व्यवसायासाठी भांडवल - श्री. उल्हास जोशी [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 26, 2023
- 3 min read
Updated: Jul 29, 2023
व्यवसायासाठी भांडवल

श्री.उल्हास जोशी,पुणे
९२२६८ ४६६३१
joshiulhas5@gmail.com
कोणताही उद्योग किंवा व्यवसाय करायचा म्हणजे त्याला भांडवल हे लागतेच असे समजले जाते आणि यात खोटे असे काही नाही. भांडवलाशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही हे उघड सत्य आहे, पण अनेकांची गाडी भांडवलपाशी अडकत असते. अनेकांच्या मनात बिझनेसमध्ये येण्याची इच्छा असते. अनेकांकडे चांगले प्रॉडक्ट, चांगल्या आयडियाज किंवा बिझनेस प्लॅन्स पण असतात, पण भांडवल मिळत नाही, कोणी भांडवल द्यायला तयार नाही, बँका कर्ज देत नाहीत म्हणून गाडी अडत असते. कारण भांडवल म्हणजे फक्त पैशांचे भांडवल असाच विचार करण्यात येतो.
कारण ‘भांडवल’ या शब्दाभोवतीच मोठी गफलत करण्यात येते. बिझनेस मग तो कोणत्याही प्रकारचा असो, त्याला चार प्रकारचे भांडवल लागते. पहिला प्रकार म्हणजे इच्छा, आवड, पॅशन आणि दीर्घकाळ बिझनेसमध्ये तगून रहाण्याची प्रवृत्ती. दुसरा प्रकार म्हणजे वेळ, तिसरा प्रकार म्हणजे मनुष्यबळ आणि चौथा प्रकार म्हणजे पैसा. यापैकी पैसा सोडल्यास यातील पहिल्या प्रकारचे रकाने जे इच्छा, वेळ आणि मनुष्यबळ हे भांडवल जवळ जवळ प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. याची काही किंमत करता येते का? तर हो येते. त्याची किंमत कशी करायची ते आता आपण बघूया.
कामाचे वार्षिक तास :
भारतामध्ये पूर्ण वेळ नोकरी करणारा कोणताही माणूस रोज साधारणपणे 8 तास काम करत असतो. आठवड्याचे 6 दिवस व महिन्याचे 4 आठवडे काम करत असतो. तसेच त्याला थोडाफार ओव्हरटाईम पण करावा लागतो. म्हणजे तो सर्वसाधारणपणे महिन्याला 200 तास काम करत असतो. वर्षातले 52 रविवार, सरकारी सुट्या व त्याला मिळणार्या हक्काच्या रजा यांचा विचार करता तो सर्वसाधारणपणे वर्षाला 9 महिने काम करतो (पण पगार मात्र 12 महिन्यांचा घेतो.) म्हणजे तो वर्षाला सर्वसाधारणपणे 1800 तास काम करत असतो.
तासाची कमाई :
एखाद्याचा पगार महिना 20000 रुपये किंवा वर्षाला 2,40,000 असेल तर तो तासाला 133 रुपये कमवत असतो. हाच वेळ त्याने स्वतःच्या धंद्यासाठी वापरला तर त्याने तासाला कमीत कमी 266 रुपये मिळवायला हवेत. या हिशोबाने त्याच्या वेळेची किंमत 4,80,000 रुपये होते. त्याने स्वतःचेच मनुष्यबळ वापरायचे ठरवले तर त्याला वर्षाचा 2,40,000 रुपये पगार मिळेल. त्यामुळे त्याच्याकडे वेळ व मनुष्यबळाचे 7,20,000 रुपयांचे भांडवल उपलब्ध आहे. ज्याचा पगार महिना 30,000 रुपये असेल, त्याच्याकडे 10 लाख 8 हजार, 40,000 रुपये पगारवाल्याकडे 14 लाख 40 हजार, 50,000 रुपये पगार असलेल्याकडे 18 लाख रुपयांचे भांडवल उपलब्ध आहे.
वेळ व मनुष्यबळाचा सुयोग्य वापर :
या भांडवलाचा व्यवस्थित उपयोग केला तरच पैशांचे भांडवल मिळते. ज्यांना या भांडवलाचा उपयोग कसा करावा हे समजत नसतो त्यांना पैशांचे भांडवल मिळविण्यामध्ये अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा कसा योग्य उपयोग करायचा हे मराठी माणसाने शिकले पाहिजे. मी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक कंपन्यांचा अभ्यास केला. 1000 ते 2000 डॉलर्स अशा अल्पशा भांडवलावर घराच्या गॅरेजेसमध्ये सुरू झालेल्या व ‘अती लघु उद्योग’ या श्रेणीत येणार्या एच. पी., गुगल, अॅपल, ओरॅकल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक या कंपन्या मोठ्या कशा झाल्या? तर मला आढळून आले की या कंपन्यांच्या संस्थापकांनी त्यांच्याकडे असलेल्या वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा योग्य उपयोग केला. तसेच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आल्यावर कॉलेज शिक्षण घेण्यामधे वेळ दवडला नाही. ते भले अमेरिकेतले 12वी पास असतील, पण आज जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे.
आवड, इच्छा, पॅशन महत्त्वाची :
बिझनेस ही एक तीन मजली इमारत आहे; जिचा पाया हा बिझनेसची आवड, इच्छा हा आहे. पहिला मजला वेळ आणि दुसरा मजला मनुष्यबळ आहे. पैशांचे भांडवल हा तिसरा मजला आहे. अनेकजण पाया न घालता किंवा खालील दोन मजले न बांधताच परस्पर तिसरा मजला बांधायला जातात. अशी इमारत होत नाही आणि झालीच तर फार काळ टिकत नाही.
नोकरी :
नोकरी हाच उद्योग व्यवसायाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो असे माझ्या पहाण्यात आले आहे. ज्यांनी नोकरीचे दार स्वतःसाठी कायमचे बंद करून टाकले त्यांनाच बिझनेसचे सतत उघडे असलेले दार दिसले असे मला आढळून आले आहे. माणूस एकदा नोकरीच्या खोड्यात अडकला की त्यातून बाहेर पडणे मुश्कील असते. त्यामुळे ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांनी नोकरी करण्यामध्ये आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया घालवू नयेत. तसेच बिझनेसचे दार हे सर्वांसाठी सतत उघडेच असते हे पण विसरु नये.
भांडवल नाही :
त्यामुळे माझ्याकडे भांडवल नाही म्हणून मला व्यवसाय सुरु करता येत नाही ही मराठी माणसाची सबब न पटण्यासारखी आहे. आज असे अनेक बिझनेस उपलब्ध आहेत की ज्यासाठी पैशांच्या भांडवलाची फारशी गरज पडत नाही. वेळ आणि मनुष्यबळ याच भांडवलाची खरी गरज पडते व हे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते.
आता भारतामध्ये बिझनेस ऑपॉर्चुनिटिजचे पेव फुटले आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे. याचा फायदा करून घ्यायचा की नाही, तसेच यातून काही धडा घ्यायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.