"लाइफ लाइन" वरचे सायबरहल्ले [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 8, 2023
- 4 min read
Updated: Aug 5, 2024

जग झपाट्याने बदलते आहे. त्याच्या जोडीला आता युद्धाचे प्रकारसुद्धा बदलताना दिसत आहेत. पूर्वी जेव्हां युद्ध होत असे तेव्हा दोन देशांची लष्करे आमनेसामने येत असत आणि एकमेकांशी लढत असत. प्रामुख्याने जमिनीवरून, समुद्रमार्गे किंवा हवाईमार्गाने हल्ले केले जात. त्यांच्या लढतीत विजयी ठरणारा देश विजेता मानला जात असे आणि तो जिंकलेला देश हरलेल्या देशाला अंकित करत असे. पण आता बदलत्या काळानुसार प्रत्येक वेळी दोन देशांनी समोरासमोर येऊनच लढायला हवे अशी परिस्थिती राहिलेली नाही. आधुनिक काळामध्ये हे चित्र बदलताना दिसते आहे. शत्रू असणार्या देशाला जेरीस आणायचे आणि त्याची पुरती नाकेबंदी करायची झाली तर सीमेवर जाऊन लढण्यापेक्षा वेगळ्या मार्गांनी आता हल्ले करता येऊ शकतात. असाच एक वेगळा मार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने दाखवून दिला आहे, तो म्हणजे ‘सायबर’ हल्ले.
सायबर हल्ला नावाची दहशत
आजच्या ‘इंटरनेट’ युगामध्ये सगळ्याच गोष्टी माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित असल्याकारणाने प्रभावी ‘सायबर’ हल्ल्यांच्या माध्यमातून बँकिंग, उद्योग, संरक्षण, आरोग्य, वाहतूक अशी कोणतीही यंत्रणा कोलमडून टाकता येऊ शकते. त्यासाठी आता विविध देशांकडे तिथे बसून लढणारे नवे ‘हॅकर्स’ जवानांच्या रूपाने तैनात आहेत आणि ‘हॅकर्स’च्या माध्यमातून केल्या जाणार्या ‘सायबर’ हल्ल्यांपासून वाचण्याचे एक मोठेच आव्हान आता सगळ्यांच्याच पुढ्यात ठाकलेले आहे. या ‘हॅकर्स’ना रोखण्यासाठी, ‘सायबर’ हल्ल्यांपासून वाचण्यासाठी एक मोठी नवी फौज तयार करावी लागणार आहे. भारतामध्येही असे‘सायबर’ हल्ले सातत्याने होताना दिसत आहेत.
अगदी अलिकडेच दिल्लीतील All India Institute of Medical Sciences (एम्स) या सरकारी रुग्णालयाच्या यंत्रणेवर झालेला ‘सायबर’ हल्ला म्हणजे अगदी बोलके आणि ताजे उदाहरण. ‘एम्स’ हे भारतातील सर्वात जुने, प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह असे रुग्णालय मानले जाते. त्यामुळे या रुग्णालयाच्या यंत्रणेवर झालेला ‘सायबर’ हल्ला म्हणजे धोक्याची घंटा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. तेथे असणार्या ‘सर्व्हर’वर ‘सायबर’ हल्ला झाला तेव्हा तेथील सर्व यंत्रणा ठप्प झाली आणि तेथील ‘सायबर’ सुरक्षा पुरेशी अद्ययावत नसल्याचे समोर आले. 1956 सालापासून आजतागायत अनेक आजी-माजी पंतप्रधानांसह अनेक थोर व्यक्तींवर येथे उपचार झालेले असून पाच कोटींहून अधिक लोकांनी या रुग्णालयाच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे. या सगळ्याची माहिती येथील ‘सर्व्हर’ वर असल्याकारणाने त्यावर झालेला ‘सायबर’ हल्ला धोकादायक ठरू शकतो असे लक्षात आले आहे. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’च्या माध्यमातून चालवण्यात येणार्या रुग्णालयाच्या ‘ऑनलाइन’ यंत्रणेवरही ‘सायबर’ हल्ला करण्यात आलेला होता. आपत्कालीन रुग्णांची व्यवस्था, रुग्णांचे येणे-जाणे, सर्व प्रयोगशाळांमधील संगणकाधारित यंत्रणा, ‘ऑनलाइन’ सुविधा या सगळ्यांवरच बंधने आली आणि ती यंत्रणा पूर्णत: ठप्प झाली.
सद्यस्थितीमध्ये कोट्यवधी लोकांची वैद्यकीय पार्श्वभूमी तेथील ‘सर्व्हर’वर नोंदवलेली आहे. देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचीही नोंद त्यात केलेली आहे. आजवरचे सर्व आजी-माजी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या आरोग्यविषयक माहितीचा त्यात समावेश आहे. अशा व्यक्तींची माहिती इतर कुणाच्याही हाती जाणे हे फारच धोकादायक ठरू शकते, असा इशारा या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेला आहे. ‘एम्स’वर झालेला ‘सायबर’ हल्ला खंडणी मागण्याच्या उद्देशाने केलेला आहे की देशविघातक कृत्ये घडवण्याच्या हेतूने केलेला आहे हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे. ‘सायबर’ सुरक्षेमध्ये असणार्या त्रुटींचा फायदा उठवून ‘सायबर’ हल्ले केले जातात. ‘एम्स’च्या सुरक्षेत निश्चितपणे काही त्रुटी होत्या. यापुढील काळात मात्र अशी परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये आणि महत्त्वाची माहिती अन्य कोणाच्याही हाती लागू नये यासाठी मोठी दक्षता घ्यावी लागेल, हे स्पष्ट होते आहे.
आरोग्यक्षेत्र रडारवर
‘इंटरनेट’च्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि ‘सायबर वॉरफेअर’ या विषयात काम करणार्या ‘सायबर पीस फाऊंडेशन’ या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 2021 साली जगभरात जितके ‘सायबर’ हल्ले झाले त्यापैकी 77 टक्के ‘सायबर’ हल्ल्यांमध्ये आरोग्य क्षेत्रालाच प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलेले होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वाधिक ‘सायबर’ हल्ले हमेरिकेतील आरोग्य संस्थांवर झालेले असून त्या खालोखाल दुसरा क्रमांक भारताचा लागतो. त्या पार्श्वभूमीवर, ‘एम्स’वर झालेला हा ताजा हल्ला अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे अभ्यासकांना वाटते. भारतावर वाढत असलेल्या ‘सायबर’ हल्ल्यांच्या संदर्भात अलिकडेच संसदेत एक माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार 2019 ते 2022 या कालावधीमध्ये ‘सायबर’ हल्ल्याशी संबंधित 36 लाखांहून अधिक प्रकरणे समोर आलेली आहेत. त्यामुळे केवळ ‘डिजिटल’ विश्वाच्याच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा कळीचा मुद्दा बनत चाललेला आहे, अशी भूमिका या विषयातील अभ्यासक घेताना दिसतात. 2022 सालातील भारताच्या ‘ग्रीड कॉर्पोरेशन’वर देखील सायबर हल्ला करण्यात आलेला होता. तसेच आर्थिक क्षेत्राशी संबंधित अनेक बँका आणि विमा कंपन्यांवरही ‘सायबर’ हल्ला झाल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.
डिजिटल अर्थव्यवस्था
‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अंगिकार करण्याच्या दिशेने वाटचाल करू पाहत असलेल्या भारतामध्ये आजमितीला 70 कोटींपेक्षा अधिक लोक ‘इंटरनेट’चा वापर करतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘इंटरनेट’चा वापर होऊन देखील त्या संबंधातील फसवणुकीच्या किंवा ‘सायबर’ हल्ले झाल्याच्या तक्रारी करणार्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. ‘सायबर’ गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असताना देखील 2020 साली भारतामध्ये केवळ पाच लाख तक्रारी नोंदवल्या गेल्या. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो’च्या (एनसीआरबी) आकडेवारी-नुसार आरोग्य संस्थांवरील हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, Cyber Hygiene या संकल्पनेच्या बाबतीत भारतात फारशी जागरूकता झालेली नाही, हे वास्तव आहे. बहुतांश सरकारी संस्थांमधील ‘ऑपरेटिंग’ यंत्रणा कालबाह्य झालेल्या असल्याने आणि वेळच्या वेळी त्या अद्ययावत न केल्या गेल्याने अशा ठिकाणी ‘सायबर’ हल्ल्यांचा धोका सर्वाधिक आहे.
यंत्रणा अद्ययावत नसल्याने सायबर धोका अधिक
भविष्यातील ‘सायबर’ हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे ‘अँटी व्हायरस’, ‘फायरवॉल’ या सुविधा देखील बदलत्या काळानुसार आणि नव्या ‘व्हायरस’चे धोके लक्षात घेऊन अद्ययावत करणे गरजेचे असते. परंतु, त्याचा अभाव असल्याने अशा माहितीवर हल्ला करणे ‘सायबर’ हल्लेखोरांसाठी अगदीच सोपा खेळ ठरतो. बहुतांश वेळेला अशाप्रकारचे ‘हॅकिंग’ परदेशातून होत असते. चीन आणि पाकिस्तान या देशातील ‘हॅकर्स’ भारताला लक्ष्य करून सातत्याने ‘सायबर’ हल्ले करण्याच्या प्रयत्नात असतात असा आजवरचा अनुभव आहे. 2021 साली रशिया आणि चीनमधून भारतावर मोठ्या प्रमाणावर ‘सायबर’ हल्ले झाले होते. त्यामध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’, ‘रेड्डिज लॅब’ आणि ‘भारत बायोटेक’ या आरोग्य क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या कंपन्या आणि संस्थांचा समावेश होता.
अनेक गुन्हेगारी टोळ्या आणि परदेशातील माफियादेखील ‘हॅकर्स’चा वापर करू लागल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तरीदेखील प्रत्यक्षात हाती फारसे काही लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. ऊर्जा, संरक्षण, वैद्यकीय संस्था, संशोधन करणार्या संस्था, उच्चस्तरीय सुरक्षा असणार्या सरकारी संस्था हे सारे ‘हॅकर्स’च्या रडारवर असतात. या संस्थांचे जे ‘ऑनलाइन’ जाळे विणलेले असते त्यातील त्रुटी नेमकेपणाने हेरून ‘सायबर’ हल्ले केले जातात. बरेचदा यंत्रणा ठप्प करणे आणि आतील महत्त्वाची माहिती हस्तगत करणे असे हेतू असतात. त्यामुळे या सगळ्या यंत्रणा अद्ययावत ठेवणे आणि त्यासाठी सरकारी व खासगी संस्थांमध्ये उत्तम प्रशिक्षण घेतलेले, ‘सायबर’ हल्ल्यांचे आव्हान रोखू शकणारे नवे मनुष्यबळ तैनात करणे ही काळाची गरज बनत चालली आहे.
सायबर सुरक्षा धोरण अवलंबिणे महत्त्वाचे
जागतिक पातळीवरदेखील अशा स्वरूपाच्या ‘सायबर’ हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने सक्षम असे ‘सायबर’ सुरक्षा धोरण आखणे आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. अन्य देशातून जे ‘सायबर’ हल्ले केले जातात त्यामुळे होणारे नुकसानही खूप मोठ्या पातळीवरचे असू शकते आणि त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी हा फार मोठा धोका आहे, हे लक्षात घेऊन वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.