शिदोरी
- Vyapari Mitra
- Apr 27, 2023
- 3 min read

सुविचार :
आयुष्यात चुका न करणारा माणूस कधीच शिकत नसतो.
Success is never owned. It's rented and rent is due every day.

बुृद्धीला ताण द्या :
स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख कोण ?
पहिला सहकारी साखर कारखाना कोणी आणि कोठे सुरु केला ?
आयएमएफ (IMF) चे मुख्यालय कोठे आहे ?
भारतातील धवलक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
(आपले अचूक उत्तर व्यापारी मित्राकडे लेखी स्वरुपात पाठवा.)
थोडी माहिती मिळवा :
1. SAARC : Sount Asian Association for Regional Co-operation.
2. UNICEF : United Nations International children's Emergency Fund.
3. GDP : Gross Domestic Product.
4. NPA : Non Performing Assets.
महाराष्ट्र दर्शन -
माझा जिल्हा – रत्नागिरी

सह्याद्रीच्या उंच, कणखर, राकट रांगा एका बाजूला; तर अथांग सागर दुसर्या बाजूला आणि या दोघांच्या कुशीत वसलेला, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी, म्हणजेच कोकण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय पां. वा. काणे, रँग्लर र. पु परांजपे, साने गुरुजी अशा अनेक नररत्नांची ही जन्मभूमी. या नामवंतांनी रत्नागिरीचे नाव केवळ देशातच नाहीतर जगाच्या नकाशावर कोरले आहे. स्वातंत्र्यानंतर बँरिस्टर नाथ पै, प्रा मधू दंडवते, बाळासाहेब सावंत, भाई सावंत यांनी राजकारण आणि समाजकारणात आपला ठसा उमटवला. श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर हे नामवंत साहित्यिक देखील याच जिल्ह्यातील. नमन आणि खेळे ही येथील लोककला कोकणाने जपली आहे. या कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न कोकणी माणसाला अनेकांनी दाखवली मात्र ही स्वप्न कधीच हवेत विरली. नारळ-सुपारीच्या बागा आणि हापूस आंब्याच्या आमराया. सोबतीला तांदूळ, काजू आणि मच्छीमारी हा येथील कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय. कोकणात एखादा उद्योग येणार अशी कुणकुण जरी येथील लोकांना लागली तरी त्याला विरोध करायला येथील मंडळी सरसावताना दिसतात. याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील. फिनोलेक्स आणि लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहत सोडली तर रत्नागिरीत फारसे मोठे उद्योग नाहीत. आंबा, काजू, नारळ, पोफळी, सुपारी अशा कोकणी मेवा विक्रीचे अनेक लहान-मोठे उद्योग येथील गावात दिसतील. मासे निर्यातीचे कधी मोठे प्रकल्प रत्नागिरीच्या किनार्यावर आपल्याला दिसतील. प्रामुख्याने शेती व शेतीशी निगडीत उद्योग/व्यवसाय हेच या जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्नाचे साधन.
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले हिरवं कोकण नजरेस पडले की मन प्रसन्न होते. येथील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, फणस, काजू हा कोकणी मेवा सगळ्यांना भुरळ पाडतो. कोकण ही परशुरामाची भूमी. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे कोकण. 1981 पर्यंत हे दोन जिल्हे एकत्र होते. पण प्रशासकीय दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून याचे विभाजन करण्यात आले. सध्या अस्तित्वात असणार्या रत्नागिरी जिल्ह्याची लांबी आहे 180 किलोमीटर. रत्नागिरीसह जिल्ह्यात नऊ तालुके आहेत. यापैकी मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी हे सागरी किनार्यावरील तालुके तर खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरीचा काही भाग हे सह्याद्रीच्या पायथ्याचे तालुके. मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेच्या आगमनामुळे या जिल्ह्याची खर्या अर्थाने प्रगती झाली असे म्हणायला हरकत नाही. येथील जवळपास घरटी एक माणूस मुबईत कामाच्या शोधार्थ जातो आणि तेथेच काही वर्षे नोकरी/धंद्यात रमतो. त्याला चाकरमाने असे म्हटले जाते. या चाकरमान्यांनी पाठविलेल्या मनीऑर्डरवर गावातील आर्थिक व्यवहार चालतो. देशभरात लोकसंख्या वाढत असताना रत्नागिरी मधील लोकसंख्या मात्र कमी होत आहे हे या जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य. गेल्या 10 वर्षात येथील लोकसंख्या 85 हजारांनी कमी झाली असे सरकारी आकडेवारी सांगते. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाख 21 हजार इतकी आहे.
डोंगराळ भाग असल्याने रोजगाराच्या संधीचा अभाव येथे दिसतो. अजून ही परंपरागत भातशेतीवरच येथील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. मराठा, ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित हे जिल्ह्यातील मुख्य सामाजिक घटक. मराठा व ब्राह्मण समाज सुस्थितीत असला तरी फार श्रीमंत नाही. एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्के असणारा कुणबी समाज हा मुख्यत: शेतकरी व कष्टकरी. या समाजाच्या अनेक पिढ्या मुंबईतील कापड गिरण्यांवर जगल्या. मुंबईतील गिरण्या बंद पडल्यावर या समाजाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. अर्धकुशल व कुशल कामगार आजही मुंबईतच छोट्या-मोठ्या नोकर्या करुन आपले पोट भरताना दिसतात.
कोकणातला पावसाळा हे कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेने इथे प्रचंड पाऊस पडतो. वर्षाला सरासरी चार-साडेचार हजार मिलिमीटर पाऊस येथे पडतो. संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. प्रचंड पाऊस पडत असला तरी तो येथील जमिनीत मुरत नाही. तो वेगाने समुद्राला जाऊन मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य येथे दिसते. होळी, गणपती हे येथील महत्त्वाचे उत्सव. यासाठी देशभरातील कोकणवासी आपल्या गावी येतात आणि पारंपारिक पद्धतीने उत्साहात सण साजरे करतात. सहकारी क्षेत्राचे व कोकणाचे फारसे सख्य दिसत नाही. येथे साखर कारखाना, दूध संघ, अन्य सहकारी उद्योग फारसे नाहीत. रत्नागिरीला भाजीपाला, दूध, अंडी अन्य दैनंदिन वापराच्या वस्तूंचा पुरवठा सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन लगतच्या जिल्ह्यातूनच होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यातच आंब्याचे उत्पादन होते. आंब्याखालील क्षेत्र साधारणपणे 50 हजार हेक्टर आहे. येथील बहुतांश आंबा मुंबईच्या बाजारपेठेत जातो. या आंबा व्यवसायावर येथील स्थानिक शेतकर्यांपेक्षा दलाल/व्यापार्यांचे नियंत्रण आहे. औद्योगिकीकरणा पासून रत्नागिरी जिल्हा दूरच आहे. लोटे परशुराम, खेर्डी, खडे गणपोली आणि मिरजोळे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वसाहती आहेत. एन्रॉन, नाणार, जैतापूर या ऊर्जा प्रकल्पाची चर्चा खूप झाली मात्र यातून येथील नागरिकांना फारसा फायदा झालेला नाही. उद्योग-व्यवसाय येथे बहरले नसले तरी पर्यटन उद्योगाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांचा ओढा वाढलेला दिसतो. यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झालेला दिसतो. खेड, चिपळूण व संगमेश्वर या जिल्ह्यातील परंपरागत बाजारपेठेत आजही चांगला व्यवसाय करतात. संपन्न धार्मिक, सामाजिक परंपरा या जिल्ह्याला असली तरी कोणत्याच पक्षाचे खंबीर राजकीय नेतृत्व येथे दिसत नाही, त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो हे देखील जिल्ह्याच्या आर्थिक मागासलेपणाचे कारण असावे.