top of page

वित्त संभ्रम : अर्थात पैशाच्या बाबतीत घडणाऱ्या चुकांची ओळख (भाग ३) - प्रा. स्मिता सोवनी [जून २०२३]

  • Vyapari Mitra
  • May 30, 2023
  • 4 min read

Updated: May 31, 2023


ree

प्रा. सौ. स्मिता सोवनी, पुणे.

97665 09090

infintiesmita@gmail.com





बजेटिंग म्हणजे गरिबी, कंजूषी, वेळ वाया घालवणे, कागदी घोडे नाचवणे असे अनेक गैरसमज असतात. पण पैसा वापरताना तो कुठे खर्च करायचा याचा निर्णय आपण स्वत:च्या ताब्यात ठेवायला हवा. त्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे बजेटिंग. व्यवहार झाल्यावर त्याची नोंद करणे म्हणजे जमाखर्च आणि व्यवहार करण्याआधीच अंदाजपत्रक मांडणे म्हणजे बजेट; हा बारकावा तसेच घरगुती बजेट कसे करावे हे आपण मागील लेखात बघितले. आज व्यावसायिक बजेट व त्यातील चुका दुरुस्त करण्याविषयी ऊहापोह करूया.


1. पहिली चूक म्हणजे बजेट न करणे

अनेक व्यावसायिक जमाखर्चाला व हिशोबाला पक्के असतात. पण बजेट करत नाहीत असे आढळून येते. एखादा खर्च उभा राहिला की तो करावा तर लागतोच, पण त्या खात्यावर आत्ता इतके पैसे खर्च करणे बरोबर आहे का? की अनाठायी खर्च झाला? हे कसे कळणार? त्यासाठी पुढील काळाचे बजेट आधी करून ठेवावे. यामुळे पैश्याचा अपव्यय टळतो आणि योग्य वेळी पैसा हाताशी उपलब्ध असतो. उदाहरण : डिसेंबर / जानेवारी महिन्यातच एसीच्या देखभालीसाठी एका रकमेची तरतूद करून ठेवणे, एखादा पार्ट ठीक करायचा असल्यास ऑफ सीझन मध्ये कमी खर्चात करवून घेणे हे बजेटमुळे जमेल. पण हे केले नाही व उन्हाळ्यात देखभाल निघाली तर माणूस पण वेळेत मिळणार नाही, किंमतही महाग पडेल.


बजेट असे करता येईल

बजेट करणे हे एक सोपे शास्त्र असून ते आपल्या आर्थिक सल्लागाराकडूनही शिकून घेता येईल. आपण थोडक्यात आपल्या कॉम्प्युटरवर असे एक्सेल शीट स्वत:च करू शकता. लिखित स्वरूपातही करू शकता पण त्याला जास्त वेळ लागतो. पुढील महिन्याचे बजेट अगदी काटेकोरपणे आणि 3 महिन्यांचे बजेट साधारणपणे करावे. पुढे ढोबळपणे 31 मार्च पर्यंतच्या रकान्यांमध्ये अंदाजे रकमा टाकून ठेवाव्यात व तो महिना जवळ येत जाईल तसे बजेट काटेकोरपणाकडे सुधारत न्यावे. उदाहरणात 3 महिने दाखवले असतील तरी कॉम्प्युटरवर 12 महिने घेणे सहज जमते.

ree
2. दुसरी चूक म्हणजे खर्चांची अगोदरपासून तरतूद न करणे

एखाद्या महिन्यात जर आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या असे चित्र असण्याची शक्यता दिसू लागली असेल, तर बजेटमुळे याची चाहूल आधीच लागते. हातात पैसे कमी असतात पण खर्च तर करायचे असतात. अश्या वेळी त्या पैश्यांची जुळवाजुळव आपण कशी करणार आहोत हे आधीच ठरवणे गरजेचे, नाहीतर ऐनवेळी पैसा उभा करताना अव्वाच्या सव्वा दराने कर्ज काढायची वेळ येते. उदा. जुलैमध्ये कॅश फ्लो नीट नसणार आहे असे दिसू लागले तर मे-जून पासूनच काही खर्चांना कात्री लावता येईल, किंवा थोडा कमी प्रॉफिट घेऊन काही माल विकून पैसा उभा करण्याचा निर्णय घेता येईल किंवा काही डिस्काउंट स्कीम देऊन उधारी लवकर वसूल करता येईल. त्यामुळे जास्तीचे कर्ज काढायची वेळ येणार नाही.

3. तिसरी चूक म्हणजे वेळच्या वेळी अकाउंट्स न लिहिणे

कंटाळ्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे रोजचे रोज हिशोब न लिहिल्यास काय होते, की इतक्या विचारपूर्वक केलेले बजेट कागदावरच रहाते. आपल्या अकाउंटंटकडून हिशोब शक्य तितके अप टु डेट ठेवून घेणे व त्याबद्दल अकाउंटंटला विचारत रहाणे हा सोपा उपाय आहे. जमा आणि खर्च यांची तरतूद कशी केली आहे व त्यानुसार सगळे चालू आहे ना हे तपासत राहायचे आणि तफावत येऊ द्यायची नाही. नाहीतर पुढच्या महिन्याचे बजेट कोलमडेल. बजेट आणि हिशोब दोन्ही लिहिणे आणि Before & After असे विश्‍लेषण करणे याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली की कमी वेळात या गोष्टी होतात व आपले पैश्याचे व्यवस्थापन सुधारते.


4. चौथी चूक म्हणजे हातातील रकमेलाच नफा समजणे

बजेटमधून आपल्याला नफा/तोटा दिसत नाही, ते पैश्यांची नीट जुळवाजुळव करण्याचे साधन आहे. उदा. अबक ट्रेडिंग कंपनीत एका महिन्यात कमी विक्री झाली. पण मागील अनेक महिन्यांची उधारी या महिन्यात वसूल होत असेल तर कॅश/बँक मध्ये वाढ होणार आहे. म्हणजे बजेटमध्ये दिसेल की भरपूर पैसे शिल्लक आहेत, पण खरे तर धंद्याला पुरेसा नफा नसेल. शिवाय या महिन्यात विक्री कमी झाल्यामुळे पुढील महिन्यात वसुली कमी असणार आहे. त्यानुसार पुढील महिन्याचे नियोजन करावे. कधी कधी असे आढळून आले आहे, की हातात खेळणार्‍या पैश्यालाच नफा मानून ते पैसे खर्च केले जातात आणि नंतर पैश्याचा तुटवडा येतो.


5. पाचवी चूक म्हणजे एका कर्जाच्या परतफेडीसाठी दुसर्‍या कर्जातून सोय करणे

कधी कधी असे होते की धंदा नीट चालू आहे, पण वसुली आणि सप्लायरच्या बिलचे पेमेंट किंवा मोठे-मोठे खर्च यांच्या तारखा जुळत नाहीत. त्यामुळे नफा आहे पण हातात खेळते भांडवल नाही. आमच्याकडून कर्ज घ्या, कर्ज घ्या म्हणून नेहेमी फोन येतच असतात. मग अश्या अवघड प्रसंगात आपण ते कर्ज घेतो व त्यातून तात्पुरते खर्च भागवतो. नंतर वसुलीही होते व आपण ते कर्ज लगेच फेडतो व काही दिवसांमध्येच त्यातून मोकळे होतो. पण पुढच्या महिन्यात परत तशीच परिस्थिती येते. मग हा पॅटर्न दरमहा सुरू होतो. पण एखाद्या महिन्यात हे गणित परत बिघडते. यावेळी डोईजड रकमेचे कर्ज काढून खर्चही करावे लागतात व आधीच्या कर्जाची परतफेड पण करावी लगते. असा सापळा सुरू होतो व व्यवहारात होणार्‍या नफ्यापेक्षा कर्जावरचे व्याज वाढून बसते. असे वारंवार होऊ लागले तर धंद्याच्या पैश्याला गळती लागते. त्यामुळे पहिले कर्ज फेडायला दुसरे कर्ज ही चांगली कल्पना नाही. म्हणून एक रक्कम गुंतवून ठेवावी व अडचणीत तिच्यातून काही पैसे काढावेत. कॅश फ्लो सुधारला की काढलेले पैसे प्राधान्याने परत गुंतवावेत. अशी गळती होत आहे का, वारंवार बाहेरून पैसा उभा करावा लागत आहे का, कश्यामुळे, व्याजात किती पैसे जातात असा अभ्यास करता येतो. त्यानुसार आपले उत्पन्न आणि खर्च यांचे चक्र बसवून घेता येते व गळती थांबवता येते.


सारांश

एका पेक्षा अधिक मार्गांनी उत्पन्न होत राहायला हवे. उदा. विक्री, दुरुस्ती, सल्ला, ट्रेनिंग, भाडे, व्याज वगैरे वगैरे. हे उत्पन्न कसे वाढेल हे बघावे. प्रत्येक खर्चाची आगाऊ तरतूद करण्याची सवय लावून घेणे गरजेचे. उत्पन्न आणि खर्च यांचे चक्र नीट बसले असल्यास थोडा कमी नफा असलेला धंदापण तग धरून रहातो. पण ते चक्र चुकल्यास नफा असूनही सारखे बाहेरून कर्ज घ्यावे लागते. नफा आणि कॅश या दोन्हीकडे लक्ष दिले तर लवकर भरभराट होते. व्यावसायिक बजेट करताना एका प्रकारच्या खर्चांचे बजेट एकत्र लिहावे (तुमच्या प्रॉफिट स्टेटमेंटमध्ये ते त्याच क्रमाने असेल असे नाही) आणि आपल्या धंद्याच्या आकाराला तो खर्च योग्य की अवाजवी ठरत आहे हे पाहावे. अवाजवी खर्च थोडे थोडे कमी करत न्यावेत. हिशोब वेळच्या वेळी पूर्ण करून बजेटनुसार सगळे नियंत्रणात आहे की नाही यावर नजर असावी.

कॅश फ्लोबाबत घडणार्‍या चुका पुढील भागात बघू. (क्रमश:)




 
 
bottom of page