माणसाला संपवणाऱ्या प्रदूषणाला हद्दपार करा - श्री. प्रसाद घारे [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 25, 2023
- 4 min read
Updated: May 30, 2023

श्री. प्रसाद घारे, पुणे (मुक्त पत्रकार)
93730 05448
prasad.ghare@gmail.com
मुसळधार पावसाने तापलेल्या जमिनीला शांत करणारा आणि हिरवाईची चाहूल लावणारा महिना म्हणजे जून. मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेतील लहानग्यांचा चिवचिवाट पुन्हा एकदा कानावर येणारा हाच तो जून. जगाच्या पाठीवर अनेक विधायक उपक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन (5 जून) आणि जागतिक योग दिन (21 जून) साजरा करणारा हा महिना. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याने सार्या महाराष्ट्राला भक्तिमय करणारा महिना. अशा या जून महिन्याचे माहात्म्य काही औरच. जूनमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत असल्याने शाळा-महाविद्यालये पुन्हा एकदा फुलून जातात. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, कंपास, स्टेशनरी, दप्तरे, बूट, गणवेश, रेनकोट, छत्र्या इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा सजू लागतात. उलाढाल वाढू लागते. शाळा, महाविद्यालये, क्लासेस सुरू झाल्याने आई-बाबांचे खिसे फी भरण्यासाठी रिकामे होतात. शैक्षणिक कर्जाला मागणी वाढते, बँकांमधील व्यवहार जोर पकडू लागतात. बाजारपेठेत चैतन्य निर्माण व्हायला लागते. एकूणच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील व्यापारी वर्गात, बाजारपेठात उत्साह निर्माण होतो. बाजारात पैसा फिरू लागतो. अर्थचक्राला गती यायला लागते. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. आजूबाजूचे पर्यावरण भवताल बदलायला प्रारंभ होतो.
सृष्टी हळूहळू हिरवागार गालिचा अंगावर पांघरायला सुरूवात करते. हे चित्र माणसाला सुखावणारे असले तरी मागील काही वर्षांपासून माणसाच्या अति हव्यासाने पर्यावरणाचा, भवतालचा झपाट्याने र्हास व्हायला लागला असल्याचे दिसते आहे. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ॠतुचक्र पूर्णपणे बिघडून गेले आहे. एप्रिल-मे महिन्यातील अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी वर्गाला अतोनात नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. मे महिन्यातच विदर्भातील काही नद्यांना पूर आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 40, 45, 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा आकडा जाऊ लागला आहे. थंडी पळाली आहे. उन्हाळा आणि पावसाळा असे दोन ॠतु निर्माण होत आहेत. अवेळी पावसाने विविध समस्या निर्माण होत आहेत, हे वास्तव आहे. आगामी काळात यात भरच पडणार आहे. हे चित्र बदलावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न चालू आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काही संकल्प करून पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी काही हातभार लावू शकतो का याचा विचार करण्याची आज खर्या अर्थाने आवश्यकता आहे. मध्यंतरी एका मित्राच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्याचे काम चालू होते म्हणून त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. मित्राने त्याच्या बॉसला एक मेल पाठवला आणि त्या मेलचा एक प्रिंटआऊट काढून फाईलला लावला. त्याची ती फाईल मेलच्या प्रिंटआऊटने भरलेली होती. मी म्हटले मेल पाठवला आहेस ना मग त्याचा प्रिंट कशाला घ्यायची. हा कागदाचा अपव्यय नाही का? मेलमुळे किंवा संगणकावरील कामामुळे आपले ऑफिस पेपरलेस होईल असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. आपण असे मेलचे प्रिंट घेत नाही ना. एकदा तपासा.

प्लॅस्टिक हे पर्यावरणाला सर्वात जास्त हानी पोहचवते. अनेक जण ट्रेकिंगला जाताना 10/20 रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात आणि जंगलात, गड-किल्ल्यावर टाकून देतात. कुरकुरे, लेझ, वेफर्सची रॅपर्स देखील अशीच इत:स्तत: पडलेली दिसतात. कोणी जर असा कचरा करणार्या व्यक्तीला हटकले तर त्या व्यक्तीला राग येतो आणि विनाकारण वादावादी सुरू होते. कचरा पेटीतच टाकावा ही साधी गोष्ट देखील आपल्याला का कळत नाही हा प्रश्न मला कायम सतावतो. देशात स्वच्छता अभियान राबवायला लागणे म्हणजे समस्त भारतीयांच्या दृष्टीने अपमानास्पद गोष्ट वाटायला हवी. आपले घर, परिसर, रस्ते, भवताल, पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा हे आजही सांगायला लागते आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात हे बरोबर नाही. आपण प्रत्येकानेच स्वच्छतेचे महत्त्व ओळखायला हवे. या पर्यावरण दिनी “मी कचरा पेटीतच टाकीन, इतरत्र टाकणार नाही’’ हा साधा पण/नियम आचरणात आणू या.
हल्ली पुण्या-मुंबईत तसेच अन्य मोठ्या शहरात सकाळी फिरायला बाहेर पडताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेला कचरा हळूच रस्त्याच्याकडेला किंवा ओढ्यात, नाल्यात, तलावात, नदीपात्रात भिरकावण्याची नवीनच पद्धत सुरू झाली आहे. अशा पिशव्या रस्त्याच्या कडेला ठेवणारे किंवा नदीपात्रात, ओढा-नाल्यात टाकणारे हे शिकलेले, सुशिक्षित पांढरपेशा वर्गातील आहेत. यांना महानगर पालिकेने किंवा सरकारी यंत्रणेने पकडून आर्थिक दंड करायला हवा. ‘सीसीटीव्ही-कॅमेरा’ मध्ये हे महाभाग नक्कीच दिसू शकतील. आपण असे कृत्य करत नाही ना? मी प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करीन, कागदाचा अपव्यय करणार नाही, घरातील कचरा दुसर्याच्या घरासमोर किंवा रस्त्यावर टाकणार नाही, विनाकारण कर्कश्य हॉर्न वाजवणार नाही, थर्मोकोल वापरणार नाही, वाहतुकीचे नियम पाळीन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करीन, आठवड्यातून किमान एकदा दुचाकी-चार चाकी वापरणार नाही, दोन-तीन किलोमीटर परिसरातील कामे करताना सायकलचा वापर करीन अशा छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण मनापासून केल्या तरी रोज पर्यावरण दिन साजरा होईल.
“पैसा हेच सर्वस्व’’ अशी चुकीची संकल्पना सध्या सर्वच वयोगटात रूढ होऊ लागली आहे. यामुळे छंद, वाचन, लिखाण, व्यायाम, भटकंती याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. पैसा आणि चंगळवाद हेच काय ते जीवनाचे ध्येय अशी समजूत झाल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातून आपले मानसिक पर्यावरण बिघडत चालले आहे. मत्सर, तिरस्कार, द्वेष, ईर्षा, पूर्वग्रहदूषितपणा, खोटेपणा, दुसर्याचे चांगले न पाहता येणे हे एक प्रकारचे प्रदूषणच. त्याने सर्व वयोगटातील तरुण-तरुणींना, मध्यम वर्गांना वेढले आहे. यातून बाहेर पडायचे असेल आणि आपले स्वत:चे बिघडलेले पर्यावरण ठीकठाक करायचे असेल तर ‘योग’, ‘ध्यान’ याकडे वळणे श्रेयस्कर ठरेल.

‘योग’ ही भारताने जगाला दिलेली भेट आहे. आज अमेरिका, युरोप आणि अन्य जगभरातील देशात योगाला खूपच महत्त्व दिले जात आहे. आपल्याकडे देखील योगाकडे वळणार्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्याच्याकडे गांभीर्याने न पाहता फॅशन म्हणून बघितले जात आहे. मनापासून जर रोज ठराविक वेळ योग व ध्यान केले तर मन शांत होते आणि हीच शांतता आपले बिघडलेले गणित ठीक करायला हातभार लावते असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. तेव्हा 21 जून रोजी येणार्या योगदिनापासून योग करायला सुरूवात करा म्हणजेच आपण काही दिवसांनी म्हणायला लागू, ‘योगा से ही होगा’ मध्यंतरी ? एक कविता वाचनात आली. याचा कवी कोण हे माहित नाही, कविता आवडली म्हणून आपल्याला सांगावी असे वाटले, बघा आवडते का?
“खूप नको, इतके बास’’
हातामध्ये पुस्तक आहे,
डोळ्यावरती चष्मा आहे,
जवळ भरपूर वेळ आहे
इतके मला बास आहे!
पायामध्ये त्राण आहे
छातीमध्ये श्वास आहे
देहामध्ये प्राण आहे
हे काय कमी आहे?
इतके मला बास आहे
डोक्यावरती छत आहे
कष्टाचे दोन पैसे आहेत
पोटाला दोन घास आहेत,
इतके मला बास आहे
हे ही हवे, ते ही हवे
असे मी करत नाही
कशाचाही हव्यास
मी फार धरत नाही
जितके मला मिळाले आहे
तितके मला बास आहे
माणसाने अती हव्यासापायी निसर्गाला ओरबाडले आहे. यातूनच निसर्गाचे चक्र बिघडत चालले आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, दुष्काळ यातून माणसाला धक्के बसायला लागले आहेत. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण यामुळे माणूस त्रस्त झाला आहे. “मी आणि माझे’’ ही वृत्ती वाढत चालली आहे. ‘आपण समाजाचे देणे लागतो’ हा विचार मागे पडू लागला आहे. यातून समाजस्वास्थ्य बिघडत चालले आहे. आंतरिक पर्यावरण आणि सभोवतालचे पर्यावरण याचा समतोल ढासळत आहे. तो ठीकठाक करणे हे आपल्या हातात आहे. येत्या 5 जूनला व 21 जूनला पर्यावरण दिनी व योग दिनी हा ढासळत चाललेला समतोल सावरण्यासाठी आपण प्रयत्न करूयात, नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
"Change is never painful,only the
resistance to change is painful "
हे जरूर लक्षात ठेवा.