मानवी जीवनमूल्य ओळखून आर्थिक नियोजन करा : श्री. योगेश कातकाडे [ ऑगस्ट 2023]
- Vyapari Mitra
- Aug 7, 2023
- 4 min read
मानवी जीवनमूल्य ओळखून आर्थिक नियोजन करा

श्री. योगेश कातकाडे, (आर्थिक सल्लागार) नाशिक
98818 43617
जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की तिचे मूल्य नाही किंवा बाजारात विनामूल्य मिळत आहे. आज कोणतीही वस्तू घेण्यासाठी विशिष्ट किंमत मोजावी लागते; परंतु आपले स्वतःच्या जीवनाचे काय मूल्य आहे याचा विचार कधी केलाय..? ती माहिती जाणून घेणे व योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
मानवी मूल्य हे भावनिक व आर्थिक या दोन प्रकारात विभागू शकतो. भावनिक जीवन मूल्यामध्ये प्रेम, आदर, सन्मान, जिव्हाळा, सलोखा-जवळीक असे व्यक्तीनुसार वेगवेगळे प्रकार असून याचे निश्चित स्वरूपात मोजमाप करता येत नाही. त्यामुळे याचे निश्चित मूल्य काढता येत नाही; परंतु मानवी जीवनाचे आर्थिक मूल्य हे विशिष्ट पद्धतीने मोजता येते. कुटुंबातील कर्ता व्यक्ती व्यवसाय अथवा नोकरीच्या काळात कुटुंबियांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करतो. या जबाबदारीचे मोजमाप शास्त्रीय परिभाषेत मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते. घरातील सर्वांच्या आर्थिक गरजा जसे कुटुंब चालविण्यासाठी दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते, घर, दवाखाना, भविष्यातील खर्चासाठीची तरतूद हा सर्व खर्च लक्षात घेतला तर अशा व्यक्तीचे जीवनमूल्य हे लाखो ते कोटींच्या घरात जाऊ शकते. तुम्ही जिवंत असेपर्यंत हे सर्व खर्च सहज भागवले जातात. जीवन हे अनिश्चित आहे तुमच्या पश्चात हे आर्थिक खर्च भागविताना कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहते, त्यांना पुढील आयुष्यासाठी किती पैशांची गरज लागणार आहे व ती कशी पूर्ण करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. भविष्यातील ही अनिश्चितता दूर करण्यासाठी, कुटुंबाला नियमित कायमस्वरूपी उत्पन्न मिळत राहील यासाठी आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. यात एक ठराविक रकमेची शाश्वती देणारा सर्वोत्तम पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स. कमी रकमेत मोठा फायदा इथं मिळत असतो त्यासाठी हा इन्श्युरन्स अतिशय महत्त्वाचा आहे.
टर्म इन्शुरन्स किती रकमेचा हवा यावरही शास्त्रीय दृष्टिकोन आहे. एक पद्धत आहे ज्यात तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात हे महत्त्वाचं ठरतं. त्या काळात तुम्ही जमा केलेली रक्कम आणि पुढच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विम्याची रक्कम ठरवणं ही योग्य पद्धत आहे. तर दुसर्या पद्धतीत महागाईचा दर पुढे किती वाढणार आहे; त्या अंदाजाने या दरावर आधारित विम्याची रक्कम ठरवणं योग्य असणार आहे.
टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. विम्याची रक्कम तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळते. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय
टर्म इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमा आहे जो तुमच्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करत असतो, परंतु मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र याचा तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स मधील फरक आहे. टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदार्या पूर्ण करू शकते.
टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी समजून तपासून घेतल्या पाहिजेत. त्यात काय फायदे असतात, ही पॉलिसी कशाप्रकारे तुमच्या उपयोगात येईल या गोष्टी नक्की समजावून घ्या. टर्म इन्शुरन्स योजना या जास्त कालावधी करता कमी रकमेचा प्रीमियम देऊन योग्य जीवन संरक्षण देत असतात. एखादा दुर्दैवी प्रसंग ओढवला तर कुटुंबाची आर्थिक परवड होत नाही. दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कर्ज फेडण्यापूर्वीच झाला तर..? ही कल्पना भयावह आहे.
त्याच्या पश्चात हा भार त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार असतो, असे आपण खूपदा ऐकलेही असेल. टर्म इन्शुरन्स एकरकमी पैसे देत असल्यामुळे तुम्ही गेल्यानंतरही ही जबाबदारी इन्शुरन्स घेतो व एक ठरलेली मोठी विमा रक्कम कुटुंबाला दिली जाते. मुदतीनंतर लाभ मिळणार नसला तरीही आर्थिक जबाबदार्या पूर्ण करताना जोखीम कमी करणारा म्हणून महत्त्वाचा असा टर्म इन्शुरन्स आहे. तो घेण्याचा निर्णय झाल्यावर या गोष्टींवर जरुर लक्ष द्या.
विमा रक्कम निश्चित करताना आपण आपल्या जबाबदार्या काय आहेत, जीवनातील ध्येय, राहणीमान, मुलांचे शिक्षण, कर्ज, व्यवसायातील गुंतवणूक इ. गोष्टी लक्षात घेऊनच विमा रक्कम ठरवली पाहिजे. साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट विमा घ्यावा म्हणजे 10 लाख वार्षिक पगार असेल तर कमीत कमी 1 ते 2 कोटींच्या दरम्यान विमा घ्यावा.
या पॉलिसीत एक हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी रद्द होण्याची भीती असते. त्यामुळे हप्ता न चुकता नियमित भरा.
टर्म इन्शुरन्स घेताना फॉर्म बिनचूक भरा. स्वत:विषयी खरीखुरी माहिती द्यातुम्हाला दारू, तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर त्याबाबतची माहिती न चुकता लिहा. त्यामुळे नॉमिनीला पैसे मिळताना अडचण येणार नाही.
विमा कंपनीची पत, ऐपत आर्थिक संपन्नता यावरून ग्राहकांना कंपनीची आर्थिक पत लक्षात येते की, कंपनी किती विमा दावे मंजूर करू केले.
दावाचे प्रमाण (क्लेम सेटलमेंटचे), किती विमाधारकानी विमा रक्कम मिळविण्याकरिता अर्ज केला आणि सदरील कंपनीने किती दावे मंजूर केले, किती ग्राहकांचे दावे फेटाळून लावले ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाचे आहे त्याबद्दल अद्यावत माहिती असणे उपयुक्तच आहे. या माहिती वरून आपण अंदाज बांधू शकता की कंपनीचा ग्राहकां प्रती अशा कठीण काळात प्रतिसाद काय असतो.
इन्शुरन्स ऑनलाईन घेण्यापेक्षा त्यातल्या तरतुदी समजून घेऊन निर्णय घ्या.
टर्म इन्शुरन्सचे काही महत्त्वाचे फायदे
पॉलिसी आपल्याला आर्थिक संरक्षण देते
जीवनात पुढे काही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळते.
गंभीर आजारात संरक्षण :- हृदय आजार, किडनी आजार किंवा कॅन्सर सारखे आजार हे जीवघेणे असतात. टर्म प्लॅन सोबत असणार्या अधिकच पेमेंट करून अशा गंभीर आजाराच्या काळात संरक्षण मिळते.
अपघात घटना घडली तर टर्म इन्शुरन्स सोबत अधिक प्रीमियम देऊन अपघातात आपल्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर संरक्षण मिळू शकते.
अपंगत्व आले तर :- अपघातात तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व आल्यास उपजीविके करता या अधिकच्या रायडरमधून आर्थिक मदत मिळू शकते.
उत्पन्न करातून सूट :- या पॉलिसी करता देय असलेला प्रीमियम हा कर सूटी करता पात्र असतो. हा प्लॅन इन्कम टॅक्स कायदा 1961 मधील कलम 80 सी प्रमाणे कर सूटी करता पात्र असतो.
प्रीमियम मध्ये सूट :- विमाधारक दुर्दैवाने अपंगत्वामुळे किंवा गंभीर आजारामुळे प्रीमियम भरण्यास असमर्थ झाल्यास नियमानुसार पुढील प्रीमियमचे हप्त्यातून सूट मिळते.
टर्म इन्शुरन्स मध्ये जास्त भर यावर दिला जातो की, दुर्दैवाने मृत्यू ओढवल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ असावे, पण काही कंपन्या विमाधारक विमा कालावधी नंतर जीवन जगत राहिल्यास पॉलिसी मुदत पूर्ण फायदा देखील देतात.