शेअर बाजारातील व्यवहार - श्री. उदय पिंगळे[ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 3 min read
Updated: Jul 29, 2023
शेअर बाजारातील व्यवहार

श्री. उदय पिंगळे, रसायनी (रायगड)
83909 44222
udaypingale@yahoo.com
हितगुज
मागील लेखात आपण कंपन्यांचे वर्गीकरण, ब्रोकर्सचे प्रकार आणि ऑर्डर्स देण्याच्या पद्धती यांची माहिती करून घेतली. आपण टाकलेली कोणतीही ऑर्डर बाजारात संगणकाद्वारे नोंदवली जाते तिला एक नंबर मिळतो. त्याचप्रमाणे त्याचा प्राधान्यक्रम ठरतो. हे सर्व अत्यंत पारदर्शक पद्धतीने चुटकीसारशी होते. जे व्यवहारात एकमेकांशी जुळतील ते पूर्ण होतात. बाजार चालू असताना किंवा बंद असताना अनेक बर्यावाईट घडामोडी घडत असतात. यात कंपनीचे आर्थिक निकष, व्यवसाय विषयक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, वित्तीय सल्लागारांची मते, अफवा या सर्वच गोष्टींमुळे काही लोकांच्या मनात सदर शेअर घ्यावेत किंवा विकावेत अशा भावना निर्माण होतात. याशिवाय बाजारात दीर्घकालीन आणि मध्यमकालीन गुंतवणूकदारांबरोबर अल्प कालावधीत अतिशय कमीतकमी पैसे भरून अधिकाधिक नफा मिळवण्याची इच्छा असलेले धाडसी आणि जुगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. याशिवाय म्युच्युअल फंड कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असतात. यातील काही व्यवहार तोटा नियंत्रित करणारे म्हणजेच हेजिंगच्या स्वरूपातील असतात. काही व्यवहार दोन शेअर-बाजारातील भावामधील फरकाचा लाभ करून घेणारे असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम बाजारातील मागणी पुरवठ्यावर होतो. सर्वसाधारण कोणत्याही बाजारास लागू पडणारे तत्त्व म्हणजे ‘मागणी अधिक पुरवठा कमी’ म्हणजे भावात वाढ तर ‘मागणी कमी आणि पुरवठा अधिक’ अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भावात घट होते. याशिवाय क्वचित कधीकधी मागणी भरपूर पण पुरवठा नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास विक्री होऊ शकते परंतु खरेदी होण्याची शक्यता कमी किंवा पुरवठा भरपूर झाल्यास खरेदी होऊ शकते पण विक्री होण्याची शक्यता कमी अशी स्थिती निर्माण होते. बाजाराच्या भाषेत यास अप्पर किंवा लोअर सर्किट लागणे असे म्हणतात. असे असले तरी तात्कालिक भावात पडलेला फरक हा अंतिमतः कंपनीच्या कामगिरीनुसार कुठेतरी स्थिरावतो.
शेअरबाजार व्यवहार कसा पार पडतो
अवाजवी प्रमाणात भाव वाढले अथवा कमी झाले तरी गुंतवणूकदार संभ्रमात पडून कदाचित चुकीचा निर्णय घेऊ शकतात. असे होऊ नये यासाठी सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकरसारखी यंत्रणा उपलब्ध आहे. यामुळे गुंतवणूकदारांना शांतपणे विचार करण्यास अवधी मिळतो. त्याचप्रमाणे कंपनी भागभांडवलाच्या अर्ध्या टक्याहून अधिक शेअर्सची खरेदी-विक्री एकाच व्यक्तीस करायची असल्यास बाजार नियामक मंडळास आधी कळवावे लागते. पारदर्शक पद्धतीने बाजारभाव ठरावा आणि त्यात फार मोठे चढउतार नसावेत यासाठी शेअर्सची किंमत बाजार चालू होण्यापूर्वी 15 मिनिटे असलेल्या बाजारपूर्व सत्रात होते. यातील 9:00 ते 9:08 या पहिल्या 8 मिनिटात सर्वांच्या योग्य ऑर्डर्स स्वीकारल्या जातात; त्या दुरुस्त करता येतात किंवा रद्द करता येतात. बाजार नियमानुसार एकमेकांशी जुळणारे व्यवहार पुढील 4 मिनिटात म्हणजेच 09:08 ते 09:12 या कालावधीत मान्य केले जातात. यातून कोणता व्यवहार काय भावाने झाला हे ठरून 09:12 ते 9:15 रोजी नियमित सत्रासाठी त्या शेअर्सचा खुला भाव जाहीर करण्यात येऊन त्यासाठी सौदे स्वीकारले जातात.
सकाळी 09:15 ते दुपारी 03:30 या वेळेत नियमित कामकाज चालते. यात सर्वजण व्यवहार करू शकतात यातील काही कालावधी वेगळ्या व्यवस्थेतून मोठे व्यवहार करण्यासाठी असतो तर ऑक्शनद्वारे ठराविक वेळात पुरे केले जातात. जे लोक डे-ट्रेडिंग करतात म्हणजे त्यादिवशीचे व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करतात त्यांचे विरुद्ध व्यवहार म्हणजे खरेदी केली असल्यास विक्री किंवा विक्री केली असल्यास खरेदी, दुपारी तीन ते साडेतीन या वेळात केली जाते. असे सौदे एकतर ट्रेडर्सकडून पूर्ण केले जातात किंवा ब्रोकर्सकडून समायोजित केले जातात. यानंतर दुपारी 03:30 ते 03:40 यावेळात पूर्ण झालेल्या सर्व व्यवहारांची शेअरबाजारकडून नोंद घेतली जाऊन शेवटच्या अर्ध्या तासात झालेल्या प्रत्येक कंपनीच्या सर्व व्यवहारांचा हिशोब करून सरासरी भाव काढला जातो. तो भाव त्या दिवसाचा बंद भाव समजण्यात येतो. एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा या काळात व्यवहारच झाला नाही तर या आधीच्या कालावधीतील शेवटचा भाव बंद भाव समजण्यात येतो किंवा त्या दिवशी व्यवहारच झाला नसेल तर त्यापूर्वी निश्चित केलेला बंद भाव हाच बंद भाव मानण्यात येतो. एखाद्या गुंतवणूकदारास सदर भाव मान्य असेल तर त्या भावाने खरेदी विक्रीचा व्यवहार दुपारी 03:40 ते 04:00 या वेळेत होऊ शकतो. असे व्यवहार पूर्ण होण्याचे प्रमाण मर्यादित असते, तरीही एखाद्या ट्रेडर्सचा व्यवहार समायोजित करायचा राहिला असेल अथवा डिलिव्हरीचा व्यवहार ट्रेडिंगमध्ये बदलायचा असेल तर तशी अधिकची संधी गुंतवणूकदारांना मिळते.
बाजारात होणारे सर्व व्यवहार हे निश्चित पूर्ण होतील यांची हमी शेअरबाजार देतो. काही कारणाने असे व्यवहार पूर्ण होत नसतील तर लिलाव पद्धतीने त्याच्याविरुद्ध व्यवहार केला जाऊन त्यांची पूर्तता केली जाते. यात चूक असलेल्या व्यक्तीस बाजार-भावाच्या जास्तीतजास्त 20% पर्यंत भुर्दंड पडू शकतो. तरीही व्यवहार पूर्ण न झाल्यास नियमानुसार त्याची आर्थिक स्वरूपात भरपाई केली जाते.
एके काळी गुप्त स्वरूपात आणि कागदी प्रमाणपत्राद्वारे होणारे हे सर्व व्यवहार आता अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि संगणकाद्वारे होत आहेत त्याचप्रमाणे त्यांची पूर्तता होण्याचा कालावधी महिन्यावरून कमी कमी होत आता एक दिवसावर आला आहे. भविष्यात हा कालावधी तात्काळ व्यवहार पूर्ण होऊ शकेल इतक्या कमी कालावधीचाही होऊ शकेल.
सेबी या स्वतंत्र नियामकाचे त्यावर लक्ष असल्याने एकप्रकारची शिस्त त्यात आली आहे.
शेअरबाजारात दिसतो तो भाव पण या भावापलीकडे जाऊन गुंतवणूकदारास त्याचे मूल्य ओळखायचे असते. ते ओळखणे हे म्हटलं तर सोपे आहे किंवा किचकटही आहे यासाठी मूलभूत विश्लेषण आणि तांत्रिक विश्लेषण याविषयी प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.