शेअरबाजारातील गुंतवणुकीस सुरुवात : श्री. उदय पिंगळे [ मे २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 27, 2023
- 3 min read

श्री. उदय पिंगळे, पुणे. अर्थ अभ्यासक
83909 44222
udaypingale@yahoo.com
विविध खात्यावर नियंत्रण ठेवा :
आपल्या गुंतवणुकीचे निश्चित असे धोरण आखून शेअरबाजारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करता येते हे आपण पाहिले. आज प्रत्यक्ष गुंतवणूक कशी करता येईल आणि त्यासाठी कोणकोणत्या करसवलती आहेत ते पाहूयात. यासाठी आपल्याकडे काही रक्कम, गुंतवणूक करण्याची मानसिक तयारी या दोन महत्त्वाच्या गोष्टी असायला हव्यात. आता सर्वच व्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात होत असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे बरेच सोपे झाले आहे. आपल्याला व्यवहार करण्यास ट्रेडिंग खाते, शेअर साठवून ठेवणे यासाठी डीमॅट खाते हवे; त्याचप्रमाणे पैशांची देवाण घेवाण करण्यास बचत खाते हवे. काही बँका आपल्या उपकंपन्यांमार्फत असे व्यवहार करीत असल्याने एकाच ठिकाणी अशी तिन्ही खाती केवळ एक फॉर्म देऊन काढता येतात किंवा आपल्या ब्रोकर्सच्याकडे ट्रेडिंग खाते उघडता येईल. अनेक ठिकाणी असे खाते आपल्याला मोफत काढता येते. याचे पहिल्या वर्षीचे चार्जेस सहसा घेतले जात नाहीत. नंतर सेट होल्डिंग चार्जेस म्हणून काही रक्कम घेतली जाते. त्याचप्रमाणे शेअर विक्री केल्यावर खात्यातून वजा करण्यास किंवा खरेदी केल्यास जमा करण्यास काही रक्कम घेतली जाते. ही रक्कम किती आहे याची माहिती करून घ्यावी. अशी खाती ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उघडता येतात.
ब्रोकर :
सध्या दोन प्रकारात ब्रोकरेज फर्मचा व्यवसाय चालतो. यामध्ये फुल फ्लेज ब्रोकर्स आणि डिस्काउंट ब्रोकर्स असे प्रकार आहेत. फुल फ्लेज ब्रोकर्सकडून आपल्याला अनेक सुविधा आणि मदत मिळू शकते तर डिस्काउंट ब्रोकर्सचा व्यवसाय पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. तेथील ब्रोकरेज दर अत्यल्प आहेत. जे टेक्नोसॅव्ही आहेत ते डिस्काउंट ब्रोकर्सकडे आपले खाते उघडू शकतात. ब्रोकर्समध्ये असलेल्या स्पर्धेमुळे दलाली खूपच कमी झाली आहे. आपले एकूण व्यवहार आणि उलाढाल याचा विचार करून हे दर आपल्याला कमी करून घेता येतील. मध्यम उलाढालीस 0.3 ते 0.5% दलाली ठीक वाटते. मोठ्या प्रमाणात उलाढाल आणि डे ट्रेडिंगसाठी फुल फ्लेज ब्रोकर्सकडे 0.1% दलाली योग्य आहे. आता सर्व ब्रोकर्सनी त्यांची अॅप विकसित केली असून ती वापरण्यास सोपी आहेत. जवळपास सर्वच व्यवहार आपण त्यांचा उपयोग करून करू शकतो.
शेअरबाजार :
सध्या देशातील मोठे दोन शेअरबाजार म्हणजे मुंबई शेअरबाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) यांचे व्यवहार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत चालतात. तेथे कॅश आणि डिरिव्हेटिव्ह व्यवहार (फ्युचर्स आणि ऑप्शन) या काळात होतात. त्यापूर्वी सकाळी 9 ते 9:15 या वेळात प्री ओपनिंग आणि दुपारी 3:40 ते 4 या वेळात पोस्ट क्लोजिंग व्यवहार होतात. प्री ओपनिंगमध्ये पारदर्शक पद्धतीने शेअरचा खुला भाव फुटतो. कोणीही आपली ऑर्डर्स तेथे टाकू शकतो. तर पोस्ट क्लोजिंग सेशनमध्ये तुम्ही बाजार बंद भावाने खरेदी विक्री करू शकता. या कालावधीत उलाढाल आणि भाव याची मर्यादा असल्याने मर्यादित व्यवहार होऊ शकतात.
कंपनीची भांडवल उभारणी :
कोणत्याही उद्योगासाठी भांडवल लागते, उद्योगाचा विस्तार करताना अधिक भांडवलाची जरुरी लागते. हे भांडवल कर्ज किंवा समभाग विक्री या माध्यमातून मिळवता येते. कर्ज घेतल्यास त्यावरील व्याज द्यावे लागते; काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. समभाग विक्री केल्यास त्यावर डिव्हिडंड द्यावा लागतो परंतू तो दिलाच पाहिजे असे बंधन नसते. समभाग धारक हा त्या कंपनीचा अंशतः मालक बनतो. कंपनीस तोटा झाल्यास शेअरहोल्डरची जबाबदारी त्यांनी गुंतवलेल्या रकमेएवढीच असते. हे शेअर त्यास दुय्यम बाजारात म्हणजेच स्टॉक एक्सचेंजवर कधीही विकता येतात. उलट कंपनीने चांगली कामगिरी केल्यास शेअरचा बाजारभाव वाढतो. डिव्हिडंड, राईट, बोनस मिळण्याची शक्यता वाढते. गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतात. यातून चांगला नफा होऊ शकतो. अधिकाधिक गुंतवणूकदार भांडवल बाजाराकडे आकर्षित व्हावेत म्हणून फक्त याच गुंतवणुकीवरील भांडवली नफा हा एक वर्षानंतर दीर्घकालीन समजण्यात येऊन त्यावर 1 लाखपर्यंत कोणतीही कर आकारणी होत नाही. 1 लाखहुन अधिक नफा झाल्यास त्यावर आपण कोणत्याही टॅक्स ब्रेकेटमध्ये असाल अथवा नसाल तरी 10% या सवलतीच्या दराने कर आकारणी होते. एक वर्षाच्या आतील निव्वळ नफ्याची रक्कम सर्वसाधारण उत्पन्नात मिळवली जाते. आपले उत्पन्न करपात्र असेल तर त्यावर 15% या सवलतीच्या दराने कर आकारणी होते. गुंतवणूकदार जोखीम स्वीकारून अशी गुंतवणूक करतो, त्यास प्रोत्साहन म्हणून ही सवलत दिली आहे. डे ट्रेडिंग आणि डिरिव्हेटिव्ह ट्रेडिंग यातून मिळालेले उत्पन्न हे नियमित उत्पन्नात मिळवून कर निश्चित करण्यात येतो.
श्रद्धा-सबुरी ठेवा :
एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून आपण यातून काही छोटी छोटी पथ्ये पाळून नफा मिळवू शकतो. त्यासाठी या गुंतवणुकीवर विश्वास आणि थांबण्याची तयारी म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी यांची गरज आहे. यापुढील लेखात आपण बाजारातील कंपन्यांचे प्रकार, शेअर खरेदी विक्री यांच्या ऑर्डरचे प्रकार आणि त्या कशा पूर्ण होतात याविषयी अधिक माहिती घेऊयात, सर्वांना भांडवल बाजारातील गुंतवणुकीसाठी शुभेच्छा !