळ प्रत व झेरॉक्स प्रती इ. तपशील.


12) वीज मीटर :-

स्थावर मिळकत तपशील, मीटर नंबर, ग्राहक नंबर, डिपॉझिट रक्कम, डिपॉझिट पावती.


13) गॅस सिलेंडर कार्ड :-

गॅस कार्ड, मूळ प्रत, झेरॉक्स प्रत, गॅस कंपनी, ग्राहक क्रमांक, डिपॉझिट तपशील, गॅस पाईप क्षमतेची मुदत संपते त्या तारखेची कागदपत्रे.


14) बीएसएनएल लँडलाईन / मोबाईल फोन :-

फोन नंबर, कस्टमर आयडी, खाते क्रमांक, डिपॉझिट रक्कम, मोबाईल कंपनी, सिम कार्ड तपशील.


15) रेशन कार्ड :-

रेशन कार्ड, मूळ प्रत व झेरॉक्स प्रति, रेशन कार्ड, प्राधिकरणाचा तपशील, पांढरे / केशरी / पिवळे कार्ड तपशील.


16) मतदान कार्ड :-

मतदान कार्ड, मूळ प्रत, झेरॉक्स प्रती, मतदान वॉर्ड क्रमांक.


17) आयकर :-

आयकर पर्मनंट अकौंट नंबर, वॉर्ड नंबर, कार्यालय पत्ता, आत्तापर्यंतची रिटर्न भरल्याचा तपशील सी.पी.सी. ऑर्डर तपशील इ.


18) मृत्यूपत्र / इच्छापत्र / बक्षिसपत्र इ. :-

मृत्यूपत्र केलेले असल्यास त्याच्या नोंदणीचा तपशील मृत्यूपत्र कागदपत्रे कोठे ठेवली त्याची संक्षिप्त निशाणी.


19) पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी :-

पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी कोणासाठी नोंदणी केली असल्यास, त्याचा तपशील कोणत्या फाईलमध्ये ठेवली त्याची संक्षिप्त निशाणी.


20) ई मेल पासवर्ड :-

आपले वेगवेगळी ई मेल खाती, बँक खाती, गुंतवणूक वगैरेचे ई मेल खाते आणि त्यांचे पासवर्ड एका वहीत लिहून ठेवावेत.


21) कर्ज दायित्व / अन्य जबाबदारी :-

मी कोणत्या बँकेचे / कर्ज काढले आहे काय , कोणत्या तारणावर, बँकेचे नाव, शाखा, मी अन्य कोणाच्या कर्जास जामीनदार आहे काय ? त्याचा तपशील.


मध्यंतरी नाशिकला राष्ट्रीयीकृत बँकेतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या अधिकार्‍याच्या घरी जाण्याचा योग्य आला. भिंतीवरील कॅलेंडरवर त्यांचे नावावरील विविध हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कार्डचे झेरॉक्स तयार करून त्याचे ओळखपत्र स्वरूपात एका दोरीवर बांधून ठेवल्याचे आढळले, शिवाय ते सकाळी व संध्याकाळी फिरावयास जाताना खिशात त्यांनी तयार केलेले आगळेवेगळे ओळखपत्र दाखविले त्यात नाव, पत्ता, स्वतःचा मोबाईल, कुटुंबियांचे फोन नंबर, मोबाईल नंबर, मध्ये त्यांना असलेल्या व्याधी, फॅमिली डॉक्टरचे नाव, चालू औषधोपचार इ. तपशील होता. या ओळखपत्रास रुपये 10 खर्च आल्याचे सांगितले. आपल्यामुळे इतरांना, विशेषतः कुटुंबियांना मानसिक त्रास व हेलपाटे नको. आपल्यावर आलेल्या अडचणींच्या काळात मदत करणार्‍या व्यक्तीस कमीत कमी त्रास व्हावा, मदतीस धावल्याचे त्यांना सार्थकी समाधान मिळावे हा सद्हेतू असल्याचे या निवृत्त अधिकार्‍याने ठासून व निक्षून सांगितले.

कोणालाही अधिक त्रास न होता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही.

...





 
 
bottom of page