top of page

वित्त संभ्रम :अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख-प्रा. सौ. स्मिता सोवनी [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 27, 2023
  • 6 min read

वित्त संभ्रम :अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख - भाग ४

ree

प्रा. सौ. स्मिता सोवनी, (फायनान्स कोच) पुणे.

97665 09090




मागील लेखावरून पुढे

आर्थिक व्यवस्थापन करताना सहज घडणार्‍या चुकांचे अवलोकन आणि त्या टाळण्याचा व दुरुस्त करण्याचा प्रयत्न अश्या धर्तीवर मागील दोन भागात आपण बजेट विषयी घडणार्‍या चुका बघितल्या. कॅश फ्लो धोरणाबाबत घडणार्‍या चुका या भागात बघू. (Cash Flow Statement आणि Compliance विषयी हा लेख नाही हे लक्षात घ्यावे.) अनेक व्यावसायिक बंधू नफ्याबद्दल खूप जागरूक असतात, पण तितके लक्ष कॅश फ्लो धोरणाकडे दिले जात नाही. उदा. अनेक दुकानदारांशी बोलताना लक्षात येते की त्यांना खेळता पैसा नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. कारण आपल्याला रोजचे खर्च, सप्लायरचे बिल, पगार हे तर वेळेत द्यावेच लागतात आणि तेवढे पैसे हातात उरलेले नसतात. तर कॅश फ्लो धोरणाबाबत चूक कशी घडते आणि काही उपाय करता येतील का ?


1. नफ्यालाच कॅश फ्लो समजणे

एक उदाहरण पाहा. एक पाण्याची विहीर आहे. तिच्या आतमध्ये पाण्याचा उगम किंवा झरे आहेत. त्यातून विहीर भरते. याला Inflow म्हणूया. या विहिरीतून तुम्ही पाणी उपसता, त्यामुळे पाणी कमी होते. याला Outflow म्हणूया. कॅश फ्लो म्हणजे अशीच खुद्द पैश्याची आवक-जावक.

यात एक पैलू आहे की आवक, Inflow, म्हणजेच पैसा मिळणे; मग तो विक्रीतून आलेला पैश्याचा प्रवाह असो, व्याज असो, भाडे असो, डिव्हिडंड असो, मागची उधारी वसूल होत असो, बँकेने कर्ज दिलेले असो किंवा तात्पुरते उसने आणलेले पैसे असोत. आणि दुसरा पैलू म्हणजे जावक, Outflow, म्हणजेच पैसा देणे. मग ते वीज बिल भरणे असो, पगार देणे असो, टॅक्स भरणे असो, किंवा घरगुती खर्चासाठी धंद्याच्या कॅश बॉक्समधून काढलेले पैसे असोत. पण कॅश फ्लोबद्दल उदासीन असलेला व्यावसायिक मात्र नफ्यालाच कॅश फ्लो समजतो. नफा म्हणजे विक्री वजा खरेदी वजा व्यावसायिक खर्च. अनेक धंद्यांमधे विक्री झाली की वसुली होईपर्यंत वाट बघावी लागते. मग आवक होते. पण तुम्ही ग्राहकाला विक्रीचे बिल केले त्या दिवशीच हिशोबात विक्रीची नोंद होत असते. म्हणजेच नफा झाल्याचे दिसते, पण हातात आवक झालेलीच नसते. त्यामुळे पुस्तकात नफा आहे पण तिजोरीत ठणठणगोपाळ अशी परिस्थिती येते.

वैयक्तिक आणि व्यावसायिक बजेट शक्य तितक्या काटेकोरपणे पाळले तर कॅश फ्लो नीट सांभाळला जाईल. व्यवसायात नफ्याइतकेच खेळता पैसा असणही महत्त्वाचे आहे. म्हणून कॅश फ्लो बद्दल उदासीनता ही न परवडणारी चूक ठरते.


2. धंद्यात अति जास्त माल भरणे

व्यवसायात उधारीवर माल भरला जातो. पण आपली उधारीची मुदत संपल्यावरही तो माल विकला न जाता पडून राहिला असेल तर कॅश फ्लो मध्ये तूट येते. आज दळणवळण साधने बरीच वेगवान आहेत. आणि ग्राहकांच्या आवडी-निवडी पटापट बदलणार्‍या आहेत. त्यामुळे भारंभार माल न भरता कोणत्या प्रकारचा किती माल भरावा याचा निर्णय एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करून घेणे आणि तसातसा माल मागवत राहाणे चांगले. तसेच माल भरण्यापूर्वी एखादी योजना आखावी. उदा. या तारखेपर्यंत किंमतीवर सूट, अ‍ॅडव्हान्स पैसे भरणार्‍यांना एक सर्व्हिसिंग खर्च माफ, कॅश पैसे भरणार्‍यांना गिफ्ट कुपन, अ‍ॅडव्हान्स पैसे भरणार्‍यांना होम डिलिव्हरी चार्जेस माफ वगैरे. ही योजना पाहून आपल्यापर्यंत ग्राहक पोहोचतील त्याच बेताने माल भरावा. तसेच आपला कोणताही उद्योगधंदा असेल तरी भरपूर प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करावा. म्हणजे दूरदूरचे ग्राहकपण आपल्यापर्यंत पोहोचतील व मालाला उठाव राहील.


3. क्षमतेपेक्षा जास्त उधारी देणे

उधारीमुळे विक्री वाढते हे खरेच. पण आपले खेळते भांडवल किती? त्यानुसारच ग्राहकांना उधार मंजूर करावा. तसेच उधार देण्यापूर्वी त्यांच्याकडून काही ओळखीतील संदर्भ मागावेत. त्यांची वेळच्या-वेळी परतफेडीची वृत्ती आहे का, कोणाला पूर्वी बुडवले आहे का, त्यांची बँक कोणती व तेथून काही गॅरंटी मिळते का असे पाहता येते. तसेच उधारीवर माल घेणार्‍याकडून पोस्ट-डेटेड चेक मागणे हा एक उत्तम मार्ग असतो. चेक बाउन्स झाल्यास आपण त्याविरुद्ध कायदेशीर दाद मागू शकतो, अश्या माणसाचे रेकॉर्डही खराब होते. इंटरनेटच्या युगात रेकॉर्ड खराब होणे हे कोणत्याच व्यावसायिकाला परवडण्यासारखे नसते, कारण हे खराब रेकॉर्ड लगेच दहा ठिकाणी जाऊन पोहोचते व पुढे त्याला पुन्हा नावलौकिक कमावणे ही डोकेदुखीच ठरते. तसेच हे पोस्ट-डेटेड चेक बँकेतील आपल्या रिलेशनशिप मॅनेजरला दाखवून आपली पत/Goodwill हे पण मजबूत करता येते. जास्त उधारी दिल्यास बँकेतून उचल करावी लागते आणि त्यावर भरमसाठ व्याज पडते. म्हणूनच इथे तारतम्य हवे.


4. आपण मिळवलेली उधारी आणि दिलेली उधारी याचा ताळमेळ नसणे

आपल्याला उधार खरेदी करता येते. आपल्या खरेदीला एक महिन्याची उधारी मिळत असेल तर आपल्या विक्रीवर 21 दिवसांची उधारी मंजूर करणे हे शहाणपणाचे. वसुलीस 2-4 दिवस पुढे मागे झाले तरी आपल्याला पैसे फेडण्यापूर्वी वसुली झालेली असते. पण ग्राहकांची संख्या अणि विक्री वाढवण्याकरिता वारेमाप उधारी दिली जाते. यामुळे पैसे अडकून राहतात. कॅश फ्लो चुकतो.

काही खर्च पुढे ढकलता येतील का असे पण पाहा. उदा. एखादे बिल आले की लगेच भरण्यापेक्षा त्याच्या देय दिनांकाला (Due Date) भरणे चांगले नाही का? इथे आपण बिल थकवत किंवा टाळाटाळ करत नसून फक्त देय दिनांक येईपर्यंत थांबत आहोत हे लक्षात घ्यावे.


5. क्रेडिट कार्डाचा अमर्याद वापर

क्रेडिट कार्डाने पेमेंट करून आपण पैश्याची जावक पुढील महिन्यात ढकलू शकतो. मात्र त्याच्या आहारी गेल्यास उधारीचा ताळमेळ अजूनच चुकतो. तसेच क्रेडिट कार्डाचे पेमेंट अगदी एका दिवसाने पुढे गेले तरी भरमसाठ व्याज पडते. पण कार्डाची परतफेडीची सायकल नीट लक्षात घेतल्यास, Outflow बिनदिक्कत पुढे सरकवता येतो. अनेक क्रेडिट कार्ड घेऊन पैसा फिरवणे ही मात्र चांगली कल्पना नसून ‘आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार?’ ही म्हण इथे वापरा. पैश्याची वसुलीच करता येत नसेल तर नुसती उधारीची मर्यादा वाढवत राहून कसे चालेल? यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा तयार होईल आणि धंदा बंदही पडू शकतो.


6. कोणकोणत्या मार्गाने रोकड/बँकेत पैश्याची आवक जावक होते त्यावर नीट लक्ष न ठेवणे

आपण धंदा करून पैसे मिळवतो हे खरेच. पण या व्यतिरिक्त काही गोष्टींमुळे पैश्याची आवक-जावक होते का हे किती लोक बघतात? याचा संबंध आपल्या रोजच्या नफ्या/तोट्याशी नसतो पण सांपत्तिक स्थितीवर परिणाम होत असतो.

उदा. पैसे गुंतवल्यामुळे हातातली रोकड कमी होते. एखादी मालमत्ता, यंत्र, गाडी, शेअर्स वगैरे विकत घेतल्यामुळेपण पैसा बाहेर जातो ना? किंवा अशीच काही आधीची मालमता विकून पैश्याची आवक पण होते की नाही? म्हणूनच धंद्याचे मुख्य खर्च व उत्पन्नाच्या बरोबर इकडे पण लक्ष ठेवायला हवे. नाहीतर एखाद्या मालमत्ता विक्रीतून आलेला पैसा धंद्याच्या मुख्य प्रवाहात गुंतवला जातो आणि पुन्हा तशी मालमत्ता उभारायची झाली तर हातात पैसा नसतो किंवा नको त्या ठिकाणी, म्हणजेच नीट परतावा नसलेली गुंतवणूक केल्यास ती जणू डेड इन्व्हेस्टमेंट ठरते.

उदा. आर्थिक व्यवहार, जे मुख्य धंद्याच्या खरेदी विक्रीचे नाहीत, त्यांच्याकडे लक्ष देण्याचे. उदा. कर्ज काढले की आवक होते आणि ते फेडण्यासाठी पैसा व्याजासकट परत द्यावा लागतो. सहज मिळते आहे म्हणून भरमसाठ कर्ज घेणे, त्यातून डेड गुंतवणुकी करणे, यामुळे नको तिथे पैसा अडकून पडतो, आणि कर्जाचे हप्ते भरणे मात्र मागे लागतात. त्यामुळे असे निर्णय विचार करून घ्यायला हवे.

उदा. तुमचे फर्निचरचे दुकान आहे. तुम्हाला वाहन कर्ज मिळाले म्हणून टेम्पो घेतला. आता कर्जाचे हप्ते, रोजचे पेट्रोल, ड्रायव्हरचा पगार व मेंटेनन्स चालू झाला. मग यापेक्षा भाड्याचे वाहन परवडले असते का? पण या कर्जावरील व्याज किंवा वाहनावरचा घसारा यामुळे काही टॅक्स वाचला का? यातील नक्की फायदा कशात आहे हा धोरणात्मक निर्णय घ्यावा.

तर अश्या जागा, वाहने, यंत्रे घेतली असतील तर त्या भाड्याने देणे किंवा त्यातून काही परतावा मिळेल असे काम सुरू करता येईल का? व त्यातून पैश्याची आवक होईल का? अर्थात असे करताना विश्‍वासू माणसांशी, योग्य ते कायदे पाळूनच व्यवहार करण शहाणपणाचे. असेही आढळून येते की, ‘जागा घेणे चुकीचे’ असा प्रचार सुरू झाला आहे. जागा घेतल्यास मोठी रक्कम गुंतून पडते हे खरे आहे, पण रोजच्या नफ्यातून जरुरी पुरता कॅश फ्लो मिळत असेल तर वरची रक्कम योग्य प्रॉपर्टीत गुंतवली म्हणून बिघडले कुठे? जागा विका - जागा विका अश्या प्रचारामुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक किंवा शहरात राहणारे नोकरदार गावाकडची जमीन विकून बसलेले मी बघितले आहेत. हे जागा विकून मोकळे झालेले पैसे त्यांनी शेअरमध्ये अभ्यास नसतानाही घातले किंवा मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या व संपवले.

तसेच नियमितपणे थोडेथोडे पैसे धंद्यापेक्षा बाहेरच्या गुंतवणुकीत टाकत राहावे. कदाचित याचा परतावा धंद्याइतका नसेल, पण धंद्यात अचानक अवघड परिस्थिती आली तर, त्या गुंतवणुकीतून पैसे काढता येतील व तात्पुरती परिस्थिती सांभाळली जाईल.

उदा. LIC पॉलिसीवर तात्पुरते कर्ज काढल्यामुळे अनेकांना लॉक डाऊनमध्ये हातातोंडाची गाठ पडण्याइतके पैसे धंदा बंद असूनही उभे करता आले. अर्थात, मुख्य धंद्याला हानी पोचेल इतकी रक्कम बाहेर गुंतवायची नाही.


7. धंद्यात फार जास्त रोकड ठेवणे

खरे तर व्यवसायात भरपूर पैसे हाताशी असणे म्हणजे वाह! क्या बात है! नाही का? पण धंद्यात जर 20% नफा सुटत असेल अणि आपण हाताशी आलेली रोकड त्यात घालण्याऐवजी 7-8% व्याजावर बँकेत ठेवली असेल तर? याचा अर्थ असा असेल का, की आता तुमचा धंदा वाढायची शक्यताच नाही, त्यामुळे तुम्ही ते पैसे धंद्यात घालत नाही आहात? की या धंद्यातील जोखीम डोईजड आहे म्हणून तुम्ही 20% नी धंद्यात घालण्यापेक्षा 7-8% नी पैसे अडकवून ठेवले आहेत? तसेच त्या 7-8% व्याजावर कर भरल्यानंतर काय हातात उरणार? त्यामुळे आपली तिजोरी फिल्मी पद्धतीने नोटांनी भरून ठेवणे किंवा बँकेत जास्त पैसे ठेवणे ही एक चूकच. यासाठी आपली कॅश सायकल कशी काम करते ते पाहा. त्यानुसार कॅश व बँक बॅलन्स बाळगायला हरकत नाही. वाटल्यास ताण कमी करण्यासाठी थोडीशी जास्त रोकड ठेवू शकता. पण जास्त रोकड असेल तर वसुलीसाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत आणि तुमच्या ग्राहकांना पैसे द्यायला उशीर करायची सवय लागून जाते. बाकी तुमचा व्यवसाय कॅश रिच असेल तर तो पैसा योग्य प्रकारे गुंतवा म्हणजे त्यावर चांगला परतावा मिळेल. साधारणपण हॉटेल, किराणा, मेडिकल वगैरे दुकानदारी, विमा वगैरे सल्ला, सॉफ्टवेअर, क्लासेस, इस्टेट एजंट, टूर ट्रॅव्हल, दुरुस्ती, सेवा-सल्ला, ईव्हेंट, सिनेमा गृह अश्या ठिकाणी व्यवहार रोकडीने होतात. तर उत्पादनक्षेत्रात आधी कारखाना टाका, नोकर भरती करा, माल आणा, उत्पादन झाले की त्या वस्तू शोरूम वगैरे मध्ये मांडा, जाहिरात करा. यानंतर रोख विक्री झाली तर आवक होते नाहीतर उधार वसुली करा. त्यानंतर आवक होते. यामुळे साधारणपणे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ही सायकल लांबलचक असते. आपापली सायकल ओळखून त्यानुसार कॅश राखणे महत्त्वाचे.


सारांश

नफा आणि कॅश फ्लो या दोन्हीकडे सतत लक्ष द्यायला हवे. केवळ सेल्स टारगेट पूर्ण करण्यासाठी भरमसाठ विक्री उधारीवर करणे बरोबर नाही. आपले विक्री कौशल्य आणि संवाद कौशल्य वापरून सतत वसुलीकडे लक्ष देणेही गरजेचे. आपल्याला सप्लायरकडून किती उधारी मिळते त्यानुसार आपण किती उधारी कस्टमरला द्यायची याची सायकल नीट बसवणे आवश्यक आहे. धंद्यातला प्रत्येक रुपया हा आधी नियोजन करून मगच बाहेर गेला पाहिजे. आवक सतत प्रवाहित ठेवण्यासाठी पैसे स्वीकारताना ऑफर देणे, ऑनलाईन पैसे स्वीकारणे, पैसे देताना ड्यू डेटच्या आधीच न चुकते करणे, कस्टमरकडून पोस्ट-डेटेड चेक घेणे, धंद्याचा पैसा डेड गुंतवणुकीत न टाकणे, बँकेशी चांगले संबंध राखणे या दृष्टिकोनातून व्यवसायाचे बजेट तयार करावे. कॅश फ्लोचे नियोजन अधिक चांगले होण्यात त्यांची नक्कीच मदत होईल.

 
 
bottom of page