top of page

शिदोरी [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 4, 2023
  • 3 min read

Updated: Apr 6, 2023


ree
सुविचार :
  1. आयुष्य जगायला पैसे जोडावा लागतो पण आयुष्य सुंदर करायला चार माणसं जोडावी लागतात. आयुष्य नुसतंच जगू नका तर ते सुंदर करा.

  2. Money is small coin. Health is a big coin. Love is a lucky coin. Friendship is a sweet coin and Relationship is a Gold coin. Keep it Safe

ree
बुृद्धीला ताण द्या :
  1. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

  2. ऑलिंपिक मध्ये पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक मिळविणारा भारतीय खेळाडू ?

  3. मुंबई शेअर बाजाराची (बीएससी) स्थापना कोणत्या साली झाली ?

(आपले अचूक उत्तर व्यापारी मित्राकडे लेखी स्वरुपात पाठवा.)
थोडी माहिती मिळवा :
  1. NATO (नाटो) North Atlantic Treaty Organisation.

  2. RAW (रॉ) Research and Analysis Wing.

  3. SIDBI (सिडबी) Small Industries Development Bank of India.


महाराष्ट्र दर्शन -

माझा जिल्हा – सातारा

ree

महाराष्ट्राचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ अशी प्रसिद्धी लाभलेले कास पठार हे सातारा जिल्ह्याचे वैभव. या पठारावर पावसाळ्यात फुलणारी रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हजारो पर्यटकांची झुंबड उडत असते. महाबळेश्वर, पाचगणीचे निसर्गसौंदर्य पहायला देशभरातील पर्यटकांची गर्दी आता नित्याची झाली आहे. सातारा म्हणजे सात डोंगरांच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. सातारा हे जिल्ह्याचे शहर असले तरी या जिल्ह्याची शान वाढविली आहे ती कराडने. कराड हे औद्योगिक शहर तसेच कृष्णा आणि कोयनेच्या प्रीतिसंगमावरचं शहर. व्यापारी व शैक्षणिक केंद्र म्हणून देखील या शहराची ख्याती आहे. याच कराडने महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि श्री. पृथ्वीराज चव्हाण हे दोन मुख्यमंत्री दिले. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा आणि फलटण हे तालुके कायमचे दुष्काळी व अविकसित आहेत. सातारा जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचा मोठा वारसा लाभला आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव ‘खटगुण’ आणि सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव ‘नायगाव’ या जिल्ह्यातले. गोपाळ गणेश आगरकर या थोर विचारवंताचे गाव ‘टेंभू’ सातारा जिल्ह्यातलेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मध्ये झाले. याच शाळेत माजी सरन्यायाधीश गजेंद्रगडकर आणि साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे देखील शिक्षण झाले. सातार्‍यातील धनजी शहा कूपर हे मुंबई प्रांताचे काही काळ मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्य आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकार्‍यांनी याच भागात ‘प्रति सरकार’ ची स्थापना केली होती. ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावचे होते. मोठमोठ्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या जिल्ह्यात असली तरी या जिल्ह्याचा चौफेर विकास झालेला दिसत नाही. फलटण व कराड यांचा तुलनेने चांगला विकास झाला मात्र सातारा शहर आणि अन्य भाग कायमच दुर्लक्षित राहिला. येथे ‘कूपर’ कारखाना सोडला तर अन्य कोणताही मोठा कारखाना नाही. ओगलेवाडीचा काच कारखाना बंद होऊन अनेक वर्षे लोटली. गेल्या काही वर्षात पुणे शहराच्या जवळ असणार्‍या सातार्‍यामधील शिरवळचा विकास झपाट्याने झालेला दिसतो. येथे लहान-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहेत.

सातार्‍यामधील दुष्काळी भागातील हजारो श्रमिक मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करताना दिसतात. खटाव-माण-दहिवडी या भागातले मेंढपाळ वर्षभर मेंढ्यांच्या कळपांसह महाराष्ट्रात भटकत असतात. शिखर शिंगणापूर, म्हसवड, पाली, मांढरदेवी, पुसेगाव, गोंदवले, सज्जनगड अशा विविध धार्मिक क्षेत्रांचा जिल्हा म्हणजे सातारा. ही जिल्ह्याची वेगळी ओळख. महाबळेश्वर, पाचगणीची थंड हवा हे जसे सातार्‍याचे वैशिष्ट्य तसेच भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून आता सार्‍या महाराष्ट्रात परिचित झाले आहे.

या गावाला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आजचा सातारा जिल्हा हा मूळच्या सातारा-सांगली जिल्ह्याच्या उत्तरेकडचा भाग. जिल्हा पुनर्रचनेनंतर आत्ताचा सातारा जिल्हा अस्तित्वात आला. ‘मिलिटरी अपशिंगे’ हे सातार्‍यातील अतिशय प्रख्यात गाव. या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती लष्करात भरती झाली आहे. देशप्रेमाचा हा अलौकिक नमुना येथे बघायला मिळतो. या गावाचा लौकिक देशभर आहे.

कृष्णाकाठी वसलेले वाई म्हणजे महाराष्ट्राची जणू काशी. या गावाला खूप मोठा इतिहास आहे. अनेक देवळे, घाट, वाडे या इतिहासाच्या खुणा येथे अजून दिसतात. 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विश्वकोष निर्मितीचे काम येथे सुरु झाले. आजदेखील हे काम चालू आहे. फलटण हे देखील असेच ऐतिहासिक गाव. मात्र या गावाचा व्यापारी संबंध सातार्‍यापेक्षा पुणे व बारामतीशी अधिक आहे. त्यामुळे या गावावर पुण्याची छाप पडलेली दिसते. सातारी माणूस हा अगत्यशील, सहनशील, रांगडा आणि आपले मराठमोळेपण जपणारा आहे. सातार्‍यातील नागरिक / लोक आपल्याला देशाच्या कानाकोपर्‍यात कोठेही स्थलांतरित झालेले दिसतील मात्र निवृत्तीनंतर त्यांना आपले मूळगाव नक्की आठवते. त्यामुळे ते रहायला गावी येतात; म्हणूनच पेन्शनरांचे गाव म्हणून देखील सातारा प्रसिद्ध आहे.

सातारचे कंदी पेढे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. पुण्याहून कोल्हापूरला जाताना दुतर्फा कंदी पेढ्यांची मोठमोठी दुकाने नजरेस पडतात. तेव्हा ओळखायचे की सातारा जवळ आला. येथील मोदी व लाटकर घराण्यांचा कंदी पेढे बनविण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात आणखी काही मंडळींनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

सातारा जिल्ह्यातील जनतेने येथील लोकसंस्कृती, लोकपरंपरा आजच्या आधुनिक युगात देखील जपून ठेवल्या आहेत. येथील गावोगावच्या वार्षिक जत्रांचा हंगाम जानेवारी ते एप्रिल या काळात सुरु असतो. ग्रामीण भागातील जत्रेमध्ये तमाशाचे फड, कुस्त्यांची मैदान, पालख्या बघायला झुंबड उडालेली असते. जत्रा-यात्रांप्रमाणेच सभासंमेलनांचे देखील येथील लोकांना वेड आहे. सातारा, फलटण, कराड, कोरेगाव, वाई, पाटण या छोट्या शहरांमध्ये वर्षभर विविध व्याख्यानमाला सुरु असतात. जुन्या सातारा शहरावर पुणेरी संस्कृतीचा प्रभाव दिसतो. मात्र सातारकरांनी आपले वेगळेपण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा शहर तसे शांत, सकाळी दहा नंतर येथील व्यवहार सुरु होतात ते आठपर्यंत चालू असतात. निवांतपणा, रांगडेपणा आणि मराठमोळेपणा जपणं ही या जिल्ह्याची खासियत.

(पुढील जिल्हा रत्नागिरी)

 
 
bottom of page