top of page

हँडबुक ऑन क्रेडिट मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग अँड बॅलन्सशीट अ‍ॅनॅलिसिस [ऑगस्ट 2023]

  • Vyapari Mitra
  • Aug 7, 2023
  • 2 min read

हँडबुक ऑन क्रेडिट मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग अँड बॅलन्सशीट अ‍ॅनॅलिसिस

ree

पुस्तकाचे शीर्षक स्वयंस्पष्ट आहे. बँकिंग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील अशा तीन पैलूंचे विस्तृत समालोचन या पुस्तकात केलेले आहे. ऋण-प्रबंधन, आर्थिक नियोजन व ताळेबंद-पृथक्करण या विषयांची इत्यंभूत माहिती या पुस्तकात मिळते. हे तीनही विभाग बँक अधिकार्‍यांसाठी जसे महत्त्वाचे आहेत तसेच ते बँक ग्राहकांच्याही उपयोगाचे आहेत. बँकिंग क्षेत्रात ‘करियर’ करू इच्छिणार्‍या नव-नियुक्त बँक अधिकार्‍यांना कर्जाच्या अर्जाची छाननी कशी करावी, अप्रेजल नोट लिहून कर्ज मंजूर करताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा ते कर्ज वितरित करेपर्यंतच्या सगळ्या चाचण्यांबद्दल सर्वसमावेशक माहिती अगदी तयार स्वरूपात या पुस्तकात दिलेली आहे. कर्ज मंजुरीनंतर त्याचे मॉनिटरिंग कसे करावे, याचेही मार्गदर्शन या हँडबुक मध्ये दिलेले आहे.

सध्या बँकिंग क्षेत्राला गैर निष्पादित संपत्ती, अर्थात नॉन परफार्मिंग अ‍ॅसेट (एन.पी.ए.) च्या प्रश्‍नाने जेरीस आणले आहे. एखादे कर्ज एनपीए होते याची अनेक करणे असतात. या पुस्तकातील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास व अवलंब केल्यास कर्ज खाती एनपीए होण्याच्या शक्यता बर्‍याच अंशी कमी होतील इतकी प्रभावी सामग्री या पुस्तकात दिलेली आहे. प्रत्येक बँक अधिकार्‍याने तसेच प्रत्येक बँक ग्राहकाने या पुस्तकाचे वाचन केल्यास बँकिंग उद्योगाला ‘बरे’ दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.

या पुस्तकाची भाषा इंग्रजी असली तरी अत्यंत सुलभ व सोप्या शब्दांचा वापर केल्यामुळे प्रत्येक संकल्पना स्पष्ट होण्यास कोणतीही अडचण वाटत नाही. उदाहरणार्थ ‘एसएसएसई’ ही बँकिंग क्षेत्रात नव्याने दाखल झालेली संकल्पना आहे. लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत त्याबद्दलचे निरूपण केलेले आहे. पूर्वी ‘लघुउद्योग’, ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ व मध्यम स्वरूपाचे उद्योग म्हणून प्रचलित असलेल्या सर्व उद्योगांना ‘एमएसएमई’ या एकाच शीर्षकांतर्गत ओळखले जाते. यावरील विवेचन अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

प्रत्येक बँकेने हे पुस्तक आपल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी अधिकृत करावे, इतके हे पुस्तक उपयुक्त आहे.


लेखक : श्री. व्ही.एस. व्यास (निवृत्त बँकर) मोबाईल : 78756 89918
प्रकाशक : मारुती ग्रुप, जी-73,
भोसले-शिंदे आर्केड, जे.एम. रोड, डेक्कन जिमखाना, पुणे 411 004 फोन - 93262 09049
पृष्ठसंख्या : 112; मूल्य : रु. 290

...


 
 
bottom of page