top of page

वित्त संभ्रम : अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख : प्रा. सौ. स्मिता सोवनी [ ऑगस्ट 2023]

  • Vyapari Mitra
  • Aug 4, 2023
  • 5 min read

Updated: Aug 5, 2023

वित्त संभ्रम : अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख [ भाग ५ ]

प्रा. सौ. स्मिता सोवनी (फायनान्स कोच ),पुणे

97665 09090




आर्थिक व्यवस्थापन करताना सहज घडणार्‍या चुकांचे अवलोकन आणि त्या टाळण्याचा व दुरुस्त करण्याचा प्रयत्न अशा धर्तीवर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. मागील भागात आपण कॅश फ्लो धोरणाबाबत घडणार्‍या चुका बघितल्या. त्यात प्रामुख्याने पैश्याच्या Outflow म्हणजेच जावक याबद्दल बराच ऊहापोह केला. या भागात आपण Inflow म्हणजेच आवक याबाबत वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करू.


1. पैश्याची आवक होण्याचे उगम नीट न ओळखणे :

मागील भागातील उदाहरण पुन्हा पहा. एक पाण्याची विहीर आहे. तिच्या आतमध्ये पाण्याचा उगम किंवा झरे आहेत. त्यातून विहीर भरते. याला Inflow म्हणूया. या विहिरीतून तुम्ही पाणी उपसता, त्यामुळे पाणी कमी होते. याला Outflow म्हणूया. कॅश फ्लो म्हणजे अशीच खुद्द पैश्याची आवक-जावक. आपण उत्पन्न नक्की कुठून कुठून होते याकडे पुरेसे लक्ष दिले आहे का? आता या प्रश्‍नाचे उत्तर द्या, की आपल्याला पैसे कुठून मिळतात? जास्तीत जास्त वाचक सांगतील, की कुठून म्हणजे काय? धंद्यातून किंवा विक्रीतून किंवा सेवेतून पण हे उत्तर कसे चुकीचे आहे, पहा.

समजा आपण हॉटेलात गेलात. कशाला गेलात? खाण्यासाठी. उत्तर बरोबर आहे का? हो. आता वेटरना सांगा, मी खायला आलोय. मला खायला आणा. तर ते बिचारे काय देणार?

ते म्हणतील, साहेब इथे सगळे खायलाच येतात. नक्की काय हवे, सांगा.

मग तुम्ही म्हणता, जे चांगले, ताजे आहे ते आणा.

वेटर : साहेब आमचे सगळे पदार्थ चांगले आणि ताजेच असतात.

तुम्ही : हे काय, मला इतकी भूक लागली आहे आणि या हॉटेलमध्ये मला खायलाच मिळत नाहीये.

तर आता मुद्दा लक्षात येत आहे का? इथे खायला आलो आहे हे उत्तर खरे तर चूक नाही, पण नक्की काय हवे ते ठरवल्याशिवाय तुम्हाला खायला मिळणार नाही. वेटरला नावे ठेवण्यापेक्षा असे सांगा, की मला 1 प्लेट इडली सांबार हवे आहे, सांबार वेगळ्या वाटीत द्या. आता वेटर तुम्हाला ‘खायला’ देऊ शकतो, हो ना? तर आता वरील प्रश्‍नाचे उत्तर पुन्हा द्या. आपल्याला पैसे कुठून मिळतात? ‘धंद्यातून’ असे उत्तर किती मोघम आहे, अर्धवट आहे, हे आता लक्षात आले का?

या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला नीट देता आले पाहिजे. आपला धंदा नक्की काय आहे, आपण नक्की काय करतो, कोणती कृती करतो, ग्राहकांची काय सोय आपल्यामुळे होते, कोणती अडचण आपण सोडवतो ज्याचे आपण पैसे लावतो? आपली खासियत काय आहे? आपल्या धंद्याची टॅगलाईन आपली खासियत दर्शवते का? आपल्या जाहिरातीत आपली खासियत प्रगट करता का?

उदा. मी शिक्षिका आहे, शिकवण्यातून मला पैसे मिळतात. असे मोघम उत्तर देणे ही चूक. मी फायनान्स शिक्षिका आहे, हे थोडे बरोबर. मी फायनान्सच्या कार्यशाळा घेते व त्यातून मला पैसे मिळतात हे अजून मुद्याला धरून. मी लोकांच्या पैश्याविषयी समस्या दूर व्हाव्यात यासाठी कार्यशाळा घेते हे नेमके उत्तर. असे विचार करत करत मुळापर्यंत गेल्यामुळे आपला प्रमुख कॅश फ्लो का आणि कुठून होतो ते नीट समजते आणि पहिली चूक दुरुस्त होते.


2. गुणवत्ता वाढीकडे दुर्लक्ष :

आता असा विचार करा, की आपल्या मूळ व्यवसायात आपण चार लोकांसारखेच वागतो आहोत की काही गुणवत्ता वाढवून देत आहोत? उदा. मी एक शर्ट तयार केला. त्याचे अंदाजे अडीच मीटर कापड, शिलाई वगैरे धरून मी तो 500 रुपयांना विकायचे ठरवले. पण स्पर्धेमुळे तो 400 मध्येच विकावा लागला. यात मला थोडासाच नफा झाला. पण समजा, क्रिकेट चालू असताना क्रिकेटसंबंधी आणि फुटबॉल स्पर्धा असताना किंवा वारी चालू असताना त्याच्याशी सुसंगत चित्रे मी या शर्टावर छापली, किंवा तशी वाक्ये छापली तर हा शर्ट अधिक किंमतीला खपेल. कारण गुणवत्तेत वाढ झाली. आणि या शर्टावर जर खेळाडूंनी सही केली असेल तर? हा शर्ट अगदी लाख मोलाचा ठरेल नाही?

तर अशी गुणवत्ता वाढ न केल्यास आपल्याला सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि नफा पण जेमतेम मिळतो. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळेपण शोधा आणि त्या वेगळेपणाची किंमत लावा. म्हणजे नफ्याचे प्रमाण वाढेल. अजून एक उदाहरण पाहा. समजा, एक किलो मैदा चाळीस ते पन्नास रुपयांना खपतो. आणि एक किलो नूडल्स दोनशे ते अडीचशे रुपयांना खपतात. स्वयंपाकाचा वेळ आणि कष्ट वाचल्यामुळे ते उत्पादन ग्राहकाला उपयुक्त वाटते आणि त्या व्हॅल्यू अ‍ॅडिशनचे पैसे विक्रेत्याला मिळतात. आपल्या व्यवसायातले वेगळेपण आणि उच्च गुणवत्ता ओळखा व ग्राहकांसमोर मांडत रहा म्हणजे व्यवस्थित नफा मिळवता येईल.


3. पैश्याचा एकच स्त्रोत असणे :

आपले विहिरीचे उदाहरण आठवा. विहिरीला आतून एकच झरा असेल तर ती लवकर भरेल की अनेक झरे असतील तर? तसेच आपल्या पैश्याचा उगम एकाच ठिकाणाहून होणे हे जरा जोखमीचेच. काही कारणाने तो एकमेव झरा आटला तर विहीर कोरडी पडेल ना? तसेच आपल्या व्यवसायात अजून कॅश फ्लो चा उगम शोधून काढायला हवा. पारंपारिक भाषेत याला जोडधंदा म्हणतात.

उदा. मी कार्यशाळेत आलेल्या लोकांना एखाद्या चांगल्या लेखकाचे फायनान्सचे पुस्तक विकले तर मला कमिशन मिळेल ना? आणि लोकांनाही घरी गेल्यावर संदर्भाला पुस्तक उपयोगी पडेल. तसेच हे पुस्तक मी नेहमी घेत असल्यामुळे माझ्याकडच्या लोकांना थोडे स्वस्त देण्याची विनंती मी दुकानदारास करू शकते, यामुळे माझ्या माणसांना डिस्काउंट मिळेल, मला कमिशन मिळेल आणि दुकानदाराच्या एकदम अनेक प्रती विकल्या जातील.

दुसरी शक्यता पाहा, मी वेबसाईट बनवू शकते. माझे अनेक विद्यार्थी, क्लाएंट कंपन्या या वेबसाईटला भेट देतात. माझ्या कार्यशाळतील लोकांना त्यांचे प्रॉडक्ट माझ्या वेबसाईटवरून विकायला देऊ शकते व तिथून मला उत्पन्न होऊ शकते. तिसरी शक्यता, मी फायनान्स क्षेत्रात असल्यामुळे विमाएजंट किंवा अ‍ॅडव्हायजर बरोबर काम करू शकते, त्यामुळे मला थेट विमा कंपनीकडून उत्पन्न मिळू शकते. चौथी शक्यता, मी स्वत:च एक पुस्तक लिहून विकू शकते. अश्या कितीतरी शक्यता सापडतील.

तर ज्यांच्याकडे उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे, त्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार मुख्य धंद्याच्या आजूबाजूने कुठून नवीन उत्पन्नाचे झरे सापडतात याचा शोध घ्या. अ‍ॅफिलिएट मार्केटिंग, सोशल मिडिया मार्केटिंग हे पर्याय सध्या चांगली कमाई करून देत आहेत. आजूबाजूच्या व्यवसायांशी स्पर्धा करून पाय खेचण्यापेक्षा एकत्र येऊन मोठे बनता येते का तेही पाहा. अर्थात असे कोलॅबोरशन करताना कायदा आणि विश्‍वासूपणा यांना नजरेआड करू नका असे आवर्जून सांगावेसे वाटते.


4. पॅसिव्ह उत्पन्न नसणे :

जिथे आपण स्वत: काम करत नसतो, पण उत्पन्न होते असे पर्याय म्हणजे पॅसिव्ह उत्पन्न. उदा. माझी बॅच नसेल त्या वेळात दुसर्‍या क्लास घेणार्‍यांना माझी क्लासरूम भाड्याने देता येईल का? किंवा गाडी विकत घेऊन ट्रॅव्हल कंपनीला वापरायला देऊ शकते का? तिसर्‍या मुद्यातील वेबसाईटचे उदाहरण किंवा अ‍ॅफिलिएट मार्केटिंग हे पण एक पॅसिव्ह उत्पन्न आहे, जिथे विक्रेता वेगळा, ग्राहकही वेगळा पण आपण त्यांची पब्लिसिटी करून काही कमिशन मिळवू शकतो. घरातील गृहिणींना आवड असल्यास हे करू शकतात व स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात. नवीन असताना याला वेळ द्यावा लागतो, व उत्पन्न सुरू होईपर्यंत थोडा पेशन्स ठेवावा लागतो. एकदा सगळी सिस्टीम बसली की मोजक्या वेळात हे काम उरकते.


5. पोर्टफोलिओ उत्पन्न नसणे :

पोर्टफोलिओ उत्पन्न म्हणजे गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न. म्हणजे व्याज, डिव्हिडंड वगैरे. आपल्या उत्पन्नातून दरमहा बचत कशी करायची हे आपण लेख 2 मधून नीट अभ्यासले आहे. ही बचत घरात पैश्याच्या रूपात ठेवण्यापेक्षा चांगल्या योजनांमध्ये गुंतवत रहावी. तसेच अगदी जीवन - मरणाचा प्रश्‍न असल्याशिवाय गुंतवणूक अधे-मधे मोडून पैसे बाहेर काढणे पण चुकीचे आहे. कारण त्यामुळे आपल्याला मिळणार्‍या चक्रवाढ व्याजाचे नुकसान होते. यासाठी आपल्या अ‍ॅडव्हायझरशी बोला आणि गुंतवणूक करताना कमी दिवस, मध्यम पल्ल्याच्या आणि दीर्घ काळाच्या गुंतवणुकी वेगवेगळ्या करा. तसेच लहान रकमेच्या अनेक गुंतवणुकी करणे बरे पडते, म्हणजे व्यवसायात काही गरज भासल्यास तेवढीच एक गुंतवणूक मोडता येते; बाकीच्या चालू राहातात व त्यावरील कंपाऊंडिंग बंद पडत नाही.


सारांश :

आपल्या विहिरीला अनेक झरे असतील तर ती सतत भरलेली राहील. व्यावसायिकांनीही असेच पाहावे की उत्पन्नाच्या एकाच मार्गावर सगळी भिस्त असणार नाही. तसेच स्वत:चे वेगळेपण शोधा म्हणजे तुमचाही नफा आणि तुमच्या ग्राहकालाही काही खास मिळेल. तर या महिन्यात सर्वांनी वरील चुका सुधारा अणि सांगा की तुम्हाला तुमची खासियत अणि जोड उत्पन्न कसे सापडले? शोधल्यावर परमेश्‍वर पण सापडतो. आपण तर दोनच व्यावहारिक गोष्टी शोधणार आहोत. सर्वांना शुभेच्छा !

...

 
 
bottom of page