top of page

सिप (SIP) म्हणजे काय ?-श्री. उल्हास जोशी [ ऑगस्ट २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 29, 2023
  • 4 min read

Updated: Aug 5, 2023

सिप (SIP) म्हणजे काय ?

ree

श्री. उल्हास जोशी,पुणे

92268 46631




हल्ली गुंतवणुकीच्या क्षेत्रात SIP म्हणजे सिप या शब्दाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. जे लोक म्युच्युअल फंडांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात त्यांच्यांसाठी ‘सिप’ हा परवलीचा शब्द असतो. सिप करा सिप करा असा घोषा चालू असतो. या प्रकारची केलेली गुंतवणूक फायदशीर ठरते असे संगितले जाते.

(सिप) SIP याचा अर्थ ‘Systematic Investment Plan’ असा सांगितला जातो. याचा अर्थ शिस्तबद्ध किंवा नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक असा होतो. थोडक्यात एक रकमी गुंतवणूक न करता ती हप्त्याहप्त्याने करावी असे सुचवणारा हा शब्द आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीत थोडा जास्त फायदा मिळतो असे सांगितले जाते. अर्थात यात चुकीचे काही नसले तरी असा फायदा फक्त मार्केट Linked योजनांनाच मिळू शकतो. ज्या योजनांमध्ये व्याज मिळत असते त्या योजनांमध्ये असा फायदा मिळत नसतो.

मराठीत एक म्हण आहे की आडात असेल तर पोहर्‍यात येते. पण आडात पाणीच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार? वरील ‘सिप’ हा शब्द पोहर्‍यात पाणी कसे आणायचे हे सांगतो पण विहिरीत पाणी कसे आणायचे हे सांगत नाही.

माझ्या मते SIP म्हणजे ‘सिप’ चा खरा किंवा व्यवहार्य अर्थ ‘Savings and Investment Plan’ असायला हवा. याचा अर्थ बचत आणि गुंतवणुकीची योजना.

पुण्याच्या सीए. रचना रानडे, ज्या एक प्रसिध्द्ध यूट्यूब ब्लॉगर आहेत. त्यांनी सिपची व्याख्या Savings Investment and Prosperity अशी केली आहे.

बचत हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा पाया असतो किंवा असायला हवा.


बचत होते परंतु गुंतवणूक ज्ञान नाही

बचतीच्या क्षेत्रात भारतीय समाज हा जगातील चौथ्या क्रमांकाचा समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाला बचतीचे महत्त्व समजावून सांगायची गरज नाही. बचतीच्या क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिला आणि त्यातून गृहिणी जास्त आघाडीवर असतात असे आढळून आले आहे. घर खर्चासाठी दिलेल्या पैशांमधून काही पैशांची बचत करून ते पैसे धान्याच्या डब्यांमधून साठवून ठेवण्याची पूर्वपरंपरागत पद्धत अजूनही अनेक घरांमध्ये आजही वापरली जाते. अशाच एका गृहिणीने साठवलेल्या आणि धान्याच्या डब्यात साठवून ठेवलेल्या पैशांच्या जोरावर इन्फोसिस सारख्या कंपनीची स्थापना झाली हे अनेकांना ठाऊक आहे. पै-पै साठवून बचत केल्याची अनेक उदाहरणे मला ठाऊक आहेत. पण या पैशांचे पुढे काय होते? एकतर हे पैसे रोखीच्या स्वरूपात ठेवले जातात किंवा बँकेच्या Savings Bank Account मध्ये टाकले जातात किंवा सोने किंवा Property खरेदीसाठी वापरले जातात. अर्थात यात चुकीचे किंवा वावगे असे काही नाही. पण गुंतवणुकीचा मूळ उद्देश पैशांची वाढ होणे हा कितपत साध्य होतो हा प्रश्‍न आहे. कारण रोखीच्या पैशांमध्ये वाढ होत नसते. Savings Bank अकौंटचा व्याजदर अगदी किरकोळ असतो. बँक डिपॉझिटवर मिळणारा व्याजदर जरी जास्त असला तरी रुपयांचे होत असलेले अवमूल्यन लक्षात घेता या पैशांची सकारात्मक वाढ न होता नकारात्मक वाढ होत असते. सोने आणि प्रॉपर्टीवर मिळणारा फायदा हा आभासी स्वरूपाचा असतो. यांना किती परतावा मिळतो? महागाई वाढीच्या दराशी (Inflation) तुलना करता तो पुरेसा आहे का? चक्रवाढीचे महत्त्व याची त्यांना काही फारशी कल्पना नसते.

थोडक्यात यांचेकडे S म्हणजे Saving असते पण IP म्हणजे Investment Plan नसतो. यांच्या आडात भरपूर पाणी असते पण ते पोहर्‍यात कसे आणायचे हे ठाऊक नसते.


बचतीचे लक्ष्य महत्त्वाचे

याच्या उलट मला असे अनेक जण ठाऊक आहेत की ज्यांचेकडे अनेक उत्तम Investment Plans असतात. त्यांचा गाढा अभ्यास असतो. त्यांना स्टॉक मार्केट म्हणजे काय ठाऊक असते. म्युच्युअल फंड म्हणजे काय ठाऊक असते. चक्रवाढीचे महत्त्व ठाऊक असते. डोक्यात गुंतवणुकीच्या अनेक योजना तयार असतात. त्यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असते. फक्त त्यांची समस्या एकच असते. त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी लागणारे पैसे नसतात. त्यांच्याकडे एकतर बचत नसते आणि असल्यास अगदीच अपुरी असते. त्यांचे बहुतेक इन्कम कर्ज फेडीच्या मासिक हप्त्यांमध्ये, ज्याला EMI (ईएमआय) म्हणतात, त्यात खर्च होत असते. बहुतेक हाय इन्कमवाल्यांची हीच कथा असते. त्यांच्याकडे बचतीची कोणतीही योजना नसते. बचत करणे म्हणजे कंजूषपणाने राहणे असे त्यांना वाटत असते. रोज 1 रुपयापासून बचतीला सुरुवात करून 15 दिवसांत 32 हजार रुपयांपर्यंत बचत करणे शक्य असते हे यांच्या गावीही नसते. काही लोक पैसे उधार घेऊन किंवा कर्ज काढून गुंतवणूक करताना दिसतात पण अशी गुंतवणूक कधीच फायदेशीर ठरत नसते. थोडक्यात यांना पोहर्‍यात पाणी कसे आणायचे हे ठाऊक असते पण यांच्या आडातच पाणी नसते आणि असल्यास फारच कमी असते.

नुकतेच पुण्यामध्ये ‘सकाळ मनी’ या मासिकातर्फे कोटक महेंद्र म्युच्युअल फंडाचे प्रमुख निलेश शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहा सरांना प्रश्‍न विचारला की त्यांचे मते ‘सिप’ चा योग्य अर्थ काय असायला हवा. त्यांनी जे उत्तर दिले ते मला भावले आणि आवडले. त्यांनी सांगितले की ‘SIP सिप‘ ची SEBI सेबीने केलेली व्याख्या ‘Systematic Investment Plan’ अशीच आहे आणि तीच त्यांना वापरावी लागते. ज्यावेळी ‘सिप’ या कल्पनेची सुरुवात झाली त्यावेळी गुंतवणूकदारांसाठी सिप हा Systematic Investment Plan च होता, त्यावेळी बहुतेक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडच्या इक्विटी फंडाला प्राधान्य दिले जो स्टॉक मार्केटशी निगडीत असतो. पण त्या वेळी स्टॉक मार्केटची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्यामुळे चांगले रिटर्न्स किंवा परतावा मिळाला नाही. त्यामुळे अनेकजण सिपमधून बाहेर पडले. पण ज्यांनी सिप चालू ठेवले त्यांचेसाठी सिप हा ‘Savings and Investment Plan’ ठरला. आता स्टॉक मार्केटची कामगिरी बरीच सुधारली आहे. त्यामुळे आताच्या घडीला सिप हे Saving,Investment and Prosperity ठरले आहे. थोडक्यात सिपची तिन्ही रुपे कालमानाप्रमाणे बदलणारी आहेत.

ज्यांनी खर्‍या अर्थाने Savings and Investment या SIP (सिप) चा उपयोग केला आणि ज्यांना खर्‍या अर्थाने Savings, Investment आणि Prosperity मिळाली असे एक उदाहरण मला सापडले आहे.


गुंतवणुकीचे लक्ष्य दीर्घकाळ ठेवा

काही वर्षांपूर्वी माझी अमेरिकेत एका सरदारजी जोडप्याची ओळख झाली. त्यांच्या एकूण पोषाखावरून ते गरीब मध्यमवर्गीय परिस्थितीतून आले असावेत असे मला वाटले. माझा तर्क खरा ठरला. ते चतुर्थ किंवा तृतीय श्रेणी सरकारी कर्मचारी होते. सरदारजींचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत तर त्यांच्या सौ. चे शिक्षण आठवीपर्यंत झालेले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाला इंजिनिअर केले जो पुढे अमेरिकेत आला. मुलीला सीए केले आणि तिचे थाटात लग्न लावून दिले. अमृतसरला 1 कोटी रुपयांचे घर बांधले. असे असूनही त्यांचेकडे 1 ते 1.5 कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स होता. हे कसे शक्य झाले असे मी त्यांना विचारले. त्यांनी सांगितले सर्व प्रथम त्यांनी बचतीचे टार्गेट ठेवले. कमीत कमी 20 टक्के बचत ही व्हायलाच पाहिजे असे ठरवले. जेव्हा सरदारजींचा पगार वर्षाला 50 हजार रुपये होता तेव्हा 40 हजार रुपयेच पगार मिळणार आहे असे समजून खर्चाचे प्लॅनिंग व्हायचे. जसजसा पगार वाढत गेला, बचत वाढत गेली. या बचतीची गुंतवणूक ज्या योजनानमध्ये चक्रवाढ व्याज मिळेल अशाच योजनांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. चक्रवाढ व्याज हा परवलीचा शब्द ठरला. गुंतवणुकीचे लक्ष दीर्घकाळ ठेवले. जेव्हा गरज पडेल तेव्हाच हात लावायचे ठरवले. या बचतीच्या जोरावर ते आपल्या मुलांचे उत्तम शिक्षण करू शकले, मुलीचे थाटात लग्न लावून देऊ शकले, अमृतसरला कोठी म्हणजे घर बांधू शकले. वर भरभक्कम बँक बॅलन्स ठेवून आहेत. हा साधारणपणे 2007 किंवा 2008 सालचा किस्सा आहे.

यावरून काय धडा घ्यायचा, धडा घ्यायचा, की घ्यायचा नाही; SIP म्हणजेच सिप चा वापर करून, बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक भरभराट करून घ्यायची की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे.

...




 
 
bottom of page