शिदोरी [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 30, 2023
- 3 min read

सुविचार :
अपेक्षा आणि समाधान यात एवढंच अंतर की, अपेक्षा माणसाला दु:खात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. कायम समाधानी रहा.
Nothing is impossible, the word itself says, 'I'm possible !
Never stop learning, because life never stops teaching.

बुृद्धीला ताण द्या :
सर्वात तरुण भारतरत्न ज्याने वयाची पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण केली.
‘जी-सात’ (G-7) यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो ?
सन 2024 ला ऑलिपिंक कोणत्या देशात होणार आहे.?
कोणत्या देशाचे पंतप्रधान भारतीय वंशाचे आहेत ?
(आपले अचूक उत्तर व्यापारी मित्राकडे लेखी स्वरुपात पाठवा.)
थोडी माहिती मिळवा :
WIPO (विपो) : World Intellectual Property Organisaction.
IPRS (आयपीआरएस) : Intellectual Property Rights Search.
AIR (एआयआर) : All India Radio.
BCCI (बीसीसीआय) : The Board of Control for Cricket in India.
महाराष्ट्र दर्शन -
माझा जिल्हा – सिंधुदुर्ग

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून सारा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते श्री. बाळशास्त्री जांभेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावचे सुपुत्र. बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी वृत्तपत्र दिन साजरा केला जातो. याचबरोबर मराठी मासिकांमध्ये नवयुग निर्माण करणारे मासिक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या ‘मनोरंजन’चे संस्थापक श्री. काशिनाथ रघुनाथ मित्र हे देखील सिंधुदुर्गच्या आजगावचे. सिंधुदुर्गला ‘साप्ताहिकांची’ दीर्घ परंपरा लाभली आहे, ही सिंधुदुर्गची ओळख फारशी कोणाला नसावी. सातशेहून अधिक लहान-मोठ्या नयनरम्य खेड्यांनी समृद्ध असणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. विजयदुर्ग खाडीपासून तेरेखोलच्या खाडीपर्यंत सुमारे सव्वाशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्याला ज्या जलदुर्गाचे नाव दिले गेले त्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम 29 मार्च 1667 रोजी पूर्ण झाले. महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणाचे भौगोलिक महत्त्व 350 वर्षापूर्वी लक्षात आलं होते. हीच या जिल्ह्याची महत्त्वाची ओळख.
सिंधुदुर्ग हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. 1981 मध्ये सिंधुदुर्ग स्वतंत्र्य जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग असे आठ तालुके मिळून हा जिल्हा निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 सिंधुदुर्ग मधून जातो त्यामुळे या जिल्ह्यातील कणकवली-कुडाळ-सावंतवाडी या तालुक्यारच्या विकासाला हातभार लागला आहे. गेल्या काही वर्षात पर्यटनाला चालना मिळाल्याने देवगड, मालवण, वेंगुर्ला हे सागरी किनारे असणारे तालुके आता आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात का होईना समृद्ध व्हायला लागले आहेत. शेती, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मासे याचबरोबर पर्यटन हे येथील सगळ्यात महत्त्वाचे रोजगार निर्मिती केंद्र झाले आहे. म्हणूनच भारतातील पहिला पर्यटन या व्यवसायांमुळे जिल्हा ही ओळख या जिल्ह्याच्या विकासाला / समृद्धीला हातभार लावताना दिसते. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा. मात्र नोकर्या व रोजगाराच्या संधी या जिल्ह्यात फारश्या नव्हत्या. त्यामुळे येथील सुशिक्षित तरुण मंडळी पुणे, मुंबई आणि शेजारील गोव्यात स्थलांतरीत होताना दिसत. एकेकाळी फक्त ‘मनिऑर्डर’वर जगणारा हा जिल्हा वाढत्या पर्यटनामुळे आलेल्या समृद्धीने थोडा बदलला आहे.
पूर्वेला सह्याद्रीच्या उंचच उंच रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग समुद्र आणि या भूमीवर निसर्गाने मुक्तहस्ते केलेली उधळण यामुळे हे निसर्गसंपन्न कोकण/सिंधुदुर्ग अतिशय नयनरम्य आहे. येथील डोंगररांगा व समुद्रकिनारा यामधील अंतर फक्त 50/55 किमी. इतकेच आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड या जलदुर्गांबरोबरच रांगणागड, मनोहर - मनसंतोष गड, यशवंत गड, भरतगड, सिंधगड अशा अनेक गडांवर पर्यटकांची आणि ट्रेकर्सची गर्दी असते. या गडांवर मनसोक्त भटकणे हे ट्रेकर्सचे आवडीचे काम. अशा साहसी पर्यटकांना हे गड किल्ले खुणावत असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथील लाकडी खेळांचे कारखाने अजून तग धरुन आहेत. याचबरोबर आयुर्वेदिक महाविद्यालय येथे आहे. जिल्ह्यात फारशी मान्यवर व दर्जेदार रुग्णालये नसल्याने येथील नागरिकांना गोवा, बेळगांव, कोल्हापूर, मुंबईवर अवलंबून रहावे लागते. जिल्ह्यात एकूण सरकारी 11 आरोग्य रुग्णलये, 21 दवाखाने आणि 38 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याचबरोबर 270 शैक्षणिक संस्था, 40 महाविद्यालये तर दोन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. येथे 4 बंदरे असली तरी ती फारशी विकसित नाहीत. रेडी बंदरावर कोट्यावधीची गुंतवणूक करुन ते विकसित करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला, मात्र अजून तरी त्याला यश आलेले नाही. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5207 चौरस किलोमिटर असून येथील लोकसंख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यात शेतीखाली एकूण 55 हजार 966 हेक्टर क्षेत्र असून आंबा, काजूच्या बागा हेच मुख्य पीक. येथील फळावंर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग गावातून बघायला मिळतात. कुडाळ व माजगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र येथील उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही म्हणून येथील सुशिक्षित तरुण पुणे, मुबई, गोवा, कोल्हापूरकडे रोजगाराच्या शोधार्थ जातात. नाट्य व लोककलांनी येथील संस्कृती समृद्ध केली आहे. दशावतार, संगीत नाटक यामध्ये येथील मंडळी रंगून जातात. प्रचंड पाऊस पडून देखील दुष्काळी जिल्हा हा शिक्का या जिल्ह्यावर आहेच. निसर्गसंपन्न जिल्हा असला तरी आर्थिकदृष्ट्या अजूनही तो फारसा विकसित झालेला नाही. भविष्यात हेच प्रमुख आव्हान म्हणावे लागेल.
पर्यटन स्थळाबरोबरच सिंधुदुर्गमधील खाद्य संस्कृती देखील मोहून टाकणारी आहे. येथील उत्तम चवीचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. गेल्या काही वर्षात मालवणी मसाला महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. जुन्या शैलीतील बांधकाम असलेली देवळेदेखील सिंधुदुर्गच्या वैभवात भर घालताना दिसतात. उत्कृष्ट संसदपटू बॅ नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांनी कोकणात खर्या अर्थाने अनेक लोकोपयोगी कामे केली त्यात कोकणं रेल्वेचा प्रमुख वाटा आहे. आज देखील ही दोन नावे कोकणवासीयांच्या आठवणीत टिकून आहेत. काजू, फणस, नारळ, आंबा आणि पर्यटन या भोवतीचं जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालते. औद्योगिक विकासापासून अजूनही हा जिल्हा वंचितच आहे.