शेअरबाजारातील कंपन्यांचे वर्गीकरण आणि व्यवहार करण्याच्या पद्धती - श्री. उदय पिंगळे [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 30, 2023
- 3 min read

श्री. उदय पिंगळे, रसायनी (रायगड)
83909 44222
udaypingale@yahoo.com
कंपन्यांचे त्यातील सभासदांच्या संख्येवरून, उत्तरदायित्वावरून, त्यावरील नियंत्रणावरून तसेच विशेष प्रकारच्या कंपन्या यावरून वर्गीकरण करता येईल. शेअरबाजारात ज्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याना नोंदणीकृत सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणतात त्यांची सभासद संख्या मर्यादित नसते. त्यामुळे त्याचे अनेक छोटे मोठे भागधारक म्हणजे अंशतः मालक असतात. मात्र त्यांचे उत्तरदायित्व हे त्यांनी गुंतवलेल्या भागभांडवलाच्या मूल्याएवढे मर्यादित असते. एक भाग एक मत यानुसार ज्याच्याकडे त्याचे अधिक भांडवल असते त्यावर त्याचे नियंत्रण सर्वसाधारण असते. त्यामुळेच बहुसंख्य भांडवल हे कंपनीचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडे असते. याशिवाय वित्तीय संस्थाही मोठ्या प्रमाणात भांडवलात थेट गुंतवणूक करतात. असे असले तरी पूर्णपणे व्यावसायिक व्यवस्थापन असलेल्या काही मोजक्या कंपन्या अन्य भागधारकांच्या किंवा भांडवल 50% हून कमी असूनही कंपनीतील मोठे भागधारक अथवा प्रवर्तक वित्तीय संस्थांच्या भक्कम पाठिंब्याने कंपनीवर नियंत्रण ठेवून व्यवसाय करीत आहेत.
शेअरबाजारातील गुंतवणूक हा जोखीम अंदाजित सौदा :
भागधारकांच्या दृष्टीने शेअरबाजारातील गुंतवणूक हा जोखीम अंदाजित करून घेतलेला एक सौदा असतो. त्यांनी घेतलेले शेअर्स किंवा त्यांना हवे असलेल्या शेअर्सची खरेदी ते शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात. यात खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात झालेला व्यवहार पूर्ण होईल याची शेअरबाजाराने हमी घेतलेली असते. तरीही काही कारणाने व्यवहार पूर्ण झाला नाही तर नियमानुसार कार्यवाही करून त्या व्यवहारांची आर्थिक भरपाई केली जाते.
बाजारात व्यवहार होणार्या शेअर्सच्या बाबतीत आपण मोठ्या कंपन्या (लार्ज कॅप) मध्यम कंपन्या (मिड कॅप) लहान कंपन्या (स्मॉल कॅप) असे शब्दप्रयोग ऐकतो. बाजारात उपलब्ध असणारे शेअर्स आणि त्याचा बाजारभाव यांचा गुणाकार करून कंपनीचे बाजारमूल्य काढता येते. बाजारमूल्यानुसार कंपन्यांची यादी केल्यास सर्वात जास्त बाजारमूल्य असलेल्या 100 कंपन्यांना मोठ्या कंपन्या म्हणतात. यात नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश होतो. बाजारात होणार्या मोठ्या पडझडीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही अथवा झालाच तर तो फार काळ टिकत नाही. त्यानंतरच्या म्हणजे 101 ते 250 पर्यंतच्या मध्यम कंपन्या आणि उरलेल्या छोट्या कंपन्या समजल्या जातात. अनेक कारणांनी बाजारभाव वरखाली होत असतात. मोठ्या कंपन्यांच्या बाजारभावात फार फरक पडत नाही तर छोट्या कंपन्यांच्या भावात टक्केवारीच्या दृष्टीने खूप फरक पडतो. त्यानुसार यातून गुंतवणूकदारांना मिळणार्या परताव्यात फरक पडतो. छोट्या कंपन्यांमुळे खूप फायदा होत असला तरी नुकसान अधिक होते. हा धोका मोठ्या कंपन्यांना कमी असतो परंतु त्यातून परतावा कमी मिळतो. आज ज्यांना आपण नामवंत कंपन्या समजतो त्यांची गणना एकेकाळी छोट्या कंपनीत होत होती.
आता सर्वच खरेदीविक्री व्यवहार ऑनलाइन होतात ब्रोकर्सचे. फुल फ्लेज म्हणजे पूर्णवेळ ब्रोकर व डिस्काउंट ब्रोकर्स हे दोन प्रकार आपण पाहिले. यातील डिस्काउंट ब्रोकर्स मार्फत केले जाणारे व्यवहार गुंतवणूकदारास स्वत:च करावे लागतात. जर काही कारणाने फोनवर ऑर्डर द्यायची असेल तर त्यासाठी काही रक्कम मोजावी लागते. याउलट पूर्णवेळ ब्रोकर्सच्या ऑफिसमध्ये फोन करून आपणास ऑर्डर देता येते. त्याचप्रमाणे आपणास त्याच्या अॅप किंवा वेबसाईटवर जाऊन ऑर्डर्स टाकता येतात, दुरुस्त करता येतात अथवा रद्द करता येतात.
शेअरबाजारात व्यवहार होणार्या मालमत्तांचा भाव सतत हलता राहण्याचे काम बाजारातील मध्यस्थ करीत असतात. अनेकांना तेथे दिसणारे भाव खरेदी विक्री करण्यास आकर्षित करू शकतात. गुंतवणूकदार आपली खरेदी विक्रीची सूचना संकेतस्थळावर जाऊन अथवा अॅप वापरून ऑनलाइन पद्धतीने देऊ शकतो किंवा फोन करून दलालास सांगू शकतो. त्या खालील पद्धतीने देता येतील.
मार्केट ऑर्डर :
प्राथमिक स्वरूपाचा सूचना देण्याचा हा प्रकार आहे. पडद्यावर दिसणारा बाजारभाव मान्य असेल तर या पद्धतीने सूचना देता येईल व त्याच दराने व्यवहार पूर्ण होईल.
लिमिट ऑर्डर :
यात चालू बाजारभावाच्या मागेपुढे परंतु शेअरबाजारांनी आखून दिलेल्या किमान आणि कमाल भावाच्या मर्यादेचे पालन करून सूचना देता येईल. जर अपेक्षित भाव येऊन विक्रेते खरेदीदार यांच्याकडील संख्या जुळून आली तरच व्यवहार पूर्ण होईल.
अल्पकालीन गुंतवणूकदार, स्विंग ट्रेडर्स, दीर्घकालीन गुंतवणूकदार याच पद्धतीने आपल्या सूचना देतात. या सूचना टाकताना आपल्या खरेदी विक्रीच्या किमान 10% भाग जाहीर करण्याचा ऐच्छिक पर्याय गुंतवणूकदारांना आहे. म्हणजेच आपल्याला एका कंपनीचे 1000 शेअर्स बाजारभावाने किंवा आपणास मान्य भावाने खरेदी/ विक्री करायचे असतील तर त्याच्या 10% म्हणजेच प्रत्यक्षात ऑर्डर 1000 शेअर्सची असली तरी ती 100 शेअर्सची आहे असे जाहीर करता येते. डे ट्रेडर्सना आपले व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करायचे असल्याने त्यांच्या सूचना विशिष्ट अटीवर दिल्या जातात. त्यांना त्यांचे व्यवहार मर्यादित कालखंडात पूर्ण करावे लागतात. हा कालावधी सेकंदाच्या काही भागापासून एक व्यवहार दिवसाएवढा असतो. त्यासाठी एखादा व्यवहार झाल्यावर त्याच्या विरुद्ध व्यवहार होण्यासाठी विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यासच खरेदी विक्री सूचना दिली जाईल अशा पद्धतीने सूचना दिली जाते. विहित कालावधीत ती पूर्ण होत नसेल तर असेल त्या भावाने व्यवहार पूर्ण करून त्याचे समायोजन केले जाते.
स्टॉप लॉस ऑर्डर :
व्यवहार झाल्यावर कमीतकमी तोटा होईल किंवा मिळालेला फायदा सुरक्षित राहील या हेतुने अशी सूचना दिली जाते. त्याच्या जवळपास भाव आला की आपोआपच आधी ठरवलेल्या भावाने मार्केट ऑर्डर टाकली जाते.
स्टॉप लिमिट ऑर्डर :
वरीलप्रमाणेच, इथे फक्त मार्केट ऐवजी लिमिट ऑर्डर टाकण्यात येते.
या दोन्ही सूचना खरेदी/ विक्री भावाच्या टक्केवारीशी जोडून ट्रेईल स्टॉप लॉस किंवा स्टॉप लिमिट ऑर्डर देता येऊ शकते.
याशिवाय दिलेली व्यवहार सूचना पूर्ण करण्याच्या कालावधीशी जोडून गुड टिल डेट, गुड टिल कॅन्सल, अॅट द ओपनिंग, अॅट द क्लोज, इंट्रा डे स्केअर ऑफ ऑर्डर यासारख्या सूचना देण्याची सोय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे.
सध्या बाजाराचा कालावधी सकाळी 09:15 ते दुपारी 03:30 असा असला तरी काही व्यवहार बाजारपूर्व आणि बाजारपश्चात काळातही होतात. ते कसे होतात तसेच आपण दिलेल्या ऑर्डर्सवर शेअरबाजाराकडून काय प्रक्रिया होते आणि व्यवहारपूर्तता कशी होते याबाबतची माहिती आपण पुढील भागात करून घेऊयात.