top of page

शेअरबाजारातील गुंतवणूक श्री.उदय पिंगळे [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Mar 29, 2023
  • 4 min read

Updated: Apr 5, 2023


ree

श्री. उदय पिंगळे, पुणे (अर्थ अभ्यासक)

83909 44222

udaypingale@yahoo.com



शेअरबाजारात गुंतवणूक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने करता येते. त्यासाठी सर्वप्रथम मनाची तयारी व्हावी लागते. आपल्या आजूबाजूला पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांचा भरणा आहे. हे लोक विविध बचत योजना, फिक्स डिपॉझिट, सोने आणि स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करावी अशा मानसिकतेचे असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव कळत नकळत आपल्यावर पडत असतो, हे लोक आपले पैसे ज्या वित्तसंस्थांकडे ठेव ठेवतात त्या वित्तसंस्थाही मोठ्या प्रमाणात भांडवल बाजारात कार्यरत आहेत. वाढत्या महागाईमध्ये आपली बदलती जीवनशैली कायम ठेवायची असल्यास अशी गुंतवणूक आपण टाळू शकणार नाही.

बाजारात प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी काही किमान गोष्टी आवश्यक असतात. बचत खाते, गुंतवणूक करण्यासाठी दलालाकडील व्यवहार खाते आणि ही गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी डिपॉझिटरी खाते यांची गरज असते. गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी वरील तिन्ही खाती किंवा काही ठिकाणी यातील दोन खाती एकमेकांशी जोडली आहेत. त्यांचा वापर करून समभाग (शेअर्स), कर्जरोखे (डिबेंचर्स), युनिट, ईटीएफ, रिटस, इनविट, संगणकीय सुवर्ण पावत्या (इजिआर), सार्वभौम सुवर्णरोखे (एसजीबी), विविध निर्देशांक (इंडेक्स), वस्तूबाजारातील वस्तू (कमोडिटी) यांचे रोखीचे (कॅश) आणि भविष्यकालीन व्यवहार (एफएनओ) करता येतात. हे सर्व व्यवहार करण्यास डिपॉझिटरी खाते आवश्यक असले तरी म्युच्युअल फंड युनिट आणि सार्वभौम सुवर्णरोखे यांचे व्यवहार याशिवाय करता येणे शक्य आहे.

भांडवल बाजारात गुंतवणूक करताना या बाजारातून नफा मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट असेलच; तो नेमका किती असावा याचा तुम्ही नक्की विचार केलेला असला पाहिजे. या संदर्भात गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती तुम्हाला माहिती असायला हव्यात. याशिवाय केवळ तुमचीच स्वतःची एक पद्धत असून ती तुम्हाला निश्चितपणे सांगता यायला हवी. त्यावर ठरवल्याप्रमाणे त्वरित निर्णय घेता यायला हवा. ही पद्धत आपल्याला लागू पडते की नाही ते तपासून आवश्यक ते बदल करायची तयारी ठेवावी. आपले वय, उपलब्ध पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, आपल्यावरील जबाबदाऱ्या, नजीकच्या काळात आवश्यक असलेले खर्च यांचा विचार करून गुंतवणूक धोरण ठरवावे लागते.

भांडवल बाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका.
  • फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक,

  • एखादी कंपनी किंवा व्यवसायाबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी सर्वाधिक गुंतवणूक,

  • संयमाचा अभाव,

  • अत्यल्प फायद्यातील मोठे व्यवहार,

  • मोह आणि भय,

  • गुंतवणूक धोरणात योग्य ते बदल न करणे

  • भावना प्रधानता.

या चुकांमुळे नुकसान झाल्याने गुंतवणुकीपासून काही लोक परावृत्त होऊन गैरसमज पसरवतात. अशा चुका टाळण्यासाठी-
  • स्वतःची निश्चित अशी गुंतवणूक योजना हवी.

  • तंत्रज्ञानाच्या मदतीने ती आपोआप कार्यान्वित कशी होईल ते पहावे.

  • नवनवे प्रयोग करण्यासाठी काही फंड राखून ठेवावा; त्यातून मिळालेले निष्कर्ष लक्षात ठेवून कार्यपद्धतीत सुधारणा कराव्या.

  • एकाच प्रकारच्या चुका वारंवार करू नयेत.

  • गुंतवणुकीसाठी कर्ज न घेणे, रोज एकच ट्रेड घेणे किंवा एफएनओचे व्यवहार एक लॉटमध्येच करणे, यासारखे नियम आपल्यावर स्वखुशीने लावून त्याचे तंतोतंत पालन करावे.

लक्ष ठेवा - विचलित होऊ नका

बाजार त्याच्या स्थायीभावाप्रमाणे वरखाली होतच राहील, तरी आज ना उद्या नक्की वाढेल यावर विश्वास ठेवावा. बाजारावर एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून फारसा परिणाम होत नसला तरी जगभर तीव्र मंदीचे सावट असताना भारतीय बाजार फारसा खाली न येता नवनवे उच्चांक करत राहिला. याचे मुख्य कारण कोविडनंतर नव्यानेच बाजारात आलेले गुंतवणूकदार प्रत्येक खालच्या टप्प्यावर अधिकाधिक खरेदी करत राहिले. एकवटलेले सामूहिक बळ वरील दिशेस कार्यरत राहिल्याने फार मोठी पडझड झाली नाही. या इतिहासाची जाणीव ठेवून बाजारात तेजी असो अथवा मंदी, त्यात दडलेल्या गुंतवणूक संधींचा नेहमी डोळसपणे शोध घेतल्यास यश मिळेल. शेअरबाजार निर्देशांक खालीवर होत असला तरी आपला गुंतवणूकसंच (फोलिओ) तीच दिशा दाखवील, असे नाही.

बाजार एका विशिष्ट टप्प्यावर रेंगाळत असताना आपण गुंतवणूक केलेले शेअर खरेदी केलेल्या पातळीवर राहिले, वाढले तर गुंतवणूकदारांना काही वाटत नाही परंतु खाली आल्यास त्यांचा जीव वरखाली होतो. बाजारात अनेकदा तीव्र चढउतार होतात तेव्हा भाव जरी खाली आले तर गुंतवणूकदार नाराजीने आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत अशी समजूत करून घेतात. मात्र भाव खूपच खाली आले तर त्यांच्या दृष्टीने 'बाजारात काही मजा नाही', असे वाटायला लागते. शेअरबाजार गुंतवणूकदारांच्या मनोरंजनासाठी नसून त्यातील गुंतवणुकीने त्यांचा ताणतणाव वाढत असेल तर थेट गुंतवणूक करण्याऐवजी इक्विटी म्युच्युअल योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भीती कमी होऊन जोखीम विभागली जाते. आपला गुंतवणूक संच विविध मालमत्ता प्रकारात विभागाला तर सरासरी जोखीम कमी होते. महागाई कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँकांमधील ठेवींवरील व्याजदर सध्या आकर्षक वाटतात. ते कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्यमकालीन उद्दिष्टांसाठी त्याचा विचार करता येईल. त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉण्ड, इटीएफ, रिटस, इनवीट, एसजीबी यासारखे विविध पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. नफा मिळवण्याच्या हेतूनेच आपण गुंतवणूक करीत असलो तरी त्यास पूरक होईल असे स्वतःचे गुंतवणूक धोरण असावे लागते. इतिहास सांगतो की बाजाराने जेव्हा जेव्हा उच्चांक गाठला तेव्हा त्याची कारणे वेगवेगळी होती. जोरदार मुसंडी मारणारे व्यवसाय वेगळे होते. निर्देशांकाचा समतोल राखण्यासाठी ठराविक अंतराने त्यात काही कंपन्या आत येतात, काही बाहेर जातात. सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स या लोकप्रिय निर्देशांकांवर नजर टाकली असता त्यात बँका आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे त्या खालोखाल संगणक क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्राबल्य दिसत आहे. त्यामुळे निर्देशांका बरहुकूम गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक वाढ दर्शवणारी गुंतवणूक करण्यास गुंतवणूक तज्ज्ञ प्राधान्य देऊन धोरण आखतात. बाजार वरखाली होत असताना यातील कोणत्या गुंतवणूक पद्धती सातत्याने टिकून राहिल्या याचा मागोवा घेतला असता अनेक पद्धती सापडतील. यातील एक किंवा अधिक पद्धतीचे मिश्रण करून यशस्वी गुंतवणूकदार धोरण निश्चित करून त्याच पद्धतीने गुंतवणूक करतात. ते काळानुसार काम करीत आहे की नाही ते तपासून जरूर असल्यास त्यात बदल करतात. यामागे एक शास्त्र असलं तरी आपले मनोबल ढळू न देता मुद्दल कमी न होता अपेक्षित नफा कमावणे ही कला आहे

नफा कमविणे ही एक कला

अनेक प्रकारच्या गुंतवणूक पद्धती असल्या तरी यातील काही पद्धती या दुसऱ्या पद्धतीहून कमी अधिक आकर्षित वाटू शकतात. आपले गुंतवणूक धोरण ठरवताना प्रत्येक पद्धतीचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन अनुकूल प्रतिकूल गोष्टी, संभाव्य शक्यता यांचा विचार करावा लागतो. त्यात सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. यातून तुमचे कौशल्य विकसित होते, अनुभवाने त्यात वाढ होते. यामुळे तुमच्या आर्थिक ध्येयास पूरक मार्ग सापडू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती, ज्ञान आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक धोरण ठरवताना मदत होते. सर्वात सामान्य गुंतवणूक धोरणांची रूपरेषा सांगण्यापूर्वी, सर्व गुंतवणुकीला लागू होणारी काही तत्त्वे समाविष्ट करणे योग्य आहे. सर्वप्रथम, तुम्ही कधीही गुंतवणुकीसाठी गमावण्याच्या भीतीने घाई करू नये. काळजीपूर्वक विचार न केलेली गुंतवणूक करणे नुकसानीत समाप्त होते. घाईत केलेली गुंतवणूक ही स्मार्ट गुंतवणूक नव्हेच. दुसरे म्हणजे, तुम्हाला जे समजले आहे त्यावर ठाम रहा. तुम्हाला गुंतवणुकीचे धोरण समजत नसेल, तर ते टाळा किंवा त्याबद्दल जाणून घ्या. माफक उद्दिष्टांसह सुरुवात करा आणि तुमच्या गुंतवणुकीत जितके वैविध्य आणाल तेवढा आपला गुंतवणूक संच (पोर्टफोलिओ) अधिक सुरक्षित होईल.

 
 
bottom of page