सावधान : ‘साखर सम्राटांची’संख्या वाढते आहे - श्री. प्रसाद घारे [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 3 min read
Updated: Jul 29, 2023
सावधान : ‘साखर सम्राटांची’संख्या वाढते आहे

श्री. प्रसाद घारे, पुणे (मुक्त पत्रकार)
93730 05448
prasad.ghare@gmail.com
मध्यंतरी एक गंमतीशीर जाहिरात वाचनात आली होती “मिठाईच्या दुकानात काऊंटरवर काम करण्यासाठी स्त्री/पुरुष कर्मचारी हवे आहेत. डायबेटिस (मधुमेह) असणार्यांना प्राधान्य.’’
या जाहिरातीमधील गंमतीचा भाग सोडला तरी ‘डायबेटिस’ या पाच अक्षरांनी भारतीयांना हळूहळू पोखरायला सुरूवात केलेली आहे हे वास्तव मान्यच करावे लागेल. Indian Council of Medical Research (ICMR) या प्रख्यात संस्थेने नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. या सर्व्हे/संशोधनातील आकडेवारी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणारी आहे. या संशोधनानुसार भारतात सध्या 10 कोटी (100 मिलियन) पेक्षा जास्त नागरिक (स्त्री/पुरुष) हे डायबेटिस आजाराचे आहेत. मागील 4 वर्षात या आजाराने त्रस्त होणार्यांची संख्या 44 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 15 टक्के नागरिक हे ‘प्री-डायबेटिक’ (Pre-Diabetic) या क्षेत्रात असून त्यांची संख्या जवळपास 13.6 कोटी इतकी आहे.
‘डायबेटिस’ हा आजार मुख्यत: जीवनशैली (Lifestyle) शी निगडित मानला जातो. भारतात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाऊजा) चे वारे 1990-91 च्या सुमारास वाहण्यास सुरूवात झाली. त्या सुमारास मॉल संस्कृती उदयास आली. नवनवीन परदेशी ब्रँड भारतातील गावोगावी उपलब्ध झाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे आयटी कंपन्यांचे पेव फुटले. मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागला. चंगळवाद बोकाळू लागला आणि हळूच भारतीयांच्या आयुष्यात नवीन जीवनशैलीचा (Lifestyle) प्रवेश झाला.
10 ते 5 चा जमाना संपला. दिवसातील 12-14 तास काम करणे क्रमप्राप्त झाले. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणारे आयटी इंजिनियर तर रात्रभर कामासाठी जागू लागले. दिवसा झोपा काढायला लागले. त्यांचा दिनक्रमच बदलून गेला. पोळी, भात, भाजी, आमटी अशा भारतीय जेवणाची जागा पिझ्झा बर्गर, चायनीज, मेक्सिकन पदार्थांनी घेतली. मैदानी खेळाकडे तरुणाईने पाठ फिरवली. मोबाईलवर नवनवीन गेममध्ये तसेच सोशल मिडियात ही पिढी आकंठ बुडून गेली. गेल्या 30-32 वर्षात सारे चित्र बदलून गेले. या बदललेल्या जीवनशैलीतूनच डायबेटिस, बीपी, थायरॉईड, ओबेसिटी या आजारांनी भारतीयांच्या शरीरात कधी प्रवेश केला हे कळलेच नाही. हे आजार पळवूृन लावण्यासाठी दररोज व्यायाम, योग, संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. हे आपण न चुकता केले तर या आजारांवर विजय मिळवू शकतो, हे अनेकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मागील काही वर्षांपासून देशात डायबेटिस म्हणजेच मधुमेहाची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे.
डायबेटिसचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी भारतातील नागरिकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, लठ्ठपणा, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यांचा अभ्यास केला. 2008 ते 2020 या कालावधीत एकूण पाच टप्प्यात हा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक टप्प्यात पाच राज्यात तर एका टप्प्यात ईशान्येकडील सात राज्यात संशोधकांनी अभ्यास केला. या अभ्यासकांनी एक लाख दहा हजारांपेक्षा अधिक लोकांचा अभ्यास केला. यामध्ये 20 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या स्त्री/पुरुषांचा समावेश होता. याआधी कोणत्याही देशाने अशा प्रकारचा अभ्यास केलेला नाही. देशातील सर्व राज्यांना सामावून घेणारा हा अभ्यास खरोखरच एक मैलाचा दगड आहे असे संशोधक व्ही. मोहन यांचे म्हणणे आहे. या अगोदर चीनमध्ये 40 हजार लोकांचा असा अभ्यास झाला होता. आज 10 कोटीपेक्षा अधिक मधुमेही आपल्या देशात आहेत. 2019 मध्ये हा आकडा 7 कोटी होता. मागील 3-4 वर्षात यामध्ये 3 कोटी मधुमेहींची भर पडली आहे हे जास्त चिंताजनक आहे. या अभ्यासानुसार सर्वाधिक म्हणजे 26.4 टक्के मधुमेही रुग्ण गोवा या छोट्याशा राज्यात आहेत. त्यानंतर पाँडेचरी, केरळ यांचा नंबर लागतो. उत्तरप्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात मधुमेहींची संख्या फक्त 4.8 टक्के इतकी आहे. अनेकांचा असा समज आहे की, मधुमेह हा आजार फक्त श्रीमंतांचा आहे. हे म्हणणे/समज चुकीचा आहे. मधुमेह हा बदललेली जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, चिंता अशामुळे होण्याची शक्यता अधिक असते. हा आजार गरीब/श्रीमंत असा भेदभाव करत नाही. मात्र शहरी आणि ग्रामीण असा भावभेद करतो असे संशोधन सांगते. शहरी भागात 16.4 टक्के लोकांना तर ग्रामीण भागात 8-9 टक्के लोकांना मधुमेह आहे.
आहारतज्ज्ञ तसेच डॉक्टर यांच्या म्हणण्यानुसार बदलते राहणीमान, शहरांकडे होणारे स्थलांतर, कामाच्या तासांतील अनियमितता, एका जागेवर बसून अनेक तास काम करणे, जेवणाच्या सवयीत झालेला बदल, फास्टफूडचा स्वीकार अशा काही कारणांमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. डायबेटिस होण्यापूर्वीची स्टेज म्हणजे ‘प्री-डायबेटिस’ (मधुमेहपूर्व स्थिती). या रुग्णांची संख्या ही साधारणपणे 13.6 कोटी इतकी आहे. हेच जास्त गंभीर आहे. प्री-डायबेटिस असलेल्या साधारण 1/3 लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते तर उर्वरित 2/3 लोकांना योग्य आहार, योग्य जीवनपद्धती, व्यायाम यामुळे प्री-डायबेटिसमधून सुटका होऊ शकते असे हे संशोधन सांगते.
मधुमेहामध्ये शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते, या वाढलेल्या साखरेमुळे शरीरामधील अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. शहरात या मधुमेहींना गंमतीने ‘साखर सम्राट’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ भारतात या साखर सम्राटांची संख्या वाढत चालली आहे ही नक्कीच आपली चिंता वाढविणारी गोष्ट आहे. भविष्यात ही संख्या कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात आहे. मधुमेहाला आपल्यापासून दूर पळवून लावण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करण्याची खर्या अर्थाने आवश्यकता आहे.
"There is nothing called 'problem', it's just absence of an idea to find solution" ही इंग्रजी म्हण/वाक्प्रचार आपण लक्षात ठेऊन अंमलात आणला तर मधुमेह नक्कीच दूर जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद !
चीनचा पहिला क्रमांक
जगात सर्वाधिक मधुमेह रुग्णांची संख्या चीनमध्ये आहे. (१४ कोटी) पूर्ण जगाचा विचार करता सन १९८० मध्ये जगात मधुमेहींची संख्या फक्त १.८ कोटी होती ती २०१४ मध्ये ४२ कोटी इतकी झाली. सोमालियामध्ये फक्त १% लोकांना मधुमेहाने ग्रासले आहे. आज २०२३ मध्ये जगातील मधुमेहींची संख्या ५३.७५ कोटीहून अधिक आहे. १४ नोव्हेंबर हा जगात 'डायबेटीस डे' म्हणून साजरा केला जातो. जगभरात मधुमेहींची संख्या वेधत आहे हा जगाच्या दृष्टीने चिंताजनक विषय आहे.