top of page

वित्त संभ्रम : अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख : भाग-२ प्रा. स्मिता सोवनी [ मे २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 27, 2023
  • 4 min read

ree

प्रा. सौ. स्मिता सोवनी, पुणे.

97665 09090

infintiesmita@gmail.com





आर्थिक व्यवस्थापन करताना सहज घडणा-या चुकांचे अवलोकन आणि त्या टाळण्याचा व दुरुस्त करण्याचा प्रयत्न अश्या धर्तीवर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. संपत्तीशी आपले नाते नकारात्मक प्रकारे जोडल्यामुळे आपली विचारसरणी किंवा Money Mindset बिघडतो. पुढे प्रत्येक व्यवहारात हा बिघडलेला माइंडसेट मनावरचे दडपण वाढवतो. यातून अनेक चुकीच्या सवयी, दडपण, ताण आणि आजार लागू शकतात. या चुकीची दुरुस्ती व विचारांची पुनर्बांधणी कशी करता येईल हे आपण मागच्या लेखात बघितले. महागाईला हाताळताना अनेक माणसे कुठे चुकतात आणि त्यावर काय उपाय करता येईल हे या भागात बघूया.


1. पहिली चूक म्हणजे बचतीचे समीकरण बिघडणं

सामान्य माणूस असे समीकरण मांडतो की दरमहा खर्च केल्यावर आमच्या कडे इतके-इतके पैसे उरतात. म्हणजेच उत्पन्न - खर्च = बचत. (Income-Expenses = Savings) असे समीकरण ते मांडतात. पण आपले जे काही उत्पन्न आहे, त्यातले 50% ताबडतोब बाजूला काढून गुंतवून टाकणे खूप गरजेचे आहे. मग उरलेल्या पैश्यांमध्ये उत्तम बजेट करून आपले खर्च भागवायचे आहेत. तर बचतीचे नवे, सुधारित समीकरण असे दिसेल: उत्पन्न - बचत = खर्च (Income-Savings=Expenses). पैसे जितके जास्त वर्षे गुंतवणार, तितके त्यावर चक्रवाढ व्याज जास्त जास्त जमा होत जाते. त्यामुळे सुरुवातीला जरी काटकसर करावी लागली तरी अंदाजे 6-7 वर्षांनी त्या गुंतवणुकीची फळे दिसू लागतात. आपले वय वाढणार आणि गरजाही बदलणार, त्यामुळे दरमहा बचत व गुंतवणूक करत राहिल्यामुळे वयस्कर झाल्यावर तणाव उद्भवणार नाही. आधी गुंतवलेला पैसा त्या वेळी परताव्यानिशी हाताशी येईल.


2. दुसरी चूक म्हणजे बजेट न करणे

या लेखात घरगुती बजेट आणि पुढील लेखात व्यावसायिक बजेट पाहू. अनेक लोकांकडे घरगुती खर्चांसाठी नीट बजेट केले जात नाही. जे बजेट करतात ते सुद्धा गोळाबेरीज किंवा खूप लवचिक (Flesible) असते. साधारणपणे माणूस अश्या प्रकारे बजेट लिहितो: (वहीची डावी/उजवी बाजू हा मुद्दा सोडून द्या)


ree
पण यात चूक काय घडते पाहा

किराणामाल, साबण, भाज्या, फ़ळे, पेट्रोल, दूध आणि घराचा मेंटेनन्स चार्ज वगैरे या गोष्टी घरखर्च या नावाखाली एकत्रच आल्या. खरेतर पेट्रोल हा आहे वाहनखर्च, किराणामाल आहे अन्नपाण्याचा खर्च. त्यातच घरभाडे व घराचा मेंटेनन्स मोजला जातो. एखाद्या व्यक्तीला विचारले की तुमचा दरमहा घरखर्च किती होतो तर त्याला सांगता येत नाही. तर बजेट असे एका पानावर लिहिण्यापेक्षा एक डायरी किंवा वही घ्यावी. त्यात एक एक प्रकारचे खर्च एका पानावर लिहावेत. म्हणजे नक्की कुठे कमी जास्त करता येण्यासारखे आहे ते समजेल. खालील चार्ट पाहा :

उदा. मे महिन्यात पुढील सहा महिन्यांचे घरासाठी करावे लागणारे बजेट असे दिसेल.

ree

आता या चार्टमुळे घरात होणारे खर्च किती आहेत ते समजेल. पुढील पानावर अश्याच चार्टमध्ये खाण्यापिण्याचे खर्च लिहून काढावेत. म्हणजे किराणामाल, स्वयंपाक करणा-या मदतनीसाचा पगार, भाज्या, फळे, दूध, गॅस, बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ, हॉटेल वगैरे एकत्र केल्यावर समजेल की सध्या नक्की कुठे किती खर्च होतात व कुठे कमी -जास्त करता येईल. असेच मुलांचे खर्च जसे की शिक्षणाची फी, वह्या-पुस्तके, स्टेशनरी, छंदवर्ग, डायपर, पाळणाघर इत्यादी पुढच्या पानावर लिहा. त्यापुढील पानावर वाहन खर्च, जसे की गाड्यांचे हप्ते, इन्शुरन्स, ड्रायव्हरचा पगार, बसभाडे, लोकलचा पास इत्यादी. पुढील पानावर आरोग्य येऊ दे, जसे की, औषध-पाणी, आरोग्य विम्याचे हप्ते, योगा क्लासची फ़ी, जिमची फ़ी, आरोग्य पेय, डाएटिशियनची फी, घरी येणा-या फिजिओ किंवा वयस्कर माणसाला सांभाळणार्‍या मदतनीसाचा पगार इत्यादी. असेच पुढील एक-एक पानांवर पाळीव प्राणी, लाईफस्टाईल खर्च (उदा. शॉपिंग, पार्टी) विरंगुळा (उदा. नाटक, सिनेमा), कुटुंबियांचे वैयक्तिक खर्च (उदा. भिशीची वर्गणी, भजन क्लासची फ़ी) वगैरे. एकदा नीट वळ काढून कौटुंबिक बजेट बनवावे. हे बनवताना त्यात हौस-मौज, आहेर देणेघेणे, देवधर्म अश्या सगळ्या बाजूंनी विचार करावा. याप्रमाण विचार केल्यास नको ते खर्च टाळणे, योग्य वेळी-योग्य भावात खरेदी करणे हे जमते आणि अपव्यय होत नाही.


3. तिसरी चूक म्हणजे जमाखर्च न लिहिणे

कंटाळ्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे रोजचे खर्च जमाखर्चात न मांडल्यास काय होते, की इतक्या विचारपूर्वक केलेले बजेट कागदावरच राहते. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे काढली की जमाखर्च लिहून होतो. यामुळे आपले खर्च आटोक्यात राहू शकतात. खर्च करण्यापूर्वी केलेले नियोजन म्हणजे बजेट आणि करून झाल्यावर ठेवलेली नोंद म्हणजे जमाखर्च. या दोन्हीमध्ये जास्त तफावत येऊ द्यायला नको. थोडाफार फरक होणार आहे व तेवढा चालू दे कारण हे घरगुती बजेट आहे, व्यावसायिक बजेट मात्र जास्त काटेकोरपणे पाळावे.


4. चौथी चूक म्हणजे क्रेडिट कार्ड वापरण्याचा अतिरेक

साधारण चाळिशीच्या पुढील अनेक लोकांनी वाढत्या वयात प्रामुख्याने कॅश व्यवहार, एकत्र कुटुंब, पैसा पुरवून पुरवून वापरणे, खर्च करताना मोठ्या माणसांचे मत विचारण अश्या गोष्टी केल्या आहेत. पण त्याहून तरुण पिढीने स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र कुटुंब, डिजिटल स्वरूपात खर्च अश्या सवयी अंगीकारल्या आहेत. डिजिटल पेमेंट करताना प्रत्यक्ष पैसे जाताना दिसत नाहीत व अजून खर्च करायच्या इच्छेवर चाप बसत नाही. शिवाय बँकेत पैसे नसतील तरी क्रेडिट कार्डावर खरेदी करता येते. पुढील महिन्यात अ‍ॅडजस्ट करून क्रेडिट कार्डाचे बिल भरू, पण आज हा खर्च करावासा वाटतोय तर तो करूच, अश्या चुकीच्या विचारातून कार्ड स्वाइप करायची सवय लागते. कधी कधी कार्डचे बिल भरायची तारीख उलटते व दंड भरावा लागतो. यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना भान ठेवणे गरजेचे.


सारांश

बजेटिंग म्हणजे गरीबी, कंजुषी, वेळ वाया घालवण, कागदी घोडे नाचवण असे अनेक गैरसमज असतात. पण पैसा वापरताना तो कुठे खर्च करायचा याचा निर्णय आपण स्वत:च्या ताब्यात घेणे म्हणजे बजेटिंग. यामुळे महागाई हा बागुलबुवा न वाटता, त्याला तोंड देण्यासाठी माणूस सक्षम होतो. कुठे काटकसर आणि कुठे सढळ खर्च हा आपला चॉइस असायला हवा. जाहिरातीच्या किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन खर्च करणे टाळायला हवे. तसेच आपल्याला खरोखरच कश्यातून समाधान मिळणार आहे तिथे खर्च करण्यासाठी तरतूद तसेच म्हातारपणासाठी गुंतवणूक करण्याचा रस्ता बजेटिंग मधून जातो. बजेट खोल तपशीलवार करावे. व्यवहार झाले की हिशोब लिहून ठेवावेत. बजेट काटेकोर पाळले की स्वत:ला शाबासकी द्यावी. कौटुंबिक गप्पांमध्ये बजेट, बचत, गुंतवणूक यावरही गप्पा व्हाव्यात व आर्थिक नियोजनाबाबत सहजता यावी. आपल्या कुटुंबाचे बजेट या लेखात बघितले. पुढील लेखात व्यवसायाचे बजेट करताना कोणत्या चुका होतात ते बघूया.


(क्रमश:)

 
 
bottom of page