मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण - श्री. उदय पिंगळे, पुणे [ ऑगस्ट २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 29, 2023
- 4 min read
Updated: Aug 5, 2023
मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण

श्री. उदय पिंगळे, पुणे
८३९०९ ४४२२२
अपेक्षित नफा मिळवण्याच्या हेतूनेच सर्वजण शेअरबाजारात गुंतवणूक करीत असतात. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे गुंतवणूकदार बाजारभावाच्या ऐवजी त्याचे न दिसणारे खरेखुरे मूल्य शोधत असतात. यासाठी ज्याचा आधार घेतला जातो त्यांची विभागणी मूलभूत (Fandamental) विश्लेषण आणि तांत्रिक (Technical) विश्लेषण अशी करता येईल. यातील कोणत्याही एक किंवा दोन्ही पद्धतीने आपली गुंतवणूक फायदेशीर ठरेल की नाही याचा अंदाज बांधता येतो.
मूलभूत विश्लेषण करताना, आकडेवारीचा विचार करण्यापूर्वी त्याही पलीकडे जाणारा निकष म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन. ते कुणाकडे आहे? विश्वासार्ह आहे की नाही? पारदर्शी व्यवस्थापन म्हटल्यावर आपल्यासमोर ज्या कंपन्या येतात त्यांनी बाजाराचा विश्वास कमावून नफ्यात भागधारकांना योग्य वाटा दिला आहे. याची माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालातील हितगूज, नफातोटा पत्रक, रोखता प्रवाह, विविध गुणोत्तरे, लेखा परीक्षकांची टिप्पणी यातून समजते. चांगल्या कंपनीची गुणोत्तरे कायम वरच्या पातळीवर असतात त्यामुळे त्यांच्या शेअरचा भाव तुलनात्मक दृष्टीने कायमच जास्त असतो, तरीही केवळ गुणोत्तर जास्त आहे म्हणजे कंपनी चांगली असा यातून अर्थ काढणे चुकीचे आहे. ही गुणोत्तरे भांडवल, कर्ज, नफा, त्याची वाटणी, मालमत्ता, उलाढाल, यांचा एकमेकांशी संबंध दर्शवतात, केवळ मार्गदर्शक म्हणून याकडे पहावे. कंपनीचे मूलभूत संशोधन करण्यासाठी त्यांच्या अहवालातून जी आर्थिक माहिती मिळते तिचा वापर करून ही गुणोत्तरे काढली जातात.
यातील सहा महत्त्वाची गुणोत्तरे अशी-
1. खेळते भांडवल प्रमाण (Working Capital Ratio)
कंपनीचे आर्थिक आरोग्य यावरून समजते. कंपनीकडे जमा होणारे पैसे आणि अल्पकालीन देयके यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण पाहून कंपनीचा रोखता प्रवाह समजतो. यासाठी खेळते भांडवल म्हणजे चालू मालमत्ता आणि चालू देणी यामधील फरक यावरून कंपनीची देणे फेडू शकण्याची पात्रता लक्षात येते. यासाठी अल्पकाळात म्हणजे एखाद्या कंपनीच्या दृष्टीने साधारणपणे एक वर्षात जमा होत असलेली आणि द्यावी लागणार असलेली रक्कम याच गोष्टींचा विचार केला जातो. याप्रकारे चालू मालमत्तेस चालू देण्याने भागले असता हे गुणोत्तर मिळते. हे गुणोत्तर एक असेल तर कंपनीस अल्पकाळात देणी देण्यास ताण येत आहे असे समजले जाते जर हे गुणोत्तर दोन असेल तर अशी देणी देण्यावर ताण येत नाही. जर हे गुणोत्तर खूपच अधिक असल्यास कंपनीकडे अतिरिक्त पैसा असून त्याचे नियोजन करण्यात व्यवस्थापनाची काहीतरी कमतरता आहे असे म्हणता येईल.
2. तात्काळ गुणोत्तर (Quick Ratio)
कंपनीकडे असलेल्या मालमत्तेचे रुपांतर रोखतेत करता येईल त्यास तात्काळ गुणोत्तर असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादे आम्ल झटकन परिणाम दाखवते त्याप्रमाणे या मालमत्तेचे पैशात रूपांतर होऊ शकत असल्याने यास कंपनीची अॅसिड टेस्ट असेही म्हणतात. तात्काळ गुणोत्तर मोजताना मालमत्तेतून शिल्लक माल आणि आगाऊ खर्च वजा करण्यात येतात बाकी गुणोत्तर खेळत्या भांडवलाच्या प्रमाणेच आहे यातून कंपनीची आर्थिक स्थिती अधिक स्पष्ट होते. हे गुणोत्तर एक असेल तर ती कंपनी आपली अल्पकालीन देणी भागवू शकणार नाही. ही परिस्थिती तात्कालिकही असू शकते. भाग भांडवल वाढवून किंवा कर्ज घेऊन यात बदल घडवून आणता येईल.
3. प्रतिशेअर कमाई (Earnings per Share- EPS)
जेव्हा एखादया कंपनीत गुंतवणूक केली जाते तेव्हा गुंतवणूकदार हा कंपनीच्या भविष्यकाळात गुंतवणूक करत असतो. कंपनी पुढे उत्तम नफा मिळवेल अगर तोट्यातही जाईल याची जोखीम स्वीकारत असतो. प्रतिशेअर कमाई कंपनी किती नफा मिळवू शकते याची जाणीव करून देते, ज्यायोगे गुंतवणूकदार कंपनीचा भविष्यकालीन भाव काय असू शकेल त्यामुळे आपला किती फायदा होईल याचा अंदाज बांधू शकतात. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नास वितरित करण्यात आलेल्या समभागाच्या संख्येने भागून प्रतिशेअर कमाई काढता येते. हे गुणोत्तर कंपनी तोट्यात असल्यास वजा येते तर जसा फायदा वाढत जाईल त्याप्रमाणे अधिकाधिक होत जाते.
4. किंमत प्रतिशेअर गुणोत्तर (Price Earnings Ratio, P/E)
या गुणोत्तराने गुंतवणूकदार भावात किती वाढ होऊ शकण्याची ताकद आहे याचा अंदाज बांधू शकतात. हे गुणोत्तर कंपनीच्या बाजारभावास प्रतिशेअर कमाईने भागल्यास मिळते. शून्य किंवा उणे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर ती गुंतवणूक योग्य कंपनी नाही असे दर्शवते. फक्त यात काही सुधारणा होत आहे का हे वेगवेगळ्या काळातील गुणोत्तरांची तुलना करून पहाता येते. नामवंत कंपन्या सतत फायद्यात असल्यास आणि त्यांच्या नफ्यात वाढ होत असल्यास त्यासाठी अधिक किंमत मोजण्यास लोक तयार असतात साहजिकच त्याचे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर वीस किंवा त्याहूनही खूप जास्त असते.
5. कर्ज आणि भांडवल प्रमाण (Debt-to-Equity Ratio)
एखादया कंपनीचे कर्ज वाढत चालले असता त्यावर द्यावे लागणारे व्याज यामुळे कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्थिर खर्च वाढत जातात त्यामुळे नफा कमी होत जातो. या गुणोत्तराने कंपनी घेतलेल्या कर्जाचा नफा मिळवण्यासाठी कसा वापर करीत आहे ते समजते. भविष्यात विपरीत परिस्थिती उद्भवल्यास भांडवलातून कर्जाची भरपाई होईल का? हे समजते. एकाच प्रकारच्या व्यवसायाच्या कंपन्यांचे सरासरी कर्ज भांडवल काय आहे याच्याशी तुलना करता येईल आणि गुंतवणूक करण्यातील जोखीम समजून घेता येईल. काही उद्योगांचे फायदे मिळण्यात दीर्घकाळ जावा लागतो. अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते.
6. भांडवल परतफेड प्रमाण (Return on Equity ,ROE)
या गुणोत्तरातून एखादी कंपनी अधिकाधिक नफा मिळवून समभाग धारकांचा कसा फायदा करून देत आहे ते समजते. हे टक्केवारीत दाखवले जाते निव्वळ नफ्यास भांडवलाने भागून मिळते. चांगल्या कंपन्या समभागाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळवतात. अधिकाधिक नफा मिळवून त्या समभागधारकांच्या मूल्यात भर घालत असतात.
प्रत्येक उद्योगासाठी लागणारी भांडवलाची गरज, आवश्यक कर्ज, त्यातून मिळू शकणारा नफा, त्यास लागणारा कालावधी भिन्न असतो.तेव्हाएकाच प्रकारच्या उद्योगांची एकमेकांशी तुलना केल्यासच अचूक अंदाज बांधता येईल.
शेअरबाजारात बाजारभावात होणारी हालचाल ही प्रामुख्याने गुंतवणूकदारांच्या सामूहिक मानसिकतेशी संबंधित आहे. याचा मागणी पुरवठ्यावर परिणाम होत असतो. स्तंभ रेखा आलेख याचा आधार तांत्रिक विश्लेषक घेत असतात. यावरून चालू बाजाराचा कल समजत असल्याने डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग करणारे त्याचा आधार घेतात. एकूण उलाढालीत रोखविभाग आणि डिरिवेटीव बाजारामध्ये डे ट्रेडिंग सर्वाधिक प्रमाणात होते.
तांत्रिक विश्लेषकांसाठी तेजी मंदीच्या कालखंडात दरातील बदल, उलाढालीत झालेली वधघट, वर जाणार्या भावास होणारा विरोध (Resistance) किंवा खाली येणार्या किमतीला मिळणारा आधार (Support) यासारख्या गोष्टी यासाठी महत्त्वाच्या आहेत. विशिष्ट कालावधीकरता शेअरची सरासरी किंमत आणि आलेले रोध अवरोध यावरून किंमत वाढेल की कमी होईल हे समजल्याने कोणते शेअर्स कोणत्या भावास खरेदी करावेत आणि विकावेत अथवा आधी विकून नंतर खरेदी करावेत यासंबंधी निर्णय घेता येतो. रेखा, स्तंभ, बिंदू आणि संख्या यावरून तयार केलेल्या आलेखांची ते मदत घेत असल्याने त्यांना चार्टीस्ट असेही म्हणतात. त्यातून तयार होणार्या विशिष्ट आकृतिबंधांचा संबंध विविध आकारांच्या प्रतिकांशी जोडून त्यांचा अभ्यास हे लोक सातत्याने करत असतात अनेक वर्षांचा अनुभव यासाठी उपयोगी पडतो. गुंतवणूक करण्यासाठी शेअर्सची निवड कशी करायची याच्या काही सोप्या युक्त्या आपण यापुढील समारोपाच्या भागात जाणून घेऊया.